चारचौघं तोच तो विचार करत असतील तर त्यांच्यापेक्षा काही तरी वेगळा विचार हमखास केला जातो. हा चौकटीबाहेर विचार करणं खरंच ्गरजेचं असतं का? तर नाविन्याचा ध्यास घेणाऱ्या तरुण मनांना तो गरजेचा वाटतो. तसा विचार करणं शक्य असतं का? आणि  ते कसं?, हे जाणून घेऊयात!

काही तरी वेगळं, युनिक.. यू नो, ‘आऊट ऑफ द बॉक्स’ पाहिजे, विचार करा.. अशा आशयाचे संवाद अनेकदा कॉर्पोरेट मीटिंग्ज, कलाक्षेत्र आणि आनुषंगिक ठिकाणी कानी पडतात. चिक्कार डोकेफोड अर्थात कल्पनांची-विचारांची होते आणि त्यापैकी एखादी गोष्ट मान्य होऊन लोक त्या दिशेने कामाला सुरुवात करतात. काही वेळा मात्र काही तरी हातून निसटतंय या जाणिवेतून पुन्हा भेटी आणि चर्चा रंगतात.  अशा चर्चाच्या घुसळणीतूनच एखादी नामी कल्पना ‘क्लिक’ होते. त्यावर सखोल विचार केला जातो आणि ती प्रत्यक्षात आकारते.. हे सगळं घडतं, कारण असतं – ‘आऊट ऑफ द बॉक्स थिंकिंग!’ ठरावीक चौकटीच्या पल्याड जाऊन केलेला विचार, सुचणाऱ्या कल्पना वगैरे वगैरे.

‘आऊट ऑफ द बॉक्स थिंकिंग’ या संकल्पनेचा अर्थ आहे – काही तरी सर्जनशील विचार करणं, पारंपरिक वाटा चोखाळण्यापेक्षा वेगळी वाट शोधणं किंवा ती गोष्ट वेगळ्या दृष्टिकोनातून पाहाणं. काही वेळा या संकल्पनेला स्मार्ट थिंकिंग असा टॅगही लावला जातो. चारचौघं तोच तो विचार करत असतील तर त्यांच्यापेक्षा काही तरी वेगळा विचार हमखास केला जातो, तो या प्रक्रियेत. हा चौकटीबाहेर विचार करणं खरंच ्रगरजेचं असतं का? तर नाविन्याचा ध्यास घेणाऱ्या मनांना तो गरजेचा वाटतो. तसा विचार करणं शक्य असतं का? आणि  ते कसं?, हे जाणून घेऊयात!

* नव्या विचारांचं स्वागत : आपल्याला सगळं काही येतं, समजतं अशी टिकोजीरावगिरी करणं सोडून द्यायला हवं. शिकणं ही प्रक्रिया कधीच थांबत नसते. तिला वयाची चौकट नसते. मात्र शिकणं म्हणजे केवळ माहिती मिळवणं नव्हे, तर स्वत:चा बौद्धिक विकास करणं. नवीन विचारांचं स्वागत कराल, नवीन कल्पना सुचायला वाव द्याल तेव्हा स्व-विकास आपसूक होईल.

* मन लावून काम करा : आपलं काम अगदी मन:पूर्वक करायला हवं. ते अर्धवट करणं किंवा त्याचा अर्धवट विचार करणं चुकीचं ठरतं. काम करताना नव्या पद्धतीचा विचार केलात आणि तो अवलंबलात तर तेच ते काम आणि नावीन्यपूर्ण पद्धतीने केलेलं काम यातलं अंतर आपल्यालाही जाणवतं.

* ऐकावे जनाचे : आपण दुसऱ्याचं ऐकतो का, त्यावर कसा आणि किती विचार करतो आणि त्यामुळे आपल्या विचारांत फरक पडतो का, हेही विचारपूर्वक पडताळायला हवं. समोरच्याचं म्हणणं ऐकून त्यातले चांगले मुद्दे विचारात घेऊन घेतलेल्या निर्णयाने फरक पडू शकतो.

