News Flash

ब्रॅण्डनामा : सबवे

आज ११२ देशांत सबवेची ४४,००० आऊटलेटस् आहेत. हा एका रात्रीत झालेला चमत्कार नाही.

सबवे

रश्मि वारंग viva@expressindia.com

हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी

एखाद्या अपरिहार्य गरजेतून व्यवसाय सुरू करावा आणि त्या व्यवसायाने उंचच उंच भरारी घ्यावी ही केवळ कल्पनेतील कथा नाही. काहीवेळा ते प्रत्यक्षातही येतं. पण फक्त करोडोंमध्ये एखाद्याच्याच बाबतीत. फ्रेड डेलुका हा  अशा भाग्यवंतांपैकी एक. केवळ नावावरून या व्यक्तीबद्दल काही कळत नाही. पण ‘सबवे’ ब्रॅण्डचा कर्ता म्हटलं की लगेच खूण पटते. याच जगप्रसिद्ध खाद्य ब्रॅण्डची ही कहाणी!

वयाच्या सतराव्या वर्षी फ्रेड डेलुका या तरुणाने १९६५ साली अमेरिकेतल्या ब्रीजपोर्ट भागात सब सॅण्डविचचं दुकान सुरू केलं. पाणबुडीसारख्या म्हणजेच सबमरीनच्या आकाराच्या पावाची ही सॅण्डविचेस दुसऱ्या महायुद्धापासून लोकप्रिय होती. हे दुकान उघडण्यामागचा फ्रेडचा हेतू पूर्णत: आर्थिक होता. त्याला डॉक्टर व्हायचं होतं पण शिक्षणासाठी पैसे नव्हते. स्वत:चाच खर्च तो जेमतेम भागवू शकत होता. अशा वेळी फ्रेडच्या कुटुंबाचे स्नेही असणाऱ्या डॉ. पीटर बक यांनी त्याला हजार डॉलर्स भांडवलासाठी दिले आणि सब सॅण्डविच दुकान काढायची कल्पना दिली. डॉ. पीटर हे कोलंबिया विद्यापीठात भौतिकशास्त्र विषयात पीएचडी करत होते. त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला वजन होतं. हे रेस्टॉरंट २८ ऑगस्ट १९६५ रोजी सुरू झालं. नाव होतं पीटर सुपर सबमरीन सॅण्डविच स्टोअर. त्या काळात अशा सॅण्डविच स्टोअरची कमतरता नव्हती. काही महिन्यांनी दुकानाचं नाव बदलून ‘पिटर्स सबवे’ असं करण्यात आलं. त्यामागचं एकमेव कारण म्हणजे त्या काळातील सुप्रसिद्ध ब्रॅण्ड ‘पिझ्झा मरीन’च्या ते जवळ जाणारं होतं. या काळात फ्रेडला मिळणारा प्रतिसाद फारसा उत्साहवर्धक नव्हता. व्यवसाय नुकसानीत चालू होता. फ्रेडने हार न मानता नवं रेस्टॉरंट थाटलं. तिथे नुकसान झालं नाही तरी फायदा झाला होता फक्त ६ डॉलर्स. तरीही निराश न होता फ्रेडने व्यवसाय सुरू ठेवला. या वेळेस नाव बदलून ठेवण्यात आलं ‘सबवे’ पुढच्याच वर्षी ‘सबवे’ला ७००० डॉलर्सचा नफा झाला. १९७८ पर्यंत सबवेचा बोलबाला होऊ लागला. अनेकांनी सबवेची फ्रेंचायजी घेतली. सबवेला मिळणारा प्रतिसाद विशेष असण्याची काही कारणं होती. ग्राहकांना नेहमी अगदी ताजा सब दिला जाई. किंमत माफक होती आणि प्रत्येक ग्राहकाकडे जातीने लक्ष दिलं जाई. त्यामुळे सबवेची रेस्टॉरंट्स वाढत गेली.

