सिल्क म्हटलं की हमखास साडीची आठवण होते. पण ही गोष्ट आहे एका मालगाडीची. वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य घेऊन जाणारी ही आंतरदेशीय गाडी सध्या चर्चेत आहे. त्या ट्रेनची ही शाब्दिक सफर.

मळखाऊ रंगाचे निर्जीव डबे, त्यांना ओढून नेणारी शक्तिशाली इंजिनं, शेवटी गार्डची पत्र्याची खोपटी हा एकूण प्रकार रूढ ‘पॉप्युलर कल्चर’मध्ये प्रेक्षणीय नाही. साहजिकच त्याची परिभाषाही मालगाडी, गुड्स ट्रेन, वाघिणी अशी कठीण. एरव्ही ट्रेन हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. मात्र ४० ठोकळ्यांचा हा लांबलचक प्रकार मन आणि मेंदूला साद घालत नाही. याच आठवडय़ात दूरवर इंग्लंडमधून चीनच्या दिशेने एक मालगाडी निघाली. या मालगाडीला छान सजवण्यात आलं होतं. गाडीला हिरवा कंदील दाखवण्याच्या सोहळ्याला असंख्य क्षेत्रातले ‘हूज हू’ उपस्थित होते. सोशल मीडियावर, पारंपरिक मीडियात या मालगाडीची चर्चा आहे. या मालगाडीच्या आडून एक देशाने सत्तेचा सेतू उभारलाय. आकाशकंदिलापासून स्मार्टफोनपर्यंत आपण ज्यांच्या देशात निर्मिलेल्या वस्तू वापरतो तोच चीन. आपल्या देशात तयार होणाऱ्या वस्तू चांगल्या बाजारभावाने जगाच्या बाजारात विकता याव्यात यासाठी हा खटाटोप. त्याच वेळी अन्य देशात तयार होणाऱ्या वस्तू परवडणाऱ्या दरात आपल्याला सहजतेने उपलब्ध व्हाव्यात यासाठी हा रूळप्रपंच.

In Vidarbha thousands of hectares of orchards and crops were destroyed due to unseasonal rains
विदर्भात हजारो हेक्टरवरील फळबागा, पिकांची नासाडी; तिसऱ्या दिवशीही अवकाळीचे तांडव
jalgaon gold price marathi news
जळगाव सुवर्णनगरीत सोन्याची ७५ हजारांकडे वाटचाल
heavy traffic in patri pool area in kalyan
कल्याण : पत्रीपुलामुळे पुन्हा मनस्ताप, आता रस्ते कामामुळे अभूतपूर्व वाहतूक कोंडी
mukhtar ansari death gangster turned politician buried near his parents graves in ghazipur
मुख्तार अन्सारीच्या मृतदेहाचे दफन

यंदाच्या जानेवारी महिन्यात पूर्व चीनमधल्या यिवू या उत्पादक शहरातून मालगाडी लंडनच्या दिशेने निघाली. ‘मेड इन चायना’ टॅगलाइन असलेलं घरगुती साहित्य, सूटकेस, कपडे अशा वस्तू या मालगाडीत होत्या. पर्वतराजी, वाळवंट, नद्या ही निसर्गाची रूपं अनुभवत ट्रेन लंडनमध्ये पोहचली. साहित्य जागोजागी पोहचवल्यानंतर ही ट्रेन परतीच्या प्रवासाला निघाली आहे. ३२ कंटेनर भरून साहित्य असलेल्या या ट्रेनला चीनला पोहोचायला ३ आठवडे लागतील. १२,००० किलोमीटरचा साधारण प्रवास आहे. फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी, पोलंड, बेलारुस, रशिया, कझाकिस्तान असे ७ देश आणि असंख्य टाइमझोन ओलांडून ही ट्रेन चीनमध्ये दाखल होईल. प्रवासादरम्यान बेलारुसच्या सीमेवर डबे बदलण्यात येतील. कारण बेलारुसमध्ये रेल्वे रुळाचे गज मोठय़ा आकाराचे आहेत. त्यामुळे दोन तास खर्चून नव्या वाघिण्यांमध्ये साहित्य भरलं जाईल. चीनेच्या सीमेवर पुन्हा स्टँडर्ड गेज रूळ असल्याने वाघिण्या बदलल्या जातील. हे सव्यापसव्य करण्यासाठी फक्त दोन तास जातील. हवाई वाहतुकीद्वारे मालाची ने-आण करणं खर्चीक होतं आणि समुद्रामार्गे ने-आण करणं वेळखाऊ होतं. म्हणून हा रेल्वेरूपी सुवर्णमध्य. या ट्रेनचं संचालन चीनच्या यिवू टायमेक्स इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंटतर्फे करण्यात येईल आणि आठवडय़ातून एकदा या ट्रेनची फेरी होईल.

