ठाण्यातील एम. एच. ज्युनियर कॉलेज, जोशी बेडेकर कॉलेज, एन.के.टी. कॉलेज या शहरातील प्रमुख कॉलेजच्या आजूबाजूला फ्रँकी, चायनीज भेळ, मंचुरियनचे स्टॉल, तृष्णाशांती करणारे कॅफे, ज्यूस सेंटर लोकप्रिय आहेतच. तरीही या तिन्ही व इतर छोटय़ा मोठय़ा कॉलेजमधील खवय्यांची काही कॉमन खाबूगिरीची ठिकाणे ठाणे स्टेशन परिसरात व गोखले रस्त्यावर लोकप्रिय आहेत. त्याविषयी थोडक्यात..

कुंजविहार वडापाव

सत्तर वर्षांपासून ठाण्यातील लोकप्रिय वडापावच्या यादीत कुंजविहारचा वडा हा प्रथम स्थानी आहे. वडय़ात जपलेली पारंपरिकता, त्याची चव आणि दर्जा टिकवण्यासाठी घेतलेली मेहनत या सगळ्यांमुळे ठाण्याचा कुंजविहार वडापाव लोकप्रिय ठरला आहे. जोपर्यंत एखाद्या पदार्थाला एक विशिष्ट दर्जा प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याची चव उत्कृष्ट होत नाही. या वडापावची चव ठाणा कॉलेजच्या व्यतिरिक्त इतर कॉलेजमधील मंडळीही घेतात. ठाणे एसटी बस स्टॅण्ड व ठाणे रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळच कुंजविहार असल्याने येथे असंख्य लोक वडापाव खाण्यासाठी येतात. कुंजविहारचा वडापाव लोकप्रिय होण्यामागचे कारण म्हणजे चवीमध्ये राखलेले सातत्य. दिवसाला जवळजवळ दहा हजार एवढा कुंजविहारच्या वडापावचा खप आहे. शिवाय या वडय़ाचा आकारही मोठा असल्याने पोट आणि मन दोन्ही तृप्त करणारा हा वडापावच इथे मिळणाऱ्या अन्य पदार्थापेक्षा कॉलेजखवय्यांमध्ये जास्त लोकप्रिय आहे.

झणझणीत तडका

ठाण्यातील कॉलेजमंडळींमध्ये मिसळ खायची तर ‘मामलेदारचीच खायची’ असे दबावयुक्त समीकरण तयार झाले आहे. अर्थातच हा दबाव तिथे मिळणाऱ्या मिसळीच्या चवीचा आणि प्रेमाचा आहे. मामलेदार मिसळ ही तरुणाईत भलतीच प्रसिद्ध आहे. या मिसळीसाठी सकाळी अक्षरश: रांगा लागतात, ही मिसळ प्रचंड झणझणीत असते. डोळ्यातून-नाकातून येणारे पाणी सावरत सावरत मिसळ चवीचवीने खाल्ली जाते. मामा अजिबात तिखट नको हं, मामा कमी तिखट हं, मामा होऊ न जाऊ  दे झणझणीत..अशी तंबी कॉलेज तरुण मिसळ सव्‍‌र्ह करणाऱ्या मामांना देताना नेहमी दिसतात. लाल तरीत चार-पाच वाटाण्याचे दाणे, भावनगरी शेव, कांदा व लिंबूने युक्त असलेली ही मिसळ जिभेवर काही काळ ‘तिखट’ राज्य करते.

वडापाव नव्हे वडीपाव

प्रत्येक नाक्यावर मिळणाऱ्या वडापावची चव निराळी असते. चवींच्या बाबतीत बरीच विविधता असलेल्या ठाण्यात बटाटावडी हा आगळावेगळा पदार्थ कॉलेज तरुणाईमध्ये लोकप्रिय झाला आहे. गोखले रोडवरील मल्हार सिनेमागृहाजवळील व्होडाफोन गॅलरीला लागूनच असलेल्या ‘पृथ फास्ट फूड कॉर्नर’मध्ये ही लज्जतदार डिश चाखायला मिळते. या बटाटावडीचे एकूण तीन प्रकार आहेत. साधी वडीपाव, चीज वडीपाव आणि मायोचीज वडीपाव. त्यातील मायोचीज वडीपाव तरुणाईत सर्वाधिक लोकप्रिय असल्याचे मालक पराग मालुसरे सांगतात. या वडीपावची चर्चा केवळ कॉलेज विश्वातच नाही तर कॉर्पोरेट जगातही होत असल्याचे त्यांनी सांगितले. गोखले रोडवर सर्वाधिक कोचिंग क्लासेसची रेलचेल असल्याने विद्यार्थ्यांना क्लासमधून ब्रेक मिळाला की पेटपूजा करण्यासाठी ते इथे गर्दी करतात.

