परीक्षा, अभ्यास, रिलेशनशिप, मैत्री, करिअर, लुक्स.. तरुणाईच्या आयुष्यात यातलं काहीही हल्ली तणाव निर्माण करतं. असुरक्षितता, घाई, धावपळ, स्पर्धा आणि तणाव.. यातून सुटका नाही का? हे सगळं नसेल तर आयुष्यात मजा काय? यातली खुमारी तर राहिली पाहिजे पण तोलही जायला नको. करता येईल असंस्ट्रेस मॅनेजमेंटच्या टिप्स देणाऱ्या गोष्टी

एकदा एक वस्तीत राहणाऱ्या मायलेकी माझ्याकडे आल्या होत्या. दहावी झालेली ती मुलगी अतिशय हुशार होती. तिला पुढे शिकायची फार इच्छा होती. घरकाम करणाऱ्या तिच्या आईचा मात्र याला सक्त विरोध होता. ‘इथपर्यंत शिकवलं, आता मुलीला वेळेवर उजवून टाकलेलं बरं.’ त्या म्हणाल्या.

‘असं का म्हणता मावशी? पोरगी एवढी हुशार आहे. इतक्यात कशाला लग्न?’ मी मध्यमवर्गीय आग्र्युमेंट केलं.

‘अहो ताई, मी दिवसभर कामाला जाते. आमची वस्ती काही फार चांगली नाही. तरण्याताठय़ा पोरीला एकटं ठेवायचा म्हणजे जिवाला घोर. आपापल्या घरी सुखरूप गेली एकदा म्हणजे मी सुटले.’

लग्नाचं हेही कारण असू शकतं?

मागच्या वेळी आपण शामिकाच्या बाबतीत बोललो. ती गोंधळून गेलीये आजूबाजूच्या लग्नांचं जे चित्र पाहिलंय त्यामुळे. एखादी गोष्ट आवडत नसेल तर ती फेकून द्यायची, तोडून टाकायची अशीच तिला सवय लहानपणापासून. मग का हे लग्न झालेले लोक तडजोड करीत राहतात? टाकायचं तोडून. कित्येकदा तर ती तिच्या आईलाही म्हणते, ‘अगं, का ऐकून घेतेस तू सगळ्यांचं? मी असते तर केव्हाच निघून गेले असते.’ आई म्हणते, ‘तुला नाही कळायचं. ढाल-तलवार घेऊन प्रत्येक गोष्टीचा तुकडा पडायचा नसतो. काही ठिकाणी माघारही घ्यावी लागते.’

शामिकाची आत्या तिची अत्यंत लाडकी. स्वतंत्र वृत्तीच्या या आत्यानं पस्तिशीपर्यंत लग्न नाही केलं. त्यानंतर तिचं लग्न झालं. शामिकानं विचारल्यावर ती म्हणाली, ‘मला कंटाळा आला होता लोकांच्या त्याच त्याच प्रश्नांची उत्तरं द्यायचा. कुठेही गेले तरी ते एका दयाद्र्र दृष्टीने बघायचे. बिच्चारी म्हणून. शिवाय एकटेपणाही नको वाटायला लागला होता गं!’

तसं बघायला गेलं तर गेल्या कित्येक पिढय़ांपासून लोक लग्न करतात. त्यात प्रश्न पडण्यासारखं किंवा विचार करण्यासारखं काही असेल असं कुणाला वाटतही नसे. लहान असतानाच, अगदी पाळण्यातसुद्धा लग्नं व्हायची.

लग्नाची प्रथा एक सोय म्हणून चालू झाली. पण ती नुसती सोय नाही, एक सिम्बायॉटिक रिलेशनशिपही आहे. म्हणजे दोघांनाही त्यातून फायदा व्हायला हवा, हो ना? पण जेव्हा हे फायद्याचं पारडं कुणा एकाच्या बाजूला झुकतं तेव्हा ते नकोसं वाटायला लागतं. आणि जेव्हा अशी अनेक उदाहरणं आजूबाजूला दिसायला लागतात तेव्हा ‘नको रे बाबा लग्न!’ असं का वाटू नये एखाद्याला?

लग्न करण्याचे फायदे-तोटे यावर नको जायला आपली चर्चा. पण तुमच्या जनरेशनला ‘लग्न नको’ असं का वाटत असेल हे तरी बघायला हवं. यातले काही जण असे असतात की, जे नाइलाज म्हणून लग्नाशिवाय राहतात. पण आपण बोलणार आहोत ते अविवाहित राहण्याचा निर्णय जाणून-बुजून घेणाऱ्यांविषयी.