१३०० मध्ये मार्को पोलोने चीनला जगाशी जोडणारा एका खुश्कीचा मार्ग शोधून काढला. ‘सिल्क रूट’ या नावाने हा मार्ग प्रसिद्ध होता. चीनच्या साम्राज्याचे शिलेदार बदलत गेले तसं या मार्गाचा जीर्णोद्धार होत गेला. जगाचा नकाशा पाहिला तर चीन पार उजव्या टोकाला आहे. डावीकडे पसरलेल्या जगाशी नियमितपणे संधान साधायचे असेल तर वाहतुकीचं जाळं निर्माण करायला हवं या विचारातून ‘वन बेल्ट, वन रोड’ अर्थात ‘ओबीओर’ नावाचा प्रकल्प उदयास आला. जुन्या सिल्क रूटचा हा नवा अवतार आहे. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी प्रकल्पासाठी खास पुढाकार घेतला. चीनचं नेतृत्व असलेल्या एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेकडून १०० बिलियन डॉलर्स मंजूर करण्यात आले. ते पुरेसे नाही म्हणून ‘ब्रिक्स’ संघटनेच्या न्यू डेव्हलपमेंट बँकेकडून १०० बिलियन डॉलर्स संमत करण्यात आले. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन फायनान्सिंग इन्स्टिटय़ूटची स्थापना करण्यात आली. सिल्क रोड फंड या नावाने ४० बिलियन डॉलर्स उभारण्यात आले. चीनने ग्रीकमधल्या पिरुस बंदराचं व्यवस्थापन स्वत:कडे घेतलं आहे. नेदरलँड्समधलं रॉटरडॅम आणि जर्मनीतल्या हॅम्बुर्ग बंदरांमध्ये चीनने गुंतवणूक केली आहे. यात भर म्हणून इंग्लंडमधील विगान, शिफोल एअरपोर्ट आणि नेदरलँड्समधल्या अ‍ॅमस्टरडॅममध्ये चीन लॉजिस्टिक अ‍ॅण्ड ट्रान्सपोर्ट हब विकसित करणार आहे. व्यापारउदिमासाठी दळणवळणाच्या सोयीसुविधा तयार होत असतानाच इंटरनेट व्यवस्थापनासाठी ‘डिजिटल सिल्क रोड’चं चीनच्या डोक्यात आहे.

शेकडो कोटींचा फायदा असल्यानेच चीनने हा घाट घातला आहे. खंडप्राय पसरलेला देश आणि त्यापल्याडच्या देशांना जोडत रोजगारनिर्मित्ती आणि व्यापारउदीम असा चीनचा दुहेरी हेतू आहे.

रेल्वे, रस्ते आणि जलवाहतुकीने चीनचं जगाला कनेक्ट होणं आपल्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. या प्रकल्पाच्या निमित्ताने ‘चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’ बळकट होतो आहे. ग्वादार बंदरावर चीनचा डोळा आहे. चीन-पाकिस्तान युती आपल्या दृष्टीने घातकच. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात कशी अडवणूक होते हे तुम्ही अनुभवलं असेलच. चीनने ७ देशांची सीमा पार करणारी ट्रेन सुरू केली आहे. ‘कर लो दुनिया मुठ्ठी में’सदृश प्रकल्पाचा ही ट्रेन एक भाग आहे. प्रचंड लोकसंख्या, असंख्य प्रश्नांनी वेढलेला चिनी ड्रॅगन आपल्यासाठी नवनवी आव्हानं निर्माण करतो आहे हे नक्की.

(छोटेखानी जागेत कोंबावा एवढा हा विषय लहान नाही. अर्थ-वाहतूक-आंतरराष्ट्रीय संबंध-राजकारण-इतिहास, भूगोल-विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा विविधांगी ज्ञानशाखांना व्यापणाऱ्या या मार्गाबद्दल हजारो पुस्तकं उपलब्ध आहेत. शक्तिमान चीनला समजून घेण्यासाठी जिज्ञासूंनी या साहित्याचा फडशा पाडावा. नाही तर मित्रवर्य गुगलजी आहेतच!)

viva@expressindia.com