निनाद भागवत, ब्यूट, मोंटाना, युएसए

या शहराला ऐतिहासिक व भौगोलिक महत्त्व आहे. शहर आणि आसपासच्या परिसरात अत्यंत मौल्यवान खनिजांचे (सोने, चांदी, तांबे, शिसे, इत्यादी) प्रचंड साठे आहेत. म्हणूनच हे शहर व आसपासचा परिसर म्हणजे सिल्व्हर बो कौंटी हा ‘जगातील सर्वात श्रीमंत परिसर’ म्हणून ओळखला जातो.

माझं शहर म्हणजे ब्यूट. अमेरिकेतल्या मोंटाना राज्याच्या साधारण मध्यावर हे शहर आहे. आमच्या शहराची अनेक वैशिष्टय़ं आहेत. आत्यंतिक शांतता हे त्यातलं प्रमुख वैशिष्टय़. भौगोलिकदृष्टय़ा समुद्रसपाटीपासून मध्यम उंची. शिवाय उन्हाळ्यात आल्हाददायक, परंतु हिवाळ्यात अत्यंत शीत असं वातावरण. विस्ताराच्या दृष्टीने फार कमी लोकसंख्या म्हणजे अंदाजे ३० ते ४० हजार. त्यामुळे घनता कमी. हे शहर प्रामुख्याने युनिव्हर्सिटी टाऊ न म्हणून ओळखलं जातं. सर्व बाजूंनी पर्वत असल्यामुळे शहर पर्जन्यछायेत येतं. इथे कोरडं हवामान आहे.

या शहराला ऐतिहासिक व भौगोलिक महत्त्व आहे. शहर आणि आसपासच्या परिसरात अत्यंत मौल्यवान खनिजांचे (सोने, चांदी, तांबे, शिसे, इत्यादी) प्रचंड साठे आहेत. म्हणूनच हे शहर व आसपासचा परिसर म्हणजे सिल्व्हर बो कौंटी हा ‘जगातील सर्वात श्रीमंत परिसर’ म्हणून ओळखला जातो. पहिल्या महायुद्धापूर्वी तिथे प्रचंड वस्ती व खाणकाम होत होतं. परंतु पहिल्या महायुद्धानंतर तांब्याचे भाव गडगड ले आणि लोक पोटापाण्यासाठी दुसरीकडे जाऊ लागले. म्हणून आता फार कमी लोकसंख्या उरली आहे. तसंच एकोणिसाव्या शतकात या अतीखोदकामाचे दुष्परिणामही दिसून आलेले आहेत. उदाहरणार्थ – बर्कलेपिट खाणीत उद्भवलेल्या आम्लयुक्त पाण्याच्या समस्येवर संशोधन सुरू आहे.

मुंबई विद्यापीठातून नागरी अभियांत्रिकीतील पदवी (अर्थात इ.ए. सिव्हिल इंजिनिअरिंग) प्राप्त केल्यावर तिथे भूगर्भशास्त्रीय अभियांत्रिकीत पदव्युत्तर पदवी (एम. एस. इन जिऑलॉजिकल इंजिनिअरिंग) मिळवण्यासाठी गेलो. ‘मोंटाना टेक ऑफ द युनिव्हर्सिटी ऑफ मोंटाना’ या विद्यापीठातर्फे शिकत असतानाच ग्रॅज्युएट रिसर्च असिस्टंट म्हणून विद्यापीठाच्याच एका प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळाली. जवळच्याच एका सोन्याच्या खाणीमध्ये मानवरहित यान व औष्णिक अवरक्तछायाचित्रक (ड्रोन अँण्ड थर्मल इन्फ्रारेड कॅमेरा) यांच्या मदतीने खडकांच्या स्थिरतेचं विश्लेषण करणं, अशा प्रकारचं काम करून सहकाऱ्यांबरोबर त्याचा शोधनिबंध सादर केला.

या प्रोजेक्टसाठी मी जवळपास आठ महिने काम केलं. कामाच्या वेळी तिथले लोक गांभीर्यपूर्वक कामच करतात. उगाचच मोबाईलवर विनाकारण वेळ घालवला जात नाही. आम्ही खाणीवर अल्पसा काळ असायचो आणि बाकी काम कॉम्युटरवर असायचं. आमचा प्रोजेक्ट बेंचमार्क ठरला आहे. आमच्या कामाच्या दृष्टीने उपयोगी ठरणारे ड्रोनचे डिझाईन आमच्या टीमनेच केलं आहे. आम्ही आम्हाला नेमून दिलेलंच काम करणं अपेक्षित होतं. तिथे पर्यावरणाच्या संदर्भातले सगळे काटेकोर नियम असून ते कायम पाळले जातात. नियम मोडल्यास त्वरित दंड भरावा लागतो. त्यात कोणतीही हयगय केली जात नाही.

