जीवनाला कलाटणी देणाऱ्या प्रसंगांत निसर्गाकडून मिळालेला सकारात्मक दृष्टिकोन कसा उपयोगी पडला,
करिअरइतकंच छंदांनाही आयुष्यात कसं स्थान दिलं, ते सांगतेय कुलू-मनालीतली श्रुती मोरे.

परवा एका छोटीला बोटात पेन्सिल धरायला शिकवत होते. मी दाखवलं तस्सं करायचा प्रयत्न ती मनापासून करत होती. तिच्याकडं बघता बघता मला नकळत आठवल्या त्या माझ्या प्रयत्नांच्या गोष्टी.. जीवनाला कलाटणी देणारे क्षण. आठवताहेत, मुंबईच्या सेठ जी. एस. मेडिकल कॉलेजमधले ऑक्युपेशनल थेरपी शिकतानाचे दिवस.. त्या साडेचार वर्षांत अनेक गोष्टी शिकले. ऑक्युपेशनल थेरपिस्टचं काम असतं रोजचं जगणं सुसह्य़ करण्याकरता रुग्णांना साहाय्य करणं. वैद्यकीय औषधोपचारांनी आयुष्य वाढू शकतं, तर या थेरपीमुळं आयुष्य जगणं सुसह्य़ होऊ शकतं. रुग्णाचा जीवनाकडं बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक करणारी ही थेरपी मला फार भावली. मेडिकल कॉलेजमध्ये रोज दिसत होतं वास्तववादी जगणं. तोपर्यंत मी सिव्हिअर मेडिकल केसेस जवळून पाहिल्या नव्हत्या. पण अशा केसेस बघितल्यावर आयुष्याचा हाही एक अपरिहार्य भाग आहे, हे कळलं. दुसऱ्या वर्षांला एक पेपर चांगला गेला नव्हता.. वाटलं होतं, आयुष्यात पहिल्यांदाच एटीकेटी लागतेय की काय.. सुदैवानं मी पास झाले.

कॉलेज ट्रेकिंग क्लब आणि युथ हॉस्टेलतर्फे केलेल्या ट्रेक्समुळं ट्रेकिंगची मनापासून आवड निर्माण झाली. दर वीकएण्डला ट्रेक होऊ लागला. क्लबमधल्या काहींकडून आउटडोअर अॅक्टिव्हिटीजचं ट्रेनिंग घेतलं. त्यांच्याकडूनच ‘फक्त मुलींसाठी’ आयोजलेल्या ट्रेकविषयी कळलं. ऑगस्ट २०११मधल्या या मोहिमेत एकूण १८ दिवसांत १४ दिवस आम्ही सायकलिंग केलं. कॉलेजच्या चौथ्या वर्षांच्या परीक्षेनंतर इंटर्नशिप असते. त्या परीक्षेचा निकाल लागायच्या आधी हा ट्रेक होता. ‘मी पास होणार’, हा आत्मविश्वास वाटला, तरी निकालानंतर लगेचच इंटर्नशिप सुरू करायची होती. पण कुणी सायकलिंगसाठी सुट्टी घेतल्याचं ऐकिवात नव्हतं. द्विधा मन:स्थितीत ‘एचओडीं’ची भेट घेतली. भरपूर चर्चेअंती सुट्टी मंजूर होऊन त्याच आनंदात मी सायकलिंगला गेले. आम्ही दिल्लीला पोहचल्यावर निकाल लागला, ‘पास झाले’ तिथून परतल्यावर इंटर्नशिप पूर्ण केली.
यूथ होस्टेल असोसिएशन ऑफ इंडियाने आयोजलेल्या ‘कुलू ते खारडुंगला’ या मोहिमेत १०० मुलींचा सहभाग होता. त्यापैकी ८६ मुलींनी मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली. याच ट्रेकिंगदरम्यान आयुष्यात आला एक टर्निंग पॉइंट! कुलूच्या बेसकॅम्पमध्ये खराब हवामानामुळं आम्हांला थांबावं लागलं. तेव्हा संध्याकाळी मार्केटमध्ये फिरताना पहिल्यांदा ‘सेंटर’ ओझरतं दिसलं. दुसऱ्या दिवशी ते आत जाऊन पाहिलं. नंतरच्या प्रवासात सायकलिंग करताना एका घरातल्या सेलेब्रल पल्सी झालेल्या मुलीला पाहून ‘त्या सेंटर’ची आवश्यकता लक्षात आली. प्रवास पूर्ण झाला, तरी ‘सेंटर’चा विषय डोक्यात होताच. पुढं बोरिवली ते श्रीनगर बाईकवरून केलेल्या प्रवासात डोंगरदऱ्यांच्या सहवासात रमले. निसर्गाच्या सहवासात आपण आपल्याला खरेखुरे सापडतो. एरवी आपल्याला अनेकदा मुखवटे घालून जगावं लागतं.

