मिसळ आणि महाराष्ट्र यांचं नातं वेगळंच आहे. राकट, कणखर, दगडांच्या देशा वगैरे असलेल्या महाराष्ट्राचं प्रतीक म्हणून मिसळीला मानाचं स्थान द्यायला हरकत नाही. खाबू मोशायने मध्यंतरी अशीच एक नितांतसुंदर मिसळ ठाणे शहरात खाल्ली. खाबूगिरीची अखेर करायला खाबूला चांगला पदार्थ मिळाला..

गेली तीनेक र्वष खाबू मोशायने तुम्हाला नानाविध ठिकाणी मिळणाऱ्या अनेक वेगवेगळ्या पदार्थाची ओळख करून दिली. खाबू मोशायच्या या अतरंगी खाबूगिरीमध्ये तुम्ही सगळेच अगदी भरल्या पोटाने आणि तोंडाला सुटलेले पाणी पुसत सहभागी झालात. खाबूची ही खाद्यमैफिल रंगतदार झाली. आता या मैफिलीतली ही भैरवी!

खाबू मोशायला गेल्या काही दिवसांपासून विलक्षण चुटपुट लागून राहिली आहे. उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या खाबूने गिरगावात जाऊन धूप छास पिऊन बघितलं. पुढल्या नाक्यावर जाऊन विलक्षण थंडावा देणारं फायर पानही तोंडात सारलं. हाजीअलीच्या नाक्यावरचं फ्रूट क्रीम खाऊन खिसाही हलका झाला. ठाण्यातल्या -३०१ फॅरेनाइटमध्ये तवा आइसक्रीमही फस्त केलं. तरी काही केल्या खाबूचा जठराग्नी तृप्त होई ना! तो थंड करण्यासाठी खाबूला काही तरी चमचमीत हवं होतं.

खाबूकडल्या चमचमीत पदार्थाची यादी काही छोटी नाही. ते पदार्थही खाबूने आवर्जून खाल्ले. रमजानच्या महिन्यातच मोहम्मद अली रोडची वाट चालणारा खाबू चक्क एके दिवशी, खरं तर रात्री, मोहम्मद अली रोडवरच्या त्या सुप्रसिद्ध गल्लीतही जाऊन आला. गेलाबाजार ठाण्यातला मामलेदार, बोरिवलीतला पिझ्झा पंच वगैरे पदार्थ खाऊन झाले. अगदी चमचमीत चवीसाठी शहापूरच्या त्या प्रसिद्ध मिसळीलाही खाबू तोंड लावून आला. कशानेच खाबूचं समाधान होत नव्हतं. शेवटी खाबूने आपल्या पोट्टेपोट्टींची एक मीटिंग लावली. बाबू खवय्या, फ्राइड मन्या, चमन ढोकळा, खादाड बुचकी अशा सगळ्यांना बोलावून खाबूने ग्रुप डिस्कशन केलं. डिस्कशनअंती ठाण्यात सुरूची मिसळ नावाची एक नवीन मिसळ सुरू झाल्याची वार्ता खाबूच्या कानांवर पडली.

ठाणे म्हटल्यावर मामलेदार मिसळ, हे समीकरण खाबूच्या मनात फिट्ट आहे. त्यामुळे सांप्रतकाळी ठाण्यात मिसळीचा हा कोणता नवा अवतार, असा प्रश्न खाबूच्या भेजेशरीफमध्ये घोंघावू लागला. खाबू तसा मामलेदार मिसळीचा लाइफटाइम मेंबर आहे. त्यामुळे या प्रश्नामागे खाबूचा इगो दुखावल्याची भावना नव्हतीच, असं म्हणता येणार नाही.

