सोशल मीडियाच्या या ‘व्हायरल’ युगात एखादं अ‍ॅप गाजलं, की त्याच प्रकारचं दुसर अ‍ॅप लगेच बाजारात प्रकट होतं. असंच काहीसं सध्या अ‍ॅप्सच्या गर्दीत मोस्ट पॉप्युलर मुंडा असलेल्या ‘साराहाह’ (sarahah) अ‍ॅपचं झालं आहे. ‘से अ‍ॅट मी’ (SayAt.me) या अ‍ॅपच्या गाजलेल्या वादळानंतर ‘साराहह’ या अ‍ॅपने बरीच लोकप्रियता मिळवली आहे. बोलो साराहाह.. असं म्हणतच या अ‍ॅपने अनेकांना आपला चेहरा लपवून बोलतं केलं आहे. साराहह या अ‍ॅपवरती आपल्याला स्वत:चा एक आयडी तयार करावा लागतो. तो आयडी सगळ्यांना शेअर केल्यानंतर ‘त्या’ सगळ्यांना या आयडीवर जे लिहायचं आहे ते लिहायला छूट मिळते. शिवाय, हे लिहीत असताना आपण कोण आहोत हे लपवायची सुविधा अ‍ॅपवर असल्याने ज्याला लिहिलंय त्याला हे कोणी लिहिलंय ते कळत नाही. त्यामुळे याचा प्रत्यक्ष मनमोकळेपणे न बोलता येणाऱ्यांना, काही मनातलं बोलायचं असणाऱ्यांना, राग, प्रेम काहीही व्यक्त करायचं असलेल्यांना खूप फायदा झाला आहे.

तरुणाई ही या अ‍ॅपकडे कशी वळली, याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला असता अनेकांनी केवळ उत्सुकतेपोटी या अ‍ॅपची सुरुवात केल्याचे लक्षात आले. हा अ‍ॅप वापरणारा निनाद म्हैसाळकर म्हणतो, मला सुरुवातीला या अ‍ॅपविषयी काहीही इंटरेस्ट वाटला नाही; पण सोशल मीडियावरच्या पोस्ट बघून मलासुद्धा हा अ‍ॅप वापरावा असं वाटलं. माझा मते मला लोक थोडे घाबरतात. त्यामुळे पटकन माझ्याशी बोलत नाहीत. म्हणून मी विचार करून या अ‍ॅपवर माझा आयडी बनवला आणि बघता बघता धडाधड रिप्लाय यायला लागले. कोणी माझ्या आवाजाची तारीफ करत होतं, तर कोणी माझावरच्या प्रेमाचा इजहार करत होतं. सगळं वाचून फार आनंद वाटला, कारण इतके दिवस ज्यांना माझ्याविषयी बोलायचं होतं; पण माझ्या रागीट स्वभावामुळे ते माझ्यापर्यंत पोहोचत नव्हते. त्यांच्या सगळ्यांच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या, असं निनादने सांगितलं. तर एरवीही बोलक्या स्वभावाच्या काजल घायवटला या अ‍ॅपमुळे मजेशीर अनुभव आले. ‘‘साराहाहवरचे रिप्लाय वाचून असं वाटलं की, खरंच आपले इतके फॅन आहेत की काय आणि ते बघून उगाच मी हुरळून गेले; पण खरं तर आपलेच मित्र आपली मज्जा घेत असतात.’’ रिप्लायवरून मग अजून ते आपली खेचतात, मज्जा घेतात हे लक्षात आल्याचं काजलने सांगितलं.

अनेक मुलांना या अ‍ॅपचे मजेशीर, तर काहींना वाईट अनुभवही आले आहेत. काहींच्या रिप्लायमध्ये चक्क शिव्यांचा, नकारात्मक विचारांचाही वर्षांव झाला आहे. असे रिप्लाय आलेल्यांनी मात्र लगेच अकाऊंट बंद करायलाच पसंती दिली आहे हेही निदर्शनास आलं. अ‍ॅप वापरणाऱ्यांची ही तऱ्हा आहे, तर अजूनही अनेक जण आहेत ज्यांनी हे अ‍ॅप्स वापरलेले नाहीत. मात्र सतत या अ‍ॅपची चर्चा ऐकल्याने त्याचा वापर करावा, असा विचार विक्रांत खरातसारख्या अनेक तरुणांच्या मनात घोळतो आहे. ‘‘मी सगळीकडे साराहाहबद्दल बघतोय, ऐकतोय; परंतु नीट पूर्णपणे मला याची माहितीच नाही. म्हणून मी अजूनही हे अ‍ॅप वापरायला सुरुवात केलेली नाही. कोणी सांगतं की, आपला आयडी बनवून मित्रांना द्यायचा आणि मग ते आपल्याला रिप्लाय देणार. तर कोणी अजून काही तरी भलतंच सांगतं; पण बाकीच्यांचं बघून मलाही आता हे अ‍ॅप वापरायला हवं असं वाटतं आहे,’’ असं विक्रांत म्हणतो. ‘से अ‍ॅट मी’पेक्षा ‘साराहाह’ गाजण्यामागे तांत्रिक कारण पुढे केलं जातं आहे. ‘से अ‍ॅट मी’वर आपल्याला आलेले मेसेज शेअर करण्याचा पर्याय नव्हता. स्क्रीन शॉट काढून ते शेअर करावे लागत होते. त्याऐवजी यात थेट शेअर करण्याचा पर्याय असल्याने हे चेहरे नसलेले मेसेजेस विनाकारण फेसबुक आणि इतर माध्यमांवर मिरवले जात आहेत. ‘साराहाह’ किंवा ‘से अ‍ॅट मी’ या अ‍ॅप्सची गुणवत्ता काहीच नाही, त्याचे फायदे म्हणण्यापेक्षा तोटे अधिक आहेत. मात्र याचा विचार न करता सध्या तरी हे अ‍ॅप आपलंसं करण्याकडेच अनेकांचा कल वाढतो आहे.

viva@expressindia.com