24 January 2019

News Flash

फॅशनदार : भटकंती!

हिल स्टेशनप्रमाणेच वाळवंटी प्रदेशात वावरताना आपण स्वत:ला डोक्यापासून पायापर्यंत झाकावे

आपण चाललो आहोत त्या ठिकाणी साधारण काय हवामान असतं, तिथली सांस्कृतिक व सामाजिक परिस्थिती कशी आहे, या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवूनच आपल्याला तिथे कोणते कपडे घालता येतील आणि त्या कपडय़ांबरोबरच कुठल्या अ‍ॅक्सेसरीज उपयोगी पडतील याचाही विचार करावा लागतो.

व्हेकेशन!! असं म्हणलं की आपला उत्साह वेगळ्याच शिगेला पोहोचतो. मग ठिकाण ठरलं की घरातून निघेपर्यंत चालणारी एकच गोष्ट म्हणजे पॅकिंग! पॅकिंग करताना आपल्याला विविध गोष्टींचा विचार करावा लागतो, उदा. आपण चाललो आहोत त्या ठिकाणी साधारण काय हवामान असतं, तिथली सांस्कृतिक व सामाजिक परिस्थिती कशी आहे आणि या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेऊनच आपल्याला तिथे कोणते कपडे घालता येतील आणि त्या कपडय़ांबरोबरच कुठल्या अ‍ॅक्सेसरीज उपयोगी पडतील याचाही विचार करावा लागतो. बरं, आपण जिथे जातोय तिथली संस्कृती कशी आहे यावरही कुठले कपडे न्यायचे हे ठरू शकतं. आपण जर मंदिरं वगैरे खूप पाहणार असू तर आपण त्या हिशोबाने कपडे निवडणार. विमान प्रवास जर असेल तर बॅगेचे वजनही जास्त होऊ न चालत नाही, त्यामुळे अगदी आवश्यक तेवढेच कपडे नेले पाहिजेत. आज आपण याच सर्व मुद्दय़ांवर एक नजर टाकून आपला प्रवास सुखकर करू या.

बीचवेअर आणि रेसोर्टवेअर- एखादा भव्य समुद्र किंवा एखाद्या रेसोर्टवर गेलं की आपला कल त्या पाण्यात मस्तपैकी डुंबायचं, पोहायचं, समुद्रकिनारी निवांत बसून एखादं कॉकटेल/ मॉकटेलची मजा घ्यायची; किंवा मग स्नोर्केलिंग, पॅराग्लायडिंग यासारखे अ‍ॅडव्हेंचर वॉटर स्पोर्ट्स खेळण्याकडे जास्त असतो. या जागांवरचे तापमान गरम आणि हवा दमट असल्यामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांचे कपडे साधारण सुटसुटीत, कम्फर्ट फिटचे असतात ज्यामुळे हवा सतत खेळती राहील. महिलांनी स्वीमवेअर म्हणून मेटालिक रंगाचे किंवा वायब्रंट रंगाचे टू-पीस बिकिनी, फॅन्सी स्वीमिंग सूट, ट्रेंडी रॉब्स बरोबर घ्यावेत. इतर वेळेस बीचवर फिरताना पेस्टल किंवा वायब्रंट रंगाचे मिनी बरमुडाज, स्लीवलेस लूज टॉप्स, ए लाइन व एच लाइन सिल्हाऊट्सवाले वन पीस ड्रेसेस-फ्रॉक्स बरोबर घ्यावेत. उन्हामुळे टॅन होण्यापासून वाचण्यासाठी सनस्क्रीमबरोबरच एखादं पातळ कापडाचं श्रग पण घेऊ न ठेवा. पुरुषांसाठी छान उठावदार-वायब्रंट छटांचे स्विमिंग ट्रन्कस चांगले दिसतात आणि इतर वेळेस थोडय़ा लूज लिनेन पँट्स व शर्ट्स, गुडघ्याच्या उंचीच्या प्रिंटेड पँट्स, हवाईयन प्रिंट्सचे शर्ट्स, पेस्टल रंगांचे टीशर्ट्स उपयोगी ठरतात. वरील कपडय़ांव्यतिरिक्त ट्रेंडी सनग्लासेस, गोल हॅट्स, रंगीत स्लीपर्स, लेदर सँंडल्स आणि तिकडे फिरताना सगळ्या रोजच्या गरजेच्या वस्तू मावतील अशी एक छानसी सॅक किंवा स्लिंग बॅग बरोबर ठेवावी. अशाच ठिकाणी जर तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर गेला असाल तर एक रोमँटिक डेट किंवा समुद्रकिनारी एकांतात कँ डल लाइट डिनरसाठी घालतो असे एखाददुसरे कपडेजोड नक्की सोबत ठेवा.

