डॉ. विदिता वैद्य यांच्या रूपाने व्हिवा लाउंजच्या व्यासपीठावर प्रथमच एका वैज्ञानिकाला निमंत्रित करण्यात आलं होतं. मेंदू विज्ञानासारखा वेगळा विषय असूनदेखील अनेक विज्ञानप्रेमींनी या कार्यक्रमाला तुडुंब गर्दी केली होती. यामध्ये विज्ञानाच्या विद्यार्थ्यांसोबत सर्व वयोगटाच्या प्रेक्षकांचा समावेश होता. मेंदूचं कार्य कसं चालतं यापासून ते आधुनिक मेंदुविज्ञानातील नवे शोध यापर्यंत अनेक विषय विदिता यांनी सामान्यांना कळतील, अशा सोप्या भाषेत विषद केले. शास्त्रज्ञदेखील ओघवत्या भाषेत सुसंवाद साधू शकतो आणि सामान्यांशी कनेक्ट होऊ शकतो, याचा अनुभवदेखील उपस्थितांना आला. नवं ज्ञान, नवी माहिती, नवी प्रेरणा आणि नवा दृष्टिकोन या कार्यक्रमातून मिळाल्याचे अनेकांनी सांगितले. त्यातील या निवडक प्रतिक्रिया.
(शब्दांकन : प्राची परांजपे, वैष्णवी वैद्य
छायाचित्र : अमृता अरुण)

भार्वी सावंत
विदिता वैद्य यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आमच्यासारख्या तरुणांना नक्कीच फायदा होईल. न्युरो सायन्स या फिल्डबद्दल सविस्तर माहिती त्यांच्यामुळे मिळाली. नवं इन्स्पिरेशन मिळालं. मूलभूत विज्ञान शाखांमधील संधी अमर्याद आहे, याची जाणीव झाली. प्रथमच एका वैज्ञानिकाशी भेट ‘लोकसत्ता व्हिवा’मुळे घडली.

स्नेहा मोरे
मी पीएच.डी.ची विद्यार्थिनी आहे. या कार्यक्रमामुळे मला अशा खूप गोष्टी कळल्या, ज्या आतापर्यंत मी रिसर्चसाठी केलेल्या वाचनात आल्या नव्हत्या. त्यांनी इतक्या सोप्या भाषेत मेंदूची परिभाषा मांडली. हा कार्यक्रम मला खूपच उपयोगी ठरेल. वैज्ञानिकाची थेट भेट घडवून आणल्याबद्दल लोकसत्ता व्हिवाचे मनापासून आभार.

मयूरेश डोंगरे
मी स्वत: सायन्सचा विद्यार्थी आहे. विज्ञान संशोधनाकडे बघण्याची नवी दृष्टी विदिता यांच्यामुळे आज मिळाली. मूलभूत विज्ञानाचा अभ्यास का आवश्यक आहे, तेदेखील त्यांनी खूप चांगल्या रीतीने सांगितलं. या कार्यक्रमातून प्रेरणा मिळाली, करिअरकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन मिळाला. हा कार्यक्रम एक वेगळा अनुभव होता.

नूपुर गुप्ते
मेंदूविषयी, त्याच्या कार्याविषयी मला उत्सुकता होती. मला पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मला मिळाली. हा कार्यक्रम खूपच छान झाला. न्यूरो सायन्स या नव्या फिल्डबद्दल माहिती मिळाली. विज्ञान शिक्षणाविषयीचा दृष्टिकोन बदलायला कदाचित मदत होईल. माझ्यासाठी विदिता वैद्य या आता रोल मॉडेल बनल्या आहेत.

दीक्षा घायाळ
एका वैज्ञानिकाशी गप्पा मारण्याचा हा अनुभव खूपच छान होता. विदिता वैद्य यांनी प्रत्येक गोष्ट अतिशय सोप्या भाषेत मांडली, त्यामुळे मेंदूविषयी अनेक गोष्टी समजायला खूपच मदत झाली.

पल्लवी निंबाळकर
मेंदूबद्दल सहसा माहिती नसते. मेंदुविज्ञान हा तर तसा लांबचा विषय. विदिता वैद्य यांनी मेंदूतील हे रहस्य उलगडलं. विज्ञानाच्या क्षेत्रात मुली सहसा आढळून येत नाहीत. विदिता वैद्य यांना भेटून खूपच मस्त वाटलं. नवं इन्स्पिरेशन मिळालं.

