परीक्षा, अभ्यास, रिलेशनशिप, मैत्री, करिअर, लुक्स.. तरुणाईच्या आयुष्यात यातलं काहीही हल्ली तणाव निर्माण करतं. असुरक्षितता, घाई, धावपळ, स्पर्धा आणि तणाव.. यातून सुटका नाही का? हे सगळं नसेल तर आयुष्यात मजा काय? यातली खुमारी तर राहिली पाहिजे, पण तोलही जायला नको. करता येईल असं?

 स्ट्रेस मॅनेजमेंटच्या टिप्स देणाऱ्या गोष्टी दर आठवडय़ाला..

नार्सिसस ग्रीक होता. तो अतिशय देखणा होता. एके दिवशी त्यानं तळ्यात आपलं प्रतिबिंब पाहिलं आणि त्याची तहानभूक हरवली. तो स्वत:च्याच प्रेमात पडला आणि आपलं प्रतिबिंब आयुष्यभर निरखत राहिला. सेल्फी काढणारे असे अनेक नार्सिसस आपल्या आजूबाजूला दिसतात. आपण कसे दिसतो हे पाहायला आवडतं आपल्याला. कुठलाही ग्रुप फोटो पाहिला, की आपण पहिल्यांदा स्वत:ला शोधतो. पूर्वी फोटो काढायला कुणी तयार व्हायचं नाही, कारण जी व्यक्ती फोटो काढायची ती यायचीच नाही फोटोत; पण आता सेल्फीनं ही अडचण सोडवलीय. आता कुठल्याही निवांत, एकांत ठिकाणी आपला आपल्याला सहज फोटो घेता येतो; वेगवेगळ्या पोझेसमध्ये, मूडमध्ये, रोमॅन्टिक अवस्थेत! ‘अ पिक्चर स्पीक्स लाऊ डर दॅन अ थाऊजंड वर्ड्स’ असं म्हणतात. त्यामुळे अनेक जण आपल्याला काय वाटतंय हे लिहिण्याऐवजी सेल्फी पोस्ट करतात. स्वत:चं प्रमोशन करण्यासाठी सेलेब्रिटीज सेल्फीचा सर्रास वापर करतात. कॉन्फिडन्स, सेल्फ एस्टीम अशा गोष्टींशीही सेल्फीचा संबंध जोडला गेलाय.

आणखीही काही कारणं असतात सेल्फी काढायला. खूप जणांना फिरायला आवडतं. वेगवेगळ्या जागा, निरनिराळे देश पाहायला आवडतात. तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ चाखायला आवडतात. त्या आठवणी जपायलाही आवडतं. म्हणून ते सेल्फी काढतात; पण फक्त मेमरी जपणं इतकाच उद्देश असतो का त्यात? नाही खरं तर. आपण कुठे कुठे गेलो होतो हे इतरांनाही सांगायचं असतं. त्याशिवाय कुठे चैन पडतंय आपल्याला? सोशल मीडियावर लाइक्स मिळाल्याशिवाय उपयोग काय सेल्फीचा, हो ना? मग त्यासाठी बॅकग्राऊंड फार महत्त्वाची ठरते. मागचा सीनिक व्ह्य़ू किंवा आयफेल टॉवर किंवा लंडन ब्रिज दिसायलाच हवा ना? समजा फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, इंस्टाग्राम अशा सोशल नेटवर्किंग साइट्स नसत्या तर? सेल्फीची क्रेझ तितकीच राहिली असती का?

मग असा स्पेशल व्ह्य़ू शोधता शोधता अतिरेक होतो काही वेळा. कुठल्याही टोकाला जायची, धोकादायक जागांपर्यंत पोचायची तरुणांची तयारी असते त्यासाठी. काही वेळा जिवावर बेततं. सेल्फी काढताना जीव गमावण्याच्या कारणांची ही यादी पाहिली तर विश्वास बसत नाही. उंचावरून खाली कोसळणे किंवा पाण्यात बुडणे, ही नेहमी सापडणारी कारणं. कुठल्या तरी इमारतीच्या किंवा कडय़ाच्या अगदी काठावर जाऊन सेल्फी काढण्याच्या नादात सुरक्षिततेचं भान सुटतं. कधी ट्रेनच्या वरती उभं राहून फोटो काढताना वरच्या विजेच्या वायरचा शॉक बसून जीव जातो. धबधब्याच्या, नदीच्या किंवा समुद्राच्या कडेशी उभं राहून फोटो काढणे, बोटीत फोटो काढण्याच्या नादात बोट उलटणे अशा गोष्टींमुळे अनेक जण बुडतात. येणाऱ्या ट्रेनच्या समोर उभं राहून सेल्फी काढण्याची आयडिया ज्याला सुचली असेल तो तर खरोखरच धन्य आहे. जंगली प्राण्याबरोबर फोटो काढताना (अस्वल, साप, बिबटय़ा वगैरे), ड्रायव्हिंग करताना, इतकंच नव्हे तर कानापाशी रिव्हॉल्व्हर धरून सेल्फी काढताना अचानक गोळी उडूनही माणसं मरण पावलीयेत. त्यावरून ‘किल्फी’ किंवा किलर सेल्फी हा शब्द वापरात आलाय. अशी धोका पत्करण्याची सवय मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये जास्त असल्यानं सेल्फी डेथ्स तरुणींपेक्षा तरुणांमध्ये जास्त दिसतात.

अर्थातच हे टाळण्यासाठी अवेअरनेस हवा; पण इतर अनेक गोष्टींप्रमाणे याही बाबतीत आपण टेक्नॉलॉजीच्या मागे आहोत. म्हणजे अगदी लेटेस्ट टेक्नॉलॉजी आपल्याला उपलब्ध आहे, पण ती हाताळण्याइतकी मॅच्युरिटी कुठेय? मग कायद्याला मध्ये पडावं लागतं. अनेक टुरिस्ट स्पॉट्समध्ये धोकादायक ठिकाणं ‘नो सेल्फी झोन्स’ म्हणून डिक्लेअर केली गेलीयेत. नुकताच स्वातंत्र्य दिन साजरा झाला. आपण सगळ्यांनी वेगवेगळ्या प्रकारे आपलं देशप्रेम व्यक्त केलं. (तिरंग्याबरोबर सेल्फी काढून मीडियावर टाकले.) पण तुम्हाला माहितेय का, की काही आकडेवारीनुसार सगळ्यात जास्त सेल्फी डेथ्स आपल्या भारतात होतात? आपला देश अशा गोष्टींमध्ये ‘नंबर वन’ नको.. नाही का?

viva@expressindia.com