कधी कधी एखादा पदार्थ एखाद्या आडगावात असा काही सापडून जातो की, तो पदार्थ चाखण्यासाठी पुन्हा त्या गावाला जावं असं वाटत राहतं. रेवदंडय़ाच्या पारनाक्यावरील एका हॉटेलात खाल्लेला मारामारी पावहा पदार्थ असाच होता..

खाबू मोशायने अनेकदा अनेक संकल्प केले आणि नव्या वर्षांच्या संकल्पांचं जे काही होतं, ते त्याही संकल्पांचं झालं. त्यातल्या त्यात २०-२५ दिवस टिकलेला संकल्प म्हणजे रोजनिशी लिहिण्याचा! पण या रोजनिशीमुळेच खाबूला चांगलाच दणका बसला आणि त्याने आपल्या आयुष्याचे कोणतेही लेखी पुरावे मागे सोडणं बंदच केलं. त्याचं झालं असं की, कॉलेजात जायला लागल्यावर दोनेक वर्षांनी खाबूने रोजनिशी लिहायचा संकल्प केला. रोजनिशीत सगळं सगळं खरं लिहितात, या ध्येयाने खाबूने ती रोजनिशी भलतीच आरस्पानी लिहिली. मग त्या वेळची खाबूची सगळी ‘श्रीकृष्ण’कृत्यंही त्यात आली. अनेक गोपिकांच्या वर्णनाने भरलेली ती रोजनिशी बरोबर २१व्या दिवशी खाबूच्या जिगरी दोस्ताच्या पिताश्रींच्या हाती लागली. आता स्वत:चा बाप हा औरंगजेब, अफझुलखान वगैरेंच्या मांदियाळीतला असतो, हा नियम दोस्ताच्या बापांनाही लागू होतो, हे खाबूला काय माहीत! खाबूने त्यात फक्त स्वत:बद्दलच लिहिलं होतं, हे त्याच्या दोस्ताचं नशीब. दोस्ताच्या खात्यांची माहिती लिहीत बसला असता, तर दोस्ताची परिस्थिती ‘बाप असुनी मी अनाथ’ अशी झाली असती. नंतर काही खाबू त्या जिगरी दोस्ताच्या घराची पायरी चढला नाही, हे वेगळं सांगायला नको. ही आठवण सांगायचं कारण की, खाबूने यंदाही असाच एक संकल्प केला आहे. तुम्हाला मुंबईतल्या हटके पदार्थाबरोबरच मुंबईजवळच्या ठिकाणी मिळणाऱ्या अनोख्या खाद्यपदार्थाची ओळख करून देण्याचा! संकल्पाची सुरुवात तर खाबू एका वेगळ्याच पदार्थापासून करणार आहे. या पदार्थाचं नाव आहे मारामारी पाव! पदार्थ काही फार भारी आहे, अशातला प्रश्न नाही. पण तो वेगळा आहे, चविष्ट आहे आणि एकदा खाल्ल्यावर पुन्हा खावासा वाटावा असा आहे. अख्ख्या मुंबईत तरी खाबूने हा पदार्थ चाखलेला नाही. तो त्याला खायला मिळाला, तो रेवदंडय़ाच्या एका छोटय़ाशा हॉटेलमध्ये!

अलिबागच्या थोडासा पल्याडचा प्रदेश म्हणजे नागाव, आक्षी, चौल, रेवदंडा.. अलिबागवरून रोह्य़ाला जाताना मध्येच एक वळण घेतलं की, हा रस्ता खाडीवरून एका वेगळ्याच प्रदेशात नेऊन सोडतो. वळणावळणाचा छोटासा रस्ता, दुतर्फा नारळी-पोफळीच्या बागा, छोटी छोटी पण आटोपशीर घरं, आमराया असा हा भाग अष्टागार म्हणून फार प्रसिद्ध आहे. पुलंच्या ‘वाऱ्यावरची वरात’मधल्या ‘आहा, देश कैसा छान..’ या ओळींची आठवण करून देणारा! या प्रदेशाचं आणि खाबूचं खूप गहिरं नातं आहे. खाबूच्या आयुष्यातला सोनेरी काळ खाबूने चौल-रेवदंडा परिसरात घालवला आहे.

तर, मुद्दा असा की, खाबू काही दिवसांपूर्वी (याचा संबंध थर्टीफर्स्टशी लावू नये) चौल-रेवदंडा परिसरात गेला होता. समानशीलांच्या टोळक्यामध्ये रात्र जागवली, तरी पहाटेची दोन तासांची झोप तुम्हाला ताजंतवानं करते, असा हा प्रदेश आहे. त्याचप्रमाणे खाबू पहाटेची दोन तासांची झोप घेऊन साडेआठ-नवाला बाहेर पडला आणि भूक भागवण्यासाठी रेवदंडय़ाच्या दिशेने चालता झाला. चौलवरून रेवदंडय़ाला जाताना रामेश्वराचं मंदिर मागे टाकल्यावर साधारण एक-दीड किलोमीटरनंतर पारनाका नावाचा प्रकार येतो. रेवदंडा येण्याआधीचा हा नाका म्हणजे एक छोटेखानी बाजारपेठ आहे. हा मुख्य पारनाका येण्याआधी २० मीटर डावीकडे एक छोटी गल्ली आत जाते. या गल्लीच्या टोकाला एक बेकरी आहे. या बेकरीसमोरच उमेश स्नॅक्स कॉर्नर नावाचं एक छोटेखानी हॉटेल आहे.

