अलिबाग, गोवा की राजस्थान-काश्मीर असे घरच्यांबरोबर कधी काळी बेत आखणारी तरुण मंडळी आता गायब झाली आहेत. छोटेखानी बॅग पॅक करत आपल्याच गावात फिरण्यापेक्षा अवकाश मार्गाने सीमोल्लंघन करत देशोदेशीचे जग पाहण्याचं स्वप्न उराशी घेऊन ही पिढी वावरताना दिसते. त्यांच्या ट्रॅव्हल डिक्शनरीमध्ये नवनव्या देशांची नावं दाखल होतायेत..

गेल्या काही वर्षांमध्ये तरुणाईला त्रस्त समंध करून सोडणारी जागा कोणती असेल तर ते त्यांचे कामाचे ठिकाण.. लॅपटॉपसमोर बसून काम करताना साडेआठ तासांची शिफ्ट कधी बारा तासांवर जाते हे कळतही नाही ही जवळपास सर्वच तरुणांची करुण कहाणी. पण, त्यातही वीकेंड म्हणजे थोडीशी उसंत मिळण्याची संधी. ही उसंत मग दोन दिवसांची असेल नाही तर सणासुदीच्या निमित्ताने मिळणारी मोठी सुट्टी असेल त्याचा पुरेपूर उपयोग केला जातो. फिरणं म्हणजे अलिबाग, गोवा की राजस्थान-काश्मीर असे घरच्यांबरोबर कधी काळी बेत आखणारी तरुण मंडळी आता गायब झाली आहेत. छोटेखानी बॅग पॅक करत आपल्याच गावात फिरण्यापेक्षा अवकाश मार्गाने सीमोल्लंघन करत देशोदेशीचे जग पाहण्याचं स्वप्न उराशी घेऊन ही पिढी वावरताना दिसते. त्यांच्या ट्रॅव्हल डिक्शनरीमध्ये नवनव्या देशांची नावं दाखल होतायेत..

कामापासून वैवाहिक नात्यांपर्यंत कु ठल्याही ताणातून बाहेर पडायचं तर नेहमीच्या वीकेंडचा एक्सटेण्डेड वीकेण्ड करत कुठल्या तरी नवीन ठिकाणी भटकण्याची ओढ या पिढीला जरा कणभर जास्तच आहे. सुट्टीच्या दिवशी घरात निवांत राहून आराम करणं हे त्यांच्या सवयीत बसत नाही. शिवाय, सोशल मीडियामुळे अवघं जग हातात एका क्लिकवर आलं असल्याने त्यांच्या भटकंतीच्या आवडीनिवडींना तर पंख फुटले आहेत. फेसबुक, इन्स्टाग्रामवर येणाऱ्या भटकंतीच्या पोस्ट, बॉलीवूडच्या दर नव्या चित्रपटाबरोबर ओळखीची होत गेलेली परदेशी शहरं पाहिली की तरुणाईच्या भटकंतीच्या स्वप्नांना दिशा मिळते ती नव्या वाटांचे वाटसरू होण्याची, त्या नवीन वाटांवर नवीन सोबती शोधण्याची आणि जगण्याचा उत्स्फूर्त आनंद घेण्याची..