आज ११२ देशांत सबवेची ४४,००० आऊटलेटस् आहेत. हा एका रात्रीत झालेला चमत्कार नाही. फ्रेडने अतिशय विचारपूर्वक व्यवसाय विस्तारत नेताना योग्य माणसांना हाताशी धरलं. देशागणिक सबचा स्वाद बदलत राहील याची काळजी घेतली. भारताचंच उदाहरण घ्यायचं तर २००१ मध्ये नवी दिल्लीत पहिलं सबवे रेस्टॉरंट सुरू झालं. भारतातील शाकाहारींची संख्या लक्षात घेत शिवाय गोमांस किंवा पोर्क याच्याशी जोडलेल्या जनभावना लक्षात घेत पूर्णत: शाकाहारी सबवेसुद्धा काही भागांत सुरू करण्यात आलं. हेच धोरण इतर देशांतही वापरल्याने सबवेने जगभरातील रेस्टॉरंट्स साखळीच्या शर्यतीत २०१० मध्ये मॅकडोनाल्डला मागे टाकलं. जगातील सर्वोत्तम ५०० साखळी रेस्टॉरंट्समध्ये सबवेचा क्रमांक तिसरा आहे. तर सर्वात जलद गतीने वाढणाऱ्या साखळी रेस्टॉरंट्समध्ये सबवे प्रथम क्रमांकावर आहे.

सबवेच्या सुरुवातीच्या लोगोत काळ्या रंगाच्या पाश्र्वभूमीवर सबवे ही अक्षरं दिसत. २००२ पासून काळा रंग जाऊन ती जागा ठळक हिरव्या अक्षरांनी घेतली. सबवेची टॅग लाइन म्हणते ‘इट फ्रेश’.

तसं पाहता सबवे आपल्याला सॅण्डविचचाच एक प्रकार थोडय़ा वेगळ्या पद्धतीने विकते. तरी एवढी अफाट लोकप्रियता सबवेला मिळण्याचं कारण काय असावं? विविध भाज्या, चिकन वा तत्सम गोष्टी वापरण्यात नावीन्य नसलं तरी वैविध्यपूर्ण पाव, विविध सॉसेस आणि त्यांची प्रमाणबद्धता ही सबवेला वेगळं ठरवते. घरात ज्या भाज्या खायला नखरे केले जातात त्याच भाज्या चटकदार सॉसेस सोबत आवडीने खाल्ल्या जातात. त्या पाणबुडीच्या आकाराच्या पावात आपल्या आवडीनुसार खच्चून भरलेल्या गोष्टी आपल्या देखत तयार होतात तेव्हा ते पाहता पाहता आपण त्यात गुंततो. काहींना पोटभरीचं खाण्याचा आनंद देण्यात तर काहींना आपण खूपच पौष्टिक काही खातोय हा अनुभव देण्यात हा ब्रॅण्ड यशस्वी होतो.

फ्रेड डेलुका यांनी डॉक्टरकीच्या शिक्षणाची फी गोळा करण्यासाठी सुरू केलेल्या ब्रॅण्डने एका साध्या कल्पनेला आज खूप मोठं केलंय. कोणताही व्यवसाय कल्पकता आणि मेहनतीच्या जोरावर किती आणि कसा मोठा होऊ शकतो याचं हे मूर्त उदाहरण! साधीशी वडापाव गाडी किंवा सॅण्डवीच ठेला लावणाऱ्या नवव्यावसायिकांनी हे उदाहरण समोर ठेवायला काहीच हरकत नाही.. अर्थात त्यासाठी मेहनतीचा, अपयशी होऊनही नाउमेद न होण्याचा मंत्र जपत ठामपणे ग्राहकांना म्हणता यायला हवं.. इट फ्रेश!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2018 1:09 am

Web Title: subway brand information
Next Stories
1 बॉटम्स अप : पार्टी देताय?  मग हे कराच..
2 वाटेवरची पेटपूजा
3 व्हिवा दिवा : माधवी माडनूरकर, सांगली
Just Now!
X