नोटबंदीमुळे गेल्या आठवडय़ात फिरतीवर असणाऱ्यांना चांगला फटका बसला.

अनपेक्षितपणे भंबेरी उडलेल्या काही प्रवासी तरुणाईच्या कथा त्यांच्याच शब्दांत..

प्रवास माणसाला खूप काही शिकवतो, हे फार पूर्वीपासून कुणी सांगून गेलंय. गेल्या आठवडय़ात प्रवास करणाऱ्या बहुतेक सगळ्या भटक्यांना एक धडा नक्की मिळाला.. काटकसरीचा. आपल्या पंतप्रधानांनी काहीशी योजना डोक्यात ठेवून पाचशे आणि हजाराच्या नोटा अचानक रद्दबातल ठरवल्या आणि ठिकठिकाणी फिरायला गेलेले लोक थोडे अडचणीत सापडले. सोबत घेतलेले बरेचसे रोख पैसे हे आता केवळ कागदाचे तुकडे आहेत हे लक्षात आल्यावर प्रत्येकाने आपापल्या परीने त्यावर मार्ग काढायला सुरुवात केली. हातात केवळ शंभरच्या काही नोटा असताना आणि एटीएम बंद असताना त्या नोटांवर भागवत यांनी ट्रिप पूर्ण केली. मात्र प्रत्येकाला ठिकठिकाणी आलेले अनुभव काही सकारात्मक गोष्टीही शिकवून गेले. तेच अनुभव त्यांनी ‘व्हिवा’सोबत शेअर केले.

ढाब्यावरची पंचाईत

मंगळवारी आम्ही काही मित्र कामानिमित्त सोलापूरला बाइकने गेलो होतो. त्याच दिवशी काम आटोपून रात्री उशिरा पुण्याला परत येण्यासाठी निघालो. येताना पेट्रोल पंपावर पेट्रोल भरलं. तिथे ५०० ची नोट घेतली. पुढे पुण्यानजीक आल्यावर एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलो. जेवणावर ताव मारून झाल्यावर बिल झालं १४५० रुपये. त्या ढाब्यावर कार्ड स्वाइपची सोय नव्हतीच. पटकन एक हजारची आणि एक पाचशेची नोट टेकवली. टीप म्हणून ५० रुपयेही देऊ केले; पण हॉटेलवाल्यानी पैसे घेण्यास नकार दिला. तेव्हा आम्हाला समजलं की, खरंच नोटा बंद झाल्या आहेत. व्हॉट्सअ‍ॅपवर येणारे मेसेजेस खरेच आहेत हे तेव्हा उमगलं. मग काय.. खिशातले, बॅगेच्या कानाकोपऱ्यातले सगळे सुट्टे पैसे जुळवूनसुद्धा चारशे रुपये कमीच होते. सरतेशेवटी एका जवळच्या मित्राला पैसे घेऊन बोलावलं तेव्हा बिल चुकतं झालं.

  • अक्षय गायकवाड, पुणे

 

जयपूरमध्ये फक्त पकोडय़ावर राहिले

मी ८ नोव्हेंबरला संध्याकाळी जयपूरला जायला निघाले. माझ्यासोबत असलेल्या पैशांमध्ये फक्त एक हजाराच्याच नोटा होत्या. दोनेकशे रुपये तेवढे सुट्टे होते. त्याच रात्री मी ट्रेनमध्ये असताना मला या ५०० आणि १००० च्या नोटांवरील बंदीबद्दल कळलं. त्या क्षणी मी माझं पाकीट तपासलं तर माझ्याकडे फक्त १६० रुपये सुट्टे शिल्लक होते. मी ९ तारखेला सकाळी जयपूरला पोहोचले. एक अनोळखी शहर जिथे आपल्या ओळखीचं कुणीच नाही आणि जिथे पैशांचे व्यवहार बंद झाले आहेत, अशा परिस्थितीत मी काहीच करू शकत नव्हते. एटीएम बंदच होती. मला काहीच व्यवहार करता न आल्याने मी दिवसभर हॉटेल रूममध्ये फक्त बसून राहिले. बाहेर पडावं तर सुट्टे पैसे नाहीत. मला सुट्टे पैसे वाचवण्यासाठी जयपूरमध्ये फक्त पकोडे खाऊन राहावं लागलं. रिक्षावाल्यांकडेही सुट्टे नसल्याने ते पैसे घेत नव्हते, त्यामुळे कुठे जावं म्हटलं तरी शक्य नव्हतं. एका अनोळखी शहरात लांबचं अंतर चालत जावं लागलं. शेवटी दुसऱ्या दिवशी सकाळी मला जाऊन ए.टी.एम.मध्ये पैसे मिळाले आणि मग माझ्या पुढील प्रवासाला सुरुवात झाली.

  • देवश्री गोलांबरे, मुंबई

 

उस्मानाबादमध्ये मिशन .टी.एम.

मी मुंबई विद्यापीठाच्या पुरातत्त्वशास्त्र विभागाची विद्यार्थिनी असून नुकतेच आम्ही शैक्षणिक सहलीला उस्मानाबादला गेलो होतो. नेमकं तेव्हाच पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्दबातल ठरवल्याचं कानावर आलं आणि काही वेळातच ते खरं असल्याची खात्रीही झाली. मग पुरातत्त्व दस्तावेज शोधण्याअगोदर मिशन ए.टी.एम. सुरू झालं. पैसे असलेलं ए.टी.एम. शोधणं अनिवार्य होतं. आम्ही ए.टी.एम.मध्ये पोचेपर्यंत त्यातले होते नव्हते तेवढे पैसेही संपलेले होते. त्यामुळे तिथूनही काही मिळणार नव्हतं. मात्र आतापर्यंत किती लोक तिथे येऊन गेले आणि किती प्रमाणात लोक पॅनिक झाले होते हे तिथे पाहिलेल्या दृश्यावरून लक्षात आलं. तिथे पैसे काढल्याच्या पावत्यांचा अक्षरश: खच पडलेला होता. ते दृश्य कॅमेऱ्यात कैद केल्याशिवाय आम्हाला राहावलं नाही. ते पाहून नक्कीच वाटलं की, पैसे येतील, पण सुसंस्कृतपणा कधी येईल तेव्हा खरं!

  • रिद्धी जोशी, मुंबई विद्यापीठ

 

चिक्कीनं शिकवलं

सुट्टीमध्ये लोणावळ्याला जाताना वाटेत फूड कोर्टला थांबले होते. जायच्या आदल्याच दिवशी पाचशे आणि हजारच्या नोटा बंद झाल्या होत्या. फूड कोर्टला चिक्की घेतली, पण दहा रुपये कमी पडत होते आणि पाचशेची नोट खिशात असून नसल्यासारखी होती. चिक्कीचे साठ रुपये झाले आणि माझ्याकडे पन्नासच सुटे होते. विक्रेत्याकडेही सुट्टे नव्हते. त्यावर त्याने मला सांगितलं की, उरलेले पैसे पुढच्या वेळी द्या. आता त्याचे दहा रुपये द्यायला पुन्हा कोण तिथे जाईल, हे मी त्याला म्हटल्यावर मला म्हणाला, ‘आताच्या वक्ताला एकमेकांना मदत नाही करायची तर कधी करायची! चालायला शिकायचं म्हणजे आधी पडावंच लागतं.’ त्या विक्रेत्याला जे देशाबद्दल कळलं ते मला अजून न कळल्याबद्दल मला खंत वाटली.

  • प्रभा साटम, साठय़े महाविद्यालय

शब्दांकन : वेदवती चिपळूणकर, सौरभ नाईक, तेजश्री गायकवाड