भारतीय आणि पाश्चिमात्य अशा दोन संस्कृतींची भेसळ आज अनेक ठिकाणी पाहायला मिळते. असंच फ्यूजन खाबूमोशायला बोरिवली येथे ‘श्रीजीज्’ या गाडीवर खायला मिळालं. या गाडीवर आपली अस्सल चाट संस्कृती आणि इटालियन खाद्यसंस्कृती यांची मस्त सरमिसळ झाली होती. या सरमिसळीने खाबूमोशायचा आत्मा ढेकर येईल एवढा तृप्त केला.

सात सुरांना सीमेचं बंधन नसतं. त्यामुळेच संगीताची भाषा संपूर्ण जगात एकच असते. आपल्याकडे ‘सा-रे-ग-म’ असलेले स्वर युरोपात ‘डो-रे-मी-फा’ असे वाजले, तरी आवाज तोच येतो. गाण्याच्या बाबतीत एक असलेली जगाची भाषा खाण्याच्या बाबतीतही एकच असते. म्हणजे उत्तम पदार्थ खाल्ल्यानंतर इंग्लंडातला एखादा जॉन काका ढेकर देतो, तशीच ढेकर आपल्याकडले जन्याबापूही देतात. उत्तम पाककृतीला अगदी आतून आलेली दाद ती! आता सुरांचं चलन दोन्हीकडे वेगवेगळं असतं तसाच वेगळेपणा खाद्यसंस्कृतीतही असतो. पण मूळ आत्मा एकच! म्हणूनच कदाचित खाबूमोशायला संगीतातल्या फ्यूजनप्रमाणे खाण्यातलं फ्यूजन खूप आवडतं. काही महिन्यांपूर्वी खाबूने तुम्हाला भारतातल्याच दोन खाद्यसंस्कृतींच्या फ्यूजनची ओळख रसगुल्ला चाट या पदार्थाच्या माध्यमातून करून दिली होती. तसा मेळ शेझवान डोश्यातही सापडतो. असेच काही अफलातून पदार्थ खाबूमोशाय आज तुमच्यासाठी घेऊन आला आहे.

पश्चिम उपनगरांतील बोरिवली हे उपनगर प्रचंड प्रसिद्ध आहे. नॅशनल पार्कपासून वॉटरपार्कपर्यंत विविध गोष्टींसाठी बोरिवलीची कीर्ती सर्वदूर पसरली आहे. मराठी आणि गुर्जर बांधव यांचे प्राबल्य असलेल्या या उपनगरात उत्तमोत्तम खाद्यपदार्थाची रेलचेल आहे. याच उपनगरात मेहुल नावाच्या एका तरुणाने आपल्या कल्पक डोक्यातून भारतीय चाट आणि इटालियन अशा दोन खाद्यसंस्कृतींचे फ्यूजन करून काही भन्नाट डिश जन्माला घातल्या आहेत. या डिश केवळ वेगळ्या नाहीत, तर चविष्टही आहेत. बोरिवलीतल्या या ‘श्रीजीज्’ गाडीवर आल्यावर किमान दोन डिशची चव घेतल्याखेरीज इथून बाहेर पडणं शक्यच नाही.

बोरिवली स्थानकात उतरल्यावर पश्चिमेला बाहेर आल्यावर चामुंडा सर्कलकडे चालू लागायचं. त्याला उजवी घातली की, लगेचच उजव्या हाताला खाद्यपदार्थाच्या काही गाडय़ा उभ्या दिसतात. यातच ‘श्रीजीज्’ ठाण मांडून उभी असते. आणखी जवळची खूण म्हणजे प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहाच्या बाहेर येऊन नाटय़गृहाकडे पाठ करून उभं राहिल्यावर डायगोनली अपोझिट दिशेला ही गाडी उभी असते.
खाबूमोशायला या गाडीचा शोध घेणं थोडंसं कठीण गेलं. खाबूने एका-दोघांना विचारूनही बघितलं. पण हा हन्त! एकापेक्षा एक सरस खाद्यपदार्थ विकणाऱ्या या गाडीची खबर इथल्या लोकांनाच नाही, हे ऐकून खाबूमोशायला खूप अफसोस झाला. पण पिकतं तिथे विकत नाही, ही म्हण ध्यानी घेऊन खाबूमोशायने आपला शोध जारी ठेवला. या गाडीवर पिझ्झा पंच नावाचा एक पदार्थ मिळतो, एवढीच कुणकुण खाबूला लागली होती. पण एकाच देवाचे नाव ऐकून एखाद्या देवळात दर्शनाला गेल्यानंतर तिथे ३३ कोटी देवांच्या मूर्ती बघून एखाद्या भाबडय़ा भाविकाची अवस्था कशी होईल, तशीच अवस्था ही गाडी बघून खाबूमोशायची झाली.

