नव्या पिढीचा जगण्यातला वेग संगीतातही उतरलाय. कंपोझिशनपेक्षा संगीतातल्या ‘साउंड’ला महत्त्व आलंय.. सांगतेय तरुण पिढीतील गायिका.

हा जमाना आहे इंटरनेटचा. फेसबुक, ट्विटर, गुगल, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम या सगळया गोष्टी मोबाइलच्या वन टचवर अव्हेलेबल आहेत. कुठलीही माहिती शोधायची झाली तर आता लायब्ररीमध्ये जाऊन पुस्तक वाचायची गरज नाही. गुगल केलं की झालं. तसंच एखादं जुनं गाणं ऐकायचं झालं तर कॅसेट किंवा सीडीमध्ये शोधायची गरज नाही. यूटय़ूबवर सर्व गाणी उपलब्ध आहेत. परदेशी असलेले सर्व मित्र-मैत्रिणींचे अपडेट्ससुद्धा आता घरबसल्या फेसबुकवर कळतात. या सर्व गोष्टींमुळे एकूणच आयुष्य फास्ट झालंय आपलं.
आजच्या म्युझिकबद्दल बोलायचं झालं तर, तेही तसंच आहे. एखादं गाणं रेकॉर्ड करायचं झालं की, सर्वप्रथम ट्रॅक बनवला जातो. प्रत्येक वादक कलाकार त्याच्या अ‍ॅव्हेलॅबिलिटीनुसार त्यांचं वादन रेकॉर्ड करतात. मग आम्ही गायक थेट स्टुडिओमध्ये जाऊन गाणं शिकतो आणि गाणं रेकॉर्ड होतं. पूर्वी गाण्याच्या दहा वेळा रिहर्सल्स व्हायच्या. कारण अख्खं गाणं एकाच माइकवर रेकॉर्ड व्हायचं. तेव्हा ते गाणं रेकॉर्ड होईपर्यंतच सगळ्यांच्या मनात गळ्यात मुरायचं. आता बदलत्या तंत्रज्ञानानुसार या सगळया गोष्टी सुखकर आणि फास्ट झाल्या आहेत. व्हॉट्सअ‍ॅपवरून लिरिक्स पाठवणं, चाल ऐकवणं या गोष्टी सर्रास होतात. वेळ वाचतोय यात बराच. प्रवास टळतोय. ते मोबाईलच्या मार्गानं आलेले गाण्याचे शब्द नीट लक्षात घेऊन, गाणं शिकून त्याची चाल, एक्स्प्रेशन या सर्व गोष्टी आत्मसात करून जणू दहा रिहर्सल्स केल्यासारखं मनात भिनवून त्याची डिलिव्हरी देणं हे आम्हा नव्या पिढीच्या गायकांचं काम. खूप चॅलेंजिंग झालं आहे, ते याचमुळे. यामध्ये आमच्या पिढीच्या आकलनशक्तीचा कस लागतो.
