News Flash

‘जग’ते रहो : थोडासा ‘ओमानी’ हो जाए

इथले पुरुष डिशडॅशा आणि बायका अबाया घालतात. क्वचितच कुणी ओमानी शर्ट-पॅण्टमध्ये दिसतो.

इथे स्त्रियांना मिळणारा आदर आणि त्यांचं कुटुंबातील उच्च स्थान.

नीलिमा गांधी, मस्कत, ओमान

ओमानी तरुणाई मोठय़ांचा फार आदर करते. त्यांना कुटुंबाबाबत विशेष जिव्हाळा असतो. दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळचा वेळ कुटुंबासोबत घालवण्याची पद्धत आहे. थंडीच्या मोसमात जोमात बार्बेक्यू पार्टीज केल्या जातात. एकत्र कुटुंब बाहेर असताना पुरुष स्वयंपाक करतात आणि स्त्रिया मस्त गप्पा मारत मुलांना खेळवत बसतात. लहानपणापासूनच इथल्या मुलांना आऊटडोअर कुकिंग शिकवलं जातं. आमच्यासाठी हे फारच नवीन होतं.

सलाम, कैफ हाल? झेन? (हॅलो, कसे आहात? सर्व छान ना?)ओमान या देशात सर्वाधिक वापरली जाणारी ही अरेबिक वाक्यं. किंबहुना स्थानिक लोकांबरोबर कोणतंही संभाषण या वाक्यांची देवाणघेवाण झाल्याशिवाय पुढे सरकतच नाही. ओमानी लोकही तितक्यात आपुलकीने तुमची खुशाली विचारतात आणि तेही प्रत्येक वेळी. अगदी तुम्ही दिवसातून २-३ वेळा भेटलात तरीही. माझा नवरा आविष्कारच्या नोकरीनिमित्त २०१५मध्ये राजधानीचं शहर मस्कतला जायची संधी मिळाली. वाळवंटी प्रदेश असूनही भरपूर नैसर्गिक विविधतेने नटलेल्या या शांत आणि स्वच्छ देशाने मला मोहित केलं आणि मग मीही २०१६मध्ये मुंबईतली नोकरी सोडून मस्कतमध्ये एका कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून रुजू झाले.

जगातल्या तीन अव्वल चलनांपैकी एक असलेल्या या देशात फक्त ४४ लाख लोकसंख्या आहे आणि जवळपास ४५ टक्के लोक हे इतर देशांतून कामानिमित्त आलेले आहेत. त्यामुळे ओमानींसोबत इथे तितकेच आशियाई, युरोपीय आणि आफ्रिकन लोक दिसतात. अरेबिक ही मूळ भाषा असलेल्या या देशात लोक बऱ्यापैकी इंग्लिश बोलतात. तसंच काहींना छान हिंदीही येतं. इथे राजेशाही आहे. इथला राजा भारतात शिक्षणासाठी आला होता. त्यामुळे त्याला भारतीयांबद्दल विशेष आत्मीयता आहे. हीच गोष्ट त्याच्या प्रजेतही ठळकपणे जाणवते. तसेच इथले लोक स्वत: खूप धार्मिक आहेत आणि इतर धर्माचादेखील तेवढाच आदर करतात. म्हणूनच संपूर्ण मुस्लीम असलेल्या या देशात मंदिर, चर्च, गुरुद्वारा आहेत. भारतीय दूतावासात जवळपास सर्व राज्यांची स्वतंत्र मंडळे आहेत आणि त्याद्वारे आपले सण अगदी पारंपरिक पद्धतीने साजरे होतात. इथल्या बऱ्याच कंपन्यांमध्ये मोठय़ा पदावर भारतीय लोक आहेत.

१८ नोव्हेंबर हा ‘ओमानी नॅशनल डे’ म्हणून साजरा केला जातो. तेव्हा प्रत्येक घरावर आपल्या दिवाळीसारखी सजावट केली जाते. या लोकांचं आपल्या देशावर आणि राजावर खूप प्रेम आहे. लहानलहान मुलंदेखील राजाचं गुणगान गाणारी गाणी गातात व ओमानी नृत्य करतात. गेल्या वर्षी आमच्या कॉलेजच्या ‘नॅशनल डे’ समारंभात आम्ही सर्व देशांतील लोकांनी ओमानी पद्धतीचे कपडे घातले होते आणि त्यांच्यातीलच एक भाग झालो होतो. संपूर्ण ओमान हे चकचकीत रस्त्यांनी जोडलं गेलेलं आहे. मुंबईत मला कधी ड्रायव्हिंग करायची गरज भासली नाही. परंतु इथे सार्वजनिक वाहतुकीसाठी खूप कमी पर्याय उपलब्ध आहेत. नुकतीच इथे बससेवा सुरू झाली आहे. इथे प्रायव्हेट टॅक्सीचा पर्याय आहे, पण तो अतिशय महागडा आहे. त्यामुळे आम्ही दोघांनी त्वरित गाडी शिकून घेतली. इथे १२०-१४० च्या वेगात गाडी चालवण्यातली मजा काही औरच. तरीही रस्त्यावर खूप शिस्त पाळली जाते. जागोजागी छुपे रडार बसवले आहेत. त्यात स्पीड लिमिट, सीट बेल्ट न लावणं तसेच वाहतुकीचे नियम न पाळल्यास चालकाच्या गाडीच्या नंबर प्लेटसहित फोटो काढून ऑनलाइन दंड आकारला जातो.

