परीक्षा, अभ्यास, रिलेशनशिप, मैत्री, करिअर, लुक्स.. तरुणाईच्या आयुष्यात यातलं काहीही हल्ली तणाव निर्माण करतं. असुरक्षितता, घाई, धावपळ, स्पर्धा आणि तणाव.. यातून सुटका नाही का? हे सगळं नसेल तर आयुष्यात मजा काय? यातली खुमारी तर राहिली पाहिजे, पण तोलही जायला नको. करता येईल असं? स्ट्रेस मॅनेजमेंटच्या टिप्स देणाऱ्या गोष्टी दर आठवडय़ाला..

माझ्यासमोर बसलेलं ते जोडपं अगदी त्रस्त होतं. त्यांचं नवीनच लग्न झालेलं होतं, पण ते दिसत होते मध्यमवयीन. शिवाय बोलताना ‘याचा मुलगा’, ‘हिची मुलगी’ असं बोलत होते. मी जरा गोंधळलेच. ‘एक मिनिट, मला जरा पहिल्यापासून नीट सांगाल का सगळं?’ मी म्हटलं. त्यातून मला कळलं ते असं..  माधवी आणि गौरवचं लग्न होऊन सहा महिने झाले होते. दोघांचंही हे दुसरं लग्न. माधवीला नुकतीच कॉलेजमध्ये जायला लागलेली मुलगी होती आणि गौरवला साधारण त्याच वयाचा मुलगा होता. गौरवची नोकरी चांगल्या पगाराची होती. माधवीही जॉब करायची, पण लग्नानंतर या गावात शिफ्ट व्हायला लागल्यामुळे तिनं ती सोडली होती. लग्न करण्याआधी खूप विचार केला होता दोघांनी. बऱ्याचदा एकमेकांशी बोलून, आपलं छान जमतं याची खात्री झाल्यावरच त्यांनी पुढचं पाऊल उचललं होतं. आपापल्या मुलांना निर्णयात सहभागी करून घेतलं होतं. मुलांनी फार उत्साह दाखवला नाही पण विरोधही केला नाही. लग्न झाल्यावरचे सुरुवातीचे काही दिवस एकमेकांना जोखण्यात गेले. सगळेच एकमेकांशी जपून वागत होते.

‘मग आता काय झालंय? तुमचं पटत नाहीये का?’, या वयात लग्न केल्यावर काही वेळा फार तडजोड करणं जमत नाही याची कल्पना असल्यामुळे मी विचारलं. ‘नाही हो, आम्ही एकदम कम्फर्टेबल आहोत. पण ही मुलं मात्र आम्हाला सळो की पळो करून सोडतायेत. तरी चार चार वेळा विचारून घेतलं होतं आधी. त्यांची सोय व्हावी म्हणूनच हा निर्णय घेतला ना! पण कितीही केलं तरी त्यांना काही जाण नाही त्याची.’

अशी कुटुंबं पाहणं आता आश्चर्याची गोष्ट राहिलेली नाही. बदलत्या काळाबरोबर लग्नांची आणि मुलांची वेगवेगळी कॉम्बिनेशन्स दिसायला लागलीयेत. लग्नाच्या नेहमीच्या अपेक्षांमध्ये मुलं, करिअर, प्रॉपर्टी अशा नवीन गोष्टींची भर पडतेय. या लग्नांनंतर प्रत्यक्षात एकत्र राहायची वेळ येते, तेव्हा दोन्ही कुटुंबांना त्यांचे पूर्वीच्या घरामधले अनुभव आठवायला लागतात. एकमेकांच्या कितीतरी लहानसहान गोष्टी खटकायला लागतात. मुख्यत: मुलं जेव्हा मोठी असतात, तेव्हा हे जरा जास्तच जाणवतं. लहानपणी नवीन नाती जोडणं जितकं सोपं जातं, तितकं आता ते अवघड वाटतं. त्यामुळे मुलांसाठीही हे नवीन नातं म्हणजे एक आव्हान असतं. त्यांच्या मनात आईबाबांबद्दल तऱ्हेतऱ्हेचे विचार यायला लागतात.

माझे वडील बदललेत. त्यांची बोलण्याची पद्धत, शिस्त, दंगामस्ती करणं, सगळंच बदललंय. त्या नवीन लोकांवर ते जास्त प्रेम करायला लागलेत.

काय गरज होती हिला लग्नबिग्न करायची? बाबांना ऑलरेडी विसरली की काय ही?..

माझ्या आईला आजकाल वेळच नसतो माझ्यासाठी. आधी मी यायच्या वेळी काहीतरी छान खायला करून माझी वाट बघत असायची, आता मात्र सारखी कामात असते.

कुठल्या तरी अनोळखी व्यक्तीबरोबर घरात कसं राहायचं? मला नाही सवय अशी.

माझ्या आईच्या जागी दुसऱ्या कुणाला तरी बघायला नाही आवडत मला. त्यापेक्षा आई नसलेली चालेल.

त्यांनी काही शिकवलेलं मला आवडत नाही. मी ठरवीन मला काय करायचं ते. तुम्ही तुमच्या मुलाचं बघा.

म्हणजे आता माझे खरे आई-बाबा कधीच एकत्र येणार नाहीत. आत्तापर्यंत मला जरा तरी आशा होती.

माझ्या वडिलांना काय वाटेल? मला नाही वाटत हे नवीन वडील मला आवडतील असं..

मुलांचे असे बहुतेक मुद्दे नकारात्मक असतात. तुमच्या वयाची मुलं काहीशी स्वतंत्र झालेली असतात. पण अजूनही भावभावना, नातेसंबंध, मैत्री, लैंगिकता अशा बाबतीतला त्यांचा स्वत:चा गोंधळ पूर्णपणे मिटलेला नसतो. नव्यानं ठाम मतं बनत असतात आणि ती एकदम टोकाची, तीव्र असतात. आपल्या आधीच्या आई किंवा वडिलांबद्दलची त्यांची निष्ठा, प्रेम त्यांना कुठलीही नवी नाती स्वीकारू देत नाही. शिवाय या वयात तुमचं सगळं लक्ष एकवटलेलं असतं तुमच्या स्वत:कडे. त्यात इतरांविषयीच्या विचारांना फार जागा नसते. त्यामुळे ‘या सगळ्या परिस्थितीचा मला त्रास होतोय, माझ्या हक्कांवर गदा येतेय’ एवढंच वाटत राहतं. मुलं धुमसत राहतात.

एक अनोळखी, कोणीतरी व्यक्ती आपली खोली हक्कानं शेअर करतेय, आपल्या घरात राजरोसपणे वावरतेय, आपले नेहमीचे नियम बदलून काहीतरी वेगळेच नियम पाळायला लावतेय, आपल्या वडिलांवर हक्क गाजवतेय हेही तसं जडच जातं स्वीकारायला. मग त्या बाहेरून घरात येणाऱ्या तरुण मुलाचा-मुलीला किती विचित्र, उपऱ्यासारखं वाटत असेल! पण जसजशी आपण पाश्चिमात्य जीवनशैली आपलीशी करतोय, तसतशी या नवीन नात्यांना आणि त्याबरोबर येणाऱ्या गुंतागुंतींना  सामोरं जायची सवय करण्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. ती नाती कितीही स्ट्रेंज वाटली तरी!

डॉ. वैशाली देशमुख viva@expressindia.com