स्नेहल वाघ

ट्रॅव्हल व्लॉगिंग करण्याऱ्यांमध्ये मुलीदेखील मागे नाहीत. मुलांप्रामाणेच बाइक रायडिंग आणि बॅगपॅकिंग प्रकारच्या भटकंतीला हल्ली मुलीदेखील तय्यार असतात. त्यातलीच एक स्नेहल वाघ. तिचे व्लॉगिंगचे अनुभव तिच्याच शब्दांत..

मला लहानपणापासून प्रवास आणि विशेषत: निसर्गाच्या सान्निध्यात करावा लागणारा प्रवास फार आवडतो, पण जशी मी मोठी होत गेले तसतशी मला भटकंतीचं वेड लागलं. या भटकंतीदरम्यान खूप काही गवसतं. तो आनंद, ती माहिती, तो अनुभव, मला मिळालेलं हे सगळं, लोकांपर्यंत पोहोचायला हवं होतं. त्यासाठी व्हिडीओ ब्लॉगिंगचा पर्याय स्वीकारायचं ठरवलं.  जसजसं माझं कॅमेऱ्याविषयी ज्ञान वाढत गेलं तसतसा माझा व्हिडीओ ब्लॉगिंगचा विचार वृद्धिंगत होऊ  लागला. मी ट्रेक करायचेच पण आता व्हिडीओ ब्लॉगिंगला सुरुवात करायची ठरवली.

बाविसाव्या वर्षी म्हणजे गेल्याच वर्षी मी भारत नेपाळ सीमेजवळ असलेला आणि १४००० फुटांपर्यंत चढाई असणारा संदकफू ट्रेक करायचा ठरवला. तिथूनच सुरुवात झाली माझ्या व्हिडीओ ब्लॉगिंगला. मी मुंबईहून जाणारी एकटीच मुलगी. एकटीच बेसकँपपर्यंत पोचले. तिथे गेल्यावर इतरांशी ओळख झाली. त्यावेळी तिथे येणाऱ्यांना व्हिडीओ ब्लॉगिंग हा प्रकार फारसा माहिती नव्हता. माझ्याकडे तेव्हा डीएसएलआर होता, त्यानेच मी व्हिडीओ काढायचा प्रयत्न करत होते. तो व्हिडीओ छान झाला आणि यूटय़ूबवर पसंतीची मोहोर उमटली. मग मी दुसरा व्हिडीओ ब्लॉग करायचा ठरवला तो हिमाचल प्रदेश येथील १५००० फुटांवर असलेल्या ‘सारपास’चा. तेव्हा मात्र माझ्याकडे शूटिंगसाठी गो-प्रो हिरो ५ ब्लॅक कॅमेरा होता. त्यामुळे ते चित्रीकरण उत्तमच झालं. अशा प्रकारे माझा हुरूप वाढला आणि मी विविध ठिकाणच्या भटकंतीचे व्हिडीओ ब्लॉग्स करून ते यूटय़ूबवर अपलोड करू लागले.

व्हिडीओ ब्लॉगिंग करणं ही सोपी गोष्ट मुळीच नव्हती. त्यासाठी आधी आपण काय बोलणार आहोत त्याचं स्क्रिप्ट करावं लागतं. मग त्याच्या एडिटिंगचं काम. मी एक सॉफ्टवेअर घेऊन स्वत:च एडिटिंग करते. माझ्या व्हिडीओला संगीतसुद्धा मी स्वत:च दिलंय. संपूर्ण व्हिडीओवर ‘अ’ ते ‘ज्ञ’पर्यंतचे संस्कार मी स्वत: केले. त्यातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. आजमितीस माझ्या यूटय़ूब चॅनेलला ८०० सबस्क्रायबर्स आहेत. केसी नीश्ताट हा माझे या क्षेत्रातील आदर्श आहे. या मे महिन्यात मी ‘बेसिक माऊंटनेरिंग’चा कोर्स करणार आहे, ज्यातून मला अधिक ज्ञान उपलब्ध होईल आणि लोकांसाठी मी अधिक उत्तम प्रकारे व्हिडीओ ब्लॉग्स बनवून त्यांना पर्यटनाचा आनंद देऊ  शकेन.