आज देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर र्वष पूर्ण झाली असताना तरुणांचा देशही ओळख देशाला मिळाली असली तरी या तरुणाईमध्ये स्वातंत्र्याची नेमकी कुठली संकल्पना मूळ धरते आहे? परदेशातच शिक्षण घेऊन तिथेच राहणारी तरुणाई, राष्ट्रगीतासाठी उभं राहावं की नाही यावरही गोंधळलेली तरुणाई, करिअरच्या युद्धात हरवलेली पिढी असं एकूण नकारार्थी चित्र ज्यांच्याबद्दल सहज उभं राहतं त्या पिढीसाठी स्वातंत्र्याची व्याख्या फक्त व्यक्तिगत स्वातंत्र्य इतपरच मर्यादित झाली आहे का? याचा विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी बोलून जाणून घेण्याचा हा प्रयत्न..

‘जिंकू किंवा मरू’.. असा नारा एके काळी दिला गेला होता. ते युद्ध देशासमोरच्या कोण्या एका शत्रूबरोबरचं नव्हतं, तर माणुसकीशी वैर साधणाऱ्यांशी होतं. माणुसकी, न्याय, स्वातंत्र्य, कर्तव्य, देशाभिमान अशा एकेक संकल्पना जेव्हा उभ्या राहतात तेव्हा त्याबद्दल प्रत्येकाची एक वैचारिक बैठक  ठरते आणि त्यानुसार व्यक्ती म्हणून वावरताना आपण कृती करतो, असं किमान गृहीत धरलं जातं. मात्र तशी बैठक तरुणाईत सहजी दिसत नाही.

कॉलेजमध्ये राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर उपचार म्हणून उभं राहत बाकावरील निळा प्रकाश फेकणाऱ्या फोनसोबत हितगुज करणाऱ्या मुलाला या निष्काळजीपणाचे कारण विचारल्यावर तो म्हणाला, ‘‘उभं राहून कुठे कधी रिस्पेक्ट-बिस्पेक्ट दिला जातो का? अननेसेसरीली केव्हा तरी सिस्टीम कुणी तरी सेट केली आणि आपण ती ब्लाइंडली फॉलो करायची, याला काय मीनिंग आहे?’’ या मराठी मुलाच्या एका वाक्यात आलेल्या अगणित इंग्रजी शब्दांमुळे एका मिनिटासाठी अजूनही त्याच्या मनात इंग्रज वास्तव्य करून आहेत की काय असा भास झाला. क्षणभर विचार मनात आला, ‘खरंच, कशाला उभं राहायचं? या उभं राहण्याला, वंदे मातरम् म्हणण्याला, ‘भारतमाता की’ म्हटल्यानंतर बेंबीच्या देठापासून ‘जय’ असं ओरडण्याला खरंच काय अर्थ आहे?’ असा प्रश्न पडला आणि सावरकरांच्या ‘माझी जन्मठेप’पासून ते गंगाधर गाडगीळांच्या ‘दुर्दम्य’पर्यंत आणि अखंड महाराष्ट्राच्या लढय़ापासून ते अगदी शाळेत जीव तोडून शिक्षकांनी शिकवलेल्या इतिहासाच्या तासांपर्यंत सारे सारे डोळ्यासमोरून तरळून गेले. ज्याला इतिहास ज्ञात नाही, ते जाणून घेण्याची उत्सुकता नाही, त्याला वर्तमानाबद्दल आपुलकी कशी असणार? या सगळ्या मंथनातून ‘देशाभिमान’, ‘राष्ट्रप्रेम’ या संकल्पनादेखील इतिहासात गेल्या की काय, अशी शंका वाटू लागते. गरिबीतून वर आलेल्या पालकांना आजच्या हजारो चौरस फुटांच्या घरातही पैशाची किंमत जाणवते, तिथेच त्यांच्याच मुलांना क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि त्यातून होणारा पैशाचा उपयोग ही एक सहज प्रक्रिया वाटते. त्याचप्रमाणे पारतंत्र्याची झळ सोसलेली आणि आज संपूर्ण स्वातंत्र्य उपभोगणाऱ्या पिढीतही हाच अंतराय आहे का? असा सवाल मनात डोकावतो.