अमेरिकन फुटबॉल हा तिथल्या लोकांचा आवडता खेळ. मोंटाना टेक ‘ओरेडिगर्स’ या नावाने यात खूप प्रसिद्ध आहे. हे शहर ‘टूरिस्ट प्लेस’ म्हणून डेव्हलप केलेलं नाही. शहराच्या जवळच ‘लेडी ऑफ द रॉकीज’ नावाचं पर्यटनस्थळ आहे. तसंच आसपास स्कीइंगसाठी अनेक जागा आहेत. जवळपास सर्वानाच शिकारीचा छंद आहे. बदक, हरीण, टर्की यांची साधारणपणे शिकार करतात. थंडी नेहमीच ‘मी’ म्हणत असल्यामुळे गरम कपडे अनिवार्य ठरतात. हिवाळ्यात ३-४ कपडय़ांचं कोटिंग करावं लागतं. अन्यथा ‘फ्रॉस्ट बाईट’चा धोका असतो. तिथे स्पेसचा विचार केला जातोच. व्यवस्थित अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय कोणी कोणाकडे जात नाही. मनाला वाटेल तेव्हा थेट उठून कुणाकडे गेलो, असं अजिबात चालत नाही. तसंच फुकटचे सल्ले आणि आगाऊ पणे सांगितल्या जाणाऱ्या गोष्टीही तिथे अस्तित्वात नाहीत.

तिथे मी एकटाच महाराष्ट्रीय होतो. एकूण भारतीय अगदीच थोडे असल्यामुळे म्हणजे ४-५  विद्यार्थी, ४-५ फॅकल्टी आणि त्यांची कुटुंबं असल्याने भारतीयांची संस्था वगैरे असल्याचं माझ्या तरी कानी आलेलं नाही. आम्ही ४-५ विद्यार्थी कधीकधी एकत्र जमून टाईमपास करतो. दिवाळीत एका प्राध्यापकांच्या घरी दिवाळी साजरी करण्याचा योग आला. दिवाळी साजरी केली म्हणजे तिथे रात्रीचं जेवण होतं. चांगला जनसंपर्क झाला. बाकी दिवाळीचं असं म्हणून काही खास असं नव्हतं. मी पर्सनली इतर सणवार अजिबात मिस केले नाहीत. माझ्या  वास्तव्याच्या पहिल्याच आठवडय़ात मी माझं पाकीट आमच्या मेसमध्ये विसरून आलो होतो. त्यात बऱ्यापैकी रक्कम व मुख्यत: कार्ड्स आणि चालकपरवाना (लायसन्स) होता. आता लायसन्स हरवलं म्हटल्यावर पोलीसकेस करावी लागेल ही भीती होती. पण दुसऱ्याच दिवशी ते परत मिळालं, तेही अगदी जसंच्या तसं. आत्यंतिक प्रमाणिकपणा हा मी तिथे अनेक ठिकाणी अनुभवला. आवर्जून लिहिण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजे जवळजवळ सगळे कायमच हसतमुख असतात. एकमेकांना, अगदी अनोळखी लोकांनासुद्धा स्माईल देतात. तसंच एखादी व्यक्ती आपल्यापेक्षा कमी दर्जाचं काम करते म्हणून त्याला तुच्छ लेखत नाहीत. साधारणपणे सर्वजण सौजन्याने वागतात.

अमेरिकेत मी एकदा सिअ‍ॅटलला कॉन्फरन्ससाठी गेलो होतो. कॉन्फरन्सचा अनुभव छानच होता. भूशास्त्राशी संबंधित क्षेत्रातल्या अनेक तज्ज्ञांशी ओळखी झाल्या, एम.एस. नंतर काय करावं, यावरसुद्धा अनेकांशी चर्चा करायला मिळाली. माझ्या क्षेत्रातले काही प्राध्यापक भेटले. त्यांच्याबरोबर काम केल्यास भविष्यात पी.एच.डी. करण्याची संधी मिळू शकते, हे कळलं. काही नवीन कोर्सेसबद्दल माहिती मिळाली. महत्त्वाचं म्हणजे अगदी नासा आणि यू.एस.जी.एस.मध्ये काम करणारे वैज्ञानिकसुद्धा खेळीमेळीतच बोलत होते. आपण एवढय़ा मोठय़ा पदावर काम करतो म्हणून बाकीचे तुच्छ आहेत, असा त्यांचा बिल्कुल आविर्भाव नव्हता. कॉन्फरन्सवरून परत आल्यावर अनेकांशी ईमेलद्वारे संपर्क साधला. माझ्या ईमेलना बरेच सकारात्मक रिप्लाय आले आहेत.

