इंजिनीअरिंग झाल्यानंतर सगळ्यांसारखी नोकरी करायची नाही, हे तिनं ठरवलं होतं. कॉलेजमध्ये असतानाच वेगवेगळ्या कॉलेज इव्हेंट्सच्या आयोजन करताना तिला मार्ग सापडला आणि चौकटीबाहेरचं काहीतरी करण्याचं स्वप्न साकार करण्याची तयारी तिने सुरू केली. इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय सुरू करणाऱ्या ठाण्याच्या तुर्या देशपांडेची गोष्ट.
प्रत्येक पिढीतल्या तरुणांची त्या त्या काळानुरूप काही खास वैशिष्टय़ं असतात. एक पिढी होती, जी देशप्रेमाने झपाटलेली होती, एक पिढी सामाजिक स्थिरतेसाठी झटत होती, एखाद्या पिढीने नवे पायंडेच पाडले, तर एखादी पिढी चाकोरीबद्ध आयुष्य रेटत राहिली. पण आमच्या पिढीला हे मान्य नाही. ठरावीक रुळलेल्या क्षेत्रात शिक्षण घेऊन सुरक्षित नोकरी करायची. आर्थिक, सामाजिक बाबतीत सुरक्षित आयुष्य जगायचं हे आमच्यातल्या अनेकांना पटत नाही. त्याच त्या मळलेल्या वाटांवरून चालण्यापेक्षा त्यांना स्वत:ची वाट तयार करायला आवडतं. समाजात स्वत:चं स्थान निर्माण करणं हे त्यांचं ध्येय असतं. नवीन काहीतरी, उद्यमशील असं काही करणं हा त्यांचा ध्यास असतो. अशीच एक ध्येयवेडी, ठाण्याची तुर्या देशपांडे.
नियमित वेळेची दहा ते पाचची नोकरी, त्यासाठी करायला लागणारी धावपळ, यातलं काहीच तिला करायचं नव्हतं. काहीतरी वेगळं करण्याचं स्वप्न ती बघायची, पण वेगळं म्हणजे नक्की काय? हे ठरत नव्हतं. तिने आय टी इंजिनीअरिंगला प्रवेश घेतला.
इंजिनीअरिंगचं शिक्षण घेत असतानाच कॉलेजमध्ये होणारे फेस्टिव्हल्स, अ‍ॅन्युअल डेज् यांच्या आयोजनात ती सहभागी व्हायची. यासाठी काम करताना प्रत्येक वेळी काय वेगळं करता येईल? आपलं आयोजन कसं लोकांच्या लक्षात राहील हाच विचार डोक्यात असायचा. कॉलेजच्या इव्हेंटसाठी काम करता करताच इव्हेंट मॅनेजमेंटच्या क्षेत्राविषयी तिला ओढ वाटायला लागली. आपलं वेगळेपण आपण या क्षेत्रात नक्की सिद्ध करू शकतो याची तिला खात्री पटली. ज्या क्षेत्रात काम करायचं त्या क्षेत्रातलं सखोल ज्ञान असावं म्हणून इंजिनीअरिंगचं शिक्षण संपल्यावर तिनं इव्हेंट मॅनेजमेंटचं प्रशिक्षणही घेतलं. अ‍ॅडव्हर्टायझिंग, ब्रँडिंग, प्रमोशन्सबद्दल माहिती करून घेतली. त्याच दरम्यान वैयक्तिक पार्टी, समारंभांसारखे इव्हेंट्स करायलाही सुरुवात केली. पण तेवढय़ावरच तिला थांबायचं नव्हतं. चौकटीबाहेरचं काहीतरी करण्याचं तिची स्वप्न साकार करण्याची तयारी तिने सुरू केली होती. त्या तयारीतला महत्त्वाचा टप्पा म्हणजे फेब्रुवारी २०१३ मध्ये तिने ठाण्यात स्वत:ची इव्हेंट कंपनी सुरू केली. ‘लिआटो इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट’.
‘‘या समाजात मला माझं स्वत:चं स्थान निर्माण करायचं होतं. इव्हेंट मॅनेजमेंटचं प्रशिक्षण घेतल्यानंतर मी एखाद्या मोठय़ा, नामांकित कंपनीत नोकरी करू शकले असते, पण इतरांनी नेमून दिलेले नियम, तत्त्व पाळण्यापेक्षा मला स्वत:चे नियम, स्वत:ची तत्त्वं आखण्यात जास्त रस होता. म्हणूनच मी स्वत:ची कंपनी सुरू करायचं ठरवलं,’’ असं तुर्या सांगते.
तिच्या क्षेत्रात चौकटीबाहेरचे विचार करण्याची, सतत नवनवीन गोष्टी लोकांसमोर मांडण्याची गरज असते. म्हणूनच तिच्या इव्हेंटसाठी दरवेळी गरजेनुसार नवीन टीम घेऊन ती काम करते. बर्थ-डे पार्टीजपासून, फॅशन शो, कॉन्सर्ट्स, प्रॉडक्ट लाँचेस, प्रमोशन्स् असे इव्हेंट्स सतत सुरूच असतात. ‘मुरूड-जंजीरा पर्यटन महोत्सवासारखा भव्य महोत्सवही तिच्या कंपनीने केला. चौकटीबाहेरचे विचार करण्याची क्षमता, वेळ-काळाचं बंधन न ठेवता काम करायचं या सगळ्यासाठी पालकांचा पाठिंबा फार महत्त्वाचा असतो. ती म्हणते, ‘‘माझ्या पालकांनी मला स्वप्न बघण्यापासून कधीच थांबवलं नाही. त्यांनी बंधनं घेतली असती तर मीही आज कोणाच्यातरी हाताखाली काम करणारी एम्पलॉयी असते. जे स्वप्न बघतात आणि ते सत्यात उतरविण्याचं ध्येय ठेवतात अशांना मी नक्की प्रोत्साहन देईन.’’
तुर्याची स्वप्नांची दुनिया सत्यात उतरली आहे खरी, पण ही फक्त सुरुवात आहे. या दुनियेची व्याप्ती वाढवणं हे तिचं नवीन ध्येय आहे.