* भूमिका नको : कोणताही विचार मग तो आपल्या मनातला असो किंवा दुसऱ्याने सुचवलेला, तो आधी नीट ऐकून आणि समजून घ्यावा. कल्पनाशक्ती प्रत्येकाकडे असतेच, केवळ तिचा वापर कमी-जास्त प्रमाणात केला जातो, हे लक्षात ठेवावं. ‘आपलं तेच योग्य आणि बाकीचे चूक’ अशी भूमिका घेऊ  नये.

viva@expressindia.com

 

 ‘ही सिद्धी आहे, प्रसिद्धी नाही’

‘आऊट ऑफ द बॉक्स थिंकिंग’मध्ये सर्जनशीलता अर्थात क्रिएटिव्हिटी आवश्यक आहे. एकंदर क्रिएटिव्हिटीची गरज असणाऱ्या सगळ्याच क्षेत्रांमध्ये असा चौकटीबाहेरचा विचार करणं, ही गोष्ट आवश्यक आहे. नेहमीच्याच पठडीतल्या विचार करण्यामुळे नवनिर्मिती होऊ  शकत नाही.  कोणतीही गोष्ट नव्याने घडवायची असेल तर त्या दृष्टीने विचार करावा लागतो. मग ती गोष्ट रोजच्या जगण्यातली असू शकेल, स्वयंपाक असो, लिखाण असो किंवा कथा-गाणं-चित्रपट निर्माण करणं असो.. कुठल्याही गोष्टीला ही संकल्पना लागू ठरते.  त्यामुळे एकूणच व्यक्तिमत्त्व विकासालाही उपयोग होतो.

ही संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी खुलेपणा लागतो. आपल्याला येणारे अनुभव घेण्यासाठीही खुलेपणा लागतो. उदाहरणार्थ- एखाद्या नेहमीच्या वापरातल्या वस्तूच्या उपयोगाव्यतिरिक्त तिचा काय काय उपयोग करता येईल, हा विचार करणं. दुसरं म्हणजे आपल्याला चौकटीच्या बाहेर जाऊ न विचार करता येतो, यावर मुळात श्रद्धा पाहिजे. तीच नसते अनेकदा. अशा वेळी कित्येकदा लोक काय म्हणतील वगैरे अनेक प्रकारची तथाकथित सामाजिक बंधनंही आपल्यावर असतात. एक व्यक्ती म्हणून आपण जगायचं असेल तर ही चौकट ओलांडणं गरजेचं ठरतं. आपलं अवकाश ठरवावं लागतं. ते अवकाश दृश्यमान करण्यासाठी वेगवेगळ्या अनुभवांना सामोरं जायची तयारी पाहिजे. अनुभव घेण्याची संवेदनशीलता जास्तीत जास्त सक्षम होणं गरजेचं आहे.

‘आऊ ट ऑफ द बॉक्स थिंकिंग’ या संकल्पनेची क्षमता प्रत्येकात असतेच. ती वापरलीच जात नाही. आपल्या शिक्षणपद्धतीत कशा प्रकारे शिकवलं जातं, हा एक मोठाच चर्चेचा विषय आहे. अशा प्रकारचा वेगळा विचार नेहमी करावाच लागतो. जाहिरात क्षेत्रासारखं क्षेत्र करिअर म्हणून निवडलं तर तसा विचार करावा लागतो. या पद्धतीचा विचार करताना आपलं जे एकमेवाद्वितीय असणं हे सिद्ध होतं. आपण या जगात एकमेवाद्वितीय आहोत, असं या जगात आपल्याला कुणीच सांगत नाही. बहुतांशी वेळा तू अमक्यासारखा किंवा तमकीसारखी हो, असं सांगितलं जातं; पण तू तुझ्यासारखा किंवा तुझ्यासारखी हो, असं कुणीच सांगत नाही. म्हणून चौकटीपल्याडचा सर्जनशील विचार करणाऱ्यांचं प्रमाण कमी आहे. आपल्यातल्या सुप्त गुणांचा शोध घेण्यासाठी मेडिटेशन ही अत्यंत चांगली प्रक्रिया आहे. कारण मेडिटेशन ही अशी एकच गोष्ट आहे, जी तुम्हाला स्वत:कडे घेऊन जाते. मेडिटेशनचा अर्थ सेल्फ अवेअरनेस – आत्मभान. म्हणून तरुणाईने मेडिटेशनकडे जरूर वळावं.

अलीकडे समाजमाध्यमांवर काही तरी हटके गोष्टी करून झळकायचं, चर्चेत राहायचं हा ट्रेण्ड होऊ  घातला आहे, तो बोकाळतो आहे. मात्र ‘आऊ ट ऑफ द बॉक्स थिंकिंग’ ही सिद्धी आहे, प्रसिद्धी नाही. ते आतून सुचणं असतं, वेगळा विचार असतो. खेडेगावातली एखादी अशिक्षित बाईही केलेल्या पोळ्या एखादं फूल उमललेलं दिसावं, इतक्या छान पद्धतीने डब्यात मांडते. हे ती कुठेही शिकायला गेलेली नसते.. क्रिएटिव्हिटी विशिष्ट चौकटीपलीकडे गेली असली पाहिजे. ती विचार, अवकाश, कथित सामाजिक बंधनांच्या चौकटीत अडकून उपयोग नाही.

– डॉ. मनोज भाटवडेकर, मानसोपचारतज्ज्ञ