18 September 2020

News Flash

ग्राहकांच्या तक्रारींचं ई-निवारण

खरेदी हा विषय तसा जिव्हाळ्याचा. पण ग्राहक म्हणून फसवणूक होण्याचे प्रसंगही अनेकदा येतात

गेल्या वर्षीच्या डिजिटल इंडियाच्या चळवळीपासून तिनं प्रेरणा घेतली आणि या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून त्याच्याशी आपल्या कायद्याच्या ज्ञानाशी सांगड घालण्याचं ठरवलं. अ‍ॅडव्होकेट पूजा तेरवाडच्या याच प्रयत्नातून सुरू झाली ई-लीगल कन्सल्टन्सी- निवारण ऑनलाइन. तरुण वकिलांच्या या स्टार्टअपविषयी..

खरेदी हा विषय तसा जिव्हाळ्याचा. पण ग्राहक म्हणून फसवणूक होण्याचे प्रसंगही अनेकदा येतात. ऑनलाइन शॉपिंग हा हल्ली परवलीचा शब्द झालाय. अनेक लोक आता या घरबसल्या खरेदीच्या पर्यायाला सरावलेत. त्यातून या ऑनलाइन बाजारात सतत काही ना काही सेल, डिस्काउंट किंवा तत्सम काही सुरूच असतं. ऑनलाइन खरेदी करताना चांगला अनुभव आलेले ग्राहक पुष्कळ असल्याने माउथ पब्लिसिटीमुळेदेखील अनेकजण या ऑनलाइन बाजाराकडे वळले आहेत. त्यापैकी काही ग्राहकांना वाईट अनुभवही येतो. फसवणूक होते. पण त्याविरोधात दाद कुठे आणि कशी मागायची याबाबत पुरेशी माहिती नसते. कायदेशीर बाबी कळत नाहीत आणि फॉलोअपचा पेशन्सही नसतो. हे लक्षात घेऊन ई-ग्राहकांच्या तक्रारींचं निवारण लवकर व्हावं या उद्देशानं एका तरुण वकील मुलीनं एक स्टार्ट अप सुरू केलंय-निवारण ऑनलाइन. गेल्या वर्षीच्या डिजिटल इंडियाच्या चळवळीपासून प्रेरणा घेत या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून त्याची आपल्या कायद्याच्या ज्ञानाशी सांगड घालण्याचा प्रयत्न करायचं अ‍ॅडव्होकेट पूजा तेरवाड हिनं ठरवलं आणि निवारण ऑनलाइनची निर्मिती झाली. ही एक ऑनलाइन सेवा आहे. ई-लीगल कन्सल्टन्सी असं याचं स्वरूप. ग्राहकांनी कुठल्याही ब्रॅण्डविरोधात तक्रार दाखल करण्यापूर्वी त्यामागच्या कायदेशीर बाबी समजून घ्याव्यात, या उद्देशानं याची निर्मिती झाली. ग्राहकाला ब्रॅण्डविरोधात दाद मागण्यासाठी आवश्यक सर्व माहिती पुरवली जाते आणि गरज वाटल्यास त्याची तक्रार ग्राहक न्यायालयापर्यंत नेली जाते. ऑनलाइन ग्राहकांच्या तक्रारी कायदेशीररीत्या नोंदवून त्याचे निवारण करणारी ही कंपनी असल्याचं पूजा म्हणाली.
या प्रकारच्या उद्योगाची कल्पना कशी सुचली आणि याची गरज असल्याचं कधी जाणवलं याविषयी सांगताना पूजा म्हणाली, ‘‘भारतातील न्यायव्यवस्था आणि कायदेशीर प्रक्रिया काहीशी किचकट आहे. बऱ्यापैकी संथ गतीने चालणारी आहे. त्यामुळे ग्राहकांच्या समस्यांचं निवारण होण्यास बराच वेळ लागतो. याच कारणाने अनेक लोक या व्यवस्थेकडे आपल्या तक्रारी घेऊन जाण्यास टाळाटाळ करतात. अनेकांना अशी कायदेशीर तक्रार कशी करायची याबाबत पुरेशी माहिती नसते. ग्राहकांच्या तक्रारींचं सुलभ रीतीने निवारण व्हावं या उद्देशाने मी निवारण या ऑनलाइन कंपनीची स्थापना केली. या कंपनीत कोणत्याही ठिकाणी असलेल्या ग्राहकाला त्याच्या समस्येचं निवारण करून देण्यास आम्ही मदत करतो.’’