जेएनयूसारख्या विद्यापीठात जेव्हा देशविरोधी नारे घुमतात, देशाचे भविष्य म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते असे तरुण जेव्हा कुठल्याशा आमिषाला भुलून दहशतवादी संघटनेत रुजू होण्यासाठी थेट त्या देशांत जातात, तेव्हा कुठे तरी पाणी मुरतंय किंवा पाणी अजिबातच मुरत नाहीये या दोन शक्यता डोळ्यासमोर घोंघावू लागतात. ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर मनोज भाटवडेकर यांच्याशी संवाद साधताना ते म्हणाले की, ‘‘स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थच मुळात जबाबदारीशी साधम्र्य साधणारा आहे. म्हणजेच माझं माझ्याशीच उत्तरदायित्व आहे असा त्याचा अर्थ होतो. स्वातंत्र्यपूर्व काळात जो राष्ट्राभिमान होता त्यात समान मूल्यं जपली होती, एका उद्दिष्टाकडे सगळे झेपावले होते, परंतु आम्ही स्वतंत्र झाल्यानंतर ते उद्दिष्ट, ती मूल्यंच कुठे तरी हरवली. शेवटी आज देशाभिमान जागृत ठेवायचा असेल तर मी स्वत: कुठे तरी माझ्यापुरता जबाबदार आहे, असे प्रत्येकाने मानल्यानंतर सामूहिक जबाबदारीची ‘एक उत्तम समाज’ म्हणून नकळत धारणा होणार आहे. म्हणून आजच्या तरुणांनी स्वत:च्या आत वळायला हवे.’’

स्वातंत्र्यपूर्व काळात उद्दिष्ट किंवा मूल्यं जपली होती आणि आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ती अचानक पुसट कशामुळे झाली याचा शोध घेताना राजकारण या एका नेहमीच्या त्याच त्या कारणाव्यतिरिक्त प्रकर्षांने एक गोष्ट जाणवते आणि ती म्हणजे मधल्या पिढीची मानसिकता. मधल्या पिढीने ज्याप्रमाणे गरिबीतून घराला वर काढल्यानंतर, मुलांना पैशाची चणचण भासू नये म्हणून ‘अर्थ’ या शब्दामधला अर्थ विरळ केला, तसाच जागतिकीकरणाच्या भीतीपोटी मुलांना इंग्रजी भाषेबद्दल आणि इतर देशांबद्दल जी ओढ लावली त्याची प्रतिक्रिया म्हणून मुलांकडून स्वदेशाकडे पाठ फिरवली जात आहे की काय, अशी शंका मनात उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. याच विषयावर ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोलेंनी चर्चा करताना विचार व्यक्त केला की, ‘‘देश फक्त सीमांतून स्वतंत्र होऊन आपण पूर्ण स्वतंत्र झालो, असे म्हणता येणार नाही. तो वैचारिक, आर्थिक, भौतिक अशा सर्वागानी स्वतंत्र झाला पाहिजे.’’ अर्थशास्त्राच्या ‘मागणी तसा पुरवठा’ या तत्त्वावर देशातील सर्व घटकांनी आता इतर देशांच्या बरोबरीने कार्यरत होण्याची आवश्यकता आहे. इथला तरुण ज्या गोष्टींसाठी इतर देशांकडे धाव घेतो त्या इथे अद्ययावत स्वरूपात निर्माण केल्या तर तो नखशिखान्त देशात रुजू शकेल. आकाशाची ओढ असलेले रोपटे ज्याप्रमाणे कुंडीमध्ये वाढू शकत नाही, त्याचप्रमाणे आजच्या स्पर्धात्मक जगात टिकाव लागण्यासाठी आणि स्वत:ची प्रगती करण्यासाठी जर एखादा तरुण देशाबाहेर जाऊ  नये असे वाटत असेल, तर ती सुपीक माती आपल्याच देशात निर्माण करणे हे देशातील सर्वच घटकांचे कर्तव्य आहे, असे म्हणावे लागेल.

ज्येष्ठ लेखिका आणि अभिनेत्री प्रतिमा कुलकर्णी यांनी मालिकेसाठी विषय शोधात असतानाचा एक अनुभव सांगितला. एक तरुण मुलगा त्यांना म्हणाला, ‘‘आम्हाला १९४७ च्या काळातलं काही सांगू नका. आम्हाला त्याच्याशी जुळवून घेता येत नाही.’’ अर्थात आज सतत भूतकाळातले दाखले देत जर तरुणांच्या व्यावहारिक जगाशी तुलना करत बसलो, तर हाती शून्यच लागणार आहे. तेव्हा आजची आवाहने, आजचे विषय आणि देशप्रेमाचा बदलत जाणारा आवाका लक्षात घेऊन तरुणांशी संवाद साधला तर कुठे तरी ते या साऱ्याशी साधम्र्य साधू शकतील.

