तेजश्री गायकवाड

‘लेडीज अ‍ॅण्ड जेन्टलमेन शो इज अबाउट टू स्टार्ट ,काइंडली टेक युवर सीट’ अशी अनाउन्समेंट होते आणि काही क्षणांत फॅशन शो सुरू होतो. समोर प्रकाशात झगमगणाऱ्या रॅम्पवर मग एकामागून एक छान पावलं टाकत मॉडेल्स त्यांनी घातलेल्या डिझायनर कपडय़ांचं कलेक्शन प्रेझेंट करतात. आणि शेवटी शोज टॉपरबरोबर फॅशन डिझायनरचंही कोण कौतुक होतं. अवघ्या १५ मिनिटांच्या त्या शोमधलं ते ग्लॅमर, सुंदर मॉडेल्स, अप्रतिम कलेक्शन आणि रॅम्पवॉकसाठी वापरलेलं म्युझिक बघून आपलं मन सुखावतं, पण या १५ मिनिटांच्या शोसाठी रॅम्पमागे कितीतरी लोक मिनिटामिनिटाचा हिशोब ठेवत काम करत असतात. पडद्यामागे हे काम कसं चालतं, किती कुशल तंत्रज्ञांचे हात आणि मेंदू हा शो पूर्णत्वाला नेण्यासाठी कार्यरत असतात त्याची ही रॅम्पमागची कथा..

एखादा फॅशन शो म्हणजे लग्नसमारंभापेक्षा कमी नसतो. जसे हजारो लोक एकत्र येऊन लग्नकार्य पार पाडतात तसंच काहीसं फॅशन शोचंही असतं. कोणताही कार्यक्रम करायचा तर त्याची पूर्वतयारी ही आलीच. छोटा असो वा मोठा फॅशन शोची सुरुवात साधारणपणे एक आठवडा तरी आधीच होते. फॅशन डिझायनर त्याच्या कलेक्शनमागे अनेक महिने कधी कधी अनेक वर्षही कष्ट घेत असतो. पण त्याच्या कष्टाचं चीज त्याला एका आठवडय़ात नीट बसवून शोच्या दिवशी सगळ्यांसमोर मांडायचं असतं किंवा सादर करायचं असतं. डिझायनर्सपासून ते स्टायलिस्ट, मेकअप आर्टिस्ट, हेअर स्टायलिस्ट, को-ऑर्डिनेटर, त्यांचे असिस्टंट्स, वॉर्डरोब असिस्टंट्स, कॅटर्स पर्सन ते क्लीनअप पर्सनपर्यंत मोठ्ठीच्या मोठ्ठी टीम शोसाठी काही दिवस आधीपासूनच सज्ज असते. झगमगत्या दुनियेतील तारेतारकांचे चेहरे तर आपल्याला पटकन दिसतात पण त्या चेहऱ्याची काळजी घेणारे, त्यांना काय हवं नको ते बघणारे, वेळप्रसंगी त्यांचे नखरे झेलणाऱ्या पडद्यामागील टीमचे कष्ट लोकांना सहजासहजी दिसत नाहीत. पण त्यांच्या उत्कृष्ट टीमवर्कमुळेच आठवडय़ाभराचा हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडतो. शोच्या काही दिवस आधी मॉडेल सिलेक्शन होतं. डिझायनरने बनवलेल्या कलेक्शननुसार कोणती किंवा कोणतं मॉडेल परफेक्ट बसेल हे बघून त्यांची निवड होते. त्यानंतर फीटिंग केलं जातं. फीटिंगमध्ये डिझायनरचे कपडे मॉडेल्सला घातले जातात आणि त्यांच्या बॉडी मेजरमेंटनुसार कपडय़ांची फीटिंग केली जाते. फॅशन डिझायनरने बनवलेल्या प्रत्येक कलेक्शनमागे काही तरी कथा असते, काहीएक प्रेरणा असते. आणि तीच प्रेरणा, विचार त्याला आपल्या कपडय़ांमधून लोकांसमोर ठेवायचा असतो. आणि याचसाठी फीटिंगनंतर मेकअप, हेअर, रॅम्पवॉकची कोरिओग्राफी करणारी मंडळी यांचा प्रवेश होतो.

कोणत्याही फॅशन शोचा गाभा म्हणजे रनवे. आणि त्याचं उद्दिष्ट म्हणजे डिझायनरने बनवलेले कपडे लोकांच्या चटकन नजरेत भरतील आणि पटकन मनात उतरतील इतक्या व्यवस्थितपणे प्रेक्षकांना दाखवायचे. आणि यासाठी महत्त्वाचा ठरतो तो रनवे वॉक. रनवेवर कधी यायचं, कसं यायचं, कोणापाठोपाठ कोणी यायचं, किती मिनिटं थांबायचं, कशी पोज द्यायची या सगळ्या गोष्टी रनवे कोरिओग्राफर ठरवतो. डिझायनरचं कलेक्शन सुंदररीत्या त्याहीपेक्षा नाटय़मय पद्धतीने प्रेक्षकांसमोर आणण्याचं काम रनवे कोरिओग्राफरला करावं लागतं. रनवे कोरिओग्राफी ही एखाद्या नाटकापेक्षा कमी नसतं. प्रत्येक कलेक्शनची स्वत:ची एक कथा असते. ती त्याच्या कपडय़ांतून, सिल्हाऊट्समधून, अ‍ॅक्सेसरीजमधून आणि कपडय़ांच्या रंगांवरूनही दिसून येते. डिझायनरच्या अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर त्याचं कलेक्शन तयार होत असतं. कपडय़ांबरोबरच डिझायनरची दृष्टी, त्याचं आधीचं कलेक्शन, त्याच्या कलेक्शनमागची प्रेरणा या साऱ्या गोष्टी रॅम्पवर कोरिओग्राफीच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न कोरिओग्राफर करतो. मॉडेल, त्यांचा मेकअप त्यांची स्टाइल, शोचं संगीत (लाइव्ह किंवा रेकॉर्ड), रॅम्पची जागा, लाइट, मॉडेलची मुमेंट्स , सेट प्रॉडक्शन या सगळ्या गोष्टी एकत्र करून, नीट लक्षात ठेवूनच कोरिओग्राफी केली जाते. या सगळ्या गोष्टीची सुरुवात डिझायनरच्या कलेक्शनच्या माहितीने होते.