निवारण ऑनलाइनची वर्किंग स्टाइल अगदी सोपी आहे. ‘‘ग्राहकाचं नुकसान जेवढं जास्त तेवढं शुल्क कमी, या तत्त्वावर आम्ही काम करतो. आधीच नुकसान सोसावं लागलेला ग्राहक वैतागलेला असतो.
त्याची पिळवणूक करण्यात काही अर्थ नाही, हे आम्ही जाणतो. किमान ३०० रुपये आकारून आम्ही ग्राहकांना मदत करतो. नुकसानीच्या जास्तीत जास्त दहा टक्के एवढाच दर आम्ही आमची सेवा देण्यासाठी आकारतो,’’ असं पूजा सांगते. त्याचबरोबर निवारण ऑनलाइनतर्फे काही सोशल कँपेनही सुरू आहेत. निवारण ऑनलाइन कँपेन, वन रिंग टू कनेक्ट अशा अनेक मिस्ड कॉल कँपेन आम्ही सुरू केल्या आहेत. अशा मोहिमांच्या माध्यमातून ग्राहकांशी संवाद साधून त्यांनी खरेदी करताना, ऑनलाइन व्यवहार करताना कशा प्रकारे सजग राहिलं पाहिजे ते समजावून सांगतो. ग्राहकांच्या हक्काबद्दलची माहिती निवारण देत असते. मिस्ड कॉल कँपेनबद्दल बोलताना निवारण ऑनलाइन कंपनीची लीगल असोसिएट अ‍ॅड. मनाली कापरेकर म्हणाली, ‘‘या मिस्ड कॉल कँपेनमध्ये एका टोल फ्री नंबरवर ग्राहकांना मिस कॉल द्यायचा असतो. असं केल्यानं त्यांचा नंबर आमच्याकडे रजिस्टर होतो. पुढील २४ तासांत त्यावर आम्ही कॉल करून त्यांच्या तक्रारी जाणून घेतो आणि पुढील प्रक्रियेस सुरुवात करतो.’’
या कंपनीचं बहुतेक काम ऑनलाइन चालतं. पण वेळ पडल्यास ग्राहकांशी भेट घेऊन तक्रारी सोडविल्या जातात. गेल्या २४ डिसेंबरला जागतिक ग्राहक दिनानिमित्त पहिल्या १०० ग्राहकांच्या समस्या निवारण ऑनलाइनद्वारे विनाशुल्क सोडविल्या गेल्या. ६६६.ल्ल्र६ं१ंल्लल्ल’्रल्ली.ूे या संकेतस्थळाला भेट देऊन तुम्ही तुमच्या तक्रारी ‘निवारण’पर्यंत पोचवू शकता, असंही मनाली म्हणाली. ‘निवारण’मध्ये काम करणारे कर्मचारी बहुतेक सगळे अगदी तरुण आहेत. सर्व तरुण वकील, नवीन संकल्पना आणि ऑनलाइन सेट-अप असणारी ही स्टार्ट-अप वेगळ्या क्षेत्रात नवीन काही करू इच्छिणाऱ्या तरुणाईच्या उत्साहाचं प्रतीक बनली आहे.

 

ग्राहकांशी संवाद साधून त्यांनी ऑनलाइन व्यवहार करताना कशा प्रकारे सजग राहिलं पाहिजे ते आम्ही ऑनलाईन मोहिमांच्या माध्यमातून समजावून सांगतो. ग्राहकांच्या हक्काबद्दलची माहिती निवारण देत असते.
अ‍ॅड मनाली कापरेकर, (लीगल असोसिएट, निवारण ऑनलाइन)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2016 1:37 am

Web Title: startup business special articles in viva loksatta 3
Next Stories
1 चौकटीबाहेरचं स्वप्न
2 फॅशनेबल स्टार्टअप
3 जीवन त्यांना कळले हो..
Just Now!
X