पिवळ्या चटणीची खासियत

मो. ह. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या अगदी समोर असलेलं ‘गजानन वडापाव सेंटर’. इथे वडापावासोबत सुक्या खोबऱ्याची लाल चटणी किंवा ओल्या खोबऱ्याची पांढरी चटणी मिळत नाही. तर बेसनापासून तयार केलेली एक आगळीवेगळी पिवळी चटणी मिळते. ही चटणीच गजानन वडापावची शान आहे. ज्याप्रमाणे इडलीबरोबर चटणी हवी त्याचप्रमाणे गजाननच्या वडापावासोबत त्याची स्पेशल पिवळी चटणी हवीच. ठाण्यातील वडापाव संस्कृतीमध्ये गजानन वडापावचा नंबर केवळ त्याच्या पिवळ्या बेसनाच्या चटणीमुळे दुसरा लागतो. समोरचे एम. एच. कॉलेज सुरू होण्याच्या आधी व कॉलेज सुटल्यावर जवळजवळ अर्धा तास तरी या दुकानात पाय ठेवायला जागा नसते. गर्दी टाळून वडापाव पार्सल घेणारी खवय्येमंडळी चटणी टाकली ना, असा प्रश्न न चुकता विचारताना आढळतातच.

वाफाळवलेला मोमो

महाराष्ट्रीय गोड खाद्यपदार्थामधील  वैशिष्टय़पूर्ण असलेला मोदकाचा पूर्वाचलातील मानलेला भाऊ म्हणजे ‘मोमोज’ अशी मोमोजची गमतीदार व्याख्या कॉलेज तरुणाईने तयार केली आहे. ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील दादा पाटील मार्गावरील ‘अ‍ॅप्पेटाइट’मध्ये मिळणाऱ्या चटकदार ‘मोमोज’मुळे ही व्याख्या तयार झाली आहे. हे मोमोज गट्टम करण्यासाठी तरुणाईची रांग लागलेली दिसते. वडापावचे प्रस्थ असलेल्या ठाण्याच्या फास्ट फूड संस्कृतीत मोमोजचे हे दुकान अल्पावधीत भलतेच प्रसिद्ध झाले आहे. मोदकाच्या पिठात चिकन किंवा मटणाचे तुकडे भरून ते तळून अथवा उकडून शेजवान चटणीसोबत सव्‍‌र्ह केले जातात. खास शाकाहारी खवय्यांनाही पनीर, चीज तसेच भाज्यांनी युक्त असलेले मोमोज उपलब्ध आहेत. एखाद्या पाश्चात्त्य कलाकृतीवर आधारित पण अस्सल भारतीय बाजाची कलाकृती साकारावी त्याप्रमाणे ‘अ‍ॅप्पेटाइट’चे मोमोज हा एक खास देशी पदार्थ आहे.

लिंबू पाणी आणि वडापाव 

गोखले रस्त्यावरील दुर्गा स्नॅक्स सेंटर हे कॉलेज तरुणाईसाठी एक रिफ्रेशमेंट हाऊसच. भल्या सकाळी सुरू होणारे हे सेंटर रात्री उशिरापर्यंत खवय्यांच्या जिव्हेची तृप्ती करीत असते. येथे इडली, मिसळ, उसळ, मेदूवडा सांबार, वडापाव, समोसा असे निवडक सात-आठ पदार्थच मिळतात. पण सर्व पदार्थाची चव ही एकापेक्षा एक सरस असते. येथे काचेच्या मोठय़ा बाटलीत मिळणारे लिंबू सरबत हे तरुणाईत विशेष प्रसिद्ध आहे. अंगाचा दाह करणारा उन्हाळा असो अथवा हुडहुडी भरणारी थंडी असो इथल्या लिंबू सरबताचा कोणत्याही ऋतूत खप होतोच होतो. इथला वडापाव व समोसा हा पळसाच्या पानात पार्सल केला जातो. गेल्या ३५ वर्षांपासून आपली जुनी पारंपरिक चव जपण्यात शेट्टी कुटुंबीय यशस्वी झालेले आहे. ठाण्यातील वडापावच्या संस्कृतीमध्ये दुर्गाच्या वडापावचा नंबर तिसरा लागतो.