News Flash

आऊट ऑफ फॅशन : ‘बो’नामा!

पार्टीजमध्येही त्या काळी हाय बो आणि मोठा स्क्रूंची हा लुक ट्रेंडमध्ये होता.

तुम्ही आम्ही सगळेच रोज वापरतो. पण तरीही त्याची कथा गमतीशीर आहे. साधे रबर बो केसांना घट्ट बसतात, त्यांच्यामुळे केस तुटतात, या समस्या तुम्हालाही जाणवल्या असतीलच. १९८६ मध्ये रोमी रेव्हसन हिलाही या समस्येवर तोडगा काढायचा होता.

कालच सहज फेसबुकच्या भिंतीवर नजर टाकत असताना एक व्हिडीयो समोर आला. ‘स्क्रूंची’ म्हणजेच केसाला बांधायचा कापडी रबर बो. तसा रबर बो हा चघळण्याचा विषय नाहीच. तुम्ही आम्ही सगळेच रोज वापरतो. पण तरीही त्याची कथा गमतीशीर आहे. साधे रबर बो केसांना घट्ट बसतात, त्यांच्यामुळे केस तुटतात, या समस्या तुम्हालाही जाणवल्या असतीलच. १९८६ मध्ये रोमी रेव्हसन हिलाही या समस्येवर तोडगा काढायचा होता. सुटसुटीत पण केसांना व्यवस्थित बसेल, असा रबर बो पर्याय तिला शोधायचा होता. तिला कल्पना सुचली, ती तिच्या सॅटिनच्या पायजम्यातील इलॅस्टिकची. कपडय़ात गुंडळल्यामुळे इलॅस्टिक कमरेला घट्ट आवळलं जात नाही, पण त्याची पकड मात्र मजबूत असते. हीच संकल्पना तिने बोमध्ये वापरली आणि ‘स्क्रूंची’चा जन्म झाला. बरं यातील खरी गंमत पुढे आहे. अमेरिकेत ही संकल्पना बरीच लोकप्रिय झाली. तरुणींपासून ज्येष्ठ महिलांपर्यंत सगळ्यांनाच हे बो आवडू लागले. रोज घरी, ऑफिसमध्ये तर हे बो वापरात होतेच पण पार्टीजमध्येही त्या काळी हाय बो आणि मोठा स्क्रूंची हा लुक ट्रेंडमध्ये होता. पण हळूहळू तरुणी किंवा किशोरवयीन मुलींना एक गोष्ट जाणवायला लागली, की स्क्रूंची आरामदायी प्रकार आहे. त्याने केसांना त्रास होत नाही, म्हणजेच हा म्हाताऱ्या बायकांचा बो आहे. आपण तो वापरला तर आपण ओल्ड फॅशन, बोअरिंग दिसू. त्यामुळे सुटसुटीत आणि उपयोगी असूनही तरुणींनी स्क्रूंचीकडे पाठ फिरवली. आजचा आपला विषय ना स्क्रूंची आहे ना हेअर अ‍ॅक्सेसरीज. पण विषयाची सुरुवात या गोष्टीने करायचं कारण म्हणजे स्क्रूंचीसारख्या अशा कोणत्या वस्तू आहेत, ज्या उपयोगी, सुटसुटीत आहेत, हे आपल्याला माहीत आहे, पण तरीही त्यांचा वापर करणं आपण टाळतो. कारण त्यात आपण ‘कूल’ दिसत नाही, ही भावना सतावत असते. यानिमित्ताने मीही विचार करू लागले आणि एक यादी डोळ्यासमोर आली. या यादीतील एक आजचा विषय आहे.

नुकताच दिल्लीमध्ये ‘इंडिया फॅशन वीक’ पार पडला. यामध्ये डिझायनर अंजू मोदीने एक कलेक्शन सादर केलं होतं. कॉटन, लिनिन, खादी कापडावरील सिम्पल डायिंग पद्धतीचा वापर करून तयार केलेलं. सफेद, क्रीम बेसच्या कापडावर इंडिगो रंगाचं डायिंग आणि झाल्यास लाल रंगाची नाजूक बॉर्डर किंवा मस्टड यल्लो रंगाचं जॅकेट हे समीकरण जुळून आलेलं. एरवी आपण डायिंग म्हटलं की ऑल ओव्हर प्रिंटिंग डोळ्यासमोर येतं. पण अंजू मोदीने बांधणी, टाय-डाय पद्धतींचा वापर करत हे प्रिंट्स बॉर्डरच्या स्वरूपात वापरले होते. कंबर, बस्टलाइनच्या ड्रेसच्या विभाजनाच्या भागात नाजूक बांधणीची रेष, साडीच्या खालच्या बाजूला त्रिकोणी टाय-डायची बॉर्डर, इंडिगो रंगाच्या कुर्त्यांच्या स्लीव्हवर भौमितिक टाय-डाय इतकंच त्याचं मिनिमम स्वरूप होतं. अर्थात काही ड्रेसेसवर ऑलओव्हर टाय-डाय, बाटिक केलेलं होतच, पण त्यातही सफेद रंगाचा जादा भाग असण्याने भडकपणा कमी होता. अगदी या कलेक्शनवरून लक्षात आलं, तसं तर डायिंग पद्धतींचा भारताला जुना इतिहास आहे. टाय-डाय, बांधणी, लेहरीया, बाटिक, बाघ्रू, सांगनरी, दाबू, अजराक, बाघ, कलमकारी अशा कितीतरी पद्धती भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये पाहायला मिळतात. चीन, जपान अशा निवडक आशियाई देशांमध्येच या डायिंगच्या पद्धती पूर्वीपासून होत्या. त्यात प्रामुख्याने कॉटन, मलमल, लिनिनसारख्या सुटसुटीत कापडाचा वापर केल्यामुळे कपडे आरामदायी असतात. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे सततच्या त्यांच्या अस्तिवामुळे आणि त्यांच्या सहजतेमुळे तरुणांनी त्याकडे पाठ फिरवली. काकूबाई स्टाईल, बोरिंग असा त्याला ठपका पडला आणि चाळिशीनंतरच्या वयोगटापुरतं याचं अस्तित्व राहिलं. पण मध्यंतरीच्या काळात अमेरिका, युरोपियन देशांना या डायिंग पद्धतीबद्दल आकर्षण वाटू लागलं होतं. इक्कतचा अमेरिकन कलेक्शनवरील प्रभाव याबद्दल मागे आपण बोललो होतोच. पण शिबोरी या जपानी टाय-डाय पद्धतीचा डाय स्वरूपातील घरगुती वापर हा अमेरिकन तरुणींचा आवडता उद्योग ठरलाय. याबद्दलचे कितीतरी व्हिडीओज पाहायला मिळतील. सध्याच्या सस्टेनेबल फॅशन किंवा पर्यावरणस्नेही फॅशनच्या व्याख्येत या पद्धती चपखलबसतात. नैसर्गिक रंगांचा आणि कापडाचा वापर यामुळे यांच्या बनविण्याच्या पद्धतीत पर्यावरणाला धोका पोहोचत नाही. त्यामुळे हळूहळू या पद्धती लोकप्रिय होऊ  लागल्या.

