15 August 2020

News Flash

पाव्हनं.. तुम्हाला सोशल, सोसंल का?

प्रेमासारख्या अतिशय खासगी असलेल्या नात्याचा या सोशल मीडियावर बाजार झाला.

सोशल मीडिया : आजी-आजोबांना अजिबात न उमजणारा, आई-बाबांसाठी नवीन असल्यामुळे त्यांची उत्सुकता वाढवणारा आणि नीट शोधले तर आम्हा तरुणांच्या ‘डीएनए’त हमखास सापडणारा एक अवलिया शब्द! सोशल या शब्दाचा अर्थ ‘समाज संबंधित’ असा असला, तरी बऱ्याचदा नेहमीच्या वापरात आत्मकेंद्री असलेली ही टर्म वाऱ्याच्या आवेगाने घराघरांत, मनामनांत केव्हा, कशी अलगद विसावली हे कळलंच नाही.

याच्या पहिल्यावहिल्या दिवसांत आपण डमोकावले तर दिसून येते, की हजारो दुरावलेली नाती या माध्यमातून एकत्र आली. शाळेतले मित्र, मित्रांचे मित्र यानिमित्ताने पुन्हा एकदा रोजच्या सारखे भेटू लागले. यामुळे माणसे जवळ आली, कालांतराने ती अधिक जवळ आली आणि आतातर याच जवळ पणाचं बंधन घालून एकमेकांच्या आयुष्याला बांधील झाली. या सोशल मीडियावर नियमाने निर्थक पोस्ट टाकणाऱ्या काही सज्जन जनांची, आणि त्या पोस्ट नियमाने फॉलो करणाऱ्या अति सज्जन जनांची कधी कधी कीव आल्याशिवाय राहत नाही. समोर निसर्गाचा अवाढव्य आविष्कार, नायगारा धबधब्याच्या रूपाने धबधबा कोसळत असतो, आणि तो संपूर्ण सोहळा स्वत:च्या अस्तित्वावर न झेलता त्या अजुब्या समोरचा इसम #(हॅशटॅग)च्या नामावलीत शेकडो भावभावनांचे सोशल प्रदर्शन करून, काही हजारांच्या टाळक्यांमध्ये काही शे लाइक्स आणि दहा पंधरा ‘उदो उदोच्या’ कमेंट्स मिळवून जातो. या सोशल नादा पायी, प्रत्यक्ष अनुभवायचे अब्जावधी थेंब, कानात न मावणारी ती गर्जना मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात गाडून टाकली जाते आणि दुर्दैव हे, की याची त्याला तमा नसते.

प्रेमासारख्या अतिशय खासगी असलेल्या नात्याचा या सोशल मीडियावर बाजार झाला. यामुळे अनेक ‘शुभमंगल’ झाली हे खरंय, परंतु एका संशोधनाच्या आधारे ही नाती केवळ फॅमिली कोर्टाचे काम वाढवायलाच फक्त निर्माण झाली असे म्हटले गेले. ‘आपण आयुष्यात किती आनंदी आहोत’, याचे मार्केटिंग हेच या नात्याचं मुख्य ध्येय बनत गेलं. एकमेकांसोबत असताना फेसबुकवर इतरांशी संवाद आणि इतरांसोबत असताना व्हॉट्सअपवर एकमेकांशी संवाद असा ट्रेण्ड हळूहळू रुजू होतोय. झालाय! या एकंदर बाबींमुळे नात्यांमध्ये ‘संशय कल्लोळ’ नाटकाचे शेकडो प्रयोग न चुकता होत जातात, आणि एके दिवशी दोघे जण एकमेकांना ‘चलो इक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो!’ म्हणतात आणि किंडलवर (किंडल अॅप या प्रकारावर परिसरातील प्रेमवीर आपल्या हद्दीत येतात) राइट स्वॅपिंगचा वर्षांव होतो, व्हॉट्सअॅपवर स्टेटस बदललं जातं, त्याची समूहात चर्चा होते, काहींनी ती व्हावी म्हणून खास प्रयत्नही केलेले असतात. फेसबुकवर एकमेकांना अन्फ्रेंड केलं जातं, रिलेशनशिप स्टेटस आवर्जून बदललं जातं. मनामधली जागा अगदी स्वच्छ, रिकामी करण्यात येते, जणू कधी काही झालंच नाही. स्टेशनच्या बाकडय़ांवर जसे प्रवासी गाडी आली की उठून जातात, इतक्या सहजतेने नात्याचा बाक रिकामाही केला जातो आणि तितक्याच सहजतेने नवीन प्रवासी पुन:श्च स्थानापन्नही होतो.

