18 January 2019

News Flash

बॉटम्स अप : ‘चिअर्स’ करण्यामागच्या कथा

लॅटीन भाषेत चेहऱ्याला पर्यायी शब्द म्हणून ‘चिअर्स’चा वापर केला जायचा.

शेफ वरुण इनामदार

प्रसिध्द चॉकलेटिअर आणि शेफ वरुण इनामदार यांनी याआधी आपल्याला चॉकलेटीसफर घडवली होती. या नव्या सदरात आणखी एक पाऊल पुढे जात  वेगवेगळ्या प्रकारची मद्य, त्यांच्या कथा, त्याबरोबर विकसित होत गेलेल्या क्राफ्टिंग, फुड पेअरिंगसारख्या संकल्पना आणि संस्कृती अशा नानाविध गोष्टींची ओळख ते करुन देणार आहेत..

नवीन वर्षांची सुरुवात दणक्यात झालीये ना. विचार कसला करताय झालीच असणार की. नव्या वर्षांत पदार्पण करताना एकमेकांना येत्या वर्षांच्या शुभेच्छा देत असताना, मागे वळून पाहात काही गोष्टींवर नजर टाकणंही तितकंच महत्त्वाचं असतं. तसं म्हणायचं झालं तर माझं आणि तुमचं नातंही असंच आहे. याआधीही कोकोच्या बियांपासून चॉकलेटपर्यंतचा प्रवास आपणअनुभवला होता.  यावेळी मात्र आपला हा प्रवास खऱ्या अर्थाने एका वेगळ्या वाटेवर जाणार आहे.

यंदाच्या ‘बॉटम्स अप’ या सदरात आपण, ड्रिंक्स (मद्य), पेयं, स्पिरिट्स, लिकर, लिक्यर, कॉकटेल, मॉकटेल आणि अशा बऱ्याच गोष्टींविषयी जाणून घेणार आहोत. अशा या नव्या प्रवासाच्या पुस्तकाचं पान पलटताना मी एक आश्वासन देऊ इच्छितो की, माझ्या आतापर्यंतच्या अनुभवातून वाचकांपर्यंत या सदरातून काही अफलातून गोष्टींचा नजराणा पोहोचणार आहे. तर मग लोकहो.. या नव्याकोऱ्या प्रवासासाठी एकदा मोठय़ा उत्साहात म्हणू या, ‘चिअर्स’..

आता तुम्ही म्हणाल अचानक ‘चिअर्स’.. हाच शब्द इथे का वापरावा. या जागी दुसरा कोणता शब्दही वापरता आता असता. मुळात ‘चिअर्स’ या शब्दाचा अर्थ आहे तरी काय?  याच सुरेख आणि उत्साहपूर्ण शब्दाच्या साथीने आपण या सदराची सुरुवात करतो आहोत. तयार आहात ना या धमाल प्रवासासाठी?

लॅटीन भाषेत चेहऱ्याला पर्यायी शब्द म्हणून ‘चिअर्स’चा वापर केला जायचा. चेहऱ्यावरील भावही (उत्साहपूर्ण किंवा इतर कोणतेही भाव) ‘चिअर्स’ या शब्दाशी मेळ खातात. पुढे जाऊन या शब्दाचा अर्थ बदलत गेला आणि आनंद, उत्साह, एखाद्याला प्रोत्साहन देण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी म्हणून हा शब्द वापरला जाऊ  लागला. साधारण १९१९ मध्ये मद्यपानापूर्वीच्या ‘सॅल्यूटेशन’ला पर्यायी शब्द म्हणून ‘चिअर्स’ची नव्याने ओळख झाली. जेथे मद्याचे प्याले एकमेकांवर हलकेसे टकरावले जात असत त्यालाच ‘क्लिंकिंग’ असंही म्हणतात.

इंग्लिश घरंदाज व्यक्तीने कोणतेही पेय घेत असताना हातात ग्लास घेऊन त्याने इतरांच्या ग्लासला स्पर्श करून (प्याले एकमेकांवर हलकेसे आदळवून) पिण्याच्या पद्धतीचा उल्लेख १८२० पासून ‘ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी’मध्ये करण्यात आला. पण एका शब्दामुळे आणि त्यासोबत केल्या जाणाऱ्या कृतीमुळे आतापर्यंत मला बरेच प्रश्न पडत होते. मद्यपानापूर्वी किंवा कोणतेही पेय पिण्यापूर्वी ग्लास एकमेकांवर आपटून त्यातून खणखण असा आवाज झाल्यानंतरच त्यातील पेय का प्यायले जाते, याचे उत्तर मात्र मला काही केल्या मिळतच नव्हते. याच गोष्टींविषयी जाणून घेण्याच्या जिज्ञासू वृत्तीमुळे माझी शोधमोहीम काही इतिहास, आख्यायिका आणि विविध जुन्या पुस्तकांमध्ये मांडलेल्या संदर्भापर्यंत जाऊन पोहोचली. बऱ्याच अमेरिकन लोकांमध्ये ड्रिंक्स किंवा मद्याचा उल्लेख ‘विष’ म्हणून केला जायचा. किंबहुना मित्रमंडळींच्या गप्पांचे फड रंगू लागले की त्यांच्यात ‘आजच्या रात्रीसाठी तुमचं आवडतं विष कोणतं?’, असाच प्रश्न उपस्थित केला जायचा. पण त्यानंतर एकटय़ा मित्राने ते करण्याऐवजी सर्वानीच ही कृती करण्यास सुरुवात केली आणि तिथपासून ‘क्लिंकिंग’ला सुरुवात झाली.