हा जमाना आहे टी-20चा. पण खरं क्रिकेट बघायला गेलं तर ते टेस्ट मॅचमधलं. तिकडे प्लेअर्सचा संपूर्ण कस लागतो. तसंच काहीसं चित्र या फील्डमध्ये दिसू लागलं आहे. गाण्यातला मनोरंजनाचा फॅक्टर वाढला आहे आणि या जगण्याच्या वेगामुळे वेळ कमी झाला आहे. क्लासिकलच्या मफिलीत एक राग दोन तास आळवला जायचा. पण आता वेळेअभावी एक तासात दोन राग गायले जातात. पूर्वी संगीत नाटकांचे प्रयोग पहाटेपर्यंत रंगायचे, पण आता आम्हाला तीन तासांचं लिमिट असतं. त्यामुळे आता शांत, हळूहळू फुलवत नेणाऱ्या गायकीची जागा आक्रमक, अलंकारिक आणि आकर्षित करून घेणाऱ्या गायकीने घेतली आहे. पण हे बदल अटळ आहेत. सतत होणाऱ्या बदलांचा स्वीकार करणारी ही पिढी आहे. या जनरेशनचे विचार अधिक मॉडर्न, ओपन आणि ब्रॉड माइंडेड आहेत. त्यातूनच सध्याच्या युथफुल म्यूझिकमध्ये वेगवेगळे प्रयोग केलेले दिसतात. विविध प्रकारची सॉफ्टवेअर उपलब्ध असल्यामुळे म्यूझिक अरेंजमेंट, प्रोग्रॅमिंग, मिक्सिंग, मास्टरिंग या गोष्टींमध्ये आमूलाग्र बदल जाणवतो. संगीतात होणाऱ्या बदलाचे आणखी एक कारण आहे – आताच्या संगीतावर ‘साउंड’चा खूप पगडा आहे. तंत्रज्ञान एवढं विकसित झालंय की, हा साउंडमधला फरक श्रोत्यांच्याही लक्षात यायला लागलाय. कॉम्पोझिशनपेक्षा हल्ली या ‘साउंड’चं महत्त्व वाढलंय. त्यातून श्रोते आपापली आवड, आपापलं प्राधान्य, त्या वेळचा विरंगुळा ठरवू लागतेत. श्रोते बदलले तसे कलाकारही. आता प्रत्येक जण आपला स्वतचा ‘साउंड’ शोधतोय.
आत्ताची जनरेशन डिस्कोथेकमध्ये ‘चार बॉतल वोडका’, ‘शांताबाई’ अशा गाण्यांवर थिरकताना दिसते. पण हीच आणि एवढीच त्यांची आवड नाही. हेच त्याचं म्युझिक आहे असं नाही. कारण हीच तरुण गर्दी सवाई गंधर्व वसंतोत्सव, डमरू फेस्टिवल, अभिषेकी महोत्सव, ए आर रेहमान कॉन्सर्ट यांसारख्या आणि भक्तीसंगीत, भावगीतांच्या स्थानिक कार्यक्रमांच्या ठिकाणीसुद्धा तितक्याच तन्मयतेनं हजेरी लावताना दिसते. यामध्ये काय चूक, काय बरोबर, काय चांगलं काय वाईट हा मुद्दा असला तरी संगीत ऐकायची तरुणाईची पद्धतही बदलली आहे. त्यामुळे त्याच्या आवडी-निवडी बदलत राहतात. ‘लाउड म्युझिक’च्या गोंगाटानंतर तरुण एकटा असतो तेव्हा त्याला आजही किशोरीबाईंचं ‘सहेला रे’ जवळचं वाटतं. अजय- अतुल यांचं ‘खेळ मांडला’ हे गाणं थेट त्याच्या काळजाला भिडतं.
जुनं ते सोनं हे मान्य करून नव्याचं स्वागत करणारी ही जनरेशन काय चांगलं, काय वाईट हे ठरविण्यापेक्षा आलेला क्षण भरभरून जगायचा प्रयत्न करते. वेगाशी जुळून घेण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही – सततची धावपळ, टेन्शन, वाढलेली कॉम्पिटिशन, प्रवास, तब्येतीला जपणं, स्वतला अपडेट ठेवणं, कितीही धावपळ असली, थकवा आला तरी कायम फ्रेश दिसणं, गळा नीट ठेवणं ही या जनरेशनची मोठी आव्हानं आहेत. आणि ती पेलण्याची मानसिक तयारी, कणखरपणा, ऊर्जा, कष्ट करण्याची तयारी, पॅशन, केपेबिलिटी आणि टॅलेंट या सगळ्या गोष्टी या जनरेशनमध्ये आहेत. संगीतामध्ये होणारे प्रयोग आणि त्यातून जाणवणारा बदल नक्कीच सकारात्मक आहे. तरीही या वेगवान लाइफमध्ये पॉप्युलिस्ट साउंडच्या प्रवाहात वाहत न जाता प्रत्येकाला गरज आहे आपला आतला आवाज शोधण्याची. कारण या वेगात संगीताचा आत्मा हरवू न देणं, हे आमच्या पिढीपुढचं खरं आव्हान आहे.