तेजश्री गायकवाड – viva@expressindia.com

फेस्टिव्हल फॅशन म्हणून नावारूपाला आलेले कपडे ट्रेंडी तर आहेतच पण सणापुरते अंगावर आणि बाकीचे दिवस कपाटात असं यांच्याबाबतीत करण्याची गरज भासत नसल्याने हा इंडो-वेस्टर्न फॅशन अवतार सध्या भलताच ट्रेंडिंग आहे. साडी, सलवार-कमीज अशा वेगवेगळ्या प्रकारांत नेमके काय फॅशन प्रयोग करता येतील याची एक झलक..

श्रावण महिना संपतो न संपतो तशी मोठमोठय़ा सणांची एकच रांग लागते. त्यामुळे गणेशोत्सव, नवरात्र, दसरा असे सगळे सण साजरे केल्यानंतर दिवाळीची तयारी काय, हा मोठा प्रश्न उरतोच. बाकीच्या दिवशी कितीही वेस्टर्न कपडे घालणारे आपण सणावाराला मात्र पारंपरिक कपडेच घालणं पसंत करतो. मात्र हल्ली पारंपरिक कपडय़ांनाही वेस्टर्न साज चढवण्याचं वेडच फॅशनिस्टांमध्ये घुमतंय. आणि हे फेस्टिव्हल फॅशन म्हणून नावारूपाला आलेले कपडे ट्रेंडी तर आहेतच पण सणापुरते अंगावर आणि बाकीचे दिवस कपाटात असं यांच्याबाबतीत करण्याची गरज भासत नसल्याने हा इंडो-वेस्टर्न फॅशन अवतार सध्या भलताच ट्रेंडिंग आहे. साडी, सलवार-कमीज अशा वेगवेगळ्या प्रकारांत नेमके काय फॅशन प्रयोग करता येतील याची एक झलक..

साडी

पारंपरिक कपडे म्हटलं की साडीचा पहिला क्रमांक लागतो. साडीमध्ये जसे अनेक प्रकार आहेत तसेच साडी नेसण्याचेही अनेक प्रकार आहेत. आणि यंदा त्या प्रकारात फॅशन डिझायनर्सनी अनेक वेगवेगळे प्रयोग केलेले बघायला मिळताहेत. साडी नेसणं म्हणजे खरं तर एक मोठा सुंदर कपडा अंगाभोवती छान पद्धतीने ड्रेप करणं. या ड्रेपिंग स्टाइलमध्ये तुम्ही थोडा जरी बदल केला तरी तुम्हाला नवीन लुक सहज मिळू शकतो. फॅशनविश्वचे चक्र पुन्हा फिरून जुन्या काळातील फॅशनकडे वळतेच. फक्त जुनी फॅशन नव्याने येताना त्यात काही तरी नवीन एलिमेंट असतो. अशा प्रकारे साडीमध्येही ऐंशी आणि नव्वदच्या दशकातील ट्रेंड पुन्हा आला आहे. त्या काळातील सिल्कच्या साडय़ांना थोडा नवीन टच देऊ न अनेक डिझायनर्सनी वेगवेगळ्या प्रकारे साडी बाजारात आणली आहे. सिल्कची साडी म्हटलं की हेवी आणि शाइनी कापड, ब्राइट रंग असं रूप डोळ्यासमोर येतं. पण आता आलेल्या फॅशननुसार थोडी कमी शाइन असलेलं सिल्क आणि स्काय ब्ल्यू, पोपटी रंग, पिंक असे ट्रेंडमध्ये असणारे रंग फॅशनमध्ये आहेत. पूर्ण साडीपेक्षा फक्त साडीच्या पदरावर सिल्कची बॉर्डर केलेल्या साडय़ा या फेस्टिव्ह सीझनमध्ये ट्रेंडमध्ये असणार आहेत.

सलवार कमीज

साडी नंतर पंजाबी ड्रेस, अनारकली ड्रेस, कुर्ती लेगिंग अशाच आऊटफिटला पसंती असते. यामध्ये बेसिक पटियाला सलवार आणि त्यावरती घातली जाणारी शॉर्ट कुर्ती किंवा कमीज नेहमीच ट्रेंडमध्ये असते. पण यंदा हीच पटियाला सलवार वेगळ्या रूपात म्हणजेच धोती पॅन्टसच्या रूपाने बाजारात आली आहे. धोती पॅन्ट्सची फॅशन काही वर्षांपूर्वी बाजारात आली होती. आता तीच फॅशन थोडा हटके लुक घेऊ न पुन्हा ट्रेंडमध्ये आली आहे. या धोती पँट्सवरती तुम्ही क्रेप, पारंपरिक टॉप, कुर्ती, केप, फ्रंट आणि साइड कट कुर्ती घालू शकता. याखेरीज नेहमीप्रमाणे लेगिंग्जवरती शॉर्ट लेंग्थ ते अगदी अँकल लेंग्थपर्यंतची कुर्तीही ट्रेंडमध्ये आहे. कुर्ती आणि स्ट्रेट पँट्सचाही पर्याय नक्की ट्राय करून बघा.