खाबूने या हॉटेलबद्दल खूप ऐकलं होतं. या हॉटेलमधली वडा-उसळ अनेक हॉटेलांच्या तोंडात मारेल, अशी असते. खाबूदेखील वडा-उसळ खायच्या इराद्याने ‘उमेश’ची पायरी चढला आणि आतमध्ये चालता झाला. हॉटेलच्या बाहेरच्या बाजूला भल्यामोठय़ा कढईत उकळतं तेल.. भज्यांचा आणि वडय़ांचा घाणा तत्परतेनं भरून काढणारा एक पोऱ्या.. त्यामुळे हॉटेलात शिरता शिरताच त्या घमघमाटाने तोंडाला पाणी सुटलंच पाहिजे. आतमध्ये साधारण सहा टेबलं जेमतेम मावतील, एवढीच जागा. त्या सहांपैकी एका टेबलावर खाबू बसला आणि त्याने भिंतीवरील मेन्यूकार्ड वाचायला सुरुवात केली. त्यात वडा-उसळ पाव यांच्या बरोबरीला मारामारी पाव नावाचा पदार्थ त्याला दिसला. ‘असा मी असामी’तल्या शंकऱ्याप्रमाणे खाबूलाही नावीन्याची भारी हौस! या हौसेपोटी खाबूने लहानपणी अनेकदा प्रचंड मारही खाल्लाय. तर, खाबूने त्याच्या नावीन्याच्या हौसेला जागत वडा-उसळ नेक्स्ट टाइम म्हणत हॉटेलातल्या पोऱ्याला मारामारी पावाची ऑर्डर दिली आणि आसमंत न्याहाळू लागला. रेवदंडा आता काही पूर्वीसारखं गाव राहिलं नसलं, तरी रेवदंडय़ाच्या मानाने हॉटेलात बरीच स्वच्छता आहे. एका भिंतीवर ‘उमेश स्नॅक्स कॉर्नर’च्या हयात नसलेल्या मालकांचे फोटो टांगले होते. भिंतीवर टांगलेल्या फोटोंखाली त्या फोटोंमधल्या व्यक्तींची नावंही लिहिली होती. आद्य मालकाचं आडनाव कुशवाह असं होतं, हे वाचून खाबूने मनातल्या मनात हात जोडले.

एवढय़ात त्या पोऱ्याने एक लालजर्द रस्सा असलेली प्लेट आणि एक पावाची प्लेट खाबूसमोर आणून ठेवली. त्या रश्शाचा घमघमाट नाकात शिरल्यावर खाबूच्या जोडलेल्या हातांबरोबर डोळेही मिटले आणि खाबू काही क्षण हरवला. समोरच्या पदार्थाचं दर्शन घेण्यासाठी खाबूने डोळे उघडले, तर तो पोऱ्या खाबूकडे खुळ्यागत बघत होता. ‘हे कोण चक्रम’  किंवा ‘च्यायला, भलताच सश्रद्ध दिसतोय’ यांपैकी एका भावाने त्याने खाबूकडे कटाक्ष टाकला. खाबूला त्याच्याशी काहीच देणंघेणं नव्हतं. खाबूने निमूटपणे त्या प्लेटच्या बाजूच्या रकान्यातील लिंबू हळूच त्या रश्शावर पिळलं आणि कांदा त्यात टाकला. पावाचा तुकडा तोडून त्याने रश्शात बुडवला. तेलाच्या तवंगाखाली कांदा भजी आणि वडा यांचं अद्वैत उसळीबरोबर नांदत होतं. खाबू डाएट कॉन्शस वगैरे नसला, तरी एवढं सगळं तेल म्हटल्यावर त्याला ती गुलाबी रंगाची जेल्युसिलची गोळी दिसायला लागली. पण समोरच मसाला सोडय़ाची बाटली दिसल्यावर खाबूने बिनधास्त त्या पावाच्या तुकडय़ासोबत भजी-वडा यांचा तुकडा तोडून एक घास घेतला. भजी-वडा-उसळ हा कॉम्बो नुसती मारामारी नाही, तर दंगा करतो. खाबूने हाता-तोंडाची लढाई करत ती मारामारी पोटात रिचवली आणि एक मसाला सोडा ऑर्डर करून तो शांत झाला.

मुंबईतल्या ज्यूस सेंटरवर गंगा-जमुना नावाचा एक प्रकार मिळतो. संत्र आणि मोसंबी यांचा एकत्रित ज्यूस  अशा या गंगा-जमुनापुढे रेवदंडय़ाची ही ‘मारामारी’ भलतीच भारी आहे.  चौल-अलिबाग-रेवदंडा वगैरे परिसरात खास मारामारी पाव खायला जायलाच पाहिजे असं काही नाही. तरीही या भागात गेलात, तर आवर्जून ‘उमेश स्नॅक्स कॉर्नर’ गाठून हा मारामारी पाव खायलाच हवा. तसा हा पदार्थ रेवदंडय़ातच इतरही काही हॉटेलांमध्ये मिळतो. पण आग्य््राात प्रत्येक हलवायाकडे मिळणाऱ्या पेठय़ाच्या बाबतीतही एखादा हलवाई भलताच प्रसिद्ध असतो. उमेश स्नॅक्स कॉर्नरचं तस्संच आहे.

  • कुठे : उमेश स्नॅक्स कॉर्नर, पारनाका, रेवदंडा.
  • काय खाल : मारामारी पाव, वडा-उसळ पाव.
  • कसे जाल : अलिबागवरून मुरुडला जाताना चौल नाका लागतो. या नाक्यावरून रेवदंडय़ाच्या दिशेने वळल्यावर साधारण दोन किलोमीटरवर पारनाका आहे. पारनाका येण्याआधी डाव्या बाजूला एक छोटी गल्ली आहे. गल्लीच्या तोंडाशी बेकरी आहे. गल्लीत वळलात की, लगेचच डाव्या हाताला उमेश स्नॅक्स कॉर्नर आहे.

viva@expressindia.com