गल्लीबोळातल्या खाद्यपदार्थाच्या गाडय़ांवरील खाबूगिरी खाबू मोशायला आणि तुम्हा खवय्यांनाही नवीन नाही. पण कमळ फक्त चिखलातच फुलत असलं, तरी खाद्यपदार्थाच्या बाबतीत तसं म्हणता येत नाही. त्यामुळे खाबू मोशायला ठाण्यातील ‘स्पाइस गेट’ हे हॉटेल दिसलं, तेव्हा त्या हॉटेलची पायरी चढल्याशिवाय त्याला पुढे जाता आलं नाही. पहिल्यांदाच या हॉटेलमध्ये गेल्यानंतर इथले ‘सारस्वत प्रॉन्झ करी राइस’, ‘करारी रोटी विथ खिमा’, ‘रावस फ्राइड राइस विथ पेकिंग सॉस’ असे अनेक पदार्थ खाबू मोशायच्या ऑल टाइम फेव्हरिट लिस्टमध्ये जोडले गेले.
भारतीय खाद्यसंस्कृतीत मसाल्यांना किती महत्त्व आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. किंबहुना मसाल्यांमुळेच भारतीय खाद्यसंस्कृती जगात वेगळी मानली जाते. पाश्चात्त्य खाद्यसंस्कृतीत मीठ, मिरी पावडर आणि काही अगदीच निवडक मसाले यांना स्थान आहे. मात्र आपल्या देशात ‘मिसळणाचा डबा’ हा घटक स्वयंपाकघरात अत्यंत महत्त्वाचा असतो. या डब्यातील छोटय़ा डब्यांशिवाय फ्रिजमध्ये असलेले ‘बादशाह’ किंवा ‘एव्हरेस्ट’ सदृश मसाले वेगळेच. मग डब्यांत भरून ठेवलेले मसाल्याचे पदार्थही महत्त्वाचे आहेतच की! आज खाबू मोशायला या मसाल्यांची इतकी उत्कट आठवण आली कारण त्याला कारणही तसंच आहे. या वेळी खाबू मोशाय मसाल्यांच्या दारीच पोटपूजा करायला गेला होता.

नेहमीचं मोगलाई पद्धतीचं जेवण घेऊन, म्हणजे लाल ग्रेव्हीतील चिकन आणि रोटय़ा तोडून किंवा नेहमीच्या चवीची बिर्याणी खाऊन खाबू मोशायच्या जिभेला कंटाळा आला. वेगवेगळ्या देशांतील खाद्यसंस्कृतींची चव देणारी फोर्ट परिसरातील अनेक हॉटेलं खाबू मोशायला खुणावत होती. पण हलका खिसा पाहून खाबू मोशाय जिभेला आणि मनाला मुरड घालत होता. तेवढय़ात एके दिवशी खाबू मोशायला ठाण्यात गोखले रोडवरून चालताना स्पाईस गेट नावाची पाटी दिसली. आत डोकावून बघितल्यानंतर रेस्तराँमध्ये जाण्यासाठी जिना होता आणि बाजूलाच मध्ययुगीन भारतातील ग्रँड ट्रंक रोड दाखवणारा नकाशा भिंतीवर काढला होता. त्या नकाश्यावर भारतातील काही ठिकाणे आणि तेथील उत्तम पदार्थाचे चित्र दाखवले होते. स्वागतालाच हा असा इंतजाम बघून खाबू मोशायने तो जिना चढण्याचं धाष्टर्य़ दाखवलं.

स्पाइस गेट हे ‘रेस्तराँ’ म्हणावं असं हॉटेल आहे. उत्तम सजावट, एका बाजूला छोटंसं मद्यालय, त्यात रंगिबेरंगी मद्याच्या लखलखणाऱ्या बाटल्या आणि या सर्वाना मागे टाकेल असा उत्तम पदार्थाचा घमघमाट घेऊन खाबू मोशायच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित झाल्या. खाबू मोशायने एक टेबल अडवून मेन्यूकार्डवर नजर टाकली आणि तिथेच खाबूच्या तोंडाला पाणी सुटलं.
या मेन्यूकार्डमध्ये नेहमीच्या लाल ग्रेव्हीतल्या पंजाबी डिशेस होत्याच पण त्याबरोबर स्टार्टर मेन्यू खूपच उत्तम होता. राईस या कॉलमखाली गोव्यातील, कारवारकडील किंवा पार सिलोनपर्यंतच्या विविध करींची लज्जत देणारे राईस होते आणि डेझर्ट्समध्ये गोव्यातील खास गोड पदार्थ बेबिन्का!

