जुन्या वस्तू ऑनलाइन विकण्याचा फंडा आपल्याकडे रुजला तो ओएलएक्ससारख्या संकेतस्थळामुळे.. कुठलीही अडगळीत पडलेली वस्तू ओएलएक्स पे बेच डाल..म्हणत तरुण पिढी इतकी सरावली आहे की सध्या एखादी जुनी वस्तू विकायची म्हटली तरी ओएलएक्सकेलीस का?, असं विचारण्याचा प्रघात रूढ झाला आहे. मात्र ऑनलाइन विकल्या जाणाऱ्या या वस्तूंमध्ये जेव्हा कपडेही समाविष्ट होतात तेव्हा काय होतं? सध्या ऑनलाइन कपडे विकण्याचाच नव्हे तर ते सेकंड हॅण्डकपडे विकत घेण्याचाही अजब फंडा चांगलाच रुळलाय. देवघेवीची ही विचित्र डिजिटल बाजारपेठ विकसित झाली आहे.

कपडे जुने होतात तरीही ते वापरावेसे वाटतात. कपडय़ांची हौस आपल्याला अगदीच रोजची आहे. वापरलेले कपडे पुन्हा वापरले जावेत म्हणून सध्या कपडे ‘रि-सायकल’ किंवा ‘अप-सायकल’ करण्याचा जमाना आहे. आपल्या जुन्या कपडय़ांना थोडा ‘टच’ देत कोणत्याही बाजारात न जाता घरबसल्या हातातल्या फोनवरून विक्री करण्यात तरुणाई पारंगत झाली आहे. जुने कपडे विकण्याची आणि खरेदी करण्याची संधी देणारे हे अ‍ॅप्स सध्या भलतेच लोकप्रिय ठरतायेत.

‘इलॅनिक’ या अ‍ॅपने केलेल्या सव्‍‌र्हेनुसार फॅशन अ‍ॅप्सना लाखो लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. तरुण ग्राहक हा या अ‍ॅप्सना जास्तच पसंती देतोय. दर दिवसाला ९०,००० पेक्षा जास्त विक्रेते या अ‍ॅप्सद्वारे जुने कपडे विकतात. तर भारतात वर्षांला १५ लाखांपेक्षा जास्त भारतीय तरुण ग्राहक या अ‍ॅप्सद्वारे खरेदी-विक्री करत आहेत.

शेतातल्या कापसापासून कपडे तयार करून ते बाजारात विकण्यापर्यंतची एक मोठी प्रक्रिया आपल्याला माहिती आहे. पण सध्या हेच वापरलेले कपडे जुने झाले की त्यांची छायाचित्रे काढून, ती अ‍ॅप्सवर टाकून, त्याला योग्य तो खरेदीदार शोधून ते विकण्यापर्यंतची किंवा विकत घेण्यापर्यंतची आणखी एक मोठी प्रक्रिया विकसित झाली आहे. अशा प्रकारे ‘सेकंडहॅण्ड’ कपडे खरेदी-विक्रीचे एक मोठे अर्थकारण या अ‍ॅप्सच्या माध्यमातून उभे राहिले आहे. ब्लॉगिंग तसेच इन्स्टाग्रामवरूनही कपडे विकण्याकडे तरुणांचा कल आहे, परंतु त्यापेक्षा विविध अ‍ॅप्सवरून कपडे विकण्यावरचा त्यांचा भर दिवसेंदिवस वाढतो आहे. ‘पॉशमार्क’, ‘ट्रेडसी’, ‘मेरकारी’, ‘एवरड्रॉब’, ‘थ्रेडअप’ हे अ‍ॅप्स मोठय़ा प्रमाणात जगभरात अशा प्रकारे कपडे खरेदी-विक्री करण्यासाठी सक्रिय आहेत. तर भारतात ‘ओएलएक्स’पाठोपाठ ‘इलॅनिक’, ‘पॉशमार्क’, ‘स्टाइलफ्लिप’ व ‘मेरकारी’ हे अ‍ॅप्स जास्त प्रमाणात वापरले जातात.

आपल्याकडे साधारणत: २०१३ पासून या अ‍ॅप्सची फार मोठी रेलचेल सुरू झाली. खूप मोठय़ा संख्येने अगदी थोडय़ा वेळात आपले जुने कपडे विकून त्यांवर मनासारखी किंमत लावत ई-बाजारात विकायला सुरुवात झाली.