आइस पानीपुरी, आइस सेवपुरी, आइस भेलपुरी असे बर्फाळलेले चाट पदार्थ; मॅक्सिकन फुसकी, इटालियन फुसकी, पिझ्झा पंच, जंगली सेवपुरी असे भन्नाट पदार्थ; आणि आपले साधे चाट पदार्थ या गाडीवर मिळतात. खाबूने कसाबसा त्या गर्दीत शिरकाव करून पिझ्झा पंच ऑर्डर केला. केवळ त्यावर भागणार नाही, हे ध्यानात घेऊन त्याने लगेचच इटालियन फुसकीसुद्धा ऑर्डर केली आणि हे पदार्थ कसे तयार केले जातात, हे पाहण्यासाठी खाबू तिथेच गाडीला खेटूनच उभा राहिला.

सुरुवातीला पिझ्झा पंच तयार करायला या माणसाने पाणीपुरीच्या पुऱ्या प्लेटमध्ये मांडल्या. त्यात त्याने मक्याचे दाणे, सिमला मिरचीचे छोटे तुकडे, पिझ्झावर किंवा पास्तामध्ये टाकण्यात येणारे एलोपेनोज्, ऑलिव्ह्ज, पास्त्यातील थोडा सॉस, थोडा चाट मसाला, ओरेगॅनो असा ऐवज भरला. त्यावर भरमसाट चीझ किसून टाकलं. एवढय़ाने भागलं नाही म्हणून की काय, त्याने आपल्याकडील बर्नरने हे चीझ थोडंसं जाळलं आणि ही प्लेट खाबूच्या समोर ठेवली. खाबूने हे पाहून थोडय़ाशा भीतीने आणि बऱ्याचशा कुतूहलाने यातील एक पुरी तोंडात कोंबली. पुरीचा कुरकुरीतपणा, आतील इटालियन स्टफिंग आणि त्यावरच्या चीझचा सॉफ्टनेस यांनी खाबूमोशायच्या तोंडचे पाणी १०० पटींनी वाढवले.

