हृतिक रोशनचा ‘क्रिश’ नावाचा चित्रपट आठवतोय? हा सुपरहिरोपट प्रदर्शित व्हायच्या आधीच ‘क्रिश’चा मास्क, गॉगल, त्याचा कॉश्च्युम बाजारात दाखल झाला होता. चित्रपटाच्या प्रसिद्धीचाच तो भाग होता. ‘धूम ३’च्या वेळी तर चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदर आमिर खान आणि कतरिना कैफच्या ‘धूम; गेटअपमधील बाहुल्या बाजारात आल्या होत्या. चित्रपटातली फॅशन लोकप्रिय होणं ही नवी गोष्ट नाही. पण या लोकप्रियतेचा चित्रपटप्रसिद्धीसाठी आणि त्याच्याही पुढे रिटेलिंगमधली वेगळी व्यवसायसंधी म्हणून विचार अलीकडच्या काळात सुरू झाला आहे. ‘क्रिश’, ‘धूम’ ही त्याची ठळक उदाहरणं. त्यानंतर किती तरी चित्रपटांतील फॅशनचं, अ‍ॅक्सेसरीजचं असं रीतसर व्यापारीकरण झालं.

चित्रपटसृष्टीत आता र्मचडायझिंग हा शब्द नवा राहिलेला नाही. यशराज स्टुडिओतर्फे तर त्यांच्या चित्रपटांशी संबंधित उत्पादनं विकण्यासाठी वेगळं ई-शॉपिंग वेबपोर्टल निर्माण केलं. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ चित्रपटाला २५ र्वष पूर्ण झाल्याच्यानिमित्ताने यशराजतर्फे चित्रपटातील संवाद, गाणी लिहिलेले मग, टीकोस्टर्स, कीचेन्स, कुशन कव्हर्स अशी बरीच उत्पादनं बाजारात आणली होती. र्मचडायजिंग विश्वातली ही नवी सुरुवात होती. कारण जुन्या चित्रपटासाठी केलेलं हे र्मचडायजिंग होतं. एरवी चित्रपटप्रसिद्धीसाठी र्मचडायजिंग आता खूप वेगळं राहिलेलं नाही. आता चित्रपटातले संवाद, व्यक्तिरेखा, त्या व्यक्तिरेखांची वैशिष्टय़ं या सगळ्याचा उपयोग करत त्यादृष्टीने उत्पादनं निर्माण केली जातात आणि चित्रपट प्रसिद्धीसाठी यांचा उपयोग केला जातो. र्मचडायजिंगसाठी रीतसर पार्टनर शोधला जातो. ई-कॉमर्सच्या जमान्यात तर अशी अनेक उदाहरणं दिसतली. ‘डिअर जिंदगी’ या आलिया भट- शाहरुख खान अभिनित चित्रपटाचं र्मचडायजिंग अजूनही ई-बाजारात दिसतं. कीप पॅडलिंग असं लिहिलेले टीशर्ट, बॅग अजूनही मुलींना भुरळ पाडताहेत. ‘दिल धडकने दो’ या झोया अख्तर दिग्दर्शित चित्रपटात तर सर्व प्रमुख अभिनेत्यांच्या स्टाइलवर विशेष मेहनत घेण्यात आली होती.

प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा यांचे ड्रेस, गाउन्स तसंच अनिल कपूर, फरहान अख्तर, रणवीर सिंग यांनी मिरवलेली स्टायलिश जॅकेट्स, शर्ट, ब्लेझर अ‍ॅमेझॉन. कॉमवर रीतसर विकायला ठेवलेली होती. ‘बेफिक्रे’चे टीशर्ट ऑनलाइन पोर्टल्सवर विकायला होते. व्हिस्टाप्रिंट्स ही कंपनी शाहरुख खानच्या ‘फॅन’ची अधिकृत र्मचडायझिंगसाठीच होती. लाइमरोड या ऑनलाइन शॉपिंग पोर्टलने ‘की अ‍ॅण्ड का’, ‘तमाशा’ आदी चित्रपटांमधील नायिकांच्या स्टाइल्सचे कपडे विकायला ठेवले होते. ‘सिंघम रिटर्न्स’च्या वेळी पीव्हीआर सिनेमाच्या सहकार्यातून ‘सिंघम’च्या पॉपकॉर्न बॅग, लंच बॉक्स, स्ट्रॉ अशा गोष्टीही आल्या होत्या. ‘बजरंगी भाईजान’ची लॉकेट लोकप्रिय झाल्यानंतर सिल्व्होस्टाइलच्या सहकार्याने ‘रईस’चं लॉकेटही लाँच करण्यात आलं.

मराठीतही र्मचडायझिंगचा प्रयोग करण्यात आला होता. राजवाडे अ‍ॅण्ड सन्स या चित्रपटातील दागिने या चित्रपटाच्याच नावाने बाजारात आले होते. शॉपर्स स्टॉप हे स्टोअर या चित्रपटातील स्टाइल्स अधिकृतपणे विकत होते. चित्रपट ताऱ्यांच्या फॅशनचा, त्यांच्या लोकप्रियतेचा जनमानसावरील प्रभाव कॅश करण्याच्या दृष्टीनं र्मचडायजिंग केलेलं दिसतं. हिंदी चित्रपटसृष्टीत र्मचडायजिंग कॉमन गोष्ट झालेली असली, तरी हॉलीवूडपटांइतका व्यापक व्यापार अजूनही केला जात नाही. र्मचडायजिंग केवळ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी होतं. चित्रपट प्रदर्शनानंतर या वस्तूंच्या विक्रीतून काही पट उत्पन्न काढण्याचे उद्योग हॉलीवूडमध्ये होतात. स्पायडर मॅन, एक्स मेन, हॉबिट, लॉर्ड ऑफ द रिंग्ज, टायटॅनिक या चित्रपटांशी संबंधित उत्पादनं अजूनही मोठय़ा प्रमाणावर खरेदी केली जातात. ई-कॉमर्सच्या जमान्यात चित्रपटाच्या प्रसिद्धीपेक्षा र्मचडायजिंगमधूनच जास्त कमाई केली जाते.

-प्रतिनिधी

viva@expressindia.com