‘ओएलएक्स’, ‘अ‍ॅमेझॉन’ या ई-कॉमर्स साईट्स मोठय़ा चलतीत असताना त्यांनाही टक्कर देत एक मोठे मार्केटिंग धोरण या अ‍ॅप्सनी राबवले. सध्या ‘इलॅनिक’ हे भारतातले सर्वात टॉप अ‍ॅप आहे. ‘इलॅनिकतर्फे आम्ही ग्राहकांना खरेदीविक्रीसाठी ईमेलद्वारे मदत करतो. पूर्ण सव्‍‌र्हिस देताना कपडय़ांचे पॅकिंग, डिलिव्हरी रिपोर्ट आणि रिटर्न्‍स यावर भर देतो. आम्ही तीन दिवसांचे वॉलेट विक्रेत्यांना देतो. तुम्ही त्या वॉलेटतर्फे पैसे घेऊ  शकता किंवा तुमच्या बँक अकांऊ टमधून काढू शकता. ग्राहकाला त्याच्या मागणीनुसार कपडे पुरवण्यावर आमचा भर आहे. सुरुवातीला आम्ही कपडे विकण्यासाठी फक्त एक रुपया एवढाच पिक-अप चार्ज ठेवला त्यामुळे आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळाला’, असं ‘इलॅनिक’चा सल्लागार शामीर बवा याने सांगितले.  इलॅनिकप्रमाणेच पॉशमार्क, स्टाईलफ्लिपसारख्या विविध अ‍ॅप्सच्या मार्केटिंग टीमशी बोलल्यावर खालील या ‘सेकंडहॅण्ड’ अ‍ॅपधारी कपडे बाजाराची कल्पना येते.

१. रिसेलिंग – कपडे रिसेल करताना खूप काळजी घ्यावी लागते. ते नेमके कशा पद्धतीने विकावेत याची माहिती देण्यापासून सगळी मदत  या अ‍ॅप्सकडून केली जातेय ‘कधी कधी जे कपडे विकायचे आहेत त्यांचे फोटो विक्रेत्यांकडून नीट काढले जात नाहीत त्यामुळे जेव्हा ते फोटो अपलोड करतात तेव्हा त्यांचे पॅकेज आम्ही परत त्यांना मेल करतो. किंवा मग फोटो नीट न आल्यास आम्हीच त्यात काही सुधारणा करतो. कधी कपडय़ांचे रंग स्पष्ट दिसत नाहीत, तेव्हा त्यांचे फोटो आम्ही त्यांना परत अपलोड करायला सांगतो. नंतर ऑर्डर नक्की झाल्यावर ते ग्राहकाकडे पोहचवतो,’ असे शामीरने सांगितले. त्याचप्रमाणे ‘स्टाईलफ्लिप’च्या मार्केटिंग टीमने सांगितले की, आम्ही विक्रेत्यांना वेगवेगळ्या टिप्स देतो. जे कपडे विकायचेत त्यांचे फोटो कसे काढावेत, त्यांची स्टाईलिंग काय आहे ते लक्षात येईल अशा पद्धतीने फोटोशूट व कव्हरशॉट कसा घ्यायचा हे सांगितले जाते. सध्या सर्व जण स्टाइलिंग करूनही कपडे विकतात. त्यामुळे रिसेलिंग करताना कपडे आकर्षक दिसतात आणि ग्राहक आपोआप जास्त प्रमाणात खरेदी करतात. या व्यवहारात कोणत्याही प्रकारची फसवेगिरी होणार नाही याचीही पुरेपूर काळजी घेतली जाते.

