परीक्षा, अभ्यास, रिलेशनशिप, मैत्री, करिअर, लुक्स.. तरुणाईच्या आयुष्यात यातलं काहीही हल्ली तणाव निर्माण करतं. असुरक्षितता, घाई, धावपळ, स्पर्धा आणि तणाव.. यातून सुटका नाही का? हे सगळं नसेल तर आयुष्यात मजा काय? यातली खुमारी तर राहिली पाहिजे पण तोलही जायला नको. करता येईल असं

मैथिली म्हणाली, तिला मला अर्जंट भेटायचंय. तिच्या मैत्रिणीची काळजी वाटत होती तिला, म्हणून माझ्याशी बोलायचं होतं. ‘‘माझी मैत्रीण आहे खूप जवळची. मी नाव सांगत नाही तुला आत्ता, कारण तिला माहिती नाहीये मी तुझ्याकडे आलीये ते. आजकाल ती फार विचित्र वागते. ती होस्टेलवर राहते. आठवडा झाला, ती कॉलेजला आली नाही. तिचा फोनही लागत नव्हता, म्हणून मी परवा तिच्या रूमवर गेले. तर भस्सकन घाणेरडा वास आला. रूम भयंकर अस्ताव्यस्त होती. तिने दार उघडलं आणि सरळ जाऊन झोपली. हसणं नाही, बोलणं नाही. तिला विचारलं, काय होतंय म्हणून, तर काही तरी तोंडातल्या तोंडात पुटपुटली. त्यानंतर बोलणंच खुंटलं.’’

‘‘गेल्या अनेक दिवसांपासून मला तिचं वागणं विचित्र वाटतंय. कशात लक्षच नसतं तिचं. एकदा परीक्षा आहे हेच विसरून गेली. एकदा रात्री झोपली ती थेट दुसऱ्या दिवशी संध्याकाळीच उठली. गप्पा मारता मारता मधूनच काही तरी टॅन्जन्ट बोलायला लागते. खूपदा आमच्यात असूनही नसल्यासारखीच वागते. ती अतिशय व्यवस्थित आणि टापटिपीची म्हणून आमच्या सगळ्या ग्रुपमध्ये प्रसिद्ध होती, पण आता मात्र कुठल्याही चुडीदारवर कुठल्याही रंगाचा कुर्ता, मळके कपडे, अंगाला घाण वास.. आंघोळ तरी करते की नाही कोण जाणे. खरं सांगू, तिला बघितलं की मला त्या रस्त्यावरून फिरणाऱ्या वेडय़ा लोकांची आठवण येते. मी काय करायला हवं हेच मला समजत नाहीये. एवढं कळतंय की तिला मदतीची गरज आहे. तिला काही तरी खोटं सांगून घेऊन येऊ  का इकडे? की तिच्या आईबाबांना कळवायचं? की काहीच नको करायला? तात्पुरतं काही तरी कारण असेल का?’’

मला खरं तर मैथिलीचं कौतुक वाटलं. तिनं या सगळ्या बाबतीत फार जबाबदारीने विचार केलेला दिसत होता.या सगळ्या बाबतीत फार जबाबदारीने विचार केलेला दिसत होता.

मैथिलीच्या या मैत्रिणीला खूप जपून हाताळायला हवंय. सर्वात पहिल्यांदा तिला काही ड्रग अ‍ॅडिक्शन तर झालं नाहीये ना हे पाहायला हवं. तिची किती तरी लक्षणं त्यासाठी जुळतायत. दुसरं असं की, काही धक्कादायक घटना घडलीये का तिच्याबाबतीत नुकतीच? उदा. जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, ब्रेक अप, एखादा मोठा अपघात.. कारण त्यामुळे आलेल्या डिप्रेशनमध्येही असंच काहीसं दिसतं. मैथिलीने आणखी एक शक्यता व्यक्त केलीये. आपल्या मैत्रिणीला वेड तर लागलं नाहीये ना? या लोकांवर आपण वेडेपणाचा शिक्का मारून मोकळे होतो खरे, पण ते एका मानसिक रोगाचे शिकार असतात, स्किझोफ्रेनिया! त्यांचं जे विचित्र वागणं दिसतं ते असतं त्यांच्या मनात येणाऱ्या विचारांच्या विकृतीमुळे आणि मनाच्या भासांमुळे. आपल्यावर कुणी तरी लक्ष ठेवून आहे, काही तरी सूचना देतंय, सारखी नावं ठेवतंय असं वाटत असतं. या सगळ्या विचारांचा, सूचनांचा, आवाजांचा कोलाहल मनात चालू असतो. त्यामुळे फक्त विचारातच नव्हे तर बोलण्यातही स्पष्टता राहत नाही. इतरांना न कळणाऱ्या हालचाली, बोलणं, हातवारे, अस्वच्छता, वेळकाळाचं सुटलेलं भान हे सगळं या मेंदूमधल्या केमिकल लोच्याचा आणि यंत्रणेच्या दोषाचाच परिणाम असतो.

