News Flash

व्हायरलची साथ : विश्वरूपदर्शनाची झलक!

बॉसला मनवून लाँग लिव्ह मिळवण्याचा जुगाड तुम्ही पार पाडला आहे.

सत्तेचा मलिदा खाण्याची इच्छा असणाऱ्यांची समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहचण्याची केविलवाणी धडपड प्रचाराच्या नावाखाली सुरू आहे. पण खरा शेवटचा माणूस समजून घेण्याची विश्वरूपदर्शनाची संधी समोर आहे. प्रवास, माणसं, चित्रपट यांपैकी काहीही आवडत असेल तर हा प्रयोग तुम्ही पाहू शकता.

बॉसला मनवून लाँग लिव्ह मिळवण्याचा जुगाड तुम्ही पार पाडला आहे. हव्या त्या दिवशीचे आणि हव्या त्या डब्याच्या रिझव्‍‌र्हेशनचा सोपस्कारही झाला आहे. हाताला रग लागू नये म्हणून व्हील असणाऱ्या ड्रॅग बॅगमध्ये यथेच्छ सामान भरून तुम्ही कुटुंबकबिल्यासह रेल्वे स्टेशन गाठलं. तुमच्या ट्रेनला यायला वेळ आहे. त्याच्याआधी दुसरी ट्रेन येऊन उभी राहते. ‘जनरल’ नावाचा डबा समोर येऊन थांबतो. कधीकाळी तुम्हीही यातून प्रवास केला आहे. मात्र आता तोच डबा पाहून ‘सो श्ॉबी’ असे उद्गार तुमच्या तोंडून बाहेर निघतात. १०८ जणांच्या क्षमतेच्या डब्यात तीनशेहून अधिक माणसं भरलेली. डबा म्हणण्यापेक्षा ‘ऑर्गनाइज्ड केऑस’ म्हणणं उचित ठरेल अशी ही एन्टिटी. कळकट असा वास भरून राहिलेला. अनारक्षित असल्याने सीट पकडण्यासाठी होणारी लठ्ठाझोंबी आणि हमरातुमरीवर येणारी माणसं. ट्रेन सुरू होईपर्यंत हातावर हात पायावर पाय अशा स्थितीत डोअरला, टॉयलेटमध्ये, दोन सीटमध्ये सगळीकडे माणसं कोंबलेली. प्रत्येकाच्या प्रवासाचं ईप्सित वेगळं पण माध्यम एकच. नीटनेटकेपणाचा लवलेशही नाही. हायजिन ऊर्फ स्वच्छता कोणाच्या गावीही नाही. इथे शिरण्याचं कारणच मुळी नाइलाज. या पसाऱ्यात अडकलेल्या अनामिकांची नोंद कुठेच नाही. ती घ्यावी असे टेम्प्टिंग काहीच नाही. ती ट्रेन सुटते. पुढच्या ट्रेनमध्ये टू टायर एसीचं (छान कुशन असलेल्या सीट, गुबगुबीत अभ्रे, सौजन्याची पराकाष्ठा करणारा सेवकवर्ग, सातत्याने अंगावर येणारी गार झुळूक) तिकीट आहे या चित्रात तुम्ही रममाण असेपर्यंत समोरची ट्रेन प्लॅटफॉर्म सोडून मार्गाला लागलेली असते.

त्रास होणार आहे हे माहिती असतानादेखील का करत असतील लोक जनरलच्या डब्यातून प्रवास? असा प्रश्न तीन तरुणांना पडला. वेगवेगळ्या संस्कृतीची, कपडय़ांची, चालीरीतींची ही माणसं कुठे जातात, का जातात. शेकडो रुपये टोल, नाश्ता आणि ब्रंचसाठी पाचशे रुपये उडवणाऱ्या एसयूव्ही, आलिशान व्होल्वो अशी प्रवासाची नवीन परिमाणं असताना हा जनरलचा डबा अजूनही भरलेलाच का असतो. अशा प्रश्नांनी मनात फेर धरलेल्या स्थितीत समर्थ महाजन, रजत भार्गव आणि ओंकार दिवेकर या त्रिकुटाने ‘भारतदर्शना’चा निर्णय घेतला. आणि हो-७ दिवस ६ रात्री, नैसर्गिक विधी सोडले तर सदैव सोबत करणारा गाइड, ब्रँडेड बॅग-टोपी, लोकप्रिय ठिकाणांची सैर घडवणारी टूर नव्हे. गाइड नाही, कम्फर्ट नाही आणि काहीही आरक्षित नाही असं भारतदर्शन आणि तेही भारतीय रेल्वेच्या अनारक्षित-जनरलच्या डब्यातून. चित्रपट निर्मित्ती क्षेत्राशी संलग्न या त्रिकुटाने कच्छपासून दिब्रुगढपर्यंत आणि जम्मूपासून कन्याकुमारीपर्यंत असं आडवातिडवा देश पालथा घालायचा असं ठरलं. खात्यापित्या घरचे असूनही हे ‘गर्दीचे डोहाळे’ त्यांनी अनुभवायचे ठरवले. १७ दिवस त्यांनी हा प्रयोग केला.

