जून महिन्यात अभिषेक सक्सेना दिग्दर्शित ‘फुल्लू’ नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला होता. मासिक पाळीदरम्यान वापरायचे सॅनिटरी नॅपकिन कमीत कमी खर्चात बनवण्याच्या ध्येयाने झपाटलेल्या एका तरुणाची कथा यामध्ये सांगण्यात आली होती. अभिनेता शारिब अली हाश्मीने यामध्ये प्रमुख भूमिका साकारली होती. हा चित्रपट केव्हा आला आणि गेला ते कळलंच नाही. पण गेल्या आठवडय़ात याच विषयावरील एका चित्रपटाची मोठी चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. यासाठी दोन गोष्टी कारणीभूत होत्या. अरुणाचलम मुरुगनंथम या व्यक्तीला प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार याने दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि दुसऱ्याच दिवशी प्रदर्शित झालेलं ‘पॅडमॅन’ या आगामी चित्रपटाचं नवीन पोस्टर. आता या दोन गोष्टींचा काय संबंध, असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर ‘पॅडमॅन’ हा चित्रपट बेतला आहे अरुणाचलम मुरुगनंथम या असामान्य व्यक्तीच्या आयुष्यावर.

मासिक पाळीदरम्यान महिलांनी पाळायची स्वच्छता याबाबत आता जाहीररीत्या चर्चा होऊ लागली आहे. पण दोन दशकांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. विशेषत: खेडय़ातील महिलांमध्ये चर्चा तर सोडाच स्वत:च्या या मासिक धर्माबाबत कशा प्रकारे स्वच्छता राखली पाहिजे याबाबतही पुरेशी जागरूकता नव्हती. (आजही याबाबत मोठय़ा प्रमाणावर जनजागृती करण्याची आवश्यकता आहे; कारण जवळपास ऐंशी टक्के स्त्रिया सॅनिटरी नॅपकिन वापरत नाहीत, असं आकडेवारी सांगते). लग्न झाल्यानंतर एके दिवशी आपली बायको न्हाणीघराजवळ मातीत काही तरी पुरताना अरुणाचलम यांना दिसली. त्या दिवशी पहिल्यांदाच त्यांना मासिक पाळीबाबत आणि त्या वेळी वापरल्या जाणाऱ्या कापडाबद्दल माहिती मिळाली होती. बाजारात सॅनिटरी नॅपकिन मिळत होते पण ते वापरले तर दूध आणि साखरेचा खर्च परवडणार नाही, अशी चिंता बायकोला होती. त्यानंतर बायकोला भेटवस्तू म्हणून सॅनिटरी नॅपकिन द्यायचे हे ठरवून अरुणाचलम स्वत: बाजारात खरेदीसाठी गेले. सॅनिटरी नॅपकिनचं जे पाकीट त्यांनी खरेदी केलं त्याची किंमत मूळ खर्चाच्या चाळीसपट अधिक असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. गरिबी अगदी जवळून पाहिलेल्या अरुणाचलम यांना बायकोचं न परवडणाऱ्या खर्चाबाबतचं म्हणणं पटलं. (खरं तर दोन दशकांनंतरही सॅनिटरी नॅपकिन न वापरण्यामागे अपुरी माहिती हे एक महत्त्वाचे कारण आहे त्याचबरोबर त्याचा न परवडणारा खर्च हा देखील तितकाच कारणीभूत आहे. म्हणूनच की काय काही महिन्यांपूर्वी जेव्हा सरकारने त्यावर बारा टक्के जीएसटी आकारायचे ठरवले तेव्हा संपूर्ण देशभरातून त्याविरोधात आंदोलनं करण्यात आली) त्याच वेळी त्यांच्या डोक्यात असाच नॅपकिन कमीत कमी किमतीत बनवण्याची संकल्पना घर करू लागली. अरुणाचलम यांनी त्यानंतर मागे वळून पाहिलंच नाही. विविध प्रयोग सुरू झाले. घरातच एक छोटंसं वर्कशॉप तयार करून त्यांनी सॅनिटरी नॅपकिन बनवायला सुरुवात केली. ते त्यांनी घरातील स्त्रियांना, वैद्यकीय महाविद्यालयातील मुलींना वापरायला दिले. पण त्यातून अपेक्षित तो परिणाम साधला जात नव्हता. घरातून, समाजातून मोठा विरोध झाला. मग त्यांनी स्वत:वर प्रयोग करायला सुरुवात केली. बाजारातून एक चेंडू आणला, खाटिक मित्राकडून बकरीचं रक्त आणलं. त्यात रक्तात गुठळ्या होऊ  देणारं अँटिकोअ‍ॅग्युल हे रसायन योग्य प्रमाणात मिसळलं. ते रक्त चेंडूत भरून चेंडूच्या छिद्राशी एक नळी जोडली आणि तो चेंडू आपल्या दोन जांघांमध्ये व्यवस्थित राहील अशा प्रकारे बांधला. त्यावर त्यांनी स्वत: तयार केलेला नॅपकिन घातला. दिवसभरात विविध कामं करताना चेंडू दाबला जात असल्याने त्यातून रक्त बाहेर येत असे. त्यातूनच त्यांनी तयार केलेला नॅपकिन किती परिणामकारक आहे हे कळत होतं. यामुळेच  ‘सॅनिटरी नॅपकिन वापरणारा पुरुष’ अशी जगाला त्यांची ओळख आहे. पण त्या प्रयोगाचा त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला. तो प्रयोग त्यांनी थांबवला. पण नवीन मार्ग शोधणं सुरूच होतं. गावकऱ्यांचा विरोध वाढतच होता. मग त्यांनी एक दिवस गावातूनच पळ काढला.