मैथिलीच्या मैत्रिणीच्या बाबतीत या निदानाचा विचार करायला हवा, कारण अनेकदा या आजाराची सुरुवात किशोरवयात आणि तरुणपणात होते. घरातल्या, नात्यातल्या कुणाला असा आजार असेल, तर या निदानाची शक्यता वाढते. आजकाल वीड किंवा मारीजुआना घेण्याची फॅशन आहे पार्टीजमध्ये. त्या ड्रगमुळे अ‍ॅडिक्शन होत नाही, असं म्हणतात; पण एखाद्या मुलाला किंवा मुलीला असलेला छुपा स्किझोफ्रेनिया तो ड्रग घेतल्यामुळे उफाळून येऊ  शकतो.

या आजारासाठी औषधं उपलब्ध आहेत. फक्त ती नियमित आणि बराच काळ घ्यावी लागतात. औषधांबरोबर वर्तनोपचार (बिहेवियरल थेरपी)सुद्धा द्यायला लागते. उपचार फक्त त्या पेशंटचेच नाही तर संपूर्ण कुटुंबाचे करावे लागतात. त्यांना पेशंटला कसं हाताळावं, स्वत:च्या मनाचं आरोग्य कसं सांभाळावं आणि समाजात असलेल्या या आजाराविषयीच्या गैरसमजांना कसं तोंड द्यावं याचं प्रशिक्षणच द्यायला लागतं.

पुरेशी झोप, समतोल आहार आजार आटोक्यात ठेवायला मदत करतात. नोकरी-व्यवसायाच्या दृष्टीने एखादं स्किल शिकणं उपयोगी पडतं. जितक्या लवकर निदान होईल तितकं  चांगलं, तितकं त्या व्यक्तीचं पुनर्वसन चांगलं होतं.

तसं बघायला गेलं तर आपल्याही काही कल्पना असतात, ठाम विश्वास असतात. उदा. एखादं घर भुताटकीचं आहे, जे काही घडतं ती देवाचीच करणी असते, आपली इंटरनेटवरची माहिती लोक लपूनछपून वापरत असतात वगैरे, वगैरे. छोटी मुलं अनेकदा एखाद्या काल्पनिक मित्राशी खेळत असतात; पण म्हणून काही लगेच त्यांना स्किझोफ्रेनिया आहे असं नव्हे.

पण एक गोष्ट नीट लक्षात ठेवायला हवी, अर्धवट ज्ञान वापरून, कुठे तरी वाचलेल्या गोष्टीचा वापर करून, इंटरनेटवर बघून, असं या आजाराचं निदान करता येत नाही. ते तसं करूही नये, कारण ही एक अतिशय गुंतागुंतीची व्याधी आहे. या विषयात अभ्यास केलेल्या तज्ज्ञ व्यक्तीच याचं डायग्नॉसिस करू शकतात, म्हणजे तज्ज्ञ सायकोलॉजिस्ट किंवा सायकिअ‍ॅट्रिस्ट. निदान आणि त्यावरचे उपचार, या दोन्ही गोष्टी अतिशय अचूक आणि संवेदनशील असाव्या लागतात. त्यासाठी देण्यात येणारी औषधं गुंतागुंतीची असतात. त्यामुळे सर्वतोपरी काळजी घेऊन लवकरात लवकर अशा व्यक्तींवर उपचार सुरू व्हायला हवेत.

viva@expressindia.com