२. शिपिंग – शिपिंग करताना कपडे विकल्यास मिळणाऱ्या कमाईतून प्रत्येक अ‍ॅप हे कमिशन घेते. २००० रुपयांपर्यंत विक्रीची किंमत असेल तर ‘स्टाइलफ्लिप’सारखे अ‍ॅप शिपिंगसाठी मूल्य आकारत नाही. तर ट्रेडसी, पॉशमार्क, मेरकारी व थ्रेडअप हे प्रीपेड शिपिंग पॅकेज देतात. शिपिंग करताना विविध अ‍ॅप्स वेगवेगळे कमिशन आकारतात. पॉशमार्क  या अ‍ॅपवरून कोणतीही गोष्ट विकल्यास कपडे किंवा इतर वस्तू विकल्यास मिळालेल्या कमाईतून २० टक्के कमिशन हे पॉशमार्क  घेते व ८० टक्के किमतीने वस्तू विकली जाते. इलॅनिक कपडे विकल्यास मिळत असलेल्या किमतीतून १०० रुपयांचे म्हणजेच १० टक्के कमिशन घेते व पिक-अप चार्ज लावते.

३. स्टार्ट-अप – हेच अ‍ॅप तरुणांना याचपद्धतीने स्टार्ट अप उभारण्यासाठी प्रोत्साहन देतात. अशा अ‍ॅप्सवर खूप जणांनी आपले प्रॉडक्ट्स विकून कमाई केली आहे. ४० टक्के तरुणाई याअ‍ॅप्सशी जोडलेली आहे. आपल्या वापरलेल्या वस्तू किंवा कपडे किां ऑनलाइन शॉपिंग करताना कपडे फिट होत नसल्यास अथवा मनासारखे कपडे न मिळाल्यास बरीच तरुण मंडळी या अ‍ॅप्सवरून ते विकतात.

एकेकाळी दुसऱ्याचे वापरलेले कपडे आपण घ्यायचे आणि घालायचे ही कल्पनासुद्धा वाईट मानली जात होती तिथे आज निम्म्याहून अधिक तरुणाई या अ‍ॅप्सचा वापर करून सेकं डहॅण्ड कपडे विकत घेऊन घालते आहे हे आश्चर्यात टाकणारे आहे. मात्र या अ‍ॅप्सवरून कपडे घेण्यापेक्षाही कपडे विकण्यावर जास्त लोकांचा कल आहे. मुंबईच्या वामाक्षी मनेक सांगते की, इलॅनिक किंवा पॉशमार्कसारख्या अ‍ॅप्सच्या माध्यमातून तुमच्या ग्राहकाशी तुम्हाला प्रत्यक्ष भेटून किंमत ठरवता येते. तुमची फसवणूक होत नाही. शिवाय, पिक-अपसाठीही काही अडथळा येत नाही. ‘मी जेव्हा माझ्या काकाकडे व्हिएतनामला जाते तेव्हा तिकडेसुद्धा मला चांगले ग्राहक या अ‍ॅप्सवरून मिळाले,’ असं ती सांगते. ओंकार नार्वेकर सांगतो की मीही माझे कपडे बऱ्याचदा वेगवेगळ्या फॅशन अ‍ॅप्सवर विकले. या अ‍ॅपसवर खूप चांगल्या पद्धतीने भाव करता येतो. दिल्लीच्या राघव जैनने या अ‍ॅप्सचा उपयोग बहिणीच्या स्टार्ट-अपसाठी करून घेतला. ‘मी मुंबईला असताना या अ‍ॅप्सविषयी माहिती मिळाली तेव्हा मी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ टाकला होता. पण तिने तयार केलेले दागिने विकण्यासाठी मला प्लॅटफॉर्म हवा होता. मी या अ‍ॅप्सवर दागिन्यांचे फोटो पोस्ट केले व विकले. मला लगोलग ग्राहकांचा प्रतिसाद मिळायला लागला’. नाशिकच्या मानसीने याच अ‍ॅपवरून ड्रेस खरेदी केला आणि तो जसा स्क्रीनवर पाहिला होता त्या रंगाचा नाही हे लक्षात आल्यावर तिने ट्रेडसी या अ‍ॅपवर पोस्ट करून तो टॉप विकला. ‘मला त्यातून हळूहळू चांगली कमाई होत गेली. इलॅनिक, ट्रेडसी व पॉशमार्क हे अ‍ॅप्स चांगले आहेत,’ असं ती म्हणते. आपल्याला हवे तसे कपडे दुसऱ्याकडून विकत घेऊन आणि तो नाही आवडला तर परत विकून पैसे आणि आवड दोन्ही पूर्ण करण्याची ही साठा-उत्तराची अ‍ॅपधारी कहाणी तरुणाईला सर्वार्थाने फळली आहे हेच खरं!

viva@expressindia.com