इंडोवेस्टर्न फॅशन गाऊन्स

गाऊन्स म्हणजे आपल्या डोळ्यासमोर सगळे वेस्टर्न लाँग ड्रेस, रेड कार्पेटवरची फॅशनच आठवते. पण या वर्षी रोजच्या वापरातही वेस्टर्न साधे वनपीस आणि गाऊन ट्रेंडमध्ये आहेत. मग या गाऊन्सना पारंपरिक साज मिळणार नाही असं होणं शक्यच नाही. बाजारात पारंपरिक गाऊन्सही इंडियन गाऊन्स या नावाने उपलब्ध आहेत. आणि हे गाऊन्स छोटे ते मोठे असे कोणत्याही वयोगटाच्या पसंतीला उतरलेले आहेत. गाऊन्समध्ये कॉटन, बोल्ड, शायनी मटेरियल, नेट अशा कपडय़ांबरोबरच  सिल्कचे वेगवेगळे प्रकार, खादी, कांजीवरम आणि अगदी वेल्वेटसारखा लुक देणारे कापड फॅशन कलेक्शनमध्ये आले आहेत. या गाऊन्सवर केली जाणारी एम्ब्रॉयडरी हे खास आकर्षण असतं. अशा गाऊन्सवर आपल्याला काही खास ज्वेलरी घालायचीही गरज भासत नाही. हे इंडियन गाऊन्स वेगवेगळ्या सिल्हाऊट्स आणि रंगांमध्ये बाजारात आहेत.

प्लाझो आणि कुर्ती – टॉप

फेस्टिवल सीझन असला तरी आपलं ऑफिस, कॉलेज किंवा अनेक दुसरी कामं सुरूच असतात. अशा वेळी आपल्याला पारंपरिक कपडे तर घालायचे असतात पण यासोबतच प्रवास करताना, धावपळ करताना कम्फर्ट देईल असेच कपडे हवे असतात. यासाठी ट्रेंडमध्ये असणारी प्लाझो आणि कुर्ती किंवा टॉप तुम्ही घालू शकता. साधी ब्राइट रंगाची प्लाझो आणि त्यावर फ्रंट कट कुर्ती, स्ट्रेट कट कुर्ती, शॉर्ट कुर्ती, असमान हेमलाइन असलेली कुर्ती ट्रेंडमध्ये आहेत. अशाच प्रकारे  पारंपरिक हातमागावरील कपडय़ांपासून बनवलेल्या प्लाझो पँट्स, साडीपासून बनवलेली प्लाझो यावर तुम्ही वेस्टर्न टॉप घालू शकता. वेस्टर्न टॉपमध्ये क्रॉप टॉप, वेस्टर्न शर्ट, प्लेन टीशर्ट, केप असे अप्पर गारमेंट्स घालू शकता. या स्टाईलवरती तुम्ही स्टेटमेंट ज्वेलरी, बोल्ड नेकपीस, मोठे कानातले घालून लुक पूर्ण करू शकता.

टॉप आणि स्ट्रेट पँट्स

स्ट्रेट पँट हा प्लाझोचाच छोटा प्रकार आहे. स्ट्रेट पँट्स आणि वेस्टर्न टॉपही ट्रेंडमध्ये आहेत. स्ट्रेट पँट्सवर तुम्ही पारंपरिक प्रिंट असेलेला टॉप, क्रॉप टॉप घालू शकता. या लुकवर लाँग किंवा शॉर्ट जॅकेट्स घालून हटके लुक मिळवू शकता. टॉप आणि स्ट्रेट पँट्सवर तुम्ही ओढणीही वेगवेगळ्या पद्धतीने ड्रेप करू शकता.

टॉप आणि स्कर्ट

फेस्टिवल सीझनमध्ये हमखास स्कर्ट घातले जातात. पारंपरिक स्कर्टवरती वेस्टर्न टॉप किंवा वेस्टर्न स्कर्टवर पारंपरिक टॉप असं कॉम्बिनेशन वापरू शकतो. पारंपरिक प्रिंट्स किंवा कापडापासून बनवलेला स्कर्ट आणि त्यावरती केप, शर्ट, ऑफशर्ट टॉप, कोल्ड स्लीव्ह टॉप घालू शकता. आणि वेस्टर्न प्लेन स्कर्टवरती फ्रंट कट टॉप, ब्लाऊज, टीशर्ट घालू शकता. या दोन्ही लुकवर नेकपीस, जॅकेट्स, स्टोल, ओढणी वापरू शकता.