News Flash

‘सु’संस्कृत

शाळेपासून संस्कृत टाळणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र इथे संस्कृत अनिवार्य आहे.

‘सु’संस्कृत

मितेश जोशी

१९६९ पासून दर वर्षी श्रावण शुद्ध पौर्णिमेचा म्हणजेच नारळी पौर्णिमेचा दिवस हा ‘संस्कृत दिन’ म्हणून साजरा केला जातो. ‘भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाणभारती’ म्हणून जिचा गौरव केला जातो, अशा संस्कृत भाषेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. परदेशी भाषा शिकून बख्खळ पगाराच्या नोकरीवर विराजमान होण्याचा सध्याचा काळ आहे. परंतु या स्पर्धात्मक व आधुनिक युगात संस्कृत भाषेत शिक्षण पूर्ण करून याच भाषेशी संबंधित क्षेत्रात नोकरी करणाऱ्या व विविध विषयांवर अभ्यास करणाऱ्या तरुणांची संख्यादेखील लक्षणीयरीत्या वाढते आहे..

‘संस्कृत म्हणजे व्याकरणाच्या संस्कारांनी परिशुद्ध केलेली भाषा होय’. संस्कृत ही अनेक भारतीय भाषांची आई आहे. परदेशी भाषांशी तिचे कमालीचे साम्य दिसून येते. संस्कृत भाषेमध्ये असलेल्या विशाल वाङ्मयाची व्याप्ती लक्षात घेतली असता मन थक्क होते. वेदापासून ते आधुनिक कालापर्यंतचे हे साहित्य अनेकविध विषयांचा परामर्श घेणारे आहे. ‘संस्कृतोच्छिष्टं जगत्सर्वम्।’ असे म्हटल्यास काहीही वावगे ठरणार नाही. इतिहास, तत्त्वज्ञान, साहित्यशास्त्र, पुराकथा, गणित, भौतिकविज्ञान, रसायन, वनस्पतिशास्त्र या सर्वाविषयी विपुल ग्रंथसंपदा संस्कृत भाषेमध्ये आहे. त्यामुळेच ज्ञानभाषा म्हणून तिचा गौरव केला जातो. अशा या ‘देववाणीत’ करिअरची गुंतवणूक करणारे तरुण दिवसेंदिवस वाढत आहेत.

आजच्या तरुण मुलांचे पाय संस्कृतकडे वळण्यामागे अनेक कारणं आहेत. काही वेळा गुरू उत्तम लाभतात म्हणून काही मुलं संस्कृतकडे वळतात. काही मुलांना शाळेतच संस्कृतची गोडी लागते व पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर कुतूहल म्हणून संस्कृत स्वीकारतात. तर काही मुलांची संशोधकवृत्ती त्यांना संस्कृतकडे खेचून आणते. टेलिव्हिजनवरील पौराणिक व ऐतिहासिक मालिकांमुळेही संस्कृतची रुची निर्माण होते. मधल्या काळात झी मराठी वाहिनीवरील ‘जय मल्हार’ या मालिकेमुळे अनेक तरुण मुलं आपल्या नजीकच्या विद्यापीठात जाऊ न संस्कृत भाषेच्या शिकवणीवर्गात भरती झाले होते. अशा या देववाणीचा प्रसार इंटरनेटचा हात धरूनदेखील केला जातोय. संहिता जोशी व राहुल डोळस यांनी सुरू केलेल्या ‘ओपन पाठशाला’चं आपण इथे उदाहरण घेऊ  गणित, विज्ञान व इतर अनेक विषयांच्या ई-लर्निगची सोय आहे. परंतु केवळ संस्कृतचं ई-लर्निग कुठे नाही, या विचारातून ‘ओपन पाठशाला’ची कल्पना आली. सप्टेंबर २०१४ मध्ये ‘ओपन पाठशाला’च्या कामाला सुरुवात झाली. आणि जानेवारी २०१५ मध्ये क्लासेस सुरू करण्यात आले. केवळ भारतातूनच नाही तर परदेशातूनदेखील या ओपन पाठशालेला उदंड प्रतिसाद मिळतो आहे. अकरावीत केवळ संस्कृत भाषेसाठी कलाशाखेकडे वळलेल्या संहिताने पाणिनीय व्याकरणाचा अभ्यास डॉ. मल्हार कुलकर्णी यांच्याकडे केला आहे. संस्कृतभाषेचा प्रसार करणाऱ्या या ‘ज्ञानदा’ला संस्कृतभाषेचे नाना पैलू ओपन पाठशाळेत कोर्सेसच्या माध्यमातून उलगडायचे आहेत.

