ससानियन रेस्टॉरंट 

 प्रशांत ननावरे

कोणे एके काळी म्हणजेच १९३० साली कुलाबा रेल्वे स्थानक बंद व्हायच्या आधी आत्ताचे मरिन लाइन्स हे रेल्वे स्थानक चर्चगेटच्या दिशेने तिसऱ्या क्रमांकाचे (आता दुसऱ्या क्रमांकाचे) स्थानक होते. त्याकाळी हा परिसर चांगलाच गजबजलेला असे. स्थानकाच्या पश्चिमेकडील बाजूस समुद्र असल्याने मुख्य शहर पूर्वेला पसरले होते आणि आजही आहे. मरिन लाइन्स स्थानकाच्या दक्षिणेकडील बाजूने बाहेर आल्यास एक रस्ता थेट मेट्रो सिनेमाकडे जातो. आनंदीलाल पोद्दार मार्ग असं नव्याने नामकरण झालेला हा रस्ता पूर्वी ‘फर्स्ट मरिन लाइन्स’ या नावाने ओळखला जात असे.

१९३८ साली बांधण्यात आलेले ‘मेट्रो-गोल्डविन-मेयर’ म्हणजेच ‘एमजीएम’तर्फे अमेरिकन मूव्ही स्टुडिओ थिएटर बांधण्यात आले. तोच आत्ताचा मेट्रो सिनेमा. त्याकाळी भारतात फार चित्रपट तयार होत नव्हते त्यामुळे थिएटरमध्ये फक्त हॉलीवूडचेच चित्रपट दाखवले जात असत. या भागात पारशी आणि ख्रिश्चन लोकांची मोठी वस्ती होती. कालांतराने भारतातही चित्रपट तयार होऊ  लागले आणि पण त्याचे फार खेळ इथल्या चित्रपटगृहात होईनात. तेव्हा या परिसरातील पारशी लोकांनी आंदोलन छेडल्याचा इतिहास आहे. याच रस्त्याच्या अगदी मध्यभागी ‘गोल मस्जिद’ आहे. १९५८ साली ‘गोल मस्जिद’ लोकांसाठी खुली करण्यात आली असली तरी दशकभर आधीपासूनच मस्जिद तिथे अस्तित्वात होती. ए. आर. अंतुले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असताना ईदच्या काळात मशिदीला आवर्जून भेट देत असत. पण मेट्रो सिनेमा आणि गोल मस्जिद यांचा जन्म व्हायच्या आधीपासून याच रस्त्यावर एक जागा आजही पाय घट्ट रोवून उभी आहे आणि ती म्हणजे ‘ससानीयन रेस्टॉरंट’.

सोडाबॉटल ओपनरवाला या आधुनिक पारशी कॅफेमध्ये एक कृष्णधवल फ्रेम हमखास पाहायला मिळते. ज्यावर लिहिलं असतं, ‘के. आर. ससानीयन बेकरी अ‍ॅण्ड रेस्टॉरंट’. १९१३ सालची स्थापना असलेला हा मुंबईतील शतकी परंपरा लाभलेला आणखीन एक महत्त्वाचा कॅफे. चहा, केक आणि बिस्किटांशिवाय लग्नाचे केक बनवणे ही आमची खासियत असल्याचाही त्यावर ठळक उल्लेख आहे.

आजघडीला ‘ससानियन बॉलगेन्जेरी’ म्हणून नामकरण झालेली ही जागा रूस्तम के. यझदाबादी यांनी १९१३ साली सुरू केली तेव्हा के. आर. ससानीयन या नावाने ओळखली जात असे. बेकरीला फ्रेंच भाषेत ‘बॉलगेन्जेरी’ असं म्हणतात. त्यानंतर १९४७ साली कोला कुटुंबीयांकडे रेस्टॉरंटची जबाबदारी आली. खोदादाद कोला ससानीयनमध्ये पार्टनर होण्याअगोदर ग्रँट रोड येथील ‘गुड मेन’ रेस्टॉरंटमध्ये काम करत असत. आज ‘गुड मेन’ अस्तित्वात नाही. खोदादाद यांच्यानंतर रेस्टॉरंटची जबाबदारी त्यांचा मुलगा मेहेरबान आणि यझदाबादी यांचे नातू आदी यझदाबादी याच्यावर आली. काही काळ मेहेरबान यांना व्यवसायात साथ दिल्यानंतर आदी आता परदेशात स्थायिक झाले आहेत. मेहेरबान मात्र त्यांच्या लहाणपणापासून रेस्टॉरंटमध्ये आवर्जून येत आहेत. स्वत: शिक्षक असलेल्या मेहेरबान यांनी १९९० साली रेस्टॉरंटची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. आणि आता आपली बहीण डिलनाझ हिच्या मदतीने ससानीयन मोठय़ा मेहनतीने चालवत आहेत.