सेलेब्रिटींच्या घटस्फोटांची आणि त्यांच्यातल्या दुराव्याची चिंता सोशल मीडियावर जणू काही ‘आपलं कर्तव्य’ असल्यासारखी वाहिली जाते. काही असंवेदनशील मनं त्याचीही चेष्टा करतात (चेष्टा सहन करण्या इतके कोणी योगी नसल्यामुळे), हे सेलेब्रिटीदेखील त्यांना चोख उत्तर द्यायच्या नादात काहीबाही बोलून बसतात आणि हे चR विषयाचा चोथा होईपर्यंत चालूच राहते.

सोशल मीडियाच्या भाषेत ‘फॉलो’ करणं हा अतिशय मजेशीर शब्द निघालाय बुवा! एक काळ असा होता, जेव्हा देशासाठी आहुती देणाऱ्या क्रांतिकारकांना वाच्यता न करता फॉलो केलं जायचं, अगदी सहज. कुठेही १४० शब्दांची टीव टीव न करता, हजारोच्या संख्येने लोक (स्वत:हून) सभांना जमायचे. आज कुठल्याही टुकार नट-नटीला, काल आलेल्या खेळाडूला आजचे फोलोअर्स फॉलो करतात, आणि हे (ज्यांना फॉलो केलं जातं ते) स्वत:ला युथ आयडॉल मानून बसतात. पण त्यांना हे माहीत नसतं, तो यायच्या आधी दोन दिवस कोणी दुसराच यांचा होता, आता दोन दिवस तू यांचा असशील आणि परवापासून कुणी तिसराच यांच्या ‘सर का ताज’ होणार आहे.

जेव्हा आम्हा तरुणांच्या बरोबरीने, आमच्या आईची पिढीदेखील या सोशल जाळ्यात गुरफटताना दिसते, तेव्हा हसावं की रडावं असा बिचारा प्रश्न पडतो. एखादे उत्तम नाटक बघताना, किंवा सुंदर मैफिल ऐकताना पुढल्या रांगेत बसलेल्या काकू सतत व्हॉट्सअॅपवर फोटो शेअर करत असताना दिसतात. यामुळे त्यांचा वेळ त्यांना हवा तसाच जातो, परंतु मागे बसलेल्या खऱ्या रसिकाला त्या समग्र काळोखात येणाऱ्या फोनच्या उजेडाचा जो भयंकर त्रास होतो तो, त्यांच्या वयामुळे व्यक्तही करता येत नाही आणि केला तरी जास्तीत जास्त त्या फोनचा ब्राइटनेस कमी करून उर्वरित फोटो शेअर होतात.

हल्ली, शाळेत निबंधासाठी, ‘सोशल मीडिया : शाप की वरदान’ असा विषय देतात म्हणे. तेव्हा हे लोण शाळेच्याही गणवेशात घुसले आहे, असे म्हणायला हरकत नाही. परंतु हे सारे घडत असताना विस्मित करणाऱ्या घटना घडत आहेत, अशा घटनांना ‘सोशल स्युसाइड’ ही टर्म वापरली जाते. याचा अर्थ आपले सोशल मीडियावरील अस्तित्वच संपूर्णपणे मिटवून टाकायचे. अशी अनेक उदाहरण आपल्याही आसपास असतील यात शंका नाही.

तेव्हा, माणूस हा जरी सामाजिक प्राणी असला तरी सोशल मीडिया हा काही आपले समाज अस्तित्व सिद्ध करण्याचा मुख्य दुवा नव्हे. झटकन मिळणारी प्रसिद्धी, सहज जनामनात पोहोचणारे आपले काम, हे या माध्यमाचे फायदे नाकारता येणार नाहीत. शेवटी काडेपेटीचा उपयोग हा मानवालाच योग्य करता येईल, माकडाच्या हातात काडी गेली तर घरं जळतील. म्हणून सोशल मीडिया माणूस वापरतोय की माणसात दडलेला माकड वापरतोय यावर विचार व्हायला हवा. तेव्हा बँकेत अकाऊंट उघडण्या अगोदर, सोशल मीडियावर अकाउंट उघडणाऱ्या येत्या पिढीला न राहून विचारावंसं वाटतं, ‘काय पाव्हनं, तुम्हाला सोशल, सोसंल का?’

– आदित्य दवणे 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2016 1:05 am

Web Title: social media occupations
Next Stories
1 ‘ट्रोलाट्रोली’
2 क्लिक: अशोक कदम, बोरिवली
3 व्हिवा दिवा: समीक्षा टक्के
Just Now!
X