23 November 2017

News Flash

व्हायरलची साथ : सर्वश्रेष्ठ प्राणी?

शेतकऱ्यांचा मित्र अशी ज्याची ओळख आहे त्या सापाचं डोकं बिअरच्या कॅनमध्ये अडकलंय

प्रशांत ननावरे | Updated: October 6, 2017 4:36 AM

पृथ्वीतलावरील प्रत्येक प्राणी निसर्गात मिळेल ते खातो, नैसर्गिक गोष्टींपासूनच आपला अधिवास निर्माण करीतो आणि त्याला जेव्हा इतर प्राण्यांपासून धोका असतो फक्त तेव्हाच तो आक्रमक होतो किंवा हल्ला चढवतो. पण या सर्व गोष्टींना अपवाद ठरेल असा वेगळा प्राणीही या भूतलावर अस्तित्वात आहे. तो स्वत:ला या सर्व प्राण्यांपेक्षा हुशार समजतो, त्यांच्यावर अधिराज्य गाजवतो, इतरांना गुलाम बनवतो आणि कारण नसताना बिनडोकपणे वागून इतरांसाठी डोकेदुखी होऊन बसतो.

एव्हाना तुम्हाला हा अपवादात्मक प्राणी कोण हे नक्कीच कळलं असेल. हा प्राणी हुशार आहे. कारण याला लिहिता, वाचता आणि बोलता येतं. इतर प्राण्यांमध्येही या क्षमता असतात फक्त आपल्यासारखी लिखित अशी त्यांची कुठलीच भाषा नाही. गुहेत राहिलेला हा अपवादात्मक माणूस प्राणी आता विज्ञान-तंत्रज्ञानाच्या मदतीने परग्रहावरही आपला झेंडा लावू इच्छितोय. त्याच्या महत्त्वाकांक्षांचं कौतुक आहेच. पण एक गोष्ट विसरता कामा नये की, त्याने पृथ्वीतलावर जो हैदोस माजवलाय त्या संदर्भात त्याला वेळीच लगाम बसला नाही तर तो स्वत: लवकरच अडचणीत येऊ  शकतो. म्हणूनच प्रगतीच्या नावाखाली त्याने केलेले प्रयोग आणि इतर जीवांच्या जगण्यावर केलेलं अतिक्रमण कधी कधी प्रचंड राग आणतात.

असाच एक वेदनादायी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरतोय. हा व्हिडीओ नेमका कुठे चित्रित झालाय हे ठोसपणे सांगता येत नसलं तरी अनेक ठिकाणी तो मध्य प्रदेशमधल्या बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील असल्याचं म्हटलं आहे. शेतकऱ्यांचा मित्र अशी ज्याची ओळख आहे त्या सापाचं डोकं बिअरच्या कॅनमध्ये अडकलंय आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याचा संघर्ष चाललाय असा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओमध्ये हा साप शेतातील वाटेवर इकडून तिकडे फिरतोय आणि जीवाचा आटापिटा करीत आपली त्या बिअरच्या कॅनपासून सुटका व्हावी यासाठी विव्हळतोय, हे पाहणं एका संवेदनशील मनाला फारच क्लेशदायक आहे. व्हिडीओत एकही व्यक्ती दिसत नसली तरी स्थानिक तरुणांनी हा व्हिडीओ मोबाइलमध्ये चित्रित करून व्हायरल केल्याचा प्राथमिक अंदाज सहज बांधता येऊ  शकतो. यामध्ये ते सापाच्या या केविलवाण्या अवस्थेची मजा लुटत असल्याचं त्यांच्यातील संवादांमधून कळतंय. ते एकीकडे या सापाचा पाठलाग करताहेत, दुसरीकडे त्यांचे मागे ऐकू येणारे व्हिडीओ बनवत राहा, चांगला व्हिडीओ तयार कर, साप बिअर पितोय, सापाला बिअर पिताना कधी पाहिलंय का? असे संवाद आणखीनच तिडीक आणतात. सापाला वाचवणं तर दूरच, पण त्याच्या अवस्थेची मजा लुटण्यातच त्या तरुणांना अधिक आनंद मिळतोय. त्या बिचाऱ्या सापाचं पुढे काय झालं हे कळू शकलेलं नाही ही आणखीन एक वाईट गोष्ट.

तसं पाहायला गेलं तर ही अतिशय छोटी घटना आहे. त्याची खरं तर नोंद घेण्याचीही आवश्यकता नाही (?) कारण जिथे रोज कसलीही चूक नसताना माणसंही हकनाक मरतात किंवा मारली जातात, त्याच्यासमोर हे काहीही नाही. पण अशा लहानसहान गोष्टींमधूनच आपली मानसिकता दिसत असते. आपल्याला जे शाळा-महाविद्यालयात शिकवलं जातं त्याला प्रॅक्टिकल आयुष्यात आपण कसा हरताळ फासतो याचं हे अतिशय उत्तम उदाहरण आहे. प्राणी-पक्ष्यांची शिकार करणं हे आपल्याकडे राजेशाही थाटाचं वागणं म्हणून मानलं जात आलं आहे. त्यामुळे सामान्य जनतेला त्याचं नेहमीच अप्रूप वाटत आलंय. आजही आपल्याकडे काही आदिवासी प्रजाती शिकार करतात, पण त्यांचा संघर्ष हा जगण्याचा आहे. त्याउपर आपण हल्ली मनोरंजनासाठी म्हणून अशा अनेक गोष्टी करू लागलो आहोत. हा साप शेतात बिअर कॅ नमुळे अडचणीत आला हे पण लाजिरवाणं आहे. शेत ही बिअर पिण्याची जागा असू शकते का? आणि असल्यास मागे राहणारा कचरा तसाच सोडून देण्यातच पिणारेही धन्यता मानतात. आपल्याकडे समुद्रकिनारे, गड-किल्ले, सार्वजनिक फिरण्याच्या जागा अशा अनेक ठिकाणी आपण आपल्या या दळभद्री मानसिकतेचं प्रदर्शन करीत असतोच. या सर्व गोष्टींचा त्रास माणसांना होतो तिथपर्यंत ठीक आहे, कारण माणसांना एकमेकांची भाषा कळते. बोलून ते हे प्रश्न निकालात काढू शकतात. पण आपल्या चुकांची किंमत मुक्या प्राण्यांना चुकवावी लागत असेल तर त्यापेक्षा दुसरं मोठं पाप नसेल. आपल्या सदसद्विवेकबुद्धीचा वापर करून ज्या दिवशी माणूस प्रत्येक जीवाविषयी संवेदनशील होईल त्या दिवशी माणूस हा खऱ्या अर्थाने सर्वश्रेष्ठ प्राणी ठरेल.

viva@expressindia.com

First Published on October 6, 2017 12:32 am

Web Title: snake gets head stuck in beer can