ससानीयनच्या किचनमध्ये लाकडाची भट्टी आहे. ब्रेड, केक आणि बिस्किटं त्यावरच तयार केली जातात. झोरास्ट्रीयन लोकं आगीची पूजा करतात. त्यामुळे ही भट्टी १९१३ सालापासून आजतागायत कधीही विझलेली नाही. गेली शंभरहून अधिक वर्षे ती धगधगतेय हे विशेष. लाकडी पट्टय़ा असलेलं उंच छत, बाजूला मोठाल्या काचा, लाकडी शेल्फ, चौकोनी, गोल लाकडी टेबल आणि त्यावर पांढरं मार्बल, बेण्ड वूड चेअर असा ससानीयचा थाट आजही कायम आहे. भिंतीवर सासनी साम्राज्यातील सिटीइसायफन पॅलेस, नक्श-ए-रूस्तम, फिरीझाबादचा सासनी पॅलेस अशा अनेक ऐतिहासिक ठिकाणांचे फोटो लावण्यात आलेले आहेत. त्याचसोबत मेट्रो सिनेमा, फ्लोरा फाऊंटन, सीएसटी स्थानक, महापालिका इमारत, चर्चगेट आणि कुलाबा रेल्वे स्थानकांचा कृष्णधवल फोटोही फ्रेम केलेले नजरेस पडतात.

ससानीयनमध्येही सुरुवातीला स्टोर्स होतं हे वेगळं सांगण्याची गरज नाही. बेकरी हे रेस्टॉरंटचे मुख्य अंग तेव्हा होतं आणि आत्ताही आहे. त्या काळी सकाळी हाफ ब्रून मस्काही मिळत असे. त्याची किंमत एका आण्यापेक्षाही कमी होती. मरिन लाइन्स स्टेशनवर उतरून मुंबईत कामाला जाणारे चाकरमानी रेस्टॉरंटमध्ये मोठय़ा प्रमाणात गर्दी करत असत. पण आता हा भाग पूर्वीप्रमाणे वर्दळीचा राहिलेला नाही. त्यामुळे पूर्वी सकाळी पाच वाजता उघडणारे आणि रात्री साडेदहा वाजता बंद होणारे रेस्टॉरंट आता सकाळी सात वाजता उघडते आणि रात्री साडेनऊ ला बंद होऊन जाते. मुंबईतील आणखीन एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे महालक्ष्मी रेसकोर्स. या रेसकोर्सवर जाण्यापूर्वी घोडय़ांचे इंग्लिश आणि भारतीय प्रशिक्षक ससानीयनमध्ये सकाळचा पहिला चहा घेत असत, अशी आठवण मेहेरबान सांगतात.

इथला मावा केक, पुडींग आणि मटण पॅटिस अतिशय प्रसिद्ध आहे. १९९० साली खिमा पाव सुरू झाला. १९९२ साली एका बाजूला रेस्टॉरंट आणि दुसऱ्या बाजूला पूर्णवेळ बेकरी सुरू करण्यात आली. १९९३ साली चिकन पॅटिस सुरू झालं. लोकांच्या खाण्याच्या सवयी आणि व्यवसायाचा विचार करता २००० साली सिझलर्सला देखल्ीा मेन्यूमध्ये समाविष्ट करण्यात आले. पारशी नववर्षांला येथे काश्मिरी पुलाव आणि दाल आवर्जून बनवली जातो. त्याचसोबत पारशी लोकांची खासियत असलेलं धनसाक, सली चिकन, चिकन करी राईस, रोस्टेड चिकन आणि पोटॅटो चिप्स (फ्रेंच फ्राइज नाही) हे पदार्थही येथे मिळतात. एकेकाळी ससानीयची ब्राऊनी, कस्टर्ड, मावा केकसारखे पदार्थ थेट मंत्रालयातही जात असत. सुशीलकुमार शिंदे, छगन भुजबळ, अभिनेत्री मुमताज, विजू खोटे यांसारखे दिग्गज या जागेचे आणि तेथील पदार्थाचे चाहते आहेत.

‘शंभर वर्षांची वैभवशाली परंपरा’, असं जरी बाहेर ससानीयनच्या बोर्डवर ठळक अक्षरात झळकत असलं तरी मुंबईकरांना आता त्यामध्ये फारसा रस राहिलेला नाही. मुळात चहा आणि ब्रून मस्का हे फॅन्सी पदार्थ झाले असून ते सुद्धा अधिकचे पैसे मोजून उंची हॉटेलात खाण्याकडेच नव्या पिढीची पसंती दिसते. मेन्यूमध्ये टाकलेली नवीन पदार्थाची भर आणि बेकरी यामुळे ससानीयन खरंतर आजही खंबीरपणे पाय रोवून उभं आहे. पण आपण किती वेळ श्वास रोखून धरू याची त्याला स्वत:लाही खात्री नाही. काळाचं म्हणणं काहीही असो, पण आजही दिमाखात उभ्या असलेल्या आणि विसाव्या शतकाचा साक्षीदार असलेल्या या जागेला एकदा तरी आवर्जून भेट द्यायला हवी. viva@expressindia.com