रुचिरा सावंत
वैज्ञानिक म्हणजे नक्की काय, ते कसं काम करतात, शोध कसा लागतो हे सगळंच आम्हाला नव्यानं कळलं. मेंदू हा शरीतातील लहान भाग असला तरी साऱ्या शरीराचा कंट्रोल त्याच्याकडे असतो. मेंदूच्या कार्याबद्दलच्या अनेक प्रश्नांची उत्तरं सापडली. मेंदूतील अद्भुत विश्वाची सफर घडली.

सोनल राऊत
आजचा व्हिवा लाउंज खूपच छान होता. एखाद्या वैज्ञानिकाला गेस्ट म्हणून बोलावणं ही लोकसत्ताची कल्पना मला आवडली. मेंदू सारखा क्लिष्ट आणि तरीही महत्त्वाचा विषय विदिता यांनी खूपच सहजतेने आणि सामान्यांना कळेल अशा प्रकारे मांडला. त्या खूपच ‘डाऊन टू अर्थ’ वाटल्या. एक प्रेरणादायी व्यक्ती आज भेटली.

उर्वी सावंत
मेंदूची जडणघडण आणि बाह्य़ अनुभवांचा परिणाम याबद्दल शास्त्रोक्त माहिती कळली. मी प्रथमच एका वैज्ञानिकाशी बोलू शकले. आमच्या पिढीला अशा कार्यक्रमांची गरज आहे. असे कार्यक्रम पुन:पुन्हा व्हावेत.

सुरभी सुर्वे
मेंदू सारखा किचकट आणि कठीण विषय सरळ सोप्या भाषेत समजावून सांगितला. स्त्री आणि पुरुषांच्या मेंदूची जडणघडण आणि बौद्धिक क्षमता सारखी असते, हे त्यांनी प्रभावीपणे समजावून सांगितलं. समाजात आजही चालू असलेला स्त्री-पुरुष भेदभाव बंद व्हावा.

तारुण्याच्या वाटेवर..
मेंदूचा एक भाग असतो- प्रीफ्रंटल कॉर्टेक्स. या भागाचं काम नियंत्रणाचं.. विवेक इथूनच निर्माण होतो. उत्क्रांतीतील आपल्या भाऊबंदांपेक्षा माणूस पुढे निघून गेला, कारण माणसाच्या मेंदूचा हा भाग इतरांपेक्षा जास्त विकसित झाला. प्रीफ्रंटल कॉर्टेक्समुळे भावनांवर आपलं नियंत्रण राहतं. पौगंडावस्थेतील मानवाच्या मेंदूत हा भाग पुरता विकसित झालेला नसतो. म्हणून १३- १४ वर्षांचा मुलगा लवकर चिडतो. मोठय़ांप्रमाणे त्याचे भावनांवर नियंत्रण राहत नाही. तारुण्याच्या वाटेवर मेंदूचादेखील विकास होत असताना, त्याला विवेक शिकवायला हवा. आजची तरुण पिढी ज्या वातावरणात वाढतेय, ते खूप गुंतागुंतीचं आहे. पूर्वीच्या पाच-सात मित्रमंडळींच्या ऐवजी आता त्यांच्याभोवती शेकडो फेसबुक फ्रेंड्स असतात. आपण त्यांच्यासाठी ‘ऑनलाइन युनिव्हर्स’ निर्माण केलंय. त्यांची संवादाची पद्धत बदलली आहे. मित्रमंडळींना भेटता तेव्हा मेंदू त्यांच्या चेहऱ्यावरील प्रतिसाद टिपत असतो. आता इंटरनेटच्या युगात प्रतिसाद देणारं चेहरा हे माध्यमच निघून जातंय. ऑडिटरी फीडबॅकही मिळत नाही. त्यामुळे संवेदना हरवल्या आहेत. पण तरुण पिढी हा बदलदेखील स्वीकारेल. मेंदू हे बदल आत्मसात करेलच, कारण उत्क्रांतीची प्रक्रिया अखंड सुरू आहे. पण हे सोपं नाही.