पर्यटनासाठी इथे खूप पर्याय आहेत, तरीही त्याचा म्हणावा तेवढा प्रसार झालेला नाही. मात्र येत्या काही वर्षांंत यात सुधारणा होण्याची चिन्ह दिसत आहेत. सलालाह म्हणजे इथले महाबळेश्वर. हे ठिकाण मस्कतपासून काही अंतरावर आहे.  वाळवंटातून हा संपूर्ण प्रवास आम्ही ८ तासात पार करू शकलो. इथला ‘खरिफ’  म्हणजे जून ते सप्टेंबरदरम्यान पडणारा धो धो पाऊस अतिशय प्रसिद्ध आहे. आजूबाजूच्या वाळवंटी देशातील खूप लोक इथे फक्त पाऊस अनुभवायला येतात. जबेल शाब (अमेरिकेतील ग्रँण्ड कॅनियनची प्रतिकृती) आणि जबेल अखदर ही इथली सर्वात उंच पर्वतरांग आणि थंड हवेची ठिकाणं. इथे हिवाळ्यात बर्फवृष्टी होते. वाळवंटात बर्फवृष्टी ही अशक्य वाटणारी गोष्ट इथे आल्यावर पायाजवळ ढग आलेले पाहतो तेव्हाच खरी वाटते. इथे ‘वादी’ हा प्रकार खूप प्रसिद्ध आहे. ‘वादी’ म्हणजे डोंगराच्या पायथ्याशी जमा झालेले तलावसदृश्य पाणी. अशा ठिकाणी खूप हिरवळ असते. तसंच या पाण्यात छान पोहताही येतं. ‘अल् हूत्’ ही इथे नुकतीच सापडलेली ५ किमी लांबीची गुहा आहे. या गुहेच्या आतपर्यंत एसी ट्रेनने पोहचता येते. भुरळ घालणारे स्वच्छ बीचेस, सिंक होल, गरम पाण्याचे कुंड ही ठिकाणं अनुभवण्याजोगी आहेत. इथे खूप सुंदर मशिदी आहेत. प्रत्येक मशिदीवर निरनिराळी कलाकुसर, रंगसंगती आणि रोषणाई असते. त्यात ‘ग्रँण्ड मॉस्क’ या नावाप्रमाणे इथली भव्यदिव्य मशिद. ही एकच मशिद इतर धर्मियांसाठी सकाळी ८ ते १२ या वेळात उघडी असते. यात जगातील मोठं झुंबर असून ते ८.५ टनाचं, २४ कॅ रेट सोन्याच्या मुलामा दिलेलं आणि ६ स्वोरोस्की क्रिस्टलनी मढवलेलं आहे. ते तयार व्हायला चार वर्षं लागली. तसंच मुख्य प्रार्थनाघरात एकसंध पार्शियन गालिचा २१ टन वजनाचा १.७ कोटी गाठींनी विणलेला आहे. जगातला हा दुसऱ्या क्रमांकाचा गालिचा पर्शियन स्त्रियांनी इथेच बसून विणला आहे.

इथले लोक इराणी, भारतीय, पाकिस्तानी, इजिप्शियन तसंच तुर्किश पद्धतीचं खाणं चवीने खातात. ओमानी रेस्तरॉंमध्ये खाली बसून जेवण्याची पद्धत असते आणि कुटुंबासहित येणाऱ्यांसाठी वेगळी व्यवस्था असते. यांना काहवा (ओमानी कॉफी) प्यायला आणि पिऊ  घालायला फार आवडते. माझी ऑफिसमधली एक ओमानी सहकारी दररोज न चुकता थर्मास भरून काहवा सर्वासाठी घेऊन येते. ओमानी हलवा खूप प्रसिद्ध आहे. तसंच ओमानी रोटी ही गव्हापासून तयार केलेली अगदी पातळ जाळीदार डोशासारखी असते. त्यावर चीज, चॉकलेट सिरप घालून खातात. मुख्य म्हणजे इथे संपूर्ण कुटुंब एकाच ताटात जेवण करतं. आम्ही माझ्या सहकाऱ्याकडे जेवायला गेलो, तेव्हा आम्हा दोघांनादेखील एकाच ताटात वाढलं गेलं. हा अनुभव फारच वेगळा होता. त्यांना मी केलेलं वरण, मोदक आणि थालिपीठ खूपच आवडलं.

