15 December 2018

News Flash

‘पॉप्यु’लिस्ट : गाण्यांमधले समाजभान!

जगातील कुठल्याही प्रांतात आणि कोणत्याही भाषेत गाणी लिहिताना समाजभान असते.

अमित त्रिवेदी या संगीतकाराबाबत एक गंमतशीर घटना २००८ साली घडली होती. म्हणजे या संगीतकाराचे ‘देव डी’मधील सर्वोत्तम काम अद्याप जगजाहीर व्हायचे होते. त्यानेच संगीतबद्ध केलेल्या ‘आमिर’ हा दहशतवादी हल्ल्याचे एक अज्ञात रूप दाखवणारा चित्रपट प्रदर्शित होऊन काही महिने लोटले होते. त्यातील ‘चक्कर घुमयो’सह सारीच गाणी लक्षणीय होती. ‘आमिर’मधील गाणी प्रदर्शित झाल्याच्या काही महिन्यांनी मुंबईत दहशतवादी हल्ला झाला. तेव्हा वृत्तवाहिन्यांवरील चाणाक्ष आणि स्वरजाणत्या प्रतिनिधीने दहशतवादाच्या सावटाखालील मुंबईचे चित्रण करताना ‘आमिर’ या चित्रपटातील शिल्पा राव हिने गायलेले ‘एक लव इस तरह’ हे गाणे वाजवून हल्ल्यात शहीद  झालेल्यांना श्रद्धांजली दिली (आजही यू टय़ूबवर ही गीत श्रद्धांजली पाहायला मिळू शकते.) हे गाणे वृत्तदृश्यांसाठी इतके चपखल बसले होते, की जणू याचसाठी करून घेतले आहे की काय, असे वाटावे.

जगातील कुठल्याही प्रांतात आणि कोणत्याही भाषेत गाणी लिहिताना समाजभान असते. आता आपल्याकडच्या काही उथळ गाण्यांमध्ये समाजातील जाणीव शोधायला गेलात, तर नक्कीच उथळतेचा शोध सहज लागू शकेल. सध्या आत्मटीकेचा पवित्रा न घेता आंतरराष्ट्रीय गाण्यांमध्ये कलाकार समाजमनाशी कसे एकरूप होतात, याचा शोध घेणे आवश्यक आहे. जस्टिन टिंबरलेक याला या युगातील थोर कलाकार म्हणून मान्यता मिळाली आहे. साठच्या दशकात गे तलिस नावाच्या शोध पत्रकाराने आपल्या काळातील परमोच्च स्थानी असलेल्या संगीत धुरिणीवर ‘फ्रँक सिनात्रा हॅज कोल्ड’ नावाचा लेख लिहून जागतिक नवपत्रकारितेचा अध्याय सुरू केला होता. डेव्हिड सॅॅम्युअल नावाच्या लेखकाने चार वर्षांपूर्वी ‘जस्टिन टिंबरलेक हॅज कोल्ड’ या नावाने प्रदीर्घ व्यक्तिविशेष लिहून आजच्या काळाशी सुसंगत असा हा कलाकार का आहे, याचे दाखले दिले होते. वैश्विक संगीत ऐकणाऱ्या भारतीय कानवेडय़ांना व्यक्तिश: टिंबरलेकची गाणी आवडावी इतकी श्रवणीय नाहीत. पण गेल्या महिन्यात त्याने प्रकाशित केलेले  ‘से समथिंग’ हे गाणे त्याच्या विषयीच्या सर्व पूर्वग्रहांवर मात करणारे आहे. सातत्याने समाजमाध्यमांवर दुसऱ्याकडे कोणता ना कोणता सल्ला मागून बेजार करणाऱ्या वैश्विक मनोवृत्तीवर हे गाणे रचण्यात आले आहे. फेसबुक, ट्विटरवर प्रत्येकाला सतत व्यक्त व्हायची आणि दुसऱ्याकडून जाणून घ्यायची जी घाई असते, त्या सर्वाचे सार ‘से समथिंग’ या गाण्यामध्ये आहे. ख्रिस स्टेपलसन या आणखी एका गिटारिस्ट कलाकारासोबत गायलेले हे युगल गीत सुरुवातीपासून वापरलेल्या आकुस्टिक आणि इलेक्ट्रॉनिक्स करामतींनी कानवेधी बनते. (हेडफोन स्पीकर्स सर्वोत्तम असायला  हवेत.) सहा वेळा उच्चारला जाणारा ‘से समथिंग’चा घोषा हे या गाण्यातील सौंदर्य आहे. अर्थ सापडला आणि आपल्या भवतालाशी त्याला पडताळून पाहिले, तर टिंबरलेकचे हे सर्वोत्तम गाणे असल्यावर विश्वास  बसेल.

सिर्गिड या नॉर्वेमधील गायिकेची गाणी सध्या फार जोमात आहेत. नुकतेच बीबीसीचे पारितोषिक पटकावणारी ही गायिका ‘डोंट किल माय वाईब’ या गाण्यामुळे जगातील म्युझिक याद्यांत पोहोचली. ‘प्लॉट ट्विस्ट’, ‘डायनामाईट’ या गाण्यांसह तिचे बिलबोर्ड याद्यांमध्ये गाजत असलेले ‘स्ट्रेंजर’ हे गाणे लक्षणीय आहे. प्रत्येकाला चित्रपटातील तारांकित व्यक्तीसारखे आपले आयुष्य जगायचे असते. त्यावर चिंतनचिंता दर्शवत व्यक्त केलेली लोभनीय शब्दफेक हे या गाण्याचे वैशिष्टय़ आहे. ‘चेनस्मोकर्स’ या बॅण्डचे ‘सिकबॉय’ हे गाणे प्रत्येक संगीत याद्यांच्या दहाच्या आतमध्ये आहे. गाण्यामध्ये अमेरिकेतील वंशभेदावर आणि राजकारणावर थेट हल्ला चढविण्यात आला आहे. पश्चिम आणि पूर्व भागातील गुण-अवगुणांचा समुच्चय असलेल्या या रागयुक्त शब्दांना आणि चालीला ऐकणे महत्त्वाचे आहे. ‘प्यार’, ‘मुहोब्बत’, ‘इश्क खुदाया’ आदी ढोंगीपणावर कळस चढविणाऱ्या शब्दांनी परिपूर्ण आपल्या गीतांशी या गाण्यांची तुलना होऊच शकत नाही. ‘पार्टी ऑल नाइट, आँटी पुलीस बुलादेगी’, ‘प्यार से करेंगे सबका स्वागत’सारख्या सुमार (तरी वास्तववादी) गाण्यांना चलनात आणण्यासाठी ढोंगी शब्दांचा अतिमारा कारणीभूत आहे का, असा प्रश्न पडल्यास दरएक गाण्यांमधून आपण फक्त समाजाची स्थिती पडताळू शकतो. कोणतीही कला समाज घडवत असते, तसेच समाज दर्शवतही असते. आजची यादी नीट ऐकलीत तर त्याचा प्रत्यय येईल.

म्युझिक बॉक्स

  • Justin Timberlake ft. Chris Stapleton – Say Something
  • Post Malone Feat. Ty Dolla $ign – Psycho
  • The Chainsmokers “Sick Boy”
  • Sigrid – Strangers
  • Sigrid – Don’t Kill My Vibe
  • Sigrid – Plot Twist
  • Marshmello & Anne-Marie – FRIENDS

viva@expressindia.com

First Published on March 2, 2018 12:35 am

Web Title: social awareness songs bollywood songs hollywood songs amit trivedi songs