तरुण वाचकांच्या मनात शिरून त्यांना आवडलेलं पुस्तक आणि त्यातला त्यांना भावलेला विचार तुमच्यापर्यंत पोहोचवणारं हे नवं सदर..

अमेरिकन लेखिका गिलियन फ्लिन हिची एक अद्भुत सस्पेन्स थ्रिलर कादंबरी म्हणजे ‘गॉन गर्ल’. या लेखिकेची लिखाण शैली नेहमी मुद्देसूद आणि वैचारिक असते. या पुस्तकातील घटनांची गती फार अफलातून लिहिली गेली आहे, त्यात कित्येक ट्विस्ट अ‍ॅण्ड टर्न्‍स आहेत. ही ओळ विशेष आहे, कारण त्यातून काय अर्थ काढायचा ते लेखिकेने वाचकावरती सोडलं आहे. या कथेत नीक व अँमी नावाचं जोडपं आहे. त्या जोडप्याच्या लग्नाचा पाचवा वाढदिवस असतो आणि ते आपल्या पालकांसहित एका रेस्टॉरंटमध्ये जातात. घरी आल्यावर अचानक त्यांच्या मिसिसिपी नदीजवळच्या मॅक मेन्शन्स या इमारतीतून निकची बायको गायब होते, असं निकला समजतं. यात लेखिकेने या दोन पात्रांभोवती दोन वेगळी चित्रं उभारली आहेत. कादंबरीच्या पहिल्या भागात या दोघांच्या आयुष्यातली उलगडलेली गुपितं दुसऱ्या भागात हळूहळू या दोन्ही पात्रांवर संशय यावा इतकी गूढ होत जातात, हे या कादंबरीचं सौंदर्य आहे असं मला वाटतं. नक्की जोडप्यांमध्ये आपापसांत अहंकार असतो का? दुजाभाव असतो का? आदर्श वाटणारं जोडपं अचानक असं कसं दुभंगतं? अशी काय अढी निर्माण होते की नवरा-बायको या नात्यात असूनही वेगळीच रहस्यं त्यांच्याभोवती निर्माण होतात, ज्याने इतरांना चर्चेचा विषय मिळतो?

आपल्या समाजाला नवरा-बायकोतल्या भांडणावर सतत टिप्पणी करायला आवडते. या कादंबरीत नीकची बायको अचानक गायब होते, त्यामुळे इतर लोकांच्या तोंडात नीकचं नाव एक संशयित म्हणून येतं. त्यानुसार पोलीस त्याला अटकही करतात. या ओळीतून हेच सांगायचं आहे की चूक कोणाची? त्यानेच तिला गायब केलं का? तोच त्यामागे आहे का, हे असे प्रश्न समाजाने विचारण्यापेक्षा काहीच पुरावे नसताना त्या व्यक्तींवर कोणतीही चिखलफेक करू नये. त्यांना त्यांच्या गोष्टी समजून घ्यायला वेळ द्यायला हवा. अनेकदा दोघांचं एकमेकांवर प्रेम असतं आणि तरीही त्यांचं नातं बहरत नाही, पुढे जाऊ शकत नाही आणि हीच खरी शोकांतिका ठरते, असं लेखिका या ओळीतून स्पष्ट करते.