दरम्यान सायकलिंगहून परतल्यावर ‘त्या सेंटर’ची माहिती घरी सांगितली. माझी त्यावेळी अमेरिकेमध्ये मास्टर्ससाठीची अॅडमिशन प्रोसेस सुरू होती. त्या गडबडीतही मी ‘हँडिमाचल प्रोजेक्ट सेंटर’च्या डॉमनिक डुफाउला अभिनंदनपर ईमेल पाठवला. तिचा रिप्लाय आला. दरम्यान ‘केईएम’मधली इंटर्नशिप, बाइक ट्रेकिंगचे प्लॅन्स आणि आपल्या स’ााद्रीतलं ट्रेकिंग सुरूच होतं. दोन महिन्यांनी डॉमनिकच्या ईमेलमध्ये तिथल्या जॉबविषयी कळलं. तिकडं जायचा विचार होता आता निर्णय पक्का झाला. तेव्ही मी तिला माझी ऑक्युपेशनल थेरपीची बॅकग्राऊंड सांगितली. घरी या हिमाचलमधल्या जॉबविषयी सांगितल्यावर त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. नंतर उलटसुलट चर्चा होऊन अमेरिकेतल्या माझ्या भावानं कळकळीनं समजावल्यावर घरचे तयार झाले. दरम्यान ‘केईएम’मधली माझी सहा महिन्यांची इंटर्नशिप चालूच होती. ती संपल्यावर ‘जाऊन बघू नि ठरवू’ असं ठरलं. कुलूमधल्या परिचितांशी संपर्क साधून राहण्याची व्यवस्था केली. दरम्यान डॉमनिकचा ई मेल आला आणि तो जॉब दुसऱ्याला दिल्याचं कळलं. तेव्हा खरंच ब्रह्मांड आठवलं, पण तोपर्यंत एक मात्र नक्की ठरलं होतं.. जे काही करायचं ते इथेच. यूएसला जायचं नाही. दोन महिन्यांनी डॉमनिकचा पुन्हा मेल आला. जॉब ऑफर करणारा ईमेल आला. पुन्हा घरच्यांची मनधरणी केली. सुरुवातीला सहा महिन्यांसाठी जाऊ म्हणताना, आता इथं येऊन ४ र्वष झाल्येत.

डॉमनिकनं २००९मध्ये हँडिमाचल प्रोजेक्टची संस्था स्थापन केल्यानंतर हळूहळू सगळा संच जमला. मी ऑक्युपेशनल थेरपिस्ट म्हणून जॉइन झाले. सध्या युनिट इनचार्ज आणि ऑक्युपेशनल थेरपिस्ट आहे. सुरुवातीला पालक मुलांना घेऊन यायचे. नंतर कम्युनिटी सेंटर सुरू झालं. ठिकठिकाणी अवेअरनेस कॅम्प चालू केलेत. गेल्या वर्षी निवडक स्थानिक महिलांना ट्रेनिंग दिल्यानं त्या ‘सेंटर’मध्ये येऊ न शकणाऱ्या मुलांना घरी जाऊन थेरपी देतात. मनालीमधल्या एका शाळेच्या साहाय्यानं आम्ही इंटिग्रेटेड शाळा सुरू केली आहे. तिथं विशेष मुलांना ट्रेनिंग दिलं जातं. व्होकेशनल ट्रेनिंगचा प्रोजेक्टही आकारतोय. विशेष मुलांविषयी स्थानिकांना फारशी माहिती नसल्यानं त्याविषयी जागृती करून, त्यांच्या पुनर्वसनाचा विचार करावा लागतो. सुरुवातीला या बाबतीत मुलगे-मुलींत फरक केला जायचा, आता खूप सकारात्मक बदल होताहेत. त्यामागं डॉमनिकचं गुडविल होतं. सरकारही चांगला पाठिंबा देतंय. कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल, अशा मलाना नावाच्या गावात जायची वेळ दोन वर्षांपूर्वी माझ्यावर आली होती. इथले गावकरी स्वत:ला आर्यवंशीय समजतात. आजही तिथं त्यांचे नियम पाळावेच लागतात. गेल्या ५-६ वर्षांत गावाची थोडी प्रगती होतेय. तिथल्या पॅरॅलिसिस झालेल्या मुलीच्या हातासाठी स्प्लिंट तयार करायचं होतं. ते एका दिवसात मिळणं शक्य नसल्यानं तिचं माप घेऊन तिच्या घरी जाऊन लावायचं ठरलं. त्यानुसार सहकारी आणि स्थानिकासह गावात पोहचले. गावातले अगम्य पारंपरिक नियम सांभाळण्याच्या दिव्यातून वाट काढून त्या मुलीला मदतीचा हात दिला, तो अनुभव अविस्मरणीय होता..

