रंगांच्या यादीमध्ये नवं वर्ष अल्ट्रा व्हॉयलेट ही जांभळ्या रंगाची छटा गाजवणार असल्याचं पँटोनकंपनीने नुकतंच जाहीर केलं. अर्थात हा फक्त इतर रंगांप्रमाणे ट्रेंडमध्ये येणारा एखादा रंग नाही. तर या रंगाच्या निमित्ताने नवं वर्ष कल्पनाशक्ती आणि नव्या प्रयोगांचं असेल, या विचारावरही शिक्कामोर्तब झालं आहे.

तुम्ही एखाद्या चित्रामध्ये कधीतरी रात्रीचं चांदण्यांनी भरलेलं आकाश रंगवलं आहे? किंवा पाहिलं आहे? अवकाशाचा रंग काळा आहे हे माहीत असूनही चित्रकाराच्या कल्पनेतील चांदण्यांनी भरलेल्या आकाशाला हलकीशी जांभळट छटा असते. आकाशाच्या काळ्या उदासीनते पलीकडे कुतूहलता, स्वप्नांची दुनिया रंगवण्यात हाच जांभळा रंग कारणीभूत असतो. त्यामुळेच कार्टून्सच्या दुनियेत आकाशालाही गडद जांभळी छटा आवर्जून दिली जाते. ‘पँटोन’ कंपनीने २०१८चा ‘कलर ऑफ द इयर’ जाहीर केला, तेव्हा त्यांनीही हाच विचार स्पष्ट केला. ‘अल्ट्रा व्हॉयलेट’ ही जांभळ्या रंगाची काहीशी गडद छटा पुढचं वर्ष गाजवणार, यावर या कंपनीने नुकतंच शिक्कामोर्तब केलं आहे. अर्थात रंगांच्या विश्वातील ‘पँटोन’ कंपनीचं स्थान आणि त्यांनी जाहीर केलेल्या ‘कलर ऑफ द इयर’ रंगाचं महत्त्व याबद्दल आपण वर्षांच्या सुरुवातीला बोललो आहोतच. या सदराची सुरुवातीला एका रंगाने सुरू झाली होती ती साखळी वर्षांच्या शेवटी एका दुसऱ्या रंगाने संपण्याच्या वाटेवर आहे, हाही योगायोग यानिमित्ताने जुळून आलाय. पण केवळ एका कंपनीचा शिक्का लागलेला एक रंग इतकंच या जांभळ्या रंगाचं महत्त्व नाही. ‘पँटोन’ वर्षभराच्या घडामोडी, घटना यांचा अभ्यास करून रंगाच्या माध्यमातून दिसणाऱ्या, जाणवणाऱ्या समाजाचं सूचक प्रतिनिधित्व करत असते. त्यामुळे फक्त रंग म्हणून दुर्लक्षित करण्याऐवजी याची दखल घेणं महत्त्वाचं आहे.

Netanyahu
अग्रलेख: मिरवण्याच्या मर्यादा!
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती
Gold Silver Price
Gold-Silver Price on 23 March 2024: होळीच्या पूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात घसरण, खरेदी करण्याआधी पाहा आजचे दर
Tandlyachya pithache sandge recipe
झटपट दुप्पट फुलणारे तांदळाचे सांडगे; ‘या’ पद्धतीन बनवा कुरकुरीत सांडगे

