21 October 2018

News Flash

थंडीला उतारा सूपचा..

सध्या बाजारात रेडिमेड सूप्सची पाकिटं मिळत असल्याने त्यांचा सहज वापर केला जातो.

थंडी आली की गरमागरम काही तरी, मग ती एक चाय की प्याली का असेना.. हवंहवंस वाटतं. चहानंतर दुसरा पर्याय असतो तो सूप्सचा. सध्या बाजारात रेडिमेड सूप्सची पाकिटं मिळत असल्याने त्यांचा सहज वापर केला जातो. मात्र ही पाकीटबंद रेडिमेड सूप्स आपल्यासाठी खरोखरच फायदेशीर असतात का, याचा ऊहापोह करत त्याऐवजी दोन हेल्दी सूप्सच्या रेसिपीज तरुणाईसाठी सुचवल्या आहेत वैद्य रुपाली पानसे यांनी..

फिटनेसच्या नावाखाली जाहिरात केली जाणारी उत्पादनं आज तरुणाई सर्रास विकत घेताना दिसते. फिटनेस, आरोग्य आणि न्युट्रिशन अशा भाबडय़ा शब्दांना भुलून प्रोसेस्ड फूड विकत घेण्याकडे आपला कल जास्त असतो. रेडिमेड सूपची पाकिटं तर हातोहात खपतात, पण काय असतं या सूप्समध्ये..

असं सूप बनवतात तरी कसं?

रेडीमेड सूपचा मूळ उद्देश वेळ न घालवता, काही न करता लगेच तयार होणार पदार्थ असा होय. म्हणजे असे पदार्थ हे पाकिटात साठवून ठेवणं अपेक्षित असतं. याचाच अर्थ हे पदार्थ टिकवणंदेखील अपेक्षित असतं. इथेच मूळ उद्देशाला हरताळ फासला गेला आहे.

या सुपमध्ये काय काय घटकद्रव्यं असतात?

१. वाळवलेल्या भाज्या : ताज्या भाज्या खाणं उत्तम असं आपण शिकलो आहोत. भाज्या या अल्पायुषी असतात, त्यामुळे ताज्या खाणं सर्वोत्तम. यात तर चांगल्या ताज्या भाज्या वाळवून वापरल्या जातात. असे ममी व्हेजी कितीही यमी लागले तरी पोषणात कमीच बरं का!

२. बटाटय़ाचा स्टार्च, कॉर्नचा स्टार्च, कितीही होल व्हीट म्हटलं तरी ते फक्त काही प्रमाणातच वापरलेलं असतं.

३. माल्ट डेक्सट्रिन : ‘नो शुगर अ‍ॅडेड’ या वाक्याला भेद देऊ न हे स्वस्तातील साखरेचं सबस्टिटय़ूट वापरलं जातं. हादेखील डी-ग्लुकोजचाच एक मोलेक्युल होय. सूपला एक मऊ सुतपणा आणि घट्टपणा येण्याकरिता हे वापरतात.

४. मोनोसोडिअम ग्लुकमेट आणि बाय सोडियम ग्लुकमेट : या रासायनिक पदार्थामुळे एक अतिशय आवडीची चव जिभेवर निर्माण होते आणि या चवीची सवयदेखील लागू शकते. या चवीला उमामी असे नाव आहे. उमामी चव नैसर्गिकरीत्या मिळवणं अतिशय खर्चीक आणि किचकट असतं. तसंच खूप कमी नैसर्गिक पदार्थामध्ये ती चव मिळते. याशिवाय, कृत्रिम चव, रंग, वास आणि टिकवण्यासाठी वापरलेली रसायनं आरोग्यासाठी घातकच असतात.

त्यामुळे मला सूपच हव असा हट्ट असणाऱ्यांसाठी रेडिमेड सूपऐवजी दोन सोप्या व चटकन तयार होणाऱ्या रेसिपीज..

कुळीथ सूप (कुळथाचं कढण) :

कुळीथ हे कमी माहीत असलेलं आणि अतिशय दुर्लक्षिलं गेलेलं कडधान्य. आयुर्वेदातील पथ्य या अतिशय अनोख्या संकल्पनेतील कुळीथ कढण हे एक उदाहरण आहे. थंडीत अतिरिक्त कफदोष कमी करणं, पोटातील वात सरून जाण्यास उपयुक्त तसंच मूत्रवाहिनी अथवा मूत्राशयात खडे (अश्मरी) या आजारात पथ्य म्हणून कुळथाचं कढण आम्ही सांगतो. एरवीदेखील कधी तरी हे कढण सूप म्हणून पिणं हा एक वेगळा अनुभव नक्की घ्या. लोह, कॅल्शिअम, प्रोटीन, पोटॅशिअम, व्हिटॅमिन बीचा अतिशय उत्तम स्रोत म्हणजे कुळीथ. कुठल्याही रेडिमेड सुपाला उत्तम आणि सोपा पर्याय म्हणून दोन्ही सूप अवश्य प्या. तमिळनाडूतील हे एक आवडीचं कडधान्य असून याला ‘कोल्लू’ असे म्हणतात. कोल्लू रस्सम, कोल्लू सांभार हा तिथला लोकप्रिय पदार्थ आहे. महाराष्ट्रातदेखील कुळथाचं पिठलं काही ठिकाणी आवडीने खाल्लं जातं.

साहित्य : कुळीथ पाव वाटी, कुळथाच्या आठ पट पाणी (४ वाटय़ा ), चिमूटभर सैंधव, मिरेपूड, सुंठ, धणे, जिरेपूड, गाईचे तूप एक चमचा

कृती : प्रथम कुळीथ नीट शिजवून घ्यावे. शिजल्यावर रवीने अथवा मिक्सरमध्ये एकजीव मऊ  करून घ्यावे. त्यात सुंठ, मिरे, धने, जिरेपूड, मीठ घालून उकळी आणावी. सूप तयार. हवं असल्यास वरून किंचित तुपाची-जिऱ्याची फोडणी द्यावी. गरमागरम वाटीभर सुपाचा क्षणात फडशा पडणार हे नक्की.

पर्ल मिलेट सूप (बाजरीचा घाटा)

हिवाळ्यात अतिशय पौष्टिक, चविष्ट आणि उत्तम पोषणमूल्यं देणारं सूप. प्रोटीन, झिंक, लोह, मॅग्नेशियम, ओमेगा फॅटी अ‍ॅसिड्स आणि इतरही अनेक जीवनसत्त्वांचा उत्तम स्रोत म्हणजे बाजरी. पारंपरिक परंतु विस्मरणात गेलेल्या या पदार्थाला नक्की चाखून बघा आणि नियमित आहारात ठेवा.

साहित्य : बाजरीच पीठ एक वाटी, गुळाचा एक छोटासा खडा, चिमूटभर ओवा, एक चमचा गाईचं तूप, चवीपुरतं मीठ, पाणी आवश्यकतेनुसार

कृती : तुपावर बाजरी पीठ नीट भाजून घ्यावं. खमंग वास आल्यावर त्यात पाणी टाकून गुठळ्या मोडून नीट हलवावं. मऊ, खूप पातळ नाही खूप घट्ट नाही इतपत पाणी असावं. यात मीठ, गूळ आणि ओवा टाकावा. एक उकळी आणून गरमागरम बाजरी घाटा किंवा सूप बाऊलमध्ये सर्व करावं.

First Published on January 12, 2018 12:30 am

Web Title: soup in winter season best soup