द हँडिमाचल प्रोजेक्ट या आमच्या संस्थेचं मेन सेंटर कुलूमध्ये असल्यानं दीड वर्षं तिथं राहिले. त्यानंतर छानशा लाकडी घरात, पहाडांच्या कुशीत राहण्याचं माझं स्वप्न मनालीतल्या अलिओ गावातल्या घरामुळं पूर्ण झालंय. मी दोन्हींकडं जा-ये करते. इथं आल्यावर सुरुवातीला पेइंगगेस्ट म्हणून राहिले. पहिले तीन आठवडे आई-बाबाही माझ्यासोबत राहिले होते. परतताना बाबांना पहिल्यांदा रडताना पाहिल्यावर अस्वस्थ झाले.. दादानं धीर दिल्यावर हळूहळू सावरले. नंतर आई-बाबा सलग तीन महिन्यांनी यायचे. पुढं ते कमी होत जाऊन आता मीच घरी जाते. स्थानिकांना हिंदी भाषा समजली तरी, मला पहाडी भाषा समजून घ्यायला थोडा वेळ लागला. सफाईनं बोलता आलं नाही, तरी कळतं. इथं येऊन खाण्यापिण्याचे नखरे बंद झालेत. स्वयंपाक करणं आवडतंय. अॅडव्हान्स माउंटेनियरिंगसारखे कोर्सेस आणि हिमालय एक्सपीडिशन केलंय. संस्थेचा कायम सपोर्ट मिळालाय. मी स्ट्राँग नि इंडिपेण्डण्ट झालेय. मात्र इथल्या कामाविषयी अजून ठामपणं काही ठरवलेलं नाहीये. एकीकडे सह्य़ाद्रीच्या डोंगररांगा खुणावताहेत.. माझ्यामागं इथलं काम थांबू नये, असं वाटल्यानं त्या संदर्भातली योजना आखू लागलेय. परतले तरी मुंबईत राहाणं कठीण दिसतंय.. त्याऐवजी छोटय़ाशा शहरात, निसर्गसान्निध्यात काम करायला आवडेल. आमच्या पिढीत ‘बॅक टू रुट्स’चा ट्रेण्ड हळूहळू वाढतोय.. हेही एक लाइफसर्कलच.. ‘परदेशात जाऊन करिअर करणं’ ही यशाची व्याख्या बदलतेय.

गेल्या वर्षी मला ‘द अमेरिकन अॅकॅडमी ऑफ सेलेब्रल पल्सी अॅण्ड डेव्हलपमेंट मेडिसिन’तर्फे आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाल्यानं त्यांच्या टेक्सासमधल्या परिषदेला हजर राहाता आलं. एका सत्रामध्ये आम्ही अॅडाप्टेड डिझाइन्सबद्दल बोलत होतो. काहींचं हायटेक डिव्हाइसेसविषयी बोलणं ऐकल्यावर त्यावर मी विकसनशील देशांमधल्या या संदर्भातल्या परिस्थितीचा मुद्दा मांडला. त्यानंतर एका प्रोफेसरनी ‘तू या विषयावर पुढच्या वर्षीच्या कॉन्फरन्समध्ये मत मांड’ असं आवर्जून सांगितलं. ही गोष्ट इथंच नाही संपली.. माझ्या स्कॉलरशिप मेंटॉरनं स्वत:हून पुढाकार घेतला. आम्ही त्या प्रेझेंटेशनसाठी प्रपोजल पाठवलंय. ते मंजूर झाल्यास पुढल्या वर्षी प्रेझेंटेशन सादर करू. त्यानंतर आणखी एखादा टर्निंग पॉइंट येईलही ..! अरेरे मला हलवून छोटीनं तंद्रीतून जागं केलं.. तिनं व्यवस्थितपणं पेन्सिल पकडली होती.. टर्निग पॉइंट!

श्रुती मोरे,
कुलू
(शब्दांकन -राधिका कुंटे)

‘ती’चं विश्व, ‘ती’चं अवकाश, ‘ती’चं करिअर, ‘ती’चा ध्यास.. त्यासाठी तिला घरापासून दूर जावं लागतं. देशी-परदेशी.. आपल्या अनुभवांची टिपिकल चौकट ओलांडताना कोणकोणते अनुभव बांधते ती गाठीशी? कशी वावरते, राहते परक्या प्रांतात.. कशी अॅडजस्ट करते त्या संस्कृतीत स्वत:ला.. काय काय जाणवतं तिला.. ते या सदरातून वाचायला मिळणार आहे.
तुम्ही स्वत: किंवा तुमच्या आसपासच्या १८ ते ३० वयोगटातल्या, वेगळ्या प्रांतात, नवख्या देशात, वेगळी वाट निवडून शिक्षण, जॉबच्या निमित्तानं दुसऱ्या राज्यात किंवा परदेशात राहणाऱ्या मुलींची किमान बेसिक माहिती तिच्या संपर्क क्रमांकासह आम्हाला नक्की पाठवा. ई-मेल लिहिताना विषय म्हणून ‘विदेशिनी’ कॉलमसाठी असा उल्लेख जरूर करा. त्यासाठी आमचा ई-मेल आहे – viva.loksatta@gmail.com