रश्मि वारंग

हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी

परंपरा जपण्याच्या अनेक पद्धती आहेत. परंपरेच्या नावे आपली खासियत दडवून ठेवणं ही एक पद्धत आणि परंपरेवर नवतेचा साज चढवून ती जगभर नेणारी दुसरी पद्धत. यातील दुसरी पद्धत स्वीकारून देशविदेशात लोकप्रिय ठरलेला आणि सणासुदीच्या काळात हमखास देवाणघेवाण होणारा ब्रॅण्ड म्हणजे हल्दिराम! मिठाई आणि फरसाणची उत्तम बांधणी करून दीर्घकाळासाठी हे पदार्थ ताजे ठेवत वैशिष्टय़पूर्ण ठरलेल्या या ब्रॅण्डची ही कहाणी..

गंगाभीषण तथा हल्दिराम अगरवाल यांचा जन्म राजस्थानमधील बिकानेर येथे मारवाडी कुटुंबात झाला. फार लहान वयात ते आपल्या कुटुंबाच्याच व्यवसायात दाखल झाले. या कुटुंबाचा बिकानेरमधील भुजिया बाजार येथे भुजिया बनवण्याचा छोटासा व्यवसाय होता. गंगाभीषण पहिल्यापासूनच नवं काही करून पाहणाऱ्यांपैकी होते. त्यांच्या दुकानातील भुजिया अगदी पातळ तर असायच्याच शिवाय त्याला वैशिष्टय़पूर्ण नावाने विकायची कल्पकता गंगाभीषण यांच्याकडे होती. ही खमंग भुजिया ते ‘डुंगर सेव’ नावाने विकत. बिकानेरचे तत्कालीन महाराज डुंगरसिंग यांच्या नावामुळे आणि मुख्य म्हणजे उत्तम चवीमुळे भुजिया हातोहात खपत असे. १९४०-५०च्या दरम्यान आठवडय़ाला शंभर ते दोनशे किलो भुजियाचा बिकानेरकर फन्ना उडवत. हल्दिरामच्या या लोकप्रियतेमुळे सुरुवातीला दोन पैसे किलोने मिळणारी भुजिया २५ पैसे किलो ‘इतकी’ महागली. गंगाभीषण तथा हल्दिराम हे अतिशय काटकसरी आणि धोरणी होते. स्वत:च्या खर्चासाठी लागणारे दिवसाचे ५० पैसेदेखील ते गल्ल्यावरती रोकड सांभाळणाऱ्या व्यक्तीकडून मागून घेत. अशा व्यक्तींचे व्यवसायातील यश निश्चित असते.

एका लग्नाच्या निमित्ताने कोलकात्याला जाण्याचा योग आल्यावर तिथल्या खवय्यांकडे पाहता हल्दिरामना मोठी बाजारपेठ दिसली. बिकानेरमध्ये वाढणाऱ्या व्यवसायाचा काही भाग त्यांनी कोलकात्याला नेला. पुढे शिवकिसन आणि मनोहरलाल हे कर्तबगार नातू हाताशी आल्यावर दिल्ली, नागपूर इथे हा व्यवसाय वाढत गेला. भुजियाच्या जोडीला मिठाई, फरसाण आले. दुधापासून बनवलेली उत्पादनं आली. हल्दिराम यांचं भाग्य हे की, त्यांच्या पुढच्या पिढय़ाही त्यांच्याइतक्याच मेहनती निघाल्या. दिल्ली हल्दिराम दुकान सुरू झालं आणि काही काळातच शीख दंगलीच्या जाळपोळीत दुकानाचं नुकसान झालं. पण ही मंडळी हरली नाहीत. नव्या उमेदीनं पुन्हा व्यवसाय सुरू केला. काही वेळा नव्या-जुन्या पिढीचा संघर्षही झाला. पण सगळ्यांचं लक्ष्य एकच होतं- व्यवसाय मोठा करणं.

भारतातील गावोगावी मिठाई, नमकीन यांची स्वत:ची संस्कृती आहे. पण पॅकबंद नमकिन विकणारा हल्दिराम हा मोठा ब्रॅण्ड झाला. पदार्थाच्या चवीबरोबरच आकर्षक पॅकिंग, पदार्थ दीर्घकाळ टिकेल याची काळजी आणि गुणवत्ता यामुळे भारतातच नाही तर जगभरातल्या ५० देशांमध्ये हा ब्रॅण्ड पसरला. त्यात श्रीलंका, यूके, कॅनडा, यूएई, न्यूझीलंड, जपान, थायलंड इत्यादी देशांचा समावेश होतो. १९९७ मध्ये हल्दिरामने अमेरिका गाठली तेव्हा साधारणपणे बटाटय़ापासून तयार फरसाण, वेफर्स विकण्याकडे अधिक कल होता. पण अमेरिकेतील भारतीय स्टोअर्सनी हल्दिरामचे सर्व प्रकारचे नमकीन उपलब्ध करून दिल्यावर अमेरिकनांनी हल्दिरामच्या सगळ्याच उत्पादनांचे स्वागत केले.

भारतीयांसाठीही हा अत्यंत महत्त्वाचा ब्रॅण्ड आहे. रक्षाबंधन, दिवाळी, भाऊबीज अशा उत्सवी दिवसांत हल्दिरामची विविध उत्पादनं हमखास विकली जातात. चवीइतकाच हल्दिरामच्या बांधणीचा यात मोठा वाटा आहे. भेटरूपात नमकीन, मिठाई देण्याची उत्तम सोय हा ब्रॅण्ड करतो. त्यामुळेच ब्रॅण्ड ट्रस्ट रिपोर्टनुसार २०१४ साली सर्वात विश्वसनीय भारतीय ब्रॅण्डच्या यादीत हा ब्रॅण्ड ५५वा क्रमांक पटकावतो.

हल्दिरामची टॅगलाइन आहे ‘ऑलवेज इन गुड टेस्ट’ तसेच ‘टेस्ट ऑफ ट्रॅडिशन’. परंपरा आणि नवता यांची सांगड घालणारा ब्रॅण्ड यशस्वी होतोच. पारंपरिक पदार्थाची चव आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यामुळे हा ब्रॅण्ड लोकप्रिय आहे. सणासुदीलाच नाही तर रोजच्या चटकमटक खाऊसाठी हल्दिराम उत्पादनं दहा रुपयांपासून मिळतात. इतर स्थानिक पदार्थाच्या तुलनेत हल्दिरामच्या किंमती महाग वाटल्या तरी आपण ती ‘ब्रॅण्ड प्राईस’विना खळखळ देतो.

साधारणपणे ८१ वर्ष जुना असा हा ब्रॅण्ड परंपरेची चव देतानाच शिस्तबद्ध दूरदर्शी धोरणातून साध्या गोष्टींचं किती छान ब्रॅण्डिंग करता येतं याचा आदर्शही देतो. हल्दिराम नमकीनचं पाकीट फोडून एखाद्या डाएट चिवडय़ाचा, फरसाणचा किंवा शेवेचा बोकाणा यापुढे जेव्हा भराल तेव्हा जाणवणारी खमंग चव फक्त त्या पदार्थाची नसेल तर ती असेल हल्दिरामच्या परंपरेची, विश्वासार्हतेची आणि दूरदर्शी प्रयत्नांची!

viva@expressindia.com