आजच्या तरुणांचं म्हणणं आहे की, सिंगल राहणं हा त्यांचा चॉइस आहे, असहायता किंवा नाइलाज नाही. तशी आपल्या भारत देशात थोर व्यक्तींनी लग्न न करण्याची परंपरा आहेच. ज्ञानेश्वर, विवेकानंदांपासून ते आजच्या रतन टाटांपर्यंत आणि जयललितांपासून ते सुश्मिता सेनपर्यंत. ए पी जे अब्दुल कलाम तर म्हणत की, मी लग्न केलं असतं तर एक तरी रॉकेट लाँच केलं असतं की नाही कोण जाणे! या लोकांच्या समोर कार्याचा इतका ढीग असतो की लग्न वगरेचा विचारच करीत नाहीत ते.

काही जणांना लग्नाची चक्क भीती वाटते. नवरा-बायकोच्या नात्यातला हळुवारपणा, गोडवा, समाधान अशा सकारात्मक गोष्टी तुमच्या जनरेशनपर्यंत पोहोचल्या नाहीयेत बहुधा. आदर्श, आनंदी कुटुंबाची चित्रं प्रत्यक्षात फारशी दिसतच नाहीत. काही वेळा स्वत:ला एखादा नकोसा अनुभव आलेला असतो. लहानपणी झालेलं लंगिक शोषण असेल, प्रेमभंग असेल किंवा अब्युझीव्ह रिलेशनशिप असेल, कुणाकडून फसवलं गेलं असेल किंवा यातलं काहीही नसलं तरी अज्ञाताची भीती असेल. आजूबाजूची अनेक लग्नं घटस्फोटामध्ये संपलेली पाहिली की लग्न ही एक क्षणभंगुर गोष्ट आहे याची पक्की खात्री होते. घटस्फोट ही काही एक घटना नसते, ती नकोशा घटनांची मालिका असते. वाद, भांडणं, पशाचा चुराडा आणि मधल्या मध्ये होणारी मुलांची कुचंबणा.

जपान काय किंवा अमेरिका काय, बहुतेक सगळ्या पुढारलेल्या देशांत अधिकाधिक लोक लग्न न करण्याचा निर्णय घ्यायला लागलेत. आधी पाहिलेल्या कारणांपेक्षा वेगळं असं याचं एक कारण तज्ज्ञांना असं वाटतंय की, मुलं आपल्या किशोरावस्थेतून बाहेरच यायला तयार नाहीयेत. त्यांना तेच निवांत, जबाबदारी नसलेलं आयुष्य बरं वाटतंय. जे वेळेवर मॅच्युअर होतात ते वयाच्या विशीत लग्न करतात. त्यानंतर मग ही शक्यता कमी कमी होत जाते. यावर मग एखादा मधला तोडगा काढला जातो, तो म्हणजे लिव्ह-इन रिलेशनशिपचा. कित्येकदा भेटलेल्या व्यक्तीचा पुरेसा अंदाज बांधता येत नाही. त्या व्यक्तीच्या आवडी-निवडी, सेक्शुअल प्रेफरन्सेस, स्वभाव.. एकदम लग्न करून मग पश्चात्ताप करण्यापेक्षा हे बरं असं वाटतं. निदान कायद्याच्या किचकट गुंत्यातून तरी सुटका होते. शिवाय लाँग टर्म कमिटमेंटची गरज नाही.

या सगळ्या ट्रेंडचे काही धोके आहेत. समाजशास्त्रज्ञांच्या मते हे कुटुंबव्यवस्थेला आणि पर्यायानं सोसायटीला घातक आहे. कुटुंबात आई-बाबा असे दोन्ही पालक असणं मुलांच्या विकासासाठी आवश्यक असतं. ते कसं साधणार? शिवाय आधीच एकटा होत चाललेला माणूस या नव्या ट्रेंडमुळे कदाचित जास्त एकलकोंडा होईल. आजारपणं, म्हातारपण या गोष्टी ज्या कुटुंबात एकमेकांच्या आधारानं पार पडतात, त्या आवरण्यासाठी हॉस्पिटल्स, नस्रेस, आधार देणाऱ्या संस्था अशी सोय करायला लागेल ती वेगळीच.

म्हणजे दिसतो तितका साधा नाहीये हा निर्णय!

viva@expressindia.com