साहजिकच भारतातसुद्धा तरुणांना या पद्धतीबद्दल आकर्षण वाटू लागलं आणि पुन्हा डायिंग ट्रेंडमध्ये आलं. अंजू मोदीचं कलेक्शन हे यातील प्रातिनिधिक उदाहरण. पण गेल्या वर्षभरात कित्येक डिझायनर्सनी डायिंगचा वेगवेगळ्या स्वरूपात वापर केला. विशेषत: आपल्याकडील सध्याच्या खादी ट्रेंडमध्ये डायिंगचा वापर जुळून येतो. या पारंपरिक पद्धतींचं एक वैशिष्टय़ म्हणजे यांच्यात मशीन प्रिंटिंगमधील सातत्य नसतं. त्यामुळे एकाच पद्धतीने प्रिंट केलेल्या कापडातसुद्धा थोडासा वेगळेपणा असतोच. त्यामुळे प्रत्येक ड्रेस, त्यावरील डिझाइन यात थोडशी भिन्नता असतेच.  कुणीही नक्कल करायची ठरवली तरी त्यातील हुबेहूबता मिळवणं कठीण असत. हीच खरी त्यांची गंमत असते. बरं टाय-डाय, बांधनी, लेहरीया करायची पद्धत एकदा कळली, की त्यात कितीतरी प्रयोग करू शकतो. रंग, गुंडाळायची पद्धत, डाय करायचा कालावधी यांच्यात बदल करून रोज नवीन डिझाइन तयार करता येऊ  शकते. त्यांची एकमेकांमध्ये सरमिसळ करूनही प्रयोग करता येऊ  शकतात. अर्थात हे सगळं कारखान्यात होतंच, पण छोटय़ा स्वरूपात घरीही करता येत. तेही खिशाला परवडेल अशा किमतीत. फक्त टाय-डाय केलेला ड्रेसही तुम्ही वापरू शकता किंवा वाटल्यास त्याला एम्ब्रॉयडरीची जोडसुद्धा देऊ  शकता. लेंरिंगने कॉन्ट्रास ड्रेसिंगमध्येही डायिंग उठून दिसत. त्यामुळे प्रयोगाला बरीच मुभा आहे. अगदी सध्या ट्रेंडमध्ये असलेला इंडिगो रंग हाही डायिंगचं देणं आहे. इंडिगो आणि क्रीम हे समीकरण किती चपखलबसतं, हे आता वेगळं सांगायची गरज नाही.

फॅशनच्या ट्रेंडच्या वर्तुळात अशा कितीतरी स्क्रूंचीच्या यादीची भर पडत असते. अर्थात जुन्या गोष्टी मागे पडल्या किंवा सोडून दिल्या यात नव्या पिढीला दोष देण्याचं कारण नसतं. कदाचित काही वर्षांनी पुन्हा तीच गोष्ट वेगळ्या स्वरूपात परत येऊ  शकतेच. आज विषय निघाला आहे, तेव्हा डायिंगप्रमाणेच स्क्रूंचीसुद्धा काहीसं रूपं पालटून पुन्हा ट्रेंडमध्ये आल्या आहेतच. असंच एक जाता जाता उदाहरण द्यायचं झाल्यास, जरदोसी एम्ब्रॉयडरी आपल्याला नवीन नाही. अजूनही त्याचा वापर होतोच. पण नुकतंच अलेक्झांडर मक्विन लेबलने एक कलेक्शन सादर केलं. लेसच्या ट्रेंडला अनुसरून काळा, ऑक्सिडाइज सिल्व्हर, काळ्या सोनेरी मण्यांचा वापर करून जरदोसीने लेस कापड तयार केलं होतं. विशेष म्हणजे पोपट, घुबड, हत्ती असे आधुनिक मोटीफही त्यात वापरले होते. संधी मिळाल्यास आवर्जून हे कलेक्शन बघा. तोपर्यंत तुमच्या कपाटात दडलेल्या अशाच स्क्रूंचींचा शोधही घ्याच.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2017 12:36 am

Web Title: scrunchie fashion scrunchie for hair
Next Stories
1 ब्रॅण्डनामा : मोती साबण
2 Watchलेले काही : आयरिश नृत्यशास्त्रदर्शन!
3 व्हायरलची साथ : सुडाची भावना
Just Now!
X