जगभरातील देश, त्या देशांतील तरुणांची मानसिकता पर्यटनाच्या व्यवसायातून जाणून घेणाऱ्या उद्योजिका वीणा पाटील यांना याविषयी विचारले असता त्या म्हणाल्या, ‘जुन्या पिढीला, या नव्या पिढीबद्दल यांच्यात देशाभिमान जागृत होईल का? अशी शंका काळजीपोटी पडणे साहजिक आहे. परंतु देशाकडे पुन्हा एकदा सकारात्मक दृष्टिकोनातून बघण्याची आज तरुणांची मानसिकता बनते आहे. दुसऱ्या देशांचे अंकित होण्यापेक्षा मी माझं भविष्य भारतातच घडवीन ही चेतना नव्याने जागृत होताना दिसते आहे. तेव्हा आधीच्या पिढीने विश्वासाचा हात या पिढीच्या खांद्यावर ठेवणे आज काळाची गरज बनले आहे.’

मुलांच्या व्यसनमुक्तीसाठी कार्यरत असणारे ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर हरीश शेट्टी यांच्याशी चर्चा करताना या विषयाला एक वेगळा दृष्टिकोन मिळाला. ते म्हणाले, ‘‘देशनिष्ठा तीच आहे. केवळ त्याची अभिव्यक्ती बदलली आहे. वैश्विक नागरिकांबद्दल मी बोलत नाही. त्यांची वृत्ती ही या सगळ्या पलीकडची आहे. एक बदल फक्त नमूद करू इच्छितो, की जागतिकीकरणामुळे करुणा मात्र कमी झाली आहे, परंतु देशाबद्दल अभिमान कमी झाला नाही. एखाद्या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळू शकणार नाही, कारण तरुणांना वाटू शकेल, की जर एफआयआर दाखल झाली तर माझा अमेरिकेचा व्हिसा रद्द होईल. मात्र उद्या जर देशाविरुद्ध कुणी आवाज उठवला तर हेच तरुण नक्की एकत्र येतील. आजच्या मुलांचा आत्मविश्वास नक्कीच आमच्या पिढीपेक्षा जास्त आहे. आज मुलांकडे व्यावहारिक जगामुळे कदाचित भावनिकतेची जोड असणारी श्रद्धा नसेल, परंतु एखाद्या गोष्टीबद्दल सन्मान नक्कीच आहे. आज ‘जिंकू किंवा मरू’ असा नारा कुणीही मारू शकत नाही, परंतु ‘जिंकू आणि जिंकूच’ असा नारा उदयास आला आहे. आज पुढे येणारा भारत हा गावांमधून पुढे येतो आहे आणि त्याला कुणीही थांबवू शकत नाही,’’ असे सांगत या प्रक्रियेकडे सकारात्मकतेने बघण्याचा आग्रह ते धरतात.

करुणा, श्रद्धा या गोष्टी वैश्विक परिणामामुळे बदलल्या असतील, परंतु सन्मान आणि अभिमान यांसारखी महत्त्वाची मूल्ये अजूनही अबाधित आहेत. भारतातील नाही तर संपूर्ण जगातील तरुण या जागतिकीकरणाच्या आहारी आहेत, त्यामुळे कदाचित भौगोलिक सीमा त्यांना मान्य नसतील, परंतु जिथे आपला जन्म झाला त्या मातीशी असणारं आपसूक नातं मात्र त्याचं अबाधित आहे असे या एकंदर मान्यवरांसोबत केलेल्या चर्चेचं फलित आपल्याला म्हणता येईल. येत्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याच्या समारंभाची ही एक नांदी आहे असे मानले तर ते वावगे ठरणार नाही.

स्वातंत्र्यपूर्व काळात जो राष्ट्राभिमान होता त्यात समान मूल्यं जपली होती. परंतु आम्ही स्वतंत्र झाल्यानंतर ते उद्दिष्ट, ती मूल्यंच कुठे तरी हरवली. शेवटी आज देशाभिमान जागृत ठेवायचा असेल तर मी स्वत: कुठे तरी माझ्यापुरता जबाबदार आहे, असे प्रत्येकाने मानल्यानंतर सामूहिक जबाबदारीची ‘एक उत्तम समाज’ म्हणून नकळत धारणा होणार आहे. म्हणून आजच्या तरुणांनी स्वत:च्या आत वळायला हवे.

डॉ. मनोज भाटवडेकर

viva@expressindia.com