परीक्षा, अभ्यास, रिलेशनशिप, मैत्री, करिअर, लुक्स.. तरुणाईच्या आयुष्यात यातलं काहीही हल्ली तणाव निर्माण करतं. असुरक्षितता, घाई, धावपळ, स्पर्धा आणि तणाव.. यातून सुटका नाही का? हे सगळं नसेल तर आयुष्यात मजा काय? यातली खुमारी तर राहिली पाहिजे पण तोलही जायला नको. करता येईल असंस्ट्रेस मॅनेजमेंटच्या टिप्स देणाऱ्या गोष्टी

घराकडे जाणाऱ्या रस्त्यावरची धूळभरली हवा मेघनानं खोलवर श्वास घेऊन छातीत भरून घेतली. रस्ता क्रॉस करताना तिनं इकडे तिकडे पाहिलं आणि तिला हसूच आलं. इथे कुठे होत्या भरधाव जाणाऱ्या गाडय़ा? बिनधास्त हवं तिथे वळा. शेजारच्या काकू वाटेत भेटल्या, त्यांनी आवर्जून खुशाली विचारली. आजूबाजूच्या शांततेत मधूनच येणारे पक्ष्यांचे आवाज, कुणीतरी दूरवर मारलेली हाक, छोटय़ा ओढय़ाचा खळखळ आवाज.. ती शांतता, तो निवांतपणा मनात भरून ती घराकडे वळली.

कॉलेजला जायला लागल्यानंतरची तिची ही पहिली ट्रिप घराकडे. मेघना लहानपणापासून या छोटय़ा गावात शिकलेली. आता पुढच्या शिक्षणासाठी मोठय़ा शहरात आलेली. आत्तापर्यंत बाहेरच्या जगाशी तिचा काहीच संपर्क आला नव्हता असं काही नव्हतं. सुट्टय़ांमधे कितीतरी वेळा ती पुण्या-मुंबईला जाऊन आली होती. तिला बऱ्यापैकी कॉन्फिडन्स होता की, शहरात राहाणं काही कठीण नाही. आपल्याला लिहिता-वाचता येतं, तोंड उघडून बोलायची लाज वाटत नाही, आपण हुशार आहोत, मग काय कठीण? कॉलेजमधे अ‍ॅडमिशन घेताना तिनं विचार फक्त अभ्यासक्रमाचा केला होता आणि तिला काळजी फक्त परीक्षेतल्या परफॉर्मन्सविषयी वाटत होती.

शहरात पहिल्यांदा येणं म्हणजे खूप सारी एक्साइटमेंट आणि त्याचबरोबर धाकधूक. तिच्या आत्मविश्वासाला तडा गेला तो शहरात पोचल्या पोचल्याच. रिक्षावाल्यापासून सगळे आपल्याकडे रोखून पाहताहेत असं वाटायला लागलं तिला आणि हे नंतरही वाटतच राहिलं, कॉलेजमधे, होस्टेलवर.. तिचं बोलणं, कपडे, केसांची स्टाईल, घरून येणारा डबा.. सगळ्याच गोष्टींवर सतत जेव्हा कॉमेंट्स व्हायला लागल्या तेव्हा ती खट्टू झाली. वर्गात उठून उत्तरं देणं, शिक्षकांना शंका विचारणं हे सगळं करताना कॉन्शस व्हायला लागली. गावात सगळ्यांना तिचं केवढं कौतुक की, कधी कुणी नावं ठेवायची सवयच नव्हती तिला.

मेघना एकटी नाही या गोष्टींना तोंड देणारी. हायर एज्युकेशनसाठी, कोचिंग क्लासेससाठी, स्पर्धापरीक्षांसाठी कितीतरी मुलं शहरात येतात. येताना डोळ्यांत असतात भावी आयुष्याची सुखी, श्रीमंत स्वप्नं. भरपूर अभ्यास करायचा, शिकायचं आणि दाखवून द्यायची जगाला आपली अचिव्हमेंट. सुरुवातीचा काही काळ नवखं गाव, अनोळखी जागा, भरधाव जग यांची सवय करून घेण्यात जातो. मग लक्षात येतं आपलं वेगळेपण, कधी आपणहून, तर कधी कुणी मुद्दाम दाखवून दिल्यावर. आपण बोललो की समोरचा चिडवतो किंवा हसू दाबतो हे लक्षात यायला लागतं. शहरात राहायचं म्हणून मुद्दामहून खरेदी केलेले नवीन कपडे आऊट ऑफ प्लेस वाटू लागतात. होस्टेलवरही हळूहळू शहरातले आणि गावाकडचे असे ग्रुप्स बनतात.

