उन्हाळ्यातली दोन महिन्यांची विश्रांती आता संपली असून कॉलेजकट्टे पुन्हा एकदा त्याच जोशात गजबजले आहेत. कॉलेज सुरू झाल्यानंतरच्या पहिला आठवडय़ात कट्टय़ावर नवीन बॅग, नवीन घडय़ाळ, नवीन मोबाइल, नवीन वह्या-पुस्तकं एकमेकांना दाखवण्यात व मिरवण्यात घालवला जातो. मुलांमध्ये सुट्टीत आपण कशा प्रकारे व्यायाम केला याविषयावर तर मुलींमध्ये कोणत्या टिप्स फॉलो करून मी बारीक झाले या विषयावर जोरदार चर्चासत्र रंगतं. काही काळ अखंड बडबड करून झाल्यावर पोटात कावळे ओरडू लागतात व आठवण येते टोळीतल्या ‘अन्नपूर्णेची.’ स्वत: तयार केलेले खमंग पदार्थ डब्यात भरून घेऊ न येणाऱ्याला कट्टय़ावर ‘अन्नपूणा’ असे संबोधले जाते. मग त्या अन्नपूर्णेच्या डब्यातील पदार्थाची कट्टय़ावर चांगलीच मेजवानी रंगते. या मेजवानीत फार काही कष्ट घेतले जात नाहीत. अर्ध साहित्य घरचं तर अर्ध बाहेरचं या दोन्हींच्या साहाय्याने निरनिराळ्या पदार्थाना फोडणी दिली जाते. अशाच कट्टय़ावरच्या अन्नपूर्णासाठी कट्टय़ावरच्या टोळीच्या जिव्हातृप्तीसाठी काही चटपटीत, काही पौष्टिक व हटके रेसिपीज..

बदाम कटलेट्स

’ शेफ कुणाल कपूर

साहित्य : बटाटे (उकडून आणि कुस्करून )- २ कप, मीठ- ३/४ टी स्पून, बदाम (भिजवून आणि पेस्ट करून )- १/२ कप, तेल- ३ टेबल स्पून, तेल- तळण्यासाठी, जिरे- २ टीस्पून, आल्याचे बारीक तुकडे- १ टेबलस्पून, हळद- १/२ टी स्पून, लाल तिखट पावडर- २ टी स्पून, हिरवे कांदे- १/२ कप, अंडी- २ नग, मैदा- १ कप, ब्रेडक्रम्स -१ कप

कृती : गरम तेलात जिरे, हिरव्या मिरचीचे तुकडे, आले, बदाम, हळद आणि लाल तिखटाची पावडर घाला. तयार मिश्रणात बटाटे घालून चवीनुसार मीठ घाला. मिश्रण तीन मिनिटे एकजीव करून बाजूला काढून ठेवा, त्यात वरून कांदा पेरा. थंड मिश्रणाला पॅटिसचा आकार द्या. तीन वेगवेगळ्या प्लेट्समध्ये पीठ, फेटलेली अंडी आणि ब्रेडक्र म्स तयार ठेवा. प्रथम कटलेट्स पीठात घालून नंतर अंडय़ात घालून ते ब्रेडक्रम्समध्ये घोळवा. थोडं दाबून कटलेट्स मंद आचेवर तळून घ्या. चटणीबरोबर गरमागरम सव्‍‌र्ह करा बदामाचे कटलेट्स.

रंग बरसे बदाम

’ शेफ विकी रतनानी

साहित्य : बदाम- ६० ग्रॅम, मीठ- चवीनुसार, ऑलिव्ह ऑइल- ५ मिली, थंडाई इसेन्स- १ टेलबस्पून

कृती : एका बाऊलमध्ये थंडाई इसेन्स, मीठ आणि ऑलिव्ह ऑइल एकत्र करा. त्यात बदाम घालून मिश्रण एकजीव करा. तयार मिश्रण एका शीटमध्ये घालून १७० अंशात ८ ते ९ मिनिटांपर्यंत बेक करा आणि सव्‍‌र्ह करा रंग बरसे बदाम..