२०१७ हे वर्ष ‘ग्रीनरी’कडे म्हणजेच हिरव्या रंगाकडे नेतृत्व देताना येणारा काळ पर्यावरण आणि त्याविषयक चर्चेचा, जागृतीचा असेल हे ‘पँटोन’ने स्पष्ट केलं होतं. आणि खरोखरच यावर्षी अगदी पॅरिसच्या ‘ग्लोबल वॉर्मिग’ सभेपासून पर्यावरण हा विषय वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या स्वरूपात चर्चिला गेला. अगदी फॅशन क्षेत्रातसुद्धा पर्यावरणस्नेही कापड, रंग आणि इतर साहित्य वापरण्याकडे डिझायनर्सनी प्राधान्य दिलं. अगदी जुन्या टाकून दिलेल्या कपडय़ांच्या पुन:वापराकडे यंदा भर दिला गेला. २०१६ ला एकाऐवजी रोझ क्वाझ आणि सेरेनीटी या दोन रंगांना वर आणताना गुलाबी आणि निळ्या रंगाकडे असलेलं मुलगी आणि मुलगा हे प्रतिनिधित्व हातात हात घालून पुढे जाणार असल्याचं त्यांनी नमूद केलं होतं. त्या वर्षीपासून स्त्री-पुरुष समानता, लिंग भेदाविरोधीच्या चळवळी वाढल्याचं आवर्जून पहायला मिळालं. या पाश्र्वभूमीवर केवळ रंग म्हणून अल्ट्रा व्हॉयलेटकडे दुर्लक्ष करणं चुकीचं ठरेल. गेल्या वर्षी हातात हात घालून उभ्या असलेल्या लाल आणि निळ्या रंगाच्या छटेच्या एकत्रीकरणातून या व्हॉयलेट रंगाचा जन्म झाला आहे. त्यामुळे साहजिकच हा रंग लिंग, जात, प्रांत, देश, भाषा हा भेद ओलांडून गेला आहे. त्याच्यासमोर नव्या संधीचं नवं आकाश उभं राहील आहे. त्याकडे उद्याचा तरुण झेपावतो आहे, हे हा रंग सांगतो. गेल्या वर्षभरात फेमिनिझमच्या चळवळींना मिळालेला सकारात्मक प्रतिसाद, जगभरातील शोषित, उपेक्षित लोकांसाठी तरुणांनी उठवलेला आवाज, #metoo सारख्या चळवळीतून शोषितांनी न्याय मागण्याचं केलेलं धाडस, समलिंगी चळवळीचे वारे यातून नवा तरुण जुन्या नकारात्मक बाबींना मागे सारून नवे बदल स्वीकारत असल्याचं दिसून आलं. ‘अल्ट्रा व्हॉयलेट (पॅन्टोन १८-३८३८)’ ही छटा समोर आणताना कंपनीने हा रंग नवीन कल्पनाशक्ती, नावीन्य, प्रयोगशीलता आणि नव्या आव्हानांचं प्रतीक असल्याचं स्पष्ट केलं. तंत्रज्ञान, शिक्षण, विज्ञानाच्या प्रगतीमुळे सध्याच्या जगाचा वेग प्रचंड वाढला आहे. जुन्या पद्धतींना चिटकून राहण्याऐवजी प्रत्येक वेळी नवीन कल्पना, नवीन युक्त्या अमलात आणण्याची गरज आज आहे. यासाठी आपल्या विचारांची सीमाही विस्तारण्याची गरज आहे. जांभळा रंग हा याच नावीन्यतेचं प्रतिनिधित्व करतो. उष्ण रंगातील लाल आणि शीतल रंगांच्या गटातील निळा या दोन रंगांच्या एकत्रीकरणातून जांभळा रंग तयार होतो. त्यामुळे या रंगाला उष्ण रंगाचा प्रचंड वेग, ऊर्जा, उत्साह आहेच. पण निळ्या रंगाची शांतता, स्थिरतासुद्धा आहे. विशेषत: जांभळा रंग म्हटल्यावर इंग्रजीमध्ये पर्पल आणि व्हॉयलेट हे दोन गट पडतात. पर्पल रंगामध्ये लाल रंगाचे प्रमाण जास्त असते. तर व्हॉयलेट रंग निळ्याकडे अधिक झुकतो. ‘अल्ट्रा व्हॉयलेट’ रंग निवडण्यामागे हेही एक मुख्य कारण आहे. या रंगातील निळ्याच्या प्रभावाने हा रंग आध्यात्मिक अंगाकडेसुद्धा काहीसा झुकतो. म्हणजेच प्रगती, यशाच्या स्पर्धेसोबतच कुठेतरी स्वत:चा आनंद, विरंगुळा शोधण्याकडेसुद्धा ही पिढी झुकत असल्याचं कंपनीच सर्वेक्षण आहे. अर्थात यावर्षी जागतिक पातळीवर फॅशन क्षेत्रातील घडामोडींसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘बिझनेस ऑफ फॅशन’ या मासिकाच्या सर्वेक्षणात आजची पिढी महागडे लेबल, ब्रँडेड वस्तू यांच्यापेक्षा नवीन अनुभव गाठीशी बांधण्याला पसंती देत असल्याचे समोर आले. एखादी उंची वस्तू, कपडे खरेदी करण्यापेक्षा अनोळखी प्रदेश पालथा घालणं, नवे मित्र-माणसं जोडणं, एखादी कला शिकणं याकडे तरुणाईचा कल असल्याचे हा सर्वेक्षण सांगतो. जांभळा रंग याच तरुणाईचं प्रतिनिधित्व करतो.

आता एक रंग म्हणून या छटेकडे पाहिलं तर लक्षात येईल, जांभळा रंग शक्यतो सगळ्या रंगांसोबत छान दिसतो. त्याची कोणती शेड वापरता हे तितकंच महत्त्वाचं आहे. नाजूक, फिकट लव्हेंडर छटा सध्या ब्राइडल लुक्समध्ये भाव खातेय. एरवीही ही छटा बहुतेक ब्युटी प्रॉडक्टमध्ये आवर्जून पहायला मिळते. अर्थात याला कारण त्याच्यातील नजाकतता. जांभळा रंग रॉयल दिसतो. त्यामुळे इतिहासात कित्येक राज घराण्यातील पेहरावामध्ये हा रंग आवर्जून पहायला मिळतो. आजही ब्रिटनच्या राजघराण्यातील व्यक्ती जांभळ्या रंगाचा कपडय़ांमध्ये आवर्जून वापर करतात. हा जांभळा रंग ऑलओव्हर म्हणूनही वापरता येतो, किंवा दुसऱ्या बोल्ड रंगाशी जोडून कलर ब्लोकिंगची किमया साधता येते. गडद जांभळ्यासोबत फिकट रंग वापरून बोल्ड स्टेटमेंट देता येतं. तर सिल्व्हर किंवा गोल्ड लुकशी जोडून फेस्टीव्ह लुकसुद्धा तयार होऊ  शकतो. जांभळ्या रंगावर एम्ब्रॉयडरीसुद्धा उठून दिसते.

फक्त कपडे नाही तर जांभळ्या स्टोनलाही दागिन्यांमध्ये सध्या बरीच मागणी आहे. तसेच हेअर कलरमध्येही जांभळ्या रंगाची मागणी सध्या वाढते आहे. अर्थात पँटोन फक्त फॅशन विश्वाला नाही, तर इंटिरियर, ब्युटी क्षेत्रालाही डोळ्यासमोर ठेवून रंग जाहीर करते. त्यामुळे यंदा घरचं रंगकाम करणार असाल, किंवा नवे पडदे, चादर घेणार असाल तर जांभळ्या रंगाचा विचार नक्की करा.

viva@expressindia.com