is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
Maldhok birds
अग्रलेख: पूतनामावशीचे पर्यावरणप्रेम!
mumbai malad 14 year old girl dies first period stress How to maintain mental health of a girl during the first period What should be the role of parents doctor said
पहिल्या मासिक पाळीवेळी मुलीचं मानसिक आरोग्य कसं जपावं? पालकांची भूमिका कशी असावी? वाचा…
chhagan bujbal
“माझा निर्णय दिल्लीतून ठरला, मात्र…”; नाशिकच्या उमेदवारीबाबत छगन भुजबळांचे विधान

कोईम्बतूर येथे आल्यानंतर तब्बल साडेचार वर्षांच्या मेहनतीनंतर ते स्वत:चं सॅनिटरी नॅपकिन तयार करण्याचं यंत्र बनवण्यात यशस्वी झाले. केवळ साठ हजार रुपयांमध्ये त्यांनी ही करामत करून दाखवली होती. आयआयटी चेन्नईने त्यांच्या प्रयोगावर शिक्कामोर्तब केलं. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते अरुणाचलम यांना पारितोषिक मिळालं. पंतप्रधानांनी पत्र लिहून त्यांचं कौतुक केलं. एवढंच नव्हे तर माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते मागच्या वर्षी त्यांचा ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यांनी तयार केलेल्या यंत्रातून विकल्या जाणाऱ्या एका नॅपकिनची किंमत जास्तीत जास्त दोन रुपये आहे पण त्याचबरोबर महिलांना रोजगारही उपलब्ध झालाय. फक्त भारतातील गावांमध्येच नाही तर बांगलादेश, श्रीलंका, सौदी अरेबिया, केनिया, युगांडा अशा तेवीस देशांमध्ये ही यंत्रं आता पोहोचली आहेत. मुख्य म्हणजे अरुणाचलम यांची बायकोदेखील आता त्यांच्या या कामात सहभागी झाली आहे. ‘टाइम मॅगझिन’ने जगातल्या शंभर सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक, असा गौरव केलेले अरुणाचलम आता आपल्या मूळ गावीच अभिमानाने राहतात. भारतात, जगभर प्रवास करतात आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत कमीत कमी किमतीत सॅनिटरी नॅपकीन पोहचवण्याच्या त्यांच्या ध्येयाशी आजही ते बांधील आहेत.

‘चिनी कम’ आणि ‘पा’ सारखे वेगळ्या धाटणीचे चित्रपट देणारे आर. बाल्की ‘पॅडमॅन’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करतायत. अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना ही या चित्रपटाची निर्माती आहे. अरुणाचलम यांना शोधण्यापासून चित्रपटासाठी तयार करण्यापर्यंतची महत्त्वाची जबाबदारी तिने पार पाडली आहे. अरुणाचलम मुरुगनंथम् यांच्या अचाट धाडसाची खरी कहाणी मनोरंजक असली तरी चित्रपटात कशा प्रकारे दाखवण्यात आली आहे याबाबत मोठी उत्सुकता आहे. सुरुवातीच्या काळात ‘खिलाडी’ नावाच्या पंक्तीतील तद्दन व्यावसायिक सिनेमांमुळे प्रसिद्धीस आलेल्या अक्षय कुमारने गेल्या काही वर्षांत आशयघन चित्रपटांमुळे प्रेक्षकांची चांगलीच वाहवा मिळवली आहे. अरुणाचलम यांची कहाणी एखाद्या ‘खिलाडी’पेक्षा कमी नाही. त्यामुळेच त्यांचं काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणं गरजेचं आहे. बॉलीवडूचा ‘खिलाडी’ त्यासाठी पुढे सरसावला हे विशेष. त्यामुळे ‘पॅडमॅन’ प्रेक्षकांना आवडला तर सॅनेटरी नॅपकिनविषयी जनजागृती करून सामाजिक क्रांती घडवणारे दोघेही (अक्षय कुमार आणि अरुणाचलम मुरुगनंथम्) आजवरचे सर्वात मोठे ‘खिलाडी’ ठरतील यात शंका नाही.

viva@expressindia.com