News Flash

‘ताण’लेल्या गोष्टी : नाही बुवा जमत

करिअरचा निर्णय म्हणजे लग्नासारखा असतो काहीसा.

‘ताण’लेल्या गोष्टी : नाही बुवा जमत

परीक्षा, अभ्यास, रिलेशनशिप, मैत्री, करिअर, लुक्स.. तरुणाईच्या आयुष्यात यातलं काहीही हल्ली तणाव निर्माण करतं. असुरक्षितता, घाई, धावपळ, स्पर्धा आणि तणाव.. यातून सुटका नाही का? हे सगळं नसेल तर आयुष्यात मजा काय? यातली खुमारी तर राहिली पाहिजे पण तोलही जायला नको. करता येईल असंस्ट्रेस मॅनेजमेंटच्या टिप्स देणाऱ्या गोष्टी

‘बारावीनंतर काय करणार?’, यासारखा त्रासदायक प्रश्न नाही दुसरा.. नाही का? आपल्याला स्वत:ला तरी तेव्हा कुठे नक्की माहिती असतं? आणि जरी काही तरी एक भन्नाट कल्पना मनात असली तरी ती पूर्ण करताना स्पर्धा, लक, दर वर्षी बदलणारे नियम असे प्रचंड अडथळे असतात. आईबाबांचं मत अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. त्यांचे लहानपणापासूनचे अनुभव, इच्छा, यशस्वी होण्याच्या कल्पना आणि समाजाच्या अपेक्षा या सगळय़ाची सरमिसळ होऊन त्यापासून त्यांचा ‘सल्ला’ हा पदार्थ तयार झालेला असतो. मुलं आपला डिसिजन ठरवण्यासाठी त्यात आणखी मित्रांचा चॉइस, इंटरनेटवरची मोलाची माहिती यांची भर घालतात. त्यातून एक नवीनच पाककृती त्यांच्या डोक्यात तयार होते. एका गोष्टीवर मात्र सगळय़ांचं एकमत असतं. ते म्हणजे, ज्या अभ्यासक्रमातून ताबडतोब नोकरी आणि पगाराचं भरपूर मोठं पॅकेज मिळण्याची शक्यता आहे अशी ब्रँच निवडणं मस्ट असतं.

जय अगदी अशाच सगळय़ा प्रोसेसमधून गेला होता. आता तो लॉच्या सेकंड इयरला होता. पण गेल्या काही दिवसांपासून तो बराच अस्वस्थ होता. लक्षच लागत नव्हतं त्याचं अभ्यासात. आपण हे काय शिकतोय, का शिकतोय?, असे विचार सतत त्याच्या मनात येत होते. बदलून टाकावी ही ब्रँच, दुसरं काही तरी करावं असं वाटायला लागलं होतं. पण दुसरं काय करावं? कधी वाटायचं की आपल्याला कुकिंग आवडतं. ‘मास्टरशेफ’ आपला सगळय़ात आवडता शो. मग के टरिंग करून एखादं हॉटेल काढावं का? पण त्यासाठी लागणारी भरक्कम फीज आणि नंतर लागणारं भांडवल? ते कोण देणार? की इव्हेंट मॅनेजमेंट? आपण लोकांशी चांगलं कनेक्ट होतो. नेटवर्कही चांगलं आहे आपलं. पण आयुष्यभर लहान मुलांचे वाढदिवस ऑर्गनाइज करणं, अतिश्रीमंत लोकांची अवास्तव उधळपट्टी बघणं हे असलं चालणार आहे का आपल्याला? की सरळ आर्ट्सला जाऊन यूपीएससी, एमपीएससीसाठी प्रयत्न करावेत? एका पर्यायावरून दुसऱ्या पर्यायावर विचार नुसते भरकटत होते.

सगळय़ात मोठा प्रश्न होता आई-बाबांना राजी करण्याचा. त्यांचा विरोध कशाकशाला असेल याची जयला कल्पना होती. ‘अरे, म्हणजे दोन र्वष वाया घालवायची? मग आत्तापर्यंत शिकलेलं ज्ञान, भरलेली फी, त्याचं काय? लोकांना काय सांगायचं आणि अशी धरसोड चांगली का? बरं, तू दुसरं जे काही करशील ते तरी धड करशील कशावरून,’ अशी प्रश्नांची सरबत्ती झाली असती. आणि गोची अशी होती की यातलं एकही वाक्य चुकीचं नाहीये हे जयला कळत होतं. ‘पण नाही जमत मला लॉ.. मग मी तरी काय करू? तुम्हीच सांगा’, त्यानं मला विचारलं.

