गणपती विद्य्ोची देवता मानली जाते. पुण्यात नोकरी करणाऱ्या तरुणाईच्या एका गटानेसुद्धा गणपतीच्या विद्यादेवता याच रूपाचे पूजन करायचे ठरवले. खेडय़ातील गरजू परंतु शिकण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी या तरुणांनी घेतली आणि सामाजिक परिवर्तनाचा जणू श्रीगणेशाच केला आहे.
एकदा एक माणूस लाटेबरोबर किनाऱ्यावर येत फडफडणारे मासे एकेक करून पुन्हा नदीत टाकत होता. त्याच वेळी दुसरा एक माणूस किनाऱ्यावर फेरफटका मारत होता. पहिल्या माणसाच्या कृतीकडे बघून त्याला हसायला आलं आणि तो म्हणाला, ‘अरे, तू हे काय करतोस, असे हाताने एकेक मासा पाण्यात टाकून तुला काय मिळणार आहे.. का स्वत:चा वेळ दवडतोस?’ हे ऐकून पहिला माणूस स्मितहास्य करत म्हणाला, ‘मला हे करून फक्त समाधान मिळेल, पण ज्याच्यासाठी करतोय त्या माशांना याचा नक्कीच फायदा होईल. काही गोष्टी आपल्याला क्षुल्लक आणि छोटय़ा वाटतात म्हणून त्या करणं आपण टाळतो परंतु ज्याच्यासाठी आपण करतोय त्याचसाठी ती गोष्ट मोठी आणि महत्त्वाची असू शकते.’ ही काल्पनिक गोष्ट खरी करून दाखवताहेत पुण्यातील काही तरुण. खेडय़ातील गरीब पण शिकण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी या तरुणांनी घेतली आहे.
याच वर्षांपासून त्यांनी हा समाज- परिवर्तनाचा श्रीगणेशा केलाय. गणपतीची विद्यादेवतेच्या स्वरूपातली पूजा आम्हाला अधिक भावते, असं या तरुणांचं म्हणणं आहे. आयटी, फायनान्स, ट्रॅव्हल-टुरिझम अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणारे हे तरुण समाजासाठी काही तरी केलं पाहिजे या एकाच विचारातून एकत्र आले. या गटातील प्रवीण खांबल सांगतो, ‘असं काही तरी करायचं हे आधीपासूनच ठरवलं होतं, पण वेळ नाही मिळत ही खंत होती.
एक दिवस सगळे मित्र एकत्र आलो आणि ‘धीस टाइम सीरियस’ असं म्हणत हा ग्रुप बनवला. मित्रांचे मित्र जुळत गेले तसा ग्रुप वाढत गेला. आम्ही सगळे नोकरी करणारे स्वत:च फिक्स इन्कम असणारे आहोत. क्षेत्र वेगवेगळी आहेत कोणी आयटीमधील आहे, तर कोणी सी. ए. आहे, तर कोणी ट्रॅव्हल टुरिझममध्ये आहे. आमच्या ओळखीमधून मुलाची/ मुलीची निवड होते, खरंच गरजू असणारी, शिकण्याची जिद्द असणारी मुलंच आम्ही घेतो. त्याला/ तिला नक्की काय करायचंय यावर चर्चा होते आणि मग त्या त्या क्षेत्रातली मंडळी मुलांना मार्गदर्शन करतात. आम्ही या मुलांच्या शिक्षणाची सगळी जबाबदारी घेण्याचं ठरवलं आहे. हे पहिलंच वर्ष असल्याने आम्ही एकाच मुलाची जबाबदारी घेतली आहे. चतुरंग संस्थेच्या कोकणातील अभ्यास वर्गाचा विद्यार्थी कृष्णा जाधवला शिक्षणासाठी मदत करत आम्ही नुकताच श्रीगणेशा केला आहे.’ दहावीत ८२ टक्के मिळालेल्या कृष्णाला प्रवीण आणि त्याच्या मित्रांमुळे विद्यार्जनाचा, उज्ज्वल भविष्याचा किरण या गणेशोत्सवात दिसतो आहे. समाज परिवर्तनासाठी असे असंख्य किरण निर्माण होणं एवढीच खरी गरज आहे.
वैष्णवी वैद्य – viva.loksatta@gmail.com