याच संदर्भाने मला पहिल्या आख्यायिकेपर्यंत नेऊ न पोहोचवलं. आपल्या साथीदांरांसोबत प्यायलं जाणारं मद्य इतरांसाठी अपायकारक नसल्याचं सिद्ध करण्यासाठी ज्या व्यक्तीने हा संपूर्ण बेत आखलेला असायचा त्याने प्रत्येकाच्या प्याल्यातील थोडंथोडं मद्य आपल्या प्याल्यात घ्यायचं. त्यामुळे कोणत्याही प्रकारची ‘विषबाधा’ म्हणजेच कोणाला अपाय होणार नाही यावर शिक्कामोर्तब केलं जात असे. आजतागायत ही प्रथा तशीच का सुरू होती याचा मला अंदाज येत नाही तोच ग्लास हवेत उचलून ते एकमेकांवर हलकेसे आपटण्याची प्रथा आणि त्याचा उल्लेख इसवी सन १८०० मध्ये अलेक्झांडर दमासच्या कथांमध्ये आढळल्याचं माझ्या लक्षात आलं.

आणखी एका आख्यायिकेने माझं लक्ष वेधलं.  हा संदर्भ होता थेट मध्ययुगीन काळातला. मंदिरात घंटानाद करून अशुभ शक्तींना पळवलं जातं तसंच त्या ठिकाणी असणाऱ्या अतृप्त आत्मा आणि भूत वगैरे तेथून नाहीसे होतील हा त्यामागचा समज असायचा. पण त्यावेळी मद्य हे लाकडाच्या किंवा सिरामिकच्या पेल्यांमधून घेतले जात होते. त्यामुळे ग्लास टकरावल्यावर होणारा आवाज तेव्हा झाला असेल का? हाही एक प्रश्नच आहे.

जर्मन संस्कृतीतही याचे काही संदर्भ आढळतात. पुस्तकांमध्ये असणारी माहिती आणि उल्लेख पाहता हे लक्षात येतंय की, जर्मन लोक आपले मद्याचे प्याले भरून टेबलावर ठेवत असत. जेणेकरून तेथे असणारे भूत, आत्मा पळून जावेत. ‘काँगोलीस’ प्रजातीतील लोक या प्रथेसाठी घंटा वाजवत असत. तिबेटियन त्यांचा ‘कमिस’चा (Kumis) प्याला पिण्यापूर्वी एकदा टॅप करत असत. ‘शँग’ राजघराण्यातील लोक मद्याचे सेवन करण्यापूर्वी रडत असत, तर ओडिनच्या गुंफेत राहणारे नॉर्डिअ‍ॅक आदिवासी जमातीतील लोक मानवी कवटय़ा फोडत असत. मुळात काय, तर मद्याचा प्याला पिण्यापूर्वी कसलातरी आवाज करण्याचीच ही संस्कृती. अलीकडच्या या संकल्पनेवर नजर टाकली तर पंचेंद्रियांकडून या पेयाला मिळणारी दाद म्हणजे ‘चिअर्स.’ नजर, चव, गंध आणि प्याले एकमेकांवर टकरावून त्यातून होणारा आवाज आणि स्पर्श या गोष्टींचंही इथे महत्त्वं आहे. इसवी सन पूर्व चौथ्या शतकात रोमन संस्कृतीत देवाला मद्याचा नैवेद्य दाखवला जायचा. त्यावेळी काही मद्य हेतुपुरस्सर प्याल्याबाहेर वाहू दिले जायचे. आणि असे करत असताना मद्याचे प्याले आपोआपच एकमेकांवर हलकेसे आदळले जायचे. हीच प्रथा पुढेही सुरू राहिली. कारण काहीही असले तरी ही प्रथा असंख्य ठिकाणी असंख्य लोकांनी पुन्हा पुन्हा अवलंबली. मानवाच्या उत्क्रांतीमध्येही त्याचा उल्लेख आढळतोच. विविध संस्कृती, कालखंडांमध्ये असणारे संदर्भ आणि त्यांच्यामध्ये असणारी विविधता पाहिली तर हे लक्षात येतंय की आपण जवळपास सहा हजार वर्षांपूर्वीच्या काळावर नजर टाकून आलो आहोत. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्हीही ‘हर फिक्र को धुँवे मे उडाके.’ चिअर्स कराल तेव्हा यामागची माहितीही तुमच्या मनात असेलच. किंबहुना कोणीतरी, कुठेतरी एकमेकांच्या आनंदासाठी, यशासाठी ग्लास एकमेकांवर हलकेसे आदळवत चिअर्स म्हणाले होते, हे नक्कीच लक्षात येईल.

viva@expressindia.com

First Published on January 5, 2018 12:56 am

Web Title: story behind cheers up