23 November 2017

News Flash

‘ताण’लेल्या गोष्टी : गरज सेक्स एज्युकेशनची

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला काय हवंय याविषयी नीट विचार करून ठेवायला हवा.

डॉ. वैशाली देशमुख | Updated: September 1, 2017 4:51 AM

प्रेग्नन्सी, लैंगिक आजार आणि शारीरिक अपाय यापासून सुरक्षित रहाणे म्हणजे सेफ सेक्स.

परीक्षा, अभ्यास, रिलेशनशिप, मैत्री, करिअर, लुक्स.. तरुणाईच्या आयुष्यात यातलं काहीही हल्ली तणाव निर्माण करतं. असुरक्षितता, घाई, धावपळ, स्पर्धा आणि तणाव.. यातून सुटका नाही का? हे सगळं नसेल तर आयुष्यात मजा काय? यातली खुमारी तर राहिली पाहिजे, पण तोलही जायला नको. करता येईल असं? स्ट्रेस मॅनेजमेंटच्या टिप्स देणाऱ्या गोष्टी दर आठवडय़ाला..

मागच्या लेखात आपण शचीचा डायलेमा पाहिला. तपनबरोबर लोणावळ्याला जाऊन आल्यानंतर तिच्या लक्षात आलं कि ती प्रेग्नंट आहे. आणि तपन आता प्रतिसाद देत नाहीये.  शचीनं काय बरं करायला हवं? आणि तपन? त्याचा काय रोल आहे या सगळ्यात? तेव्हा आपण सेफ सेक्सची व्याख्याही पाहिली. प्रेग्नन्सी, लैंगिक आजार आणि शारीरिक अपाय यापासून सुरक्षित रहाणे म्हणजे सेफ सेक्स. आज त्याविषयी बोलूया.

दरवर्षी नवरात्रीनंतर गायनॅकॉलॉजिस्टकडे गर्दी वाढते. कशासाठी माहितेय? अ‍ॅबॉर्शन करून घेण्यासाठी. कारण नवरात्रीत जे दांडियाचे कार्यक्रम होतात त्यात मुलामुलींना एकत्र येण्याची बरीच संधी मिळते. रात्री उशिरापर्यंत हे कार्यक्रम चालतात. त्या सगळ्या वातावरणाची, म्युझिक-डान्सची नशा चढलेली असते. शरीरसंबंध होण्याकरता अगदी आयडीयल परिस्थिती असते. अशी संधी आणखीही काही वेळा मिळते. शाळेच्या, कॉलेजच्या ट्रीपला गेल्यावर, स्लीप ओव्हरच्या वेळी,  हॉस्टेलवर प्रवेश घेतल्यावर, पार्टीज, ड्रग्ज.. अचानक मिळालेलं स्वातंत्र्याचं वारं कानात भरलं की कुठलीही वॉर्निंग कानात शिरत नाही. त्यामुळे सेफ सेक्सबद्दल माहिती घ्यायला हवीच. ही माहिती घेणं म्हणजे काहीही करण्याचं लायसन्स मिळणं असं नव्हे. तुम्ही मुलं उलट त्यामुळे जागरूक होता, जबाबदार होता.

गर्भाशय मुलींमध्ये असतं म्हणून टेन्शन त्यांनाच येतं. कारण काही गुंतागुंत झाली तर ती निस्तरण्याची जबाबदारी प्रामुख्यानं मुलींवरच पडते. पण प्रिकॉशन्स घेण्याची जबाबदारी दोघांनी घ्यायला हवी, नाही का? शिवाय गुंतागुंत ही फक्त शारीरिकच नसते, मानसिकही असते. त्यामुळे प्रत्यक्ष मूल जरी होत नसलं तरी मुलगे त्यात इन्व्हॉल्व्ड नसतात असं नाही.