शेती कमी असल्याने तेथील मुख्य खाद्य हे मांसच आहे. ‘मोंटाना इज अ मीट लव्हिंग स्टेट’ हे मला तिथे गेल्यानंतर समजलं. मी भारतात असताना मुख्यत: शाकाहारी असल्याने माझा तिकडचा पहिला आठवडा जवळजवळ उपाशी राहूनच गेला. कालांतराने मिळेल ते खायची सवय लागली. तिथे मांसातसुद्धा गोमांस व डुकराचं मांस हेच जास्त खाल्लं जातं. फिश आणि चिकन त्या तुलनेत कमी खाल्लं जातं. तसंच विश्वविद्यालयाच्या वसतीगृहातच राहात असल्यामुळे मेस बंधनकारक होती आणि स्वत: बनवून खायला किचन नव्हतं. त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस जरा त्रासातच गेले.

माझ्याबरोबर शिकणारे सगळेजण अमेरिकनच होते. तुलनेनं जास्तीजण बहिर्मुख असले तरी काहीजण माझ्यासारखे अंतर्मुखसुद्धा आहेत. भारताविषयी बऱ्याचजणांना आकर्षण आहे. आपली संस्कृती, प्रामुख्याने योग आणि इंडियन फूड या विषयांवर आमची बरीच चर्चा झाली. तसंच हिंदू धर्म, अध्यात्म या विषयांवरही चर्चा झाली. तिथल्या मुलींना भारतीय वेशभूषेचं आकर्षण असलेलं दिसलं. तिथले वेगळे असे काही रितीरिवाज जाणवले नाहीत. ऐकीव माहितीनुसार स्थानिक लोक ब्राऊ न लोकांचा (गोरम्य़ांव्यतिरिक्त लोक) विशेषत: मुस्लिम लोकांचा द्वेष करतात. मला एकाने ‘आर यु फ्रॉम सौदी?’, असं विचारलं होतं. तेव्हा त्यांच्याबद्दल थोडा तिरस्कार त्याच्या बोलण्यात जाणवला. पण मी भारतीय आहे, हे समजल्यावर त्याचा स्वर लगेच बदलला आणि अगदी खेळीमेळीत आमचं पुढचं संभाषण झालं. असा अनुभव मला साधारणपणे २-३ वेळा आला. मात्र त्रास असा काही झाला नाही.

अभ्यास हीच गोष्ट तिथे करायला मिळाली. आपल्याकडे नुसतीच घोकंपट्टी असते. अनेकजण कॉपी-पेस्ट संस्कृती जोपासताना दिसतात. तर तिथे एखाद्या विषयाचा अभ्यास म्हणजे काय आणि तो कसा करायचा, तो किती सखोल आणि सर्वसमावेशक असला पाहिजे, हे शिकायला मिळालं. आपण स्वत: आणखीन संशोधन करावं आणि आपलं ज्ञान वाढवावं, असं वाटायला लागलं. प्रचंड गोडी वाटायला लागली अभ्यासाची. अशी गोडी भारतात कधीच वाटली नाही. तिथे बहुसंख्य विद्यार्थी स्वत: पैसे कमावून शिकतात. आरक्षण पद्धत नाही. शिक्षण घ्यायच्या आवडीला वयाची मर्यादा आड येत नाही. आपल्या आवडीनुसार आणि तिथल्या उपलब्धतेनुसार विषय निवडता येतात. ठरल्या दिवशीच आपले प्रोजेक्ट किंवा असाईनमेंट सबमिट करावे लागतात. त्यात चालढकल चालत नाही. अगदीच काही अपरिहार्य कारण असेल तर ते प्राध्यापकांना लगोलग सांगावं लागतं. खरंतर ब्यूट शहर म्हणजे माझ्यासाठी काय हे थेट सांगणं कठीण असलं, तरी एक मात्र नक्की की शक्य असेल तर मी कधीच हे शहर सोडणार नाही..

viva@expressindia.com

संकलन – राधिका कुंटे