‘तुला एक सांगू जय? तू काय करायचं हे सर्वस्वी तुला ठरवायचंय. मी तो निर्णय तुझ्यासाठी घेणार नाहीये.’ त्यावर असं कसं म्हणता डॉक्टर तुम्ही? मग काय उपयोग तुमच्याकडे येण्याचा? आई-बाबांनी मुद्दाम त्यासाठीच तर पाठवलं मला इथे, जयचा प्रश्न होता. ‘ते नंतर बघू. मला एक सांग, तू लॉ करण्याचा निर्णय का घेतलास,’ असं त्याला विचारलं तेव्हा ‘अं, मला लहानपणापासून सिव्हिक्स खूप आवडायचं. खरं तर इतरांचा तो नावडता विषय. पण ते कायदे वगैरे माझ्या चांगले लक्षात राहायचे. बारावीनंतर माझ्या बाबांच्या एका वकील मित्राकडे काही दिवस जायचो मी. ते सगळं वातावरण मला फार इंटरेस्टिंग वाटलं. आणि काही तरी ठरवायला हवं होतंच, मग मी ही ब्रँच निवडली,’ असं जयचं म्हणणं होतं.

तसा विचारपूर्वक घेतला होता डिसिजन जयनं. मग कुठे माशी शिंकली? बरं असं जयच्या एकटय़ाच्याच बाबतीत होतं असं नाही. किती तरी मुलं-मुली माझ्याकडे येतात. त्यांच्या सेकंड-थर्ड इयरमध्ये. आपला निर्णय चुकला आणि आता तो बदलायचाय म्हणून. त्यांचे आई-बाबा रागावलेले असतात, गोंधळलेले असतात. आपण उगीचच आपले निर्णय मुलांवर लादायला नकोत, असं त्यांना जरी वाटत असलं तरी ही अनिश्चितता कुठंवर ताणायची हे त्यांनाही समजेनासं होतं.

करिअरचा निर्णय म्हणजे लग्नासारखा असतो काहीसा. लग्न करायचं जेव्हा पक्कं ठरतं तेव्हा खात्री असते. आपण तो खूप विचारपूर्वक घेतलाय आणि तो परफेक्ट आहे. मग काही दिवस जातात. एखाद्या चुकार क्षणी मनात पहिली शंका डोकावते की आपला डिसिजन चुकला तर नाहीये? त्यानंतर मात्र पटापटा एखाद्या वणव्यासारखी ती शंका पसरत जाते, नव्हे त्याची खात्रीच वाटायला लागते. जोडीदाराची प्रत्येक गोष्ट चुकीची वाटायला लागते, खटकते. यातून केव्हा एकदा बाहेर पडतोय असं वाटायला लागतं. असं वाटतं की यातून सुटका हा एकच उपाय आता शिल्लक राहिलाय. मग लग्नानंतर कधी सहा महिन्यांत, कधी दोन वर्षांत किंवा काही वेळा अगदी लग्नाला पंचवीस र्वष झाल्यावरही डिव्होर्स घेतला जातो.

करिअरच्या बाबतही असंच होतं का? एकदा मनात शंका आली की काहीच चांगलं दिसेनासं होतं का त्यातलं? की खरोखर साक्षात्कार होतो आपल्या आवडीनिवडीचा? मार्ग बदलला की ‘ऑल वेल’ होणार ही खात्री कशाच्या जोरावर बाळगायची? पण हे तसंच मनाविरुद्ध ओढत नेलं तर त्रासदायक नाही का होणार? काय निर्णय घ्यायला हवा जयने? त्याच्या आई-बाबांची भूमिका काय असायला हवी?  हं.. प्रश्न अवघड आहेत. थोडा विचार करायला लागेल सगळय़ांनाच. आणि एवढं करून उत्तर सापडेल का?, बघू या पुढच्या आठवडय़ात.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2017 3:02 am

Web Title: stress management in youngster
Next Stories
1 खाऊगल्ली दिल्ली : ‘खानेवालों की’ दिल्ली..
2 सही पकडे हैं !
3 मेरा नाम चोकर
Just Now!
X