मराठी रंगभूमीसाठी अनेक कलावंतांनी स्वत:ला झोकून दिलं. असाच एक तरुण संस्कृत रंगभूमीवर एक नवा आविष्कार करू पाहतोय. ज्याचं नाव आहे डॉ. प्रसाद भिडे. २००१ पासून संस्कृत रंगभूमीवर काम करणारा प्रसाद अभिनेता-दिग्दर्शक व आता लेखक अशा तिन्ही धुरा खूप कमी वयात अप्रतिमरीत्या पेलतो आहे. माटुंग्याच्या रुईया महाविद्यालयात अकरावीला असताना ‘शाकुंतल’ नाटकात (संस्कृत) त्याला अभिनयाची संधी मिळाली. हे नाटक त्या वेळी मुंबई महाविद्यलयाच्या युथ फेस्टिव्हलमध्ये चक्क दुसरं आलं. प्रसादने प्रभाकर भातखंडेंकडे संस्कृत नाटकाचे धडे गिरवले. मुंबई विद्यापीठ युथ फेस्टिव्हल, फग्र्युसन महाविद्यालय अंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा, पुणे व महाराष्ट्र राज्यनाटय़ स्पर्धा (संस्कृत विभाग) या तिन्ही नामांकित स्पर्धामध्ये प्रसाद दर वर्षी सहभागी होतो. प्रसादच्या कामाचं वेगळेपण म्हणजे आतापर्यंत सादर केलेली संस्कृत नाटकं असो अथवा १० मिनिटांचं संस्कृत स्किट असो ते कुठल्याही जुन्या घटनांवर भाष्य करणारे नसून ते आजच्या काळातील घटनांना अनुरूप असतं. आजच्या काळात घडणाऱ्या घटनांचा धावता आढावा आपल्याला प्रसादाच्या नाटकातून घेता येतो. संस्कृत रंगभूमीवरचं पहिल आव्हान म्हणजे ‘ग्लॅमर नसताना प्रेक्षकांना आकर्षित करणे तर दुसरं आव्हान म्हणजे संस्कृत भाषा न कळणाऱ्या प्रेक्षकांपर्यंत नाटकाचा आशय पोहोचवणं आणि तिसरं आव्हान म्हणजे संस्कृत भाषा येत नसतानादेखील हा विषय संस्कृतमध्ये बघण्यात मजा आहे ही भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे आहे, असे तो म्हणतो. सध्या प्रसाद ‘के .जे. सोमैया महाविद्यालयात संस्कृत प्राध्यापक आहे. मुलांना संस्कृत भाषेची व साहित्याची गोडी लावण्यात तो पटाइत झाला आहे. भाषाशास्त्राचा अभ्यासक असणाऱ्या प्रसादचा शोधनिबंध नुकताच ब्रिटिश कोलंबिया युनिव्हर्सिटीने स्वीकृत केला होता. भविष्यात संस्कृत भाषेत कसदार संहिता लिहिण्याचं, आधुनिक संस्कृत रंगभूमी उभारण्याचं प्रसादचं स्वप्न आहे.

आजच्या युगात तंत्रशास्त्राकडे बघण्याची लोकांची दृष्टी निराळी आहे. आजदेखील लोकांना तंत्रशास्त्र म्हटलं की, जादूटोणाच दिसतो मात्र त्यातील ज्ञान व मंत्रसामर्थ्य अगाध आहे. ‘ओम गं गणपतये नम:’ असो किंवा अन्य कोणत्याही बीजमंत्राचे पठण असो, लोक नित्यनियमाने करतात. पण या मंत्राचा अर्थ काय? या मंत्रपठणाने कोणती सिद्धी प्राप्त होते? याचा सखोल अभ्यास कोणीच करत नाही. परंतु या शास्त्राचं कुतूहल पुण्याच्या गौरी मोघेला होतं. गूढ अर्थाच्या शब्दाच्या समूहांचा अभ्यास करताना एका एका मंत्रांचा अर्थ गौरीला कळत गेला. एक एक गूढ जसं उलगडत गेलं तशी ती या शास्त्राकडे ओढली गेली. तंत्रशास्त्राचा गाढा अभ्यास तिने केला. आजच्या युगातील तरुणांनी तंत्रशास्त्राचा अभ्यास का करावा?, या प्रश्नावर गौरी म्हणाली, ‘एक चांगला समाज तयार होण्यासाठी एक चांगली विचारप्रणाली तयार करावी लागते. आणि तो चांगला विचार करण्याची प्रेरणा आपल्याला तंत्रशास्त्र देते. सगळ्याच गोष्टी गुगलवर मिळत नाहीत. काही गोष्टी या मेहनत करून वाचून, विचार करून मिळवाव्या लागतात. तंत्रशास्त्रातील मंत्रांचा अर्थ शोधून काढताना मेंदूचा व बुद्धीचा खूप विकास होतो. त्यामुळे सर्वानी तंत्रशास्त्राचा स्वविकासासाठी जरूर अभ्यास करावा,’ असं ती म्हणते. चारशे बीजमंत्रांचा गाढा अभ्यास केलेल्या गौरीने ‘दुर्गासप्तशतीच्या बीजमंत्रां’मध्ये पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. लवकरच तिच्या अभ्यासाचा काही भाग आपल्याला पुस्तक रूपात वाचायला मिळणार आहे.