तशा खाबूने ठिकठिकाणच्या मिसळी रिचवल्या आहेत. वास्तविक महाराष्ट्राच्या सगळ्या राकट, रांगडय़ा रूपाचा परिपाक त्या मिसळीच्या तर्रेबाज र्तीत आणि कुरकुरीत फरसाणात सामावला आहे. बरं हा पदार्थही प्रांतागणिक बदलत जाणारा. म्हणजे मुंबईची मिसळ वेगळी, ठाण्यातली मामलेदारची वेगळी, शहापूरची वेगळी, नाशकात ती वेगळंच रूप धारण करते, कोल्हापुरात ती लालजर्द होते आणि पुण्यात तर चक्क बिनडोक पोहे अंगावर घेऊन येते. वास्तविक खाबूला पुणं प्रचंड आवडतं. पण पुण्यातली मिसळ ही मिसळच नाही, असं खाबूचं ठाम मत आहे. (अनेक खवचट प्रतिक्रिया जमेस धरूनही हे मत बदलणं खाबूला शक्य नाही.) पुण्याची मिसळ म्हणजे नुसतीच सरमिसळ आहे. (गाढवाला गुळाची चव काय, ही म्हण खाबूला माहीत असूनही आणि आता अनेक पुणेकरांच्या मनात त्या म्हणीची उजळणी चालू असूनही खाबू आपल्या या मतावर ठाम आहे.) पुणेरी मिसळीची ही तऱ्हा, तर नागपुरातल्या मिसळीवर ओतली जाणारी टॉमेटोची र्ती त्या मिसळीला वेगळाच आयाम देते.

अशा या जिव्हाळ्याच्या मिसळीचा वेगळा अवतार चाखण्यासाठी खाबू मोशाय आपल्या गँगबरोबर ‘सुरूची’कडे रवाना झाला. डोक्यात मामलेदार मिसळीचा तोरा होताच. ठाणे स्टेशनला पश्चिमेला उतरल्यावर लागणारा सुप्रसिद्ध गोखले रोड चालायला सुरुवात करायची. साधारण आठ ते दहा मिनिटं चालल्यावर आपण मल्हार टॉकीजच्या चौकात पोहोचतो. तिथूनही सरळ तीन हात नाक्याच्या दिशेने चालत राहायचं. थोडं पुढे गेल्यावर डाव्या हाताला सुरूची मिसळ हे छोटेखानी हॉटेल आहे. खाबू या हॉटेलात पोहोचला आणि त्या हॉटेलच्या मांडणीनेच खाबूची तबियत खूश झाली. एका अस्सल खवय्याने खूप समजून-उमजून या हॉटेलची सजावट केली आहे. हॉटेलात मोजून पाच टेबलं आहेत आणि पाचही टेबलं सदैव भरलेली असतात.

या हॉटेलात तीन मुख्य प्रकारच्या मिसळी मिळतात. त्याशिवाय पायनॅपल शिरा, बटाटेवडा, उपासाचे पदार्थ, दहीबुत्ती असे पदार्थही मिळतात. या तीन मुख्य प्रकारच्या मिसळींमध्ये सुरूची स्पेशल, कोल्हापुरी मिसळ आणि पुणेरी मिसळ यांचा समावेश होता. खाबूने आधीच सांगितल्याप्रमाणे खाबूला पुणेरी मिसळीत काडीचा इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे खाबूने थेट सुरूची स्पेशल मिसळ ऑर्डर केली. चवीसाठी कोल्हापुरी मिसळही मागवली. ऑर्डर येईपर्यंतच्या काळात नेहमीच्या सवयीप्रमाणे खाबूने हॉटेलचे रसग्रहण करायला सुरुवात केली. या हॉटेलच्या सजावटीत एक कलात्मक दृष्टिकोन प्रकर्षांने दिसतो. फुलपात्र किंवा ज्याला आपण साध्या मराठीत भांडं म्हणतो तसे पेले एकमेकांना जोडून त्यातून सोडलेला दिवा किंवा स्प्राइटच्या बाटल्या एकमेकींना चिकटवून त्यांच्या मधून सोडलेला दिवा, कृत्रिम कांद्याच्या माळा, मिसळ म्हणजे जणू काही एक चित्रपट आहे, अशा अंदाजाने तयार केलेलं एक पोस्टर अशा अनेक गोष्टी खाबूचं लक्ष वेधून घेत होत्या.

या गोष्टींमधून खाबूची नजर टेबलावर स्थिरावली. तोपर्यंत मिसळी आणि पाव बश्यांमध्ये बसून आले होते. साधारण एकाच हॉटेलात दोन वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मागवल्या, तर त्या भाज्यांमधील घटक पदार्थ बदलतात आणि ग्रेव्ही तीच राहते, हा खाबूचा आतापर्यंतचा अनुभव आहे. सुरूची हॉटेलने तो अनुभव मोडीत काढला. या हॉटेलमध्ये खाबूच्या पुढय़ात आलेली सुरूची स्पेशल मिसळ वेगळी होती. म्हणजे या मिसळीत वाटाणे होते आणि कोल्हापुरी मिसळीत मटकी होती, हा फरक तर एकदम मूलभूत झाला. पण त्या पलीकडे जाऊन कोल्हापुरी मिसळीला काळ्या आणि गरम मसाल्याचा झणका जाणवत होता. आणि सुरूची स्पेशल मिसळीची र्ती नक्कीच वेगळी होती. खाबू या भिन्न चवींवर प्रसन्न झाला. सुरूची मिसळ हे हॉटेल ठाण्यातल्याच अजित मोघे यांनी सुरू केलं. मिसळीबद्दलचं त्यांचं मनोगतही या हॉटेलात दर्शनी भागात लावलं आहे. हे मनोगत वाचून हा माणूस खाबूसारखाच जातीचा खाणारा असणार, याबाबत खाबूच्या मनात तिळमात्र शंका उरली नाही. असा तबियतीने खिलवणारा आणि मेहमाननवाजी करणारा मेजबान असेल, तर खायची रंगत आणखी वाढते. इथे तर स्वत: खाणारा मेजबान आणि त्याच्या टेबलांवर खाबूगिरी करणारी खाबू मोशायची गँग! मैफिल रंगली नसती, तरच नवल.

मिसळ खाल्ल्यानंतर ताक प्यायचं हे म्हणजे तीर्थयात्रा झाल्यावर गावात येऊन मावंदं घालायचं एवढंच घट्टं समीकरण! खाबूच्या गँगमधलं प्रत्येक पात्रं खाबूइतकंच वेडं असल्याने मिसळ-ताक हा नियम त्यांनाही अर्थातच माहीत होता. पण प्रत्येक हॉटेलात हे ताक जमतंच असं नाही. अनेक जण त्या ताकात कोथिंबीर, मिरच्या वगैरे कचरा टाकून त्याचा मठ्ठा करतात. काही जण त्याचं ताकपण घालवून नुसतंच पांढरं पाणी तुमच्या पुढय़ात ठेवतात. पण सुरूची मिसळीवर दिलेल्या ताकात लोण्याचे कण लागत होते. फ्राइड मन्याच्या दाढीत त्यातले काही अडकले पण. त्यामुळे फ्राइड मन्या हिमवर्षांवातून आल्यासारखा दिसत होता. खाबूने मात्र लोण्याचा एकही कण वाया न घालवता ग्लास रिकामा केला. एवढंच नाही, तर करकोचा जसा चोच सुरईत टाकून सुरईच्या टोकापर्यंतची खीर पितो, तसंच खाबूने जमेल तेवढी जीभ आत टाकून ग्लासही चाटूनपुसून लख्खं केला. ही मिसळ ५० रुपये प्लेट एवढय़ा वाजवी दरात उपलब्ध आहे. त्याशिवाय ताकाचेही १० रुपये एवढेच शुल्क आकारले जाते. त्यामुळे या मिसळीची र्ती खिशाला तरी गरम पडत नाही.

सुरूची मिसळ हे ठिकाण आणि इथे मिळणाऱ्या तीन प्रकारच्या (खरं तर दोनच म्हणायला हवं) मिसळी याबाबत ठाणेकरांनी अभिमान बाळगायला हरकत नाही. मिसळीचा शेवटचा घास संपेपर्यंत खाबू मोशायचा मामलेदारी तोरा पूर्णपणे उतरला होता, हे वेगळे सांगावयास नको!

‘लोकसत्ता व्हिवा’मधील खाबूगिरी संपवताना एका चांगल्या ठिकाणाची ओळख खवय्यांना करून द्यायला मिळाली, या समाधानात खाबूने ठाणे स्टेशनचा रस्ता धरला.

कुठे : सुरूची मिसळ, ठाणे पश्चिम

कसे जाल : ठाणे पश्चिमेला उतरून स्टेशनच्या बाहेर आल्यावर गोखले रोडवरून तीन हात नाक्याच्या दिशेने चालायला सुरुवात करायची. अधेमधे कुठेही उजवी-डावी न घेता चालत राहिलात, तर १०-१२ मिनिटांमध्ये डाव्या हाताला सुरूची मिसळ हे हॉटेल दिसतं. स्टेशनवरून रिक्षा करण्याचा पर्यायही आहे. रिक्षावाल्याला तीन हात नाका सांगा. मल्हार टॉकीजजवळ रिक्षा सोडून त्या टॉकीजच्या समोरच्या फुटपाथवरून तीन हात नाक्याच्या दिशेने चाला. अध्र्या मिनिटात तुम्ही सुरूची हॉटेलच्या बाहेर असाल.

viva@expressindia.com