गावच्या नैसर्गिक वातावरणातून आल्यावर शहरातलं वातावरण काहीसं कृत्रिम, यांत्रिक वाटतं. समोरचा माणूस साधं, सरळ, मनापासून बोलतोय की त्यात काहीतरी अंदर की बात आहे हे कळतच नाही. सभोवताली हजारो माणसं असून एकटं असल्याचा फील येतो. बरं इतकं असूनही पर्सनल स्पेस मिळतच नाही. माणसांच्या गर्दीला सतत तोंड द्यावं लागतं. ही भेटणारी माणसंही अस्सल नमुने असतात. सगळी खिचडी, सरमिसळ. त्यांचं खाणंपिणं, राहाणं, वागणं, सगळाच एक कल्चर शॉक असतो. त्याचबरोबर अभ्यासावरचं लक्ष उडवणारी काही भूतं आजूबाजूला असतात. वाईट सवयी, व्यसनं ताबा घ्यायला तयार असतात. कधी त्या नावीन्यात, कधी मित्रमैत्रिणींच्या आग्रहात वहावत जायला होतं. पैशाला तर कुठे पाय फुटतात ते कळतच नाही.

लोनलीनेसवर कधी उगीचच एखाद्या रिलेशनशिपचा उतारा शोधला जातो. घरच्यांचं बंधन नसतं, नवं थ्रिल हवंहवंसं वाटतं. त्यातून काहीवेळा फिजिकल रिलेशनशिपपर्यंत जातं आणि त्यातून अनेक गुंतागुंती उपटतात. पॉझिटिव्ह अ‍ॅटिटय़ूड आणि अ‍ॅडजस्टमेंट करायची तयारी असेल तर हे नवीन ट्रान्झिशन तसं अवघड जायला नको. स्वत:कडे एका नव्या दृष्टीनं पाहण्याची, स्वत:तले हिडन गुण शोधण्याची संधी म्हणून याकडे बघता येईल का? त्यासाठी आपल्या कोशातून, कम्फर्ट झोनमधून बाहेर यायचा प्रयत्न करायला हवा. मनाची चौकट मोठी करून नवीन गोष्टी स्वीकारण्याची तयारी ठेवायला हवी. आपल्यात काहीतरी कमी आहे की काय हा न्यूनगंड हद्दपार करावा लागेल. सुरुवातीला उपऱ्यासारखं वागवलं जाण्याचं फीलिंग येत असलं तरी अनेक नावीन्यपूर्ण अनुभव, अनेक थ्रिल्स, कॉम्पेन्सेशन्स असतात इथे. कधी न चाखलेले एक्झॉटिक, चविष्ट पदार्थ खायला मिळतात. खूप सारे गाण्याचे कार्यक्रम, एक्झिबिशन्स, पाहण्यासारख्या अनेक गोष्टी, वेगवेगळ्या भाषा बोलणारी, कपडे घालणारी मुलं, असंख्य नवीन अनुभव आणि संधी. एक सळसळती दुनिया समोर उघडते. तो वेगही झिंग आणायला लागतो.

काही गोष्टी आपल्याला पटत नसतात. कारण आपल्यासाठी त्या सवयीच्या नसतात. पण कुरकुर करत बसण्यापेक्षा नव्याची नवलाई चाखायची ठरवली तर त्या चक्क एन्जॉय करता येतील. त्याचबरोबर स्वत:ला अनकम्फर्टेबलही करायची गरज नाही. त्यासाठी नकोशा वाटणाऱ्या गोष्टींना सरळ, न लाजता, ठामपणे नाही म्हणायला शिकावं लागेल. पार्टीज, अ‍ॅडिक्शन्स यासारख्या आकर्षणांकडे उघडय़ा डोळ्यांनी बघायला लागेल.

स्वत:ला थोडा वेळ द्यायला लागतो अ‍ॅडजस्ट व्हायला. प्रयत्नही करत राहायला लागतं न कंटाळता, डिस्करेज न होता. पण बघता बघता तुम्ही शहरात, कॉलेजमधे सीनिअर होता, रुळता आणि हे एम्बरॅसिंग दिवस मागे पडतात. मेघनानं ठरवलं, शहराची ओळख व्हावी म्हणून सुट्टीच्या दिवशी बसमधून वेगवेगळ्या एरियात भटकायचं. नव्या ओळखी करून घेण्यासाठी कॉलेजमधल्या एखाद्या अ‍ॅक्टिव्हिटी क्लबला किंवा सोशल सव्‍‌र्हिस करणाऱ्या ग्रुपला जॉईन व्हायचं. नाहीतरी वरवरच्या मैत्रीपेक्षा आपल्याला खरे ओळखणारे दोस्तच बरे. गावच्या भेटीला जाईपर्यंत ती बऱ्यापैकी सेटल झाली.

viva@expressindia.com