आपल्या सगळ्यात कूल, लाडक्या दोस्तांचं उन्हाळ्यात जरा निगुतीनंच संगोपन करावं लागतं. विशेषत केसाळ प्रजातींच्या श्वानांची या ऋतूत जास्त काळजी घ्यावी लागते.

आला उन्हाळा, तब्येत सांभाळा टाइप्स लेख आपण वाचतो आणि उन्हाळ्याची चाहूल लागताच आपल्या आहार-विहारात फरकही करायला लागतो. पण आपल्या लाडक्या पेट्सच्या बाबतीत तीच सावधगिरी सांभाळावी लागते. या उन्हाचा जितका त्रास आपल्याला होतो तितकाच आपल्यासोबत इतर प्राण्यांनाही होत असतो. निसर्गाने प्रत्येक वनस्पती आणि प्राण्याची रचना त्यांचा अधिवास असणाऱ्या प्रदेशातील वातावरणाशी जुळवून घेण्यायोग्य केली आहे. पण माणूस स्वत:च्या हौसेपोटी कित्येकदा कळत नकळत निसर्गाच्या नियमांविरुद्ध वागतो. आपली आवड म्हणून आपण परदेशी जातीचे श्वान हौसेने पाळतो. आपल्याकडच्या उन्हाळ्यात या आपल्या लाडक्या पेट्सची विशेष काळजी घ्यायला लागते. हे विसरता कामा नये. आपल्याकडचं हवामान, वातावरण याचा विचार करता केसाळ प्रजातींचे श्वान किंवा मांजरी यांना या ऋतूत जपावंच लागतं. अनेक जण उन्हाळ्यात आपल्या पाळीव प्राण्याचे केस कापण्यावर भर देतात. एखाद्या व्यक्तीस उन्हाळ्यात स्वेटर घालवून बसवलं तर जितकं गरम होईल तितकं या केसाळ मित्रांना उन्हाळ्यात त्यांच्या केसांमुळे गरम होत असतं. त्यामुळे या उपायानं त्यांना थोडं बरं वाटू शकतं. लाळ गळणं हे श्वानांना गरम होत असल्याचं महत्त्वाचं लक्षण आहे. जीभ बाहेर काढून श्वास घेत राहणं हे शरीर थंड ठेवण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न असतात. ते समजून घेऊन त्यांना योग्य ती मदत आपण केली पाहिजे. तसंच मांजरींचंदेखील आहे. उष्मा सहन होत नसल्याने त्यांच्यातही चलबिचल वृत्ती दिसून येते. त्यामुळे त्यांनाही जितकं थंड वाटेल तितकं चांगलं.

केवळ केसाळ किंवा परदेशी प्रजातींच्याच नाही तर भारतीय प्रजातींच्या श्वानांना देखील हा उन्हाळा त्रासदायक वाटतो. मात्र देशी प्रजातींना या वातावरणाची सवय असल्याने परदेशी प्रजातींच्या तुलनेत ते या वातावरणाशी पटकन जुळवून घेतात. या काळात आपल्या पाळीव मित्रांना सकाळी उन्हाची तीव्रता वाढण्याआधी आणि संध्याकाळी तीव्रता कमी झाल्यावर फिरायला अथवा खेळायला नेणं योग्य ठरतं. उन्हाळ्यात मुख्यत: जर्मन शेफर्ड, तिबेटीयन मस्टीफ, हस्की, कॉकर स्पॅनिअल इत्यादी केसाळ श्वानांसाठी एअरकंडिशण्ड वातावरण किंवा साधारण त्यांना झेपेल असं थंड हवामान आणि खेळती हवा असणारं वातावरण सोयीचं ठरतं. दमट वातावरणात विषाणूंची लागण होण्याची शक्यता असल्याने श्वानास जास्तीत जास्त प्रमाणात साफ ठेवणं, त्यांच्या स्वच्छतेची काळजी घेणं त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचं ठरतं.

कित्येकदा पाळीव श्वान किंवा मांजरीला गरम होऊ  नये म्हणून दिवसातून तीन ते चार वेळा अंघोळ घातली जाते. मात्र आपल्या काळजीतून घडणारी ही क्रिया त्यांच्यासाठी अयोग्य ठरू शकते. केवळ अंघोळ करताना थंड वाटलं तरी बाहेर आल्यावर त्यांच्या शरीरास बाहेरच्या तापमानानुसार पुन्हा गरम वाटतं. त्यामुळे असे प्रयोग शक्यतो टाळले जावेत. तसंच आंघोळीसाठी उन्हाळ्यात श्ॉम्पूचा वापर टाळण्याचा सल्ला डॉक्टर देतात, कारण त्यामुळे त्वचा विकार होण्याची शक्यता असते.

पाळीव प्राण्यांच्या राहणीमानासोबतच या काळात त्यांच्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणं महत्त्वाचं आहे. शरीरासाठी उष्ण पदार्थ शक्यतो टाळले पाहिजेत. शरीर थंड राहण्यासाठी बर्फ घालून गार झालेलं पाणी त्यांना प्यायला द्यायला हरकत नाही. तुमच्या शरीराला थंड ठेवण्यासाठीचे सोपस्कार तुमच्या या लाडक्या मित्रांसाठी उपयोगी पडू शकतात. अर्थात काही खबरदारी घेणं महत्त्वाचं. तुमचे हे प्रयत्न पाहून हे सच्चे मित्र तुम्हाला आणखी लळा लावतील यात शंका नाही.

उन्हाळ्यातली पेट केअर

  • श्वानांना ऊब आवडते, मात्र उन्हाळ्यात त्याची तीव्रता जास्त असल्याने त्यांना थेट उन्हापासून दूर ठेवलं पाहिजे. सतत उन्हात बसले तर त्वचेचा कॅन्सर होण्याची शक्यता असते.
  • वयाने मोठय़ा पाळीव प्राण्यांना उष्णतेचा जास्त त्रास होतो. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घ्यावी.
  • आपल्या लाडक्या दोस्तांना उष्मा जाणवत असेल तर अंघोळ घालायचा पर्याय अनेक जण स्वीकारतात. पण त्यापेक्षा मुलांच्या छोटय़ा स्वीमिंग टय़ूबचा वापर करावा. त्यामुळे अंग पाण्यात भिजत नाही आणि थंडावा मिळत राहतो.
  • काही श्वान अथवा मांजरींना एअरकंडिशनरची हवा फार थंड वाटू शकते. अशा वेळी टेबल फॅनचा वापर करून त्यांच्या शरीरास थंडावा द्यावा.
  • प्राण्यांच्या शरीराचं तापमान ३९-४० सेल्सियस ठेवण्याचा प्रयत्न करावा आणि शरीराचं तापमान जर वाढत असेल तर स्प्रेद्वारे पाणी शिंपडून तापमान कमी करण्याचा प्रयत्न करावा. त्यांचे तळवे थंड पाण्यात भिजवलेल्या कपडय़ाने पुसून घेत राहावेत.
  • पाणी पाजण्यासाठी भांडं वापरत असाल तर उन्हाळ्यात तुमच्या पाळीव प्राण्याचा वावर असणाऱ्या किमान दोन-तीन ठिकाणी पाणी पिण्याची सोय करून ठेवावी. त्यामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य राहते आणि डिहायड्रेशन होत नाही.
  • विशेषत: श्वानांच्या शरीराचं योग्य तापमान राखण्याकरता बाजारात काही लेप मिळतात. असे लेप वापरताना श्वानाच्या मांडीच्या सांध्यांना ते लावावेत.

ब्रीडनुसार काळजी घेणं महत्त्वाचं.

कित्येकदा लोक व्यावहारिक विचार न करता आपल्या आवडीचे परदेशी श्वान पाळतात. मात्र वातावरण आणि हवामानानुसार जुळवून घ्यायला त्यांना मदत केली नाही, तर प्राण्यांचं आरोग्य खालावतं. त्यामुळे आपल्या पेटची ब्रीड आणि त्यानुसार त्याची गरजा ओळखून हवामानानुसार त्यांची काळजी घेतली पाहिजे. कळत नकळत का होईना पण या गोष्टींचा मालक आणि त्यांचा पेटच्या नात्यावरही परिणाम होतो याचं भान ठेवणं महत्त्वाचं.

भरत फणसेकर, डॉग ब्रीडर