माझं वय २५ र्वष असून मी समाजशास्त्रात एम.ए. केलंय. माझं शिक्षण नुकतंच पूर्ण झालं असून मी सध्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय. गेले काही महिने माझं अभ्यासात लक्ष लागत नाही. मला सतत सामाजिक कार्य करावं असं वाटतं आहे. त्यामुळे अभ्यास करायला बसलो की डोळ्यासमोर समाजकार्याचे विचार येतात. १०-१२ तास अभ्यास करूनही मनाची चलबिचल होते. वाचलेलं लक्षात राहत नाही. जणू अभ्यासाची सक्ती वाटते. खरं तर घरच्यांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. मी अधिकारी बनावं असं त्यांना वाटतं. त्यामुळे द्विधा मन:स्थिती निर्माण झाली आहे. या दोन वळणांपैकी कोणता मार्ग निवडू? की वेगळ्या करिअरचा विचार करू?
– प्रशांत

हॅलो प्रशांत,
‘देशाचा संसार माझे शिरावर असे थोडे तरी वाटू द्या हो’, असे सेनापती बापट म्हणायचे. तुझा प्रश्न वाचून मला खरंच आनंद होतो आहे. एक २५ वर्षांचा मुलगा फक्त स्वत:चा विचार न करता सामाजिक कार्य करण्यास उत्सुक आहे. तुझं वय पाहता साधारणपणे गेली दोन-तीन र्वष तू स्पर्धा परीक्षेचा विचार करीत असावास असं वाटतं. सध्याच्या परिस्थितीत बहुतेक व्यवसायात अगदी वयाच्या २७-२८ वर्षांपर्यंत शिक्षण आवश्यक झालेले आहे. म्हणजे, वयामुळे तुझ्या शिकण्यासाठी काही अडचणीत येत आहेत, असं नाही. पण जर का तुझी घरची परिस्थिती तुला नोकरी तातडीने घेण्यास प्रवृत्त करीत असेल तर वेगळी गोष्ट आहे. तुझ्या घराचा विचार आणि जबाबदारी तुलाच उचलली पाहिजे. समाजशास्त्रामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर तू स्पर्धा परीक्षा देतो आहेस.

या परीक्षेचा निकाल काहीही लागला तरीही तू स्वत:साठी व देशासाठी काहीही करू शकतोस. आपल्या मनामध्ये विचार असेल तर तो कृतीत आणणं सोपं असतं. तुझ्या मनात चांगले विचार आहेत. तू नक्कीच काही तरी चांगलं करू शकतोस. तुझ्या स्पर्धा परीक्षेचा निकाल त्यामुळेच इतका महत्त्वाचा राहत नाही. पण एक नक्की, प्रत्येक परीक्षा आपल्या कार्यक्षमतेला वाढवू शकते हा विचार कर. चांगलं काम तू या परीक्षेशिवायही करू शकतोस हे लक्षात ठेव. स्पर्धा परीक्षेसाठी बऱ्याचदा अभ्यासाबरोबरच तंत्रावर लक्ष द्यावं लागतं. ते तंत्र समजून घेण्यासाठी बरेचसे मार्गदर्शक संस्थामधून अभ्यास वर्ग घेत असतात. मार्गदर्शन करत असतात. तिथे मित्रदेखील भेटल्याने एकटेपणा जाणवत नाही. सामुदायिक अभ्यास करून आपण फक्त कंटाळ्यावर मात करीत नसून समाजात वावरताना आवश्यक असणारी वाद-कला, संवादकला यांचाही आपसूकच अभ्यास करीत असतो. आता हातातील वेळ व्यक्तिमत्त्व विकास, अभ्यास, व्यायामासाठी वापर. विचलित होणारं मन ध्यानाच्या जोरावर तू नक्कीच ताब्यात ठेवू शकशील. तुझ्या दिवसाला शिस्त दे व या परीक्षेसाठी जोरदार प्रयत्न कर. ठ

तुमचे प्रश्न viva@expressindia.com या ई-मेल आयडीवर आम्हाला पाठवा. सब्जेक्टलाइनमध्ये ‘बावरा मन’ असं जरूर लिहा.