ही डिश फस्त होईपर्यंत या माणसाने, म्हणजेच मेहुलने (तोपर्यंत खाबूने त्याच्याशी जानपेहचान वाढवून त्याचं नाव वगैरे विचारून घेतलं होतं) पुढली डिश तयार करायला घेतली. इटालियन फुसकी हा सांप्रतकाली काय बरे प्रकार असावा, या बालसुलभ कुतूहलाने खाबूमोशायने तोंडाचा चंबू करून पाहायला सुरुवात केली. मेहुलने एका वाडग्यात पुन्हा मगाचचे जिन्नस घेतले. त्यात पास्त्यासाठी टाकणारा व्हाइट सॉस टाकला, थोडासा रेड चिली सॉस टाकला, त्यावर चाट मसाला, ओरेगॅनो वगैरे शिंपडलं आणि हे सगळं मिश्रण एकजीव केलं. त्यानंतर त्याने शेवपुरीच्या चपटय़ा पुऱ्या घेऊन त्या पुऱ्यांवर हे मिश्रण मोठय़ा खुबीने पसरलं. त्यावर पुन्हा भरमसाट चीझ किसून हा ऐवज खाबूसमोर पेश झाला. या डिशचं नाव इटालियन फुसकी असलं, तरी डिश अजिबातच फुसकी वगैरे नाही. चांगलीच तगडी आहे. इथे मेक्सिकन फुसकी नावाचाही प्रकार मिळतो. ही डिश मुंबईतील सर्वात तिखट डिश आहे, असा दावा मेहुल करतो. पण उद्या एखादी व्यक्ती लाल तिखट, मीरपूड, त्यात मीठ आणि काही लवंगी मिरच्यांचा ठेचा एका पुरीत कोंबून ती डिश सर्वात तिखट असल्याचा दावा करू शकेल. खाबूला सर्वात जास्त तिखट वा गोड यात रस नाही. पदार्थाने जिभेला रिझवलं पाहिजे, उगाचच काहीतरी सिद्ध करण्याच्या मस्तीत येऊ नये, हे खाबूचं मत आहे.
हे दोन अनोखे पदार्थ खाल्ल्यानंतर वास्तविक खाबूने थांबायला हवं होतं. पण तेवढय़ात खाबूला जंगली सेवपुरी मतलब क्या, असा प्रश्न विचारण्याची बुद्धी सुचली. त्यावर त्या बल्लवाचार्याने असल में जंगली हैं, खाके देखो तो जानों.. लेकीन पुरी डिश आप नहीं खा पाओगें.. असं खाबूच्या खवय्येगिरीला आव्हानच दिलं. खाबूनेही मग ती डिश हाजीर करण्याचा हुकूम सोडला. आता पुन्हा शेवपुरीच्या चपटय़ा पुऱ्या प्लेटमध्ये स्थानापन्न झाल्या. त्यावर बटाटा, कांदा, टॉमेटो, सिमला मिर्ची, मक्याचे दाणे, ऑलिव्हज, एलोपेनो, आदी विराजमान झालं. एवढय़ाने भागलं नाही म्हणून की काय, त्या माणसाने या सर्वावर किसलेलं गाजर आणि बीट टाकून त्या पुरीचा आकार अवाढव्य केला. त्यावर चटण्या आल्या आणि मग बारीक शेवेची पखरण आणि डाळिंब्यांचे दाणे टाकून खाबूसमोर हे आव्हान त्याने ठेवलं.

शेवपुरी तोडून खाणं, हा खाबूला शेवपुरीचा आणि स्वत:चाही अपमान वाटतो. शेवपुरी अख्खीच खायला हवी, आंबा शक्यतो चुपून खायला हवा, पुरणपोळीवर तुपाची धार हवीच, असे काही खाबूचे ठोकताळे आहेत. त्यामुळे खाबूने जमेल तेवढा जबडा फाकवला आणि त्यात ही जंगली शेवपुरी फिट्ट बसवण्याचा प्रयत्न केला. काही प्रमाणात तो यशस्वी झाला आणि खाबूच्या उरल्यासुरल्या जबडय़ावर हास्यरेषा उमटल्या. पहिल्या चार पुऱ्यांतच खाबूमोशायचा पुरता बिमोड झाला होता. पण ही डिश एवढी चविष्ट होती की, खाबूला ती टाकणं जिवावर आलं होतं. शेवटी चार किलोमीटर जास्त चालण्याचा संकल्प करून खाबूने उरलेल्या पुऱ्यांना हात घातला.

या सगळ्या ऐवजाचं बिल फक्त १९० रुपये झालं. हे पदार्थ वेगळे आहेत आणि जिभेचे चोचले पुरवणारे आहेत. ते शोधून काढणाऱ्या आणि इतरांना खाऊ घालणाऱ्या मेहुलच्या कल्पकतेला मनातल्या मनात सलाम करत खाबूमोशायने चार किलोमीटरची चाल सुरू केली. ल्ल
कुठे : श्रीजीज्, चामुंडा सर्कल, बोरिवली पश्चिम
कसे जाल : बोरिवली पश्चिमेला विरारच्या दिशेने उतरून चालायला सुरुवात करा. गोरा गांधी हॉटेल डाव्या बाजूला ठेवून पुन्हा डावीकडे वळा. सरळ चालत गेल्यावर चामुंडा सर्कल दिसेलच. चामुंडा सर्कलवरून उजवीकडे वळा. तिथे उजव्या बाजूला अनेक गाडय़ांमध्ये तुम्हाला ‘श्रीजीज्’ही दिसेल.

– खाबू मोशाय