काही विद्यापीठांमध्ये इतर क्षेत्रांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील संस्कृत भाषा ही अनिवार्य करण्यात आली आहे. शाळेपासून संस्कृत टाळणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र इथे संस्कृत अनिवार्य आहे. अशा वेळी या भाषेची भीती मनातून घालवून भाषेचं माधुर्य विद्यार्थ्यांसमोर खुलवणं हे प्राध्यापकांसाठी मोठं आव्हान असतं. आजकाल उच्चशिक्षण घेऊ न बंगलोरला नामांकित व बडय़ा पगाराच्या नोकरीसाठी स्थलांतरित होण्याचा एक ट्रेंड आहे. वरळीचा मनीष वाळवेकर हा बंगलोरला बी.टेक. आणि एम. टेक.च्या मुलांना कल्चरल स्टडी आणि संस्कृत शिकवण्यासाठी स्थलांतरित झाला आहे. बंगलोरमधील अमृता विश्वविद्यापीठामधून मनीषला ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर स्पिरिच्युअल स्टडीज’ या विभागांतर्गत साहाय्यक प्राध्यापकाची संधी चालून आली. क्षणाचाही विलंब न करता त्याने ती संधी स्वीकारली. मनीषकडे तेलगू भाषिक विद्यार्थी अधिक आहेत. संस्कृत भाषेमुळे मुलांमध्ये संशोधक वृत्ती निर्माण होते. प्राध्यपकांसमोर विषय मांडतानादेखील  त्याच्यावर प्रचंड मेहनत घेऊ न अनेक पुस्तक चाळून ते संशोधन करतात, असं मनीष सांगतो.

यतो हस्तस्ततो दृष्टि: यतो दृष्टिस्ततो मन:।

यतो मन: ततो भाव: यतो भावस्ततो रस:।।

कथ्थक व संस्कृत या दोघांचा सुवर्णमध्य साधून समाजात आपली एक आगळीवेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अनन्या गोवात्रीकरला लहानपणापासूनच संस्कृत भाषेची आवड होती. संस्कृत विषय घेऊ न रुईया महाविद्यालयात शिक्षण पूर्ण करत असतानाच ती कथ्थकचे धडे गिरवत होती. संस्कृत शास्त्रसंपदांमधील रसशास्त्र व काव्यशास्त्र या दोन शास्त्रांचा अभ्यास ती कॉलेजमध्ये साहित्याच्या दृष्टिकोनातून तर कथ्थकमध्ये अविर्भावाच्या दृष्टिकोनातून करत होती. दोन्ही ज्ञानांचा पुरेपूर वापर करून त्याचा सुवर्णमध्य साधण्याचं काम अनन्याने केलं. संस्कृत महाकाव्यांना रंगमंचावर भव्यदिव्य स्वरूपात आणण्याचा तिचा मानस आहे. संस्कृत भाषा स्वीकारून त्याच्या शास्त्रसंपदेचा अभ्यास करून आज अनेकविध क्षेत्र धुंडाळणारे तरुण दिसताहेत. कॉलेज तरुण संस्कृत एकांकिकांमध्ये सहभाग घेत आहेत. परदेशी भाषांच्या या चलनी नाण्यात संस्कृतचं हे नाणं नेहमीच खणखणीत असणार आहे. कारण संस्कृत भाषेचं गौरवपर सुभाषितच तसं आहे.

यावद्भारतवर्ष स्याद्

यावद्विन्ध्यहिमालयौ।

यावद्गङ्गा च गोदा च

तावत्स्थास्यति संस्कृतम् ॥

जर सर्वानीच संस्कृत शास्त्रसंपदांचा थोडाफार स्वत:च्या ज्ञानात वृद्धी करण्यासाठी अभ्यास सुरू केला तर नक्कीच समाज ‘सु’संस्कृत होईल..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 24, 2018 1:20 am

Web Title: sanskrit language narali purnima festival
Next Stories
1 भावंड दिन..
2 नया है यह : वेअर लिपस्टिक
3 ‘जग’ते रहो : चिनी भिंतीच्या पलीकडून..
Just Now!
X