16खाबू मोशायने जेवण सुरू करण्यासाठी म्हणून सूप मागवण्याचं ठरवलं आणि नजर टाकल्यावर तिथे ‘खेकडे का शोर्बा’ नावाचा पदार्थ दिसला. खेकडा किंवा चिंबोरी ही खाबू मोशायची मत्स्यकुळातील विशेष आवड आहे. त्यामुळे खाबू मोशायने तातडीने हा शोर्बा मागवला. त्याचबरोबर भुकेचं खाणं काय मागवावं, हा विचार करताना खाबू मोशायला करारी रोटी नावाचा प्रकार मेन्यूमध्ये दिसला. करारी माणसं असतात, करारी नेते असतात, एवढं माहीत होतं. पण करारी रोटी म्हणजे काय, असा प्रश्न मनाशी बाळगून खाबू मोशायने करारी रोटी विथ खिमा मागवला. तसंच आणखी तोंडी लावायला म्हणून खिमा स्टफ पापडही खाबूने मागवला. वास्तविक खिमा स्टफ पापड हा पदार्थ मेन्यूमध्ये नाही. मेन्यूमध्ये फक्त स्टफ पापड आहे. म्हणजे काय, असे विचारले असता पापडात व्हेज खिमा स्टफ करून त्या पापडाची गुंडाळी करून ती तळतात, असं कळलं. मग खाबू मोशायने फर्माईश करत त्या पापडात चिकन खिमा स्टफ करून आणायला सांगितला.

एवढय़ात खेकडे का शोर्बा तयार होऊन खाबूच्या समोर आला. पहिल्या घोटातच खाबूने मनातल्या मनात या खेकडय़ाला दाद दिली. मसाल्यांचे योग्य मिश्रण, त्यात खेकडय़ांचे तुकडे आणि खूप उत्तम शिजवलेलं सूप यांमुळे खाबू मोशाय या शोर्बाच्या प्रेमात पडला. त्याबरोबर आलेली करारी रोटी विथ खिमा ही डिश बघूनच खाबू मोशाय खूश झाला. खाकऱ्यासारखी मोठी रोटी आणि त्या रोटीच्या मध्यभागी ठेवलेला खिमा.. नुसत्या गंधानेच खाबू मोशाय कोलमडला. मस्त तिखट खिमा आणि त्याबरोबर कडक पापडासारखी रोटी, हे कॉम्बिनेशन खूपच छान आहे. स्टफ पापड नावाचा प्रकारदेखील अशीच दाद घेऊन गेला.

17मेन कोर्ससाठी खाबू मोशायने भातावर आडवा हात मारायचे ठरवले आणि सारस्वत प्राँझ करी विथ राईस मागवला. त्याचबरोबर रावस फ्राइड राईस विथ पेकिंग सॉसही मागवला. खाबू मोशायला आतापर्यंत आपल्या खाबूगिरीबद्दल असलेला अहंकार या दोन डिशनी धुळीत मिळवला. सारस्वत प्राँझ करी खाल्लीच नाही असं असेल, तर मग खवय्यांनी आतापर्यंत फार काही चाखलंच नाही, असं म्हणावं लागेल. तीच गत रावस फ्राइड राईसची. रावस हा मासादेखील अत्यंत चविष्ट म्हणून खाबू मोशायच्या ऑल टाइम फेव्हरिट लिस्टमध्ये आहे. सुंदर मुलींना रावस का म्हणतात, हे खाबू मोशायने पहिल्यांदा रावस खाल्ला तेव्हाच कळलं होतं. पण इथे या फ्राइड राईसमध्ये हा मासा एकदम जमून आला आणि त्यावर दिलेला पेकिंग सॉसही अद्भुत होता.

या डिशशिवाय इथे ‘सिना ए खंजिर’ ही स्टार्टरमधील डिश, सिलोन किंग प्राँझ करी राईस, वाडी मॅकरेल करी राईस आदी डिशही उत्तम आहेत. उदरभरण झाल्यानंतर गोव्यातील एकदम खास स्वीट डिश म्हणून ओळखली जाणारी बेबिन्का ही डिश खाबू मोशायने मागवली. साधारण खरवसासारख्या दिसणाऱ्या या डिशने पहिल्या तुकडय़ातच संपूर्ण जेवणावर चार चाँद लावले. ही एवढी चांगली डिश गोव्याबाहेर क्वचितच मिळावी, हे आपल्या खाद्यसंस्कृतीचं दुर्दैवच म्हणायला हवं. पण ठाण्यात ‘स्पाइस गेट’मध्ये ती नक्कीच मिळेल. बरं, इथली प्रत्येक डिश किमान १२५ ते कमाल ३७५ रुपयांच्या आतबाहेर आहे. त्यामुळे खिशालाही फार चाट लागत नाही आणि काही तरी वेगळं आणि उत्तम खाल्ल्याचं समाधानही मिळतं.
भूगोलाच्या तासाला खाबू मोशायला गुरुजींनी मसाल्याची बेटं शिकवली होती. पण मसाल्यांची जानपेहचान आणि मुहब्बत झाली ती, या मसाल्याच्या दारी! ल्ल
कुठे : स्पाइस गेट
कसे जाल : ठाणे स्थानकात उतरून पश्चिमेला आल्यावर ठाण्याचा सुप्रसिद्ध गोखले रोड लागतो. या गोखले रोडवरून तीन हात नाक्याच्या दिशेला चालायला सुरुवात केलीत की, थोडय़ा अंतरावर उजव्या हाताला स्पाइस गेट दिसेलच.
(खाऊच्या शोधकथा आणि फाइन डाइन ही साप्ताहिक सदरे व्हिवाच्या या अंकात प्रसिद्ध होऊ शकली नाहीत.)