आपल्या देशाचं खंडप्राय स्वरूप पाहता १७ दिवस कमीच आहेत; पण शेवटी लॉजिस्टिकपण पाहायला हवं ना. गेल्या वर्षी मार्चमध्ये या प्रयोगाचे लाइव्ह ट्विट केलं त्यांनी. अजबगजब माणसांचे नमुने शब्द आणि फोटोंच्या रूपाने त्यांनी मायाजालावर शेअर केले. नेटिझन्सना हा प्रकार आवडला. अशक्य गर्दीतही त्यांनी चित्रण केलं. लोकांच्या प्रतिसादाने हुरूप वाढलेल्या या त्रिकुटाने १७ दिवसांचे विश्वरुपदर्शन पूर्ण लांबीच्या चित्रपटाद्वारे मांडण्याचा निश्चय केला. या चित्रपटात लग्नेच्छुक हिरोहिरॉइन नाही. त्यांच्या मार्गात अडसर ठरणारा व्हिलन नाही. भारी लोकेशन्सवरची गाणी नाहीत. अतीगोड मधाळ बोलणारी किंवा कटकारस्थानी सूडबुद्धी मंडळी नाहीत. तिन्ही त्रिकाळ डिझायनर वस्त्रं आणि मेकअपलेली माणसं नाहीत. अतिंद्रिय शक्तीचे दबंग, क्रिश, सुपरमॅनही नाहीत. पण खणखणीत स्टोऱ्या असलेली जिवंत माणसं आहेत. मारझोड करणाऱ्या नवऱ्याला सोडून आत्मविश्वासाने जगाचा सामना करायला निघालेली रणरागिणी, योगाचा प्रचार करणारे गुरुजी, पोटाची खळगी भरायला निघालेले कामगार, घरच्यांचा विरोध पत्करून संसार मांडायला निघालेले प्रेमिक, नातवाला घेऊन निघालेली आजी अशी अनेक पात्रं आहेत. स्क्रिप्ट नाही, त्यामुळे डायलॉग अ‍ॅक्शन-रिअ‍ॅक्शनचा खेळ नाही. पण स्वत:ची बोली जपणाऱ्या लोकांचा समोरासमोर संवाद आहे. वॉव वगैरे फ्रेम्स नाहीत. कारण माणसाला उभं राहता येत नाही अशी अवस्था, तिथे कॅमेऱ्याचं कुठे घेऊन बसलात. चालती ट्रेन असल्याने असंख्य आवाज ऐकायला मिळतात, पण ज्याला जे म्हणायचंय ते पोहचतं आपल्यापर्यंत.

साधारण एक तासाचा ‘द अनरिझव्ह्र्ड’ परवा युटय़ूबवर ‘कॅमेरा अँड शॉर्ट्स’ चॅनेलवर रिलीज झालाय. पॉपकॉर्न आणि मल्टीप्लेक्सच्या खर्चाचा भार न सोसता पाहता येईल. समाजातला ‘शेवटचा माणूस’ हे बिरुद अनेकदा कानी पडलं असेल. त्या माणसाला पाहण्याची बरी संधी आहे घरबसल्या!

(सदरहू लिखाण या चित्रपटाच्या प्रमोशनपर नाही. प्रमोशन करण्यास त्रिकुट समर्थ आहे. आम्ही मायबाप वाचकांचे प्रमोटर..)

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2017 12:35 am

Web Title: society last man life
Next Stories
1 ‘ताण’लेल्या गोष्टी : ‘माय चॉइस’चा बॅलन्स
2 खाबूगिरी : भुजिंगाट
3 सुगंधी कट्टा : सुगंधी इतिहासाचे दुसरे पर्व
Just Now!
X