हिल स्टेशन : हिल स्टेशन म्हणजे एका डोंगर-दरीतले, सतत वाहणारं गार वारं असलेलं आणि कदाचित बर्फ  असलेलं निसर्गरम्य थंड ठिकाण. अशा वातावरणात आपण स्वत:ला डोक्यापासून पायापर्यंत जितके झाकून घेऊ आणि उबदार ठेऊ  तितके चांगले. थोडे कम्फर्ट फिटवाल्या जीन्स किंवा ट्राऊ जर्स आणि टीशर्ट्ससोबत छानसे लेदर जॅकेट, किंवा डार्क कलरचे ट्रेंचकोट, उठावदार रंगाचे फुगीर विंटर जॅकेट, स्वेटर्स, मफलर, स्टोल्स , शॉल्स इत्यादी कपडे गरजेप्रमाणे बरोबर ठेवावेत. शिवाय कान झाकले जातील अशा फर किंवा लोकरीच्या टोप्या, हायर अ‍ॅल्टिटय़ूड्सवर डोळ्यांची योग्य काळजी घेण्यासाठी सनग्लासेस, पाय पूर्ण झाकले जातील असे अँकल बूट्स किंवा सपोर्ट शूज, एक छानसी सॅक या गोष्टीही खूप उपयोगी असतात.

वाळवंटी पेहराव अथवा डेजर्टवेअर : हिल स्टेशनप्रमाणेच वाळवंटी प्रदेशात वावरताना आपण स्वत:ला डोक्यापासून पायापर्यंत झाकावे; पण यावेळेस थंडीमुळे नाहीतर धुळीपासून आणि गरम वाहणाऱ्या हवेपासून स्वत:चं संरक्षण करण्यासाठी. खूप गरमीचं वातावरण असल्यामुळे सगळ्यांना हलके कॉटन व लिनेनचे थोडे ढगळ कपडे घालणं उत्तम ठरतं. सगळ्या स्त्रिया पलाझो, हारेम पँट्स, धोती पँट्स, लुज फूल बाह्यांच्या कुर्त्यांना प्राधान्य देतात. उष्णतेपासून वाचवायला डोक्याला कॉटनचा स्कार्फ  बांधावा किंवा पूर्ण डोकं झाकलं जाईल अशी गोल हॅट बरोबर घ्यावी. तर पुरुषांनी लिनेन किंवा कॉटनच्या पॅंट्स व शर्ट्स, टीशर्ट्स, कम्फर्ट फिटच्या ट्रॅकपँट्स, डोक्याला बांधायचे स्काफ्र्स किंवा बंडाना या गोष्टी सोबत न्याव्यात. याचबरोबर गोल हॅट्स, सनग्लासेस, सॅक्स किंवा स्लिंगबॅग्स आणि वाळवंटात चालता येतील असे जाड सोलचे शूज बरोबर ठेवावेत. वाळवंटात फिरताना शक्यतोवर उठावदार रंगांचे कपडे घालावेत; अशा भव्य जागांमध्ये रस्ते नीटसे आखलेले नसतात, सारखी वादळं येत असतात आणि सगळीकडे खूप वाळू उडत असते; म्हणूनच दुरूनही आपल्यासारखी माणसं ओळखू गेली पाहिजेत यासाठी उठावदार रंगांचे कपडे घालावेत.

जंगल सफारी : जंगलात फिरताना, धावताना, जीपमध्ये चढताना किंवा उतरताना कुठल्याही प्रकारची अडचण नको म्हणून साधारणपणे केमोफ्लाज कलरमधले टीशर्ट्स, ट्रॅकपँट्स, जॅकेट्स अथवा स्वेटर्स घालावेत. याचबरोबर स्पोर्ट शूज, सनग्लासेस, शाली, टोप्या बरोबर ठेवाव्यात. केमोफ्लाज कलर्सचे कपडे हे आपलं जंगली प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी घातले जातात; जेणेकरून या प्राण्यांना मनुष्य ओळखता येत नाहीत आणि आपण त्यांना जंगलातल्या झाडाझुडपांचा भाग वाटतो.

मला वाटतं आता तुमच्या प्रवासाला कपडे नेण्याविषयीच्या बऱ्याच शंका दूर झाल्या असतील. आणि जर कधी पुन्हा एखादा असा प्रश्न पडलाच तर या टिप्स आठवा आणि सहलीची पूर्ण मजा लुटा!

viva@expressindia.com

First Published on February 9, 2018 12:32 am

Web Title: travel fashion travel fashion accessories