सेफ सेक्स च्या पद्धती पाहू. गर्भनिरोधक गोळ्या हा प्रेग्नन्सी टाळण्याचा एक उपाय. यात स्त्र्यािंमध्ये  असणारी इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन यासारखी हॉर्मोन्स असतात. त्यांचा परिणाम होऊन स्पम्र्स गर्भाशयात आले तरी फलन होत नाही. हॉर्मोन्सच्या या गोळ्या एकवीस दिवस रोज रात्री नियमानं घ्याव्या लागतात. उरलेले सात दिवस त्यात लोहाच्या गोळ्या असतात. असे तीस दिवस गोळ्या घेऊन थांबायचं. साधारण महिना पूर्ण झाला की पाळी सुरु होते. पाळीच्या पाचव्या दिवसापासून पुढचं पाकीट सुरु करावं लागतं. अर्थातच या गोळ्या मुलींनी घ्यायच्या असतात. त्यातल्या हॉर्मोन्समुळे काही साईड इफेक्ट्स होऊ शकतात. डोकेदुखी, पायावर सूज, मळमळ, उलटय़ा वगैरे. क्वचित काही वेळा रक्ताच्या गुठळ्या होण्यासारखे काही गंभीर परिणाम होतात. दुसरी महत्त्वाची लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे यामुळे फक्त प्रेग्नन्सी टळते, पण लैंगिक आजारांचा धोका तसाच राहतो. त्यामुळे पार्टनर एकच असेल किंवा त्याच्याविषयी खात्री असेल तर ठीक आहे. ज्या मुली कधीतरी एखाद्यच वेळी शारीरिक संबंध ठेवतात, त्यांना इतका धोका पत्करण्याची गरज नसते.

दुसरा उपाय म्हणजे कंडोम्स. हे पुरुष  पार्टनरनं वापरायचे असतात. रबराची ही लांबट पिशवी स्पम्र्स तर अडवतेच पण लैंगिक आजारांनाही रोखते. कंडोम्स तात्पुरते आणि बाहेरून वापरायचे असल्यामुळे त्यांचे काही  साईड इफेक्ट्स नसतात. शिवाय ते ऐनवेळी   वापरले तरी चालतात. गोळ्यांसारखे महिनाभर घ्यायला हवेत असं नाही.

एक नक्की, यातला कुठलाही उपाय मूल न होण्याची शंभर टक्के गॅरंटी देत नाही. शरीरसंबंध न ठेवणं हाच उपाय शंभर टक्के खात्रीचा.

स्त्री  -पुरुष संबंधातला तिसरा धोका म्हणजे शारीरिक इजेचा. तो म्हणजे तोंड दाबून बुक्कय़ांचा मार. ब-याचदा स्वत:हून यात पडल्यामुळे कुणाकडे तक्रारही करता येत नाही.  काही वेळा धमकीच्या दबावाखाली मुली गप्प बसतात. काही वेळा उतावीळपणे यात उडी घेतलेली असते. कुणाला कळलं तर कायमचा धब्बा बसेल, लग्न होणं अवघड होईल असा विचार केला जातो. या सगळ्यापासून स्वत:ला सुरक्षित ठेवणं हा आपला हक्क आहे याची जाणीवच नसते खूपदा.

पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला काय हवंय याविषयी नीट विचार करून ठेवायला हवा. आंधळेपणानं शारीरिक संबंधांना सामोरं जाणं नक्कीच टाळायला हवं. त्याच्याविषयी लाजून विचार न करणं किंवा आपल्याला कशाला या भानगडीत पडायला हवं, आपण कशाला या वाटेला जाणार आहोत असा विचार करून काही माहितीच घेतली नाही, तर कसं कळणार काय करावं ते? कारण खूपदा या घटना अचानक, नकळत आणि तयारीत नसताना घडतात.

मग, व्हायचं ना याविषयी जागं?

डॉ. वैशाली देशमुख viva@expressindia.com

First Published on September 1, 2017 4:51 am

Web Title: stress management tips for viva readers
टॅग Sex Education