इथले पुरुष डिशडॅशा आणि बायका अबाया घालतात. क्वचितच कुणी ओमानी शर्ट-पॅण्टमध्ये दिसतो. तरुण मुलांना नवनवीन गाडय़ांचं तसंच फुटबॉलचं प्रचंड वेड आहे. तर मुलींना फॅशनेबल कपडे, मेकअप, अ‍ॅक्सेसरीजमध्ये रुची असते. स्थानिकांना सरकारकडून घराचं बांधकाम, घरखर्च, शिक्षण, आरोग्यसेवा यांसाठी मदत केली जाते. तरुणाई मोठय़ांचा फार आदर करते. त्यांना कुटुंबाबाबत विशेष जिव्हाळा असतो. दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळचा वेळ कुटुंबासोबत घालवण्याची पद्धत आहे. थंडीच्या मोसमात जोमात बार्बेक्यू पार्टीज केल्या जातात. एकत्र कुटुंब बाहेर असताना पुरुष स्वयंपाक करतात आणि स्त्रिया मस्त गप्पा मारत मुलांना खेळवत बसतात. लहानपणापासूनच इथल्या मुलांना आऊटडोअर कुकिंग शिकवलं जातं. आमच्यासाठी हे फारच नवीन होतं. पण आता आम्हीही वीकएण्डला ऑफिसनंतर बऱ्याचदा संध्याकाळी बार्बेक्यू करतो किंवा बीचवर स्वयंपाक करून जेवतो. तरुण मुलामुलींना कुटुंबात रममाण होताना पाहून छान वाटतं. ही मुलं दर वीकएण्डला दूर असलेल्या नातेवाईकांना आवर्जून भेटायला जातात.

फिटनेसकडे मुलांचं खूप लक्ष असतं तर मुलींचं फॅशनकडे. परदेशी पर्यटनाला जाण्याकडे त्यांचा ओढा आहे. त्यांना बॉलीवूडचंही आकर्षण आहे. मी मुंबईची आहे, हे कळल्यावर माझे विद्यार्थी हमखास मला नट-नटय़ांना पाहिलं का?, असं विचारतात. इथे मला एका ओमानी लग्नसोहळ्यात सहभागी व्हायची संधी मिळाली. यात बायकांसाठीच्या सोहळ्यात त्यांना अबाया घालायची सक्ती नसते. लग्नात त्या पारंपरिक पोशाख (आपल्याकडच्या पंजाबी ड्रेससारखा) घालतात. त्यावर सोन्याचे भरपूर दागिने घालतात. तर रिसेप्शनसाठी फॅशनेबल कपडे घालतात. समाजमाध्यमांवर तरुणाई अ‍ॅक्टिव्ह असून स्नॅपचॅट अधिकांशी वापरलं जातं.

आम्हाला इथली भावलेली गोष्ट म्हणजे इथे स्त्रियांना मिळणारा आदर आणि त्यांचं कुटुंबातील उच्च स्थान. धर्माने तसंच कायद्याने इथल्या स्त्रियांना बरेच अधिकार दिले आहेत. इथे लग्न ठरते वेळी मुलगी घर, गाडी, दागिने किंवा पैशांची मागणी मुलाकडे करते आणि त्याने ती पूर्ण करायची असते. ही संपत्ती त्या मुलीच्या नावेच ठेवली जाते. इथले पुरुष अनोळखी स्त्रीशी शेकहँण्ड करत नाहीत. तसंच त्याच्याकडे रोखून बघणं, स्वत:हून बोलणं वज्र्य असतं. इथे गुन्हेगारीचं अत्यल्प प्रमाण वाखाणण्याजोगं आहे. गरम तापमानामुळे बरेच लोक पार्किंगमध्ये गाडय़ा चालू ठेवून जातात. तरीही गाडीतील वस्तू किंवा गाडी चोरीला गेल्याचे प्रकार घडत नाहीत. या बाहेरून कठोर वाटणाऱ्या शांतीप्रिय, शिस्तबद्ध, सुंदर, स्वच्छ देशाने आम्हांला कधी आपलंसं म्हटलं ते कळलंच नाही..

viva@expressindia.com

संकलन – राधिका कुंटे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2018 1:07 am

Web Title: travel and tour information about muscat oman
Next Stories
1 ब्रॅण्डनामा : रिबॉक
2 ‘पॉप्यु’लिस्ट : कोरसमधला रांगडा स्वरपट
3 ‘बुक’ वॉल
Just Now!
X