‘बिफोर माय लास्ट ब्रिथ आय वुड लव टु व्हिजिट..’ अशी गाळलेल्या जागा भरा सारखी दिसणारी पोस्ट फेसबुक वॉलवर दिसली की कमेंटबॉक्समध्ये प्रत्येक जण आपल्या आवडत्या ठिकाणाचं नाव देतं आणि त्यात आपल्या आवडत्या व्यक्तीला टॅगही करतं. मुख्य म्हणजे यामध्ये त्या ठिकाणांच्या नावांमध्येही बरंच नावीन्य पाहायला मिळतं आहे. सर्वसाधारण ठिकाणांपेक्षा एखाद्या हटके ठिकाणची वाट धरण्याला आजची तरुणाई प्राधान्य देते आहे. फिरस्तीच्या या नव्या ट्रेण्डविषयी अनेकांनाच कुतूहल आहे. त्यामुळे या ट्रेण्डला सर्वात जवळून पाहणाऱ्या ‘वीणा वर्ल्ड’च्या वीणा पाटील यांच्या मते पर्यटन हे आता देशांतर्गत सीमित राहिलेलं नाही. जागतिकीकरणाच्या रेटय़ामुळे पर्यटनाचा अवाकाही वाढला आहे त्याचाच हा परिणाम.. वेगवेगळ्या देशांतून फिरस्तीचा अनुभव घेण्याचा हा ट्रेण्ड आता भारतात आला असला तरी जागतिक स्तरावर अशा भ्रमंतीला पूर्वीपासूनच प्राधान्य आहे. आपल्याकडे गेल्या काही पिढय़ांमध्ये भविष्यासाठी पैशांची साठवण करण्याची सवय होती. पण, आता मात्र त्यामध्ये बदल झाला असून सतत भविष्याची चिंता करत राहण्यापेक्षा वर्तमानाचा मनमुराद आनंद लुटण्याकडे अनेकांचा कल आहे, असं त्यांनी सांगितलं. हा ट्रेण्ड तरुणांमध्ये वाढत चाललाय यामागचं कारण स्पष्ट करताना पर्यटन आता खिशाला परवडू लागलंय हा महत्त्वाचा मुद्दा आहेच. त्याहीपेक्षा एखाद्या नवीन देशाला भेट दिल्यानंतर जो तजेला, उत्साह मनाला मिळतो त्या आनंदासाठी अनेक जण अनोळखी प्रदेशाच्या सफरीला महत्त्व देऊ लागले आहेत. शिवाय, एव्हिएशनमध्ये झालेली क्रांती, तंत्रज्ञानातील बदल याचा परिणाम पर्यटनाच्या संकल्पनांमध्येही आमूलाग्र बदल होण्यात झाला आहे, असेही त्या म्हणाल्या. थोडंथोडकं सामान घेऊन, नेपाळ, भूतान यांसारख्या देशांना भेट देत कोणत्याही शानशौकतीची अपेक्षा न करत फक्त आणि फक्त नवं काही तरी पाहण्याचा, जाणून घेण्याचा उत्साहच आजच्या तरुणाईमध्ये पाहायला मिळतो आहे. हीच संकल्पना विस्तृत पद्धतीने सांगताना ‘वंडरिंग सोल्स’ या नव्या जोमाच्या बॅकपॅकर्स ग्रुपचा सबिजीत कुमार म्हणाला, ‘फार कमी वयातच नवनवीन देश फिरण्याच्या या सवयीविषयी आणि आकर्षणाविषयी सांगायचं तर अमुक एका ठिकाणाला भेट देण्याची तीव्र इच्छा, त्या इच्छेच्या बळावर संबंधित ठिकाणाची पूर्ण माहिती मिळवत कोणाच्या सोबतीने किंवा मग एकटय़ानेच इंटरनेट नावाच्या ब्रह्मास्त्राच्या मदतीने या ठिकाणांकडे निघण्याची सवयच आजच्या तरुणाईने अंगी बाणवली आहे. त्यामुळे फक्त मनातल्या मनात आपल्या आवडत्या ठिकाणाचं नाव लिहून एकसारखं त्याला बॅकस्पेस मारण्याचं प्रमाण आता कमी झालं आहे.’

पर्यटनाविषयीची आवड नेमकी कुठून येते, हा प्रश्न जर का तुम्हाला पडत असेल तर संकेत दांडेकरने त्याचं उत्तर गमतीशीर अनुभवातून दिलं आहे. ‘लहानपणी नातेवाईक, शेजारी, पालक कुठे जायला निघाले की सुटकेससोबत नेत असत. त्यामुळे माझ्या शब्दभंडारामध्ये ‘सुटकेस’ हा शब्द ठासून बसला खरा. पण, मला त्या शब्दामध्ये काही बदल करायचे होते. या सुटकेसपासून सुटका करून घ्यायची होती. भटकंतीला जाताना कोणतंही ओझं सोबत न्यायचं नव्हतं. अगदी कोणतंच नाही.. त्यामुळेच मीसुद्धा बॅकपॅकिंग टुरिझमच्या या ट्रेण्डचा पूर्ण आनंद घेतोय,’ असं तो सांगतो. सहसा अनोळखी व्यक्तींसोबत बोलतानाही नेहमी सावधगिरी बाळगली जाते. मात्र या नव्या ट्रेण्डमुळे अनेकांच्या स्वभावामध्ये ती सहजताही आलीये. नव्या प्रदेशात फिरताना अनेकांशी ओळख करण्याची संधी तर मिळतेच पण त्यासोबत काही भन्नाट अनुभव आणि भन्नाट व्यक्तींच्या आयुष्याचा आपणही एक भाग होऊन जातो. आपल्या आयुष्याच्या डायरीत एक नवं पान जोडलं जातं. तेही अनोळखी व्यक्तींकडून.. भ्रमंतीचा हा नवा दृष्टिकोन आजच्या तरुणाईच्या बोलण्यातून आणि वागण्यातून प्रकर्षांने जाणवतो. तरुण पिढीच्या या एकंदर अंदाजाचाच हेवा वाटतो, असं वीणा पाटील सांगतात. मुळात हल्लीचं पर्यटन म्हणजे उगाचच इतरांना ईर्षां वाटावी म्हणून केली जाणारी गोष्ट नसून रोजच्या ताणतणावापासून, दूर जात वेगळा थरार अनुभवण्यासाठी धरलेल्या या वाटा आहेत. त्यामुळे शिमला, मनालीपासून ते थेट न्यूझीलंडपर्यंतच्या ठिकाणांकडे अनेकांचे पाय वळतायेत, असं त्या म्हणतात. भूतान, नेपाळ, थायलंड, आफ्रिका, पॅरिस, न्यूझीलंड या देशांना तरुणाईकडून पसंती मिळतेय.


पूर्वी प्रवासवर्णनं वाचल्याशिवाय एखाद्या नव्या देशाची माहिती मिळत नव्हती. आता इंटरनेटवर त्याची फक्त माहिती मिळत नाही. तर तिथे जाण्यापासून राहण्या-खाण्यापर्यंतच्या सोयी इथूनच करता येतात. हिंदी चित्रपटांतून याआधी दिग्दर्शक यश चोप्रांनी स्वित्र्झलड लोकप्रिय केलं होतं. आता तर दर एका हिंदी चित्रपटातून नव्या देशाची ओळख होते. बँकॉक, सिंगापूर, दुबई, मलेशिया ही तर नित्य दिसणारी ठिकाणं. याशिवाय, ‘तमाशा’ चित्रपटातून दिसलेलं फ्रान्समधलं कोर्सिका, ‘शिवाय’चं बल्गेरिया आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘जब हॅरी मेट सेजल’मधून तर प्राग, हंगेरी, बुडापेस्ट, अ‍ॅमस्टरडॅम सगळीकडची सफर घडवून आणली आहे. ‘माझ्या मते हल्लीच्या बॅकपॅकर्समध्येही दोन गट पाहायला मिळतात,’ असं शारदा सिंह म्हणतो. स्वत:च्याच देशात फिरून काही गोष्टी जाणून घेण्यास प्राधान्य देणारा एक गट आहे. तर दुसरा असा मोठा गट आहे, जो चौकटीबाहेरील देशांना भेट देऊन त्यांची संस्कृती आणि राहणीमान जवळून अनुभवण्याची इच्छा मनी बाळगून असतो. त्यामुळे कोणा एकाचं प्राधान्य आपल्याच देशातील कसोलला असेल तर त्याच ठिकाणी दुसरा कोणी अ‍ॅमस्टरडॅम आणि पॅरिसला जाण्याची स्वप्न रंगवत असतो. विविध देशांमध्ये जाण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या सुविधा, खर्च करण्यासाठीची तयारी आणि विशलिस्टवरचं एक एक ठिकाण हुडकण्याची तीव्र इच्छा आजच्या तरुणाईला काही शांत बसू देत नाही. अर्थात, देशाबाहेरच्या भ्रमंतीसाठी सर्वात महत्त्वाचं असते ते म्हणजे ‘बजेट’. आपल्या खिशाला जास्त चाप बसणार नाही, मुख्य म्हणजे पुढच्या काळातही आपल्याला फिरता यावं, नव्या ठिकाणांना भेट देता यावं, या गोष्टी लक्षात घेऊनच आपल्या आवडत्या देशांना भेट देण्याची एक यादीच तयार केली जाते. आणि मग त्या यादीनुसार खर्चाचे, सुट्टय़ांचे नियोजन करत एकेक सफर पूर्ण केली जाते. सध्या अनेक पर्यटन कंपन्या आणि ‘वंडरिंग सोल्स’सारखे ग्रुप्स बॅगपॅकिंग टूर्स आयोजित करतात. काही लोकप्रिय ठिकाणांबरोबरच लेह-लडाखची सफर वेगवेगळ्या पद्धतीने करणारी मंडळी आहेत. इथे रोडट्रीप, बाइक राइडिंगचे असे आपल्याला हवे ते पर्याय निवडून भ्रमंती करण्यावर जसा भर आहे. तसंच बाली, मालदीव, अंदमान-निकोबार बेट असे एकेक नवनवे प्रांत तरुणाईच्या विशलिस्टमध्ये दाखल होतायेत. मग विचार कसला करताय? तुमची विशलिस्टही तयार आहे ना?

हा ट्रेण्ड तरुणांमध्ये वाढत चाललाय यामागचं कारण स्पष्ट करताना पर्यटन आता खिशाला परवडू लागलंय हा महत्त्वाचा मुद्दा आहेच. त्याहीपेक्षा एखाद्या नवीन देशाला भेट दिल्यानंतर जो तजेला, उत्साह मनाला मिळतो त्या आनंदासाठी अनेक जण अनोळखी प्रदेशाच्या सफरीला महत्त्व देऊ लागले आहेत. शिवाय, एव्हिएशनमध्ये झालेली क्रांती, तंत्रज्ञानातील बदल याचा परिणाम पर्यटनाच्या संकल्पनांमध्येही आमूलाग्र बदल होण्यात झाला आहे.

वीणा पाटील

‘लहानपणी नातेवाईक, शेजारी, पालक कुठे जायला निघाले की सुटकेस सोबत नेत असत. त्यामुळे माझ्या शब्दभांडारामध्ये ‘सुटकेस’ हा शब्द ठासून बसला खरा. पण, मला त्या शब्दामध्ये काही बदल करायचे होते. या सुटकेसपासून सुटका करून घ्यायची होती. भटकंतीला जाताना कोणतंही ओझं सोबत न्यायचं नव्हतं.

संकेत दांडेकर

viva@expressindia.com