हौशी व्लॉगर्ससाठी व्हिडीओ ब्लॉगिंगचं तांत्रिक ज्ञान, स्मार्ट टिप्स आणि काही बेसिक इक्विपमेंट्सची माहिती.. अर्थात व्हिडीओ ब्लॉगिंगचे तंत्र आणि मंत्र..

सौरभ नाईक

प्रत्येकाची व्यक्त होण्याची पद्धत निरनिराळी असते. जसा काळ बदलत गेला तशा पद्धतीही बदलत गेल्या. रोजनिशी किंवा डायरी लिहिणारे लोक ‘ब्लॉग’ लिहू लागले; पण ज्यांना त्यांच्या तिसऱ्या डोळ्यातून व्यक्त होता येतं, त्यांचं काय? फिरणं हे ज्यांचं जीवन आहे आणि ‘कॅमेरा इज माय वाइफ/ हबी’ असं जे स्वत:च्या जीवनसाथीचं वर्णन करतात, त्यांच्यासाठी व्यक्त होण्याचं माध्यम कोणतं? तर ते आहे ‘व्हिडीओ ब्लॉग्ज’ अर्थात व्लॉग्ज vlogs). ज्यांना फिरण्याची प्रचंड आवड असते आणि आपले भटकंती अनुभव साद्यंत इतरांपर्यंत पोहोचवायचीसुद्धा इच्छा असते ते या पर्यायाचा वापर करतात. तुम्हीसुद्धा भटकंती करता? तुम्हालासुद्धा व्हिडीओ ब्लॉगिंग करायचंय? मग त्यासाठी या काही सोप्या टिप्स किंवा बेसिक ज्ञान..

साधारणत: आपल्याला जर व्हिडीओ ब्लॉगिंग करायचं असेल तर आपल्याकडे जिज्ञासू वृत्ती हवी आणि काही तरी वेगळं, नवं शोधून ते उत्तम प्रकारे मांडण्याची पद्धत यायला हवी. हे सगळं तुम्ही कमावू शकाल किंवा तुमच्याकडे असेलही, पण याहून महत्त्वाचं काही लागत असेल तर व्हिडीओ ब्लॉगिंगची साधनसामग्री. तुम्ही अगदी साध्या सोप्या पातळीवर काम सुरू करणार असाल तर तुम्हाला तीन गोष्टी मुख्यत्वे लागतीलच. कॅमेरा, माइक आणि अर्थातच अपलोड (उर्वरित पान ३) (पान १ वरून) करण्यासाठी आवश्यक इंटरनेट सुविधा असलेला फोन किंवा संगणक. या तीन गोष्टी तुमच्यासोबत असतील तर तुम्ही व्हिडीओ ब्लॉगिंग करण्यासाठी पात्र आहात. यामध्येसुद्धा प्रकार असतात. कॅमेऱ्याची गुणवत्ता इथे विशेष उपयोगी ठरते. बरेच जण स्वत:च्या उत्तम कॅमेरा गुणवत्ता असलेल्या मोबाइलचासुद्धा शूटिंगसाठी वापरतात, पण ते वापरण्याचंसुद्धा एक कसब असतं. तुमच्याकडे डीएसएलआर असेल तरी चालू शकतं; पण तुम्ही ट्रेकिंग करणार असाल तर मात्र तो हाताळताना अडचणी येऊ  शकतात. पण डीएसएलआर ७०० डी तुम्हाला उत्तम गुणवत्ता देऊ  शकतो, असं तज्ज्ञ सांगतात.

जर तुम्ही व्हिडीओ ब्लॉगिंगचा गांभीर्याने विचार करत असाल तर मात्र ‘गो-प्रो’ कॅमेरा हवाच. बहुतेक ब्लॉगर्स ‘गो-प्रो’ची हिरो ५ ब्लॅक एडिशन वापरतात. याची किंमत साधारणत: ३५ ते ४० हजारांच्या आसपास असते. काही अ‍ॅक्शन कॅमेरे असतात जे आपल्याला हेल्मेटवर किंवा बाइकवर लावता येतात. आपला हात व्हिडीओ काढताना स्थिर नसतो, त्यामुळे शूटिंगच्या दर्जात खूप फरक पडतो. त्यासाठी ‘डीजीआय ऑसमो’चं एक साधन येतं, ज्यात तुमचा हात हलला तरी कॅमेरा हलत नाही आणि व्हिडीओ स्पष्ट येतो.

जसजसे तुम्ही याचा अधिक सखोलपणे अभ्यास करून व्हिडीओ तयार करायला लागाल तशी कॅमेऱ्याची गुणवत्ता वाढविणं गरजेचं आहे; पण त्याचा खर्च मात्र साहजिकच वाढता आहे. पण वर उल्लेखिलेले बेसिक कॅमेरे असल्यास तुम्ही व्हिडीओ ब्लॉगिंग करू शकता. तुम्हाला दुसरी गरज असते चांगल्या माइकची. भटकंतीदरम्यान व्हिडीओ शूटमध्ये आपण जे बोलणार आहोत ते सुस्पष्ट आवाजात ऐकू जावं यासाठी काही माइक असतात. कॉलर माइक साधारण ३ हजारांपासून पुढे मिळतो. तो तुम्ही वापरू शकता. तुम्हाला फार खर्च न करता काम करायचं असेल तर तुम्ही अगदी हेडफोनही कनेक्ट करून वापरू शकता; पण त्याने आवाजाच्या सुस्पष्टतेवर तडजोड करावी लागण्याची शक्यता असते. आता प्रश्न बॅटरीचा. बॅटरी बॅकअप तुमच्या एका स्ट्रेचमधील प्रवासाच्या वेळेवर अवलंबून आहे. जितका प्रवास जास्त तितकी जास्त क्षमता असलेली बॅटरी वापरायला हवी. जमल्यास लॅपटॉप सोबत घेऊ  शकता. म्हणजे कॅमेऱ्यामध्ये शूट केलेलं फूटेज लगेच लॅपटॉपमध्ये टाकून कॅमेरा स्पेस रिकामी करता येते आणि बॅटरीसुद्धा चार्ज करता येऊ  शकते.

अशी काही बेसिक इक्विपमेंट्सदेखील तुम्हाला व्हिडीओ ब्लॉगर बनवू शकतात; पण त्यासाठी काही इतर गोष्टीही माहीत असणं आणि मुख्य म्हणजे एकटं भटकण्यापेक्षा सोबत असणं गरजेचं आहे. तुमच्यासोबत एक बॅग हवी ज्यात सगळं उपयुक्त तांत्रिक सामान असेल. फोन आवश्यकच. त्यातही जीपीएस असणं आवश्यक. नुसता व्हिडीओ कसाही काढून चालत नाही, त्यासाठी कॅमेरा वापरण्याचं तंत्र अवगत असावं लागतं आणि मुख्यत: तो व्हिडीओ एडिट करून त्यात योग्य ते संगीत टाकून तो प्रसिद्ध करावा लागतो. म्हणजे काम इंटरेस्टिंग आहे, पण मेहनतीला पर्याय नाही. या संदर्भात अधिक मार्गदर्शन यूटय़ूबवरच्या अनेक व्हिडीओंमधूनही मिळू शकेल. काही वेबसाइटही उपयुक्त ठरू शकतील. त्यासाठी गुगलबाबा आहेतच. फक्त सुरुवात करायची खोटी.. मग सारं जग तुमच्या डोळ्यांनी विश्वाची सफर करू शकेल.

viva@expressindia.com