फॅशन शो सुरू होण्याआधी ही एवढी तयारी करावी लागते. तर नेमक्या फॅशन शोच्या दिवशीही या टीम काम करत असतात. शोसाठी मॉडेल्सच्या पायाच्या नखापासून ते केसांपर्यंतचा अखंड मेकओव्हर सातत्याने होत असतो. फॅशन वीकच्या वेळी शोनुसार दिवसातून चार-पाच वेळा मॉडेल्सना नवनवीन  मेकअप करावा लागतो, अगदी नेलपेंटदेखील बदलली जाते. या सगळ्यासाठी खास मेकअप आर्टिस्ट, हेअरस्टायलिस्ट असतात. स्वत: मॉडेल्ससुद्धा त्यांच्या मेकअप किंवा हेअरस्टाइलमध्ये फेरफार करू शकत नाहीत. सर्व मॉडेल्सचा मेकअप त्या शोच्या संकल्पनेनुसार एकसारखाच असतो, बहुतेकदा फक्त  शो स्टॉपरचा मेकअप व हेअरस्टाइल वेगळी असते. मॉडेल्सना मदत करण्यासाठी, त्यांचं कोणतं गार्मेट पहिलं, कोणतं दुसरं हे सांगण्यासाठी डिझायनरने प्रत्येक ड्रेसवर दिलेली ज्वेलरी न विसरता त्याच ड्रेसवर त्याच मॉडेलला घालण्यासाठी, मॉडेल्सना काही हवं नको ते पाहण्यासाठी प्रत्येक मॉडेलमागे एक वॉर्डरोब असिस्टंट नेमलेले असतात. मॉडेल व्यवस्थित तयार झाली आहे की नाही? चुकूनही (झीप लावायची, पदर पिनअप करायचा )काही राहिलं तर नाही ना? किंवा पेहराव परिपूर्ण झाला आहे की नाही याची जवाबदारी वॉर्डरोब असिस्टंटकडे असते. मेकअप, हेअर, ड्रेस झाल्यावर मॉडेल्स शोसाठी लाइनअप करतात. त्यांना वेळेत बाहेर काढणं, त्यांची चोख व्यवस्था करणं, बॅकस्टेज आणि फ्रंटस्टेजमधल्या घडामोडी जाणून घेऊन तसे बदल करणं याची जबाबदारी को-ऑर्डिनेटरकडे असते. हा को-ओर्डिनेटर रनवेच्या अगदी समोरच्या बाजूला वरच्या ठिकाणी बसलेला असतो. याशिवाय म्युझिक, लाइट्स टीमही त्याच्याबरोबर तिथे असते. वरती बसलेला को-ऑर्डिनेटर आणि बॅकस्टेजला असलेला को-ऑर्डिनेटर यांच्यात शो सुरू होण्यापूर्वी आणि शो सुरू असताना सतत संवाद सुरू असतो. एक मॉडेल आला त्याने टर्न घेतला, आता पुढचा मॉडेल पाठवा, स्टेजवर जर चुकूनमाकून एखाद्या मॉडेलला काही समस्या आलीच तर तत्काळ पुढच्या मॉडेलला उशिरा पाठवायला सांगणं, शोच्या शेवटी फॅशन डिझायनरचं नाव अनाउन्स करणं अशी त्याची सगळी कामं तालेवार सुरू असतात. पडद्यामागच्या या विश्वाची बाहेरच्यांना अजिबात कुणकुण न लागू देता प्रत्येकजण पडद्यामागे शो पुढे नेत असतो.

फॅशन शो सुरू होतो आणि संपतो तेव्हाही आपल्यालासमोर दिसणाऱ्या मॉडेल्स, त्यांचे कपडे, शो स्टॉपर कलाकार, फॅशन डिझायनर्स आणि समोर बसलेले सेलेब्रिटी चेहरे यांच्याशिवाय फारसं काही लक्षात येत नाही. मात्र रॅम्पमागे सुरू असलेल्या या मिनिटामिनिटाच्या नाटय़ामुळेच पुढे रॅम्पवरचं फॅ शनविश्व साकारलं जातं. फॅ शन शो म्हणजे फक्त मॉडेल्स आणि फॅशन डिझायनर दोघांचंच समीकरण नाही. तर एक पूर्ण इंडस्ट्री आणि त्यातले कुशल हात यामागे असतात या जाणिवेतून रॅम्पवरचा शो पाहिला तर न जाणो तुम